Newsworldmarathi mumbai : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने राज्यात खळबळ उडवली असून, या प्रकरणात अद्यापही तपास सुरू आहे. पोलिसांनी काही आरोपींना अटक केली असली तरी काही आरोपी अजूनही फरार असल्याचे समजते. याच प्रकरणात वाल्मिक कराड यांचे नाव चर्चेत आले आहे. पवनचक्की प्रकल्पातील दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात कराड यांना अटक झाली असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचा सहभाग असल्याचे आरोप विरोधकांनी केले आहेत. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांनी कराड यांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही विरोधकांकडून होत आहे. यामुळे धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागण्याचा मुद्दा चर्चेत आला आहे.
धनंजय मुंडे यांनी मात्र या आरोपांवर स्पष्ट भूमिका घेत, “माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. राजीनामा द्यावा तर त्यासाठी काही ठोस कारण असणे आवश्यक आहे,” असे सांगत आरोप फेटाळून लावले आहेत. विरोधकांच्या मागण्या आणि या प्रकरणाची चौकशी पुढे कशा प्रकारे जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.