Newsworldmarathi Pune : पुण्यातील युवा उद्योजक पुनीत बालन यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल स्वर झंकार महोत्सवात रसिकाग्रणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पं. अतुलकुमार उपाध्ये, पं. विजय घाटे आणि पद्मश्री हरिहरन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
देशात सर्वाधिक शहरांमध्ये स्वर झंकार संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते. पुण्यात या महोत्सवाचे सोळावे वर्ष आहे. संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांनी या महोत्सवात वादन केले आहे. याच मोहत्सवात पुनीत बालन यांच्या विविध क्षेत्रातील अतुलनीय अशा सामाजिक कार्याची दखल घेऊन उपाध्ये व्हायोलिन वादन विद्यालयाच्यावतीने स्व. दाजी काका गाडगीळ यांच्या स्मरणार्थ रसिकाग्रणी हा मानाचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याप्रसंगी जावेद अली, राहुल देशपांडे, राजस उपाध्ये आणि तेजस उपाध्ये यांचीही उपस्थित होती.
बालन यांनी त्यांच्या मातोश्री इंद्राणी बालन फाऊंडेशनच्या माध्यमातून काश्मीर खोऱ्यात भारतीय सैन्य दलाच्या बंद पडलेल्या १५ शाळांचे नूतनीकरण करून त्या पुन्हा सुरू करून त्या चालविण्यासाठी लष्कराबरोबर सामंजस्य करार केला आहे. याशिवाय दिव्यांग विद्यार्थ्यांची शाळा ते चालवतात. अतिरेकी हल्यात बळी गेलेल्या मुलांना खेळापासून विविध प्रकारची मदतही बालन यांच्या फाऊंडेशनच्या माध्यमातून आणि वैयक्तिकरित्याही केली जाते. याशिवाय उदयोन्मुख खेळाडूंना विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी लागणारी सर्वोतोपरी मदतही ‘पुनीत बालन ग्रुप’च्या माध्यमातून ते करतात. काश्मीरमध्ये सर्वांत उंचीचा तिरंगा ध्वज उभारण्याचे काम त्यांनी केले. याशिवाय गरजु रुग्णांना मदत, वेगवेगळ्या मोहत्सवाबरोबरच धार्मिक कार्यातही बालन यांच्याकडून नेहमीच मोलाचे मदत कार्य केले जाते.
हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’चे उत्सवप्रमुख आणि विश्वस्त म्हणून काम करत असताना कोविड महामारीच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सवाला मदतीचा हात देण्याचे मोठे काम बालन यांनी केले. त्यांच्या याच वेगवेगळ्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना स्वर झंकार मोहत्सवात सन्मानित करण्यात आले.
‘‘स्वर झंकार संगीत महोत्सवात ‘रसिकाग्रणी’ पुरस्काराने सन्मान झाल्याने मनस्वी आनंद झाला. मी करत असलेल्या समाज कार्यासाठी या पुरस्काराने भविष्यात अधिक चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी निश्चितपणे प्रोत्साहन मिळाले असून या पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल मी आयोजकांचा मनापासून आभारी आहे.’’
– पुनीत बालन, युवा उद्योजक