Newsworldmarathi Pune : “बदलणारा काळ माणसाच्या समोर सतत नवी आव्हाने उभी करत असतो. त्याचप्रमाणे समाजातील प्रश्न, समस्यांचे स्वरूपही बदलत असते. त्यांचा सामना करण्यासाठी आधुनिक काळात सेवाभावाला व्यावसायिकतेची जोड देऊन, सामाजिक उपक्रम करण्याची गरज आहे”, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले. समाजमानस समजून घेण्यासाठी आधी त्या समाजाच्या पोटाचा प्रश्न सोडवला पाहिजे, असेही प्रा. मिलिंद जोशी म्हणाले.
विद्यार्थी साहाय्यक समितीच्या माजी कार्यकारी विश्वस्त वसुधा परांजपे यांच्या स्मृत्यर्थ समिती आणि परांजपे कुटुंबियांच्या वतीने सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल मुक्तांगण व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राच्या संचालक मुक्ता पुणतांबेकर, ‘जीवितनदी’च्या संस्थापक संचालक शैलजा देशपांडे यांना ‘वसुधा परांजपे स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. देशपांडे यांचा पुरस्कार मृणाल वैद्य यांनी स्वीकारला. प्रत्येकी ५० हजार रुपये, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. तसेच समितीच्या पाच गरजू विद्यार्थिनींना प्रत्येकी १० हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येते. दिव्या कुलकर्णी, साक्षी मोरे, राधा गडशिला, तन्मयी मोरे आणि सानिका दांगट यांना ही शिष्यवृत्ती देण्यात आली. याप्रसंगी प्रा. प्र. ना. परांजपे, समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर यांच्यासह समितीचे विश्वस्त, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, “कार्यकर्त्यांचे मोहोळ पुण्याची ख्याती होती. मात्र, सध्या सेवाभावी कार्यकर्त्यांचा दुष्काळ जाणवतो आहे. सेवाभाव अंतःकरणातून प्रकटतो. त्यासाठी कार्यकर्त्यांची विशिष्ट जडणघडण व्हावी लागते. तसे सामाजिक, कौटुंबिक, राजकीय पर्यावरण आता राहिले नसल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. आयुर्मान वाढत असल्याने पिढ्यांमधील वैचारिक संघर्षांनी निराळी रूपे घेतली आहेत. साधेपणाचे मूल्य हरवले आहे. मध्यमवर्ग आत्ममग्न झाला आहे. सेवाकार्याचे निकष बदलले आहेत. या परिस्थितीतही ज्यांनी सामाजिक सेवाभावाचा वारसा जपला आणि समर्थपणे पुढे नेत आहेत, त्या मुक्ता पुणतांबेकरांचा सन्मान औचित्यपूर्ण ठरतो. तसेच विकासाच्या विपरीत कल्पनांच्या मागे धावताना पर्यावरणाचा विनाशकारी घटकांविरोधात संघर्ष करणाऱ्या शैलजाताईंचाही गौरव महत्त्वाचा आहे.”
मुक्ता पुणतांबेकर म्हणाल्या, “समितीचा आणि अवचट कुटुंबियांचा स्नेह जुन्या काळापासून आहे. हा पुरस्कार वैयक्तिक नसून, संपूर्ण मुक्तांगण टीमचा पुरस्कार आहे, हीच माझी भावना आहे. मुक्तांगणमधील शैक्षणिक कार्यासाठी या पुरस्काराची रक्कम वापरली जाईल. मुक्तांगण केंद्रासाठी ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी प्रथम साह्य केले होते. केंद्राचे नावही पुलंनीच सुचवले होते. रुग्णांकडूनच शिकण्याची प्रक्रिया इथे आजही सुरू आहे. मद्यपान, अमली पदार्थांच्या जोडीने नव्या काळात स्क्रीनचे नवे व्यसन भयावह रूप धारण करत आहे. तसेच अगदी कोवळ्या वयात व्यसनाधीन होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे केंद्राच्या उपचारपद्धती काळानुरूप बदलत आहेत. या पुरस्कारामुळे सुरू असलेल्या कार्यासाठी एक पाठिंबा मिळाला आहे, ही भावना मनात आहे”.
शैलजा देशपांडे यांनी दृकश्राव्य स्वरूपात मनोगत मांडले. ‘समाजामध्ये नदीसाक्षरता निर्माण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू राहतील’, असे त्या म्हणाल्या. प्रा. विजया देव आणि डा. उज्ज्वला बर्वे यांनी परिचय करून दिला. तुषार रंजनकर व खजिनदार संजय अमृते यांनी वसुधा परांजपे यांच्या आठवणींना उजाळा दिला. समितीच्या कार्याची माहिती देणारी ध्वनिचित्रफीत यावेळी दाखवण्यात आली. सानिका जोशी यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.