Newsworld Mumbai : Ajit pawar |महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याबाबतचा निर्णय आज (4 डिसेंबर) होणार आहे. भाजप विधिमंडळ पक्षनेत्याची आज मुंबईत निवड होईल. आज भाजपच्या विधिमंडळ पक्षाची सकाळी 10 वाजता मुंबईत बैठक होणार असून या बैठकीत देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांची विधिमंडळ पक्षनेते पदी निवड होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे फडणवीसांचा पुनरागमनाचा मार्ग मोकळा मोकळा झाला आहे.
सध्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवरून अनेक चर्चांना उधाण आले आहे. शिंदे गट आणि भाजपमध्ये गृहमंत्री पदावरून असलेला वाद हा राजकीय समीकरणांसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्यावरही लक्ष केंद्रित झाले आहे.
अजित पवार हे आपल्या गटासाठी चांगली खाती मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्यांची अद्याप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी भेट न झाल्याने वेगवेगळ्या तर्क-वितर्कांना वाव मिळत आहे. यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातील राजकीय हालचालींमध्ये आणखी काही मोठे बदल दिसू शकतात.
अजित पवारांनी (Ajit Pawar) केलेल्या मागण्यांमुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची होताना दिसत आहेत. अर्थमंत्री पद राष्ट्रवादीकडे कायम राहावे, 7 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रिपदे मिळावीत, तसेच केंद्रात एक कॅबिनेट मंत्री आणि एका राज्यपाल पदाची मागणी ही महत्त्वाकांक्षी आहे. या मागण्या पूर्ण झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा राजकीय वाव मिळू शकतो, जो त्यांच्या ताकदीसाठी उपयुक्त ठरेल.
आज अमित शाह (Amit Shaha) आणि अजित पवार यांची भेट होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या भेटीत या मागण्यांवर चर्चा होऊन काही ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र, भाजप आणि शिंदे गट या मागण्यांना कसा प्रतिसाद देतील, यावरच सत्तेतील बदलांचे चित्र स्पष्ट होईल. राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रित आहे, कारण या बैठकीतून महाराष्ट्राच्या सत्ताकारणावर मोठा प्रभाव पडू शकतो.