Newsworldmarathi Pune : पर्यावरण विज्ञान आणि जैव-वैद्यकीय क्षेत्रातील जागतिक संशोधनासह भरीव योगदानासाठी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना ‘भारत भाग्य निर्माता पुरस्कार २०२४’ नुकताच प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथे झालेल्या सोहळ्यात केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) व पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचा सन्मान करण्यात आला. प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी औद्योगिक क्षेत्रात २० वर्षांहून अधिक, तर शिक्षण क्षेत्रात ३० वर्षांहून अधिक काळ योगदान दिलेले आहे. ‘भारत२४’ संस्थेतर्फे हा पुरस्कार सोहळ्याचे व भारत भाग्य निर्माता परिषदेचे आयोजन केले होते.
या परिषदेमध्ये शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना सन्मानित करण्यात आले. आजवर केलेल्या कार्याचा गौरव करतानाच भविष्यातील प्रगतीसाठी प्रोत्साहन देणारा हा पुरस्कार आहे. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री जीतनराम मांझी, केंद्रीय कायदा व न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, सांस्कृतिक व पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, माजी सनदी अधिकारी व उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार अवनीश कुमार अवस्थी, आचार्य प्रमोद कृष्णम आदी याप्रसंगी उपस्थित होते.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया हे जागतिक स्तरावर प्रसिद्ध शिक्षणतज्ञ, जागतिक प्रशिक्षक, उद्योग आणि व्यवस्थापन व्यावसायिक, दूरदर्शी आणि परोपकारी व्यावसायिक म्हणून प्रख्यात आहेत. बालवाडी ते पदव्युत्तर आणि संशोधन स्तरापर्यंत ज्ञानवर्धक, आरोग्यदायी शैक्षणिक वातावरणाद्वारे शांतता आणि सुसंवाद साधण्यासाठी सर्व सामाजिक स्तरांच्या सर्वांगीण विकासासाठी परवडणाऱ्या शुल्कात दर्जेदार शिक्षण देण्यासाठी ते कार्यरत आहेत. त्यांनी पर्यावरणशास्त्र आणि जैव-वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल १०० हून अधिक राष्ट्रीय आणि ५० आंतरराष्ट्रीय पेटंट मिळवले आहेत. त्यांनी सन १९८३ मध्ये गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला पुन्हा सक्षम होण्यासाठी ‘क्वाड्रिसेप्स एक्सर्साइझर अँड नी बेंडर’ ही प्रणाली विकसित केली असून, या संशोधनासाठी त्यांना देशाचे तत्कालीन सरन्यायाधीश वाय. व्ही. चंद्रचूड यांच्या हस्ते सन्मानित केले होते.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया सन १९८३ पासून दिव्यांगांच्या पुनर्वसनात सक्रियपणे सहभागी आहेत. त्यांनी अत्यावश्यक वैद्यकीय सहाय्य देण्यासाठी हाडांची तपासणी शिबिरांसह अनेक आरोग्य तपासणी शिबिरे, एड्स जनजागृती शिबीर आदी आयोजित केली आहेत. जागतिक पर्यावरण संशोधनातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. सूर्यदत्त शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गेल्या २५ वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात योगदान दिले आहे. मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांचा एक समूह असलेल्या ‘सूर्यदत्त’मध्ये केजी टू पीजी शिक्षण दिले जाते. शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम उपल्बध आहेत. संशोधन व प्रशिक्षण केंद्र, इनोव्हेशन सेंटर यातून संशोधनात्मक शिक्षणावर भर दिला जात आहे.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी परिषदेमध्ये उपस्थित मान्यवरांची भेट घेत चर्चा केली. गजेंद्रसिंह शेखावत यांनी ‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थ्यांना कुंभमेळा स्वयंसेवक, कार्यक्रम व्यवस्थापक यांमध्ये सहभागी होण्यासाठी सुचवले. त्याबद्दल प्रा. डॉ. चोरडिया यांनी इतकी मोठी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शेखावत यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
याप्रसंगी बोलताना प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “पर्यावरण संवर्धनासाठी केलेल्या कार्याचा गौरव नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते झाला, याचा आनंद आहे. संस्थेच्या कॅम्पसमध्ये अनेक पर्यावरणपूरक प्रकल्प राबविण्यात येत आहेत. यामध्ये सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असतो. पर्यावरण संवर्धनासाठी महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गोवा, तेलंगणा आणि इतर अनेक राज्यांत हजारो शिक्षक व विद्यार्थ्यांसह जनजागृती फेरी काढली आहे. त्यातून ‘पाणी वाचवा, राष्ट्र वाचवा’, ‘स्वच्छ भारत, हरित भारत’, ‘वीज बचत करा’, ‘झाडे लावा, प्लास्टिक पुनर्वापर करा’, ‘कचऱ्यापासून खतनिर्मिती’ आणि इतर पर्यावरणीय उपक्रमांवर भर दिलेला आहे. ‘स्वच्छ, हरित, पर्यावरणप्रेमी कॅम्पस’ म्हणून ‘सूर्यदत्त’ची ओळख आहे.”