Newsworldmarathi Dharashiv : धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाथरूड येथे आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या वधूचे आदरयुक्त स्वागत करण्यात आले आहे. या विवाह सोहळ्यासाठी सासरच्या मंडळींनी अस्मिताला पाथरूड येथून नळी वडगाव फाटा येथील विवाहस्थळी आणण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर पाठवत सर्व पाहुण्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
अस्मिता तिकटे असं वधूचं नाव आहे. अस्मिता ही सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी असून तिच्या लहानपणीच डोक्यावरील आई-वडिलांचे छत्र हरपले आहे. अस्मिताचा मामाने सांभाळ केला आणि तालुक्यातीलच आंतरवलीच्या तरुणाशी लग्न जुळवून या शेतकरी कन्येचा विवाह सोहळा धूमधडाक्यात पार पडला.
लग्नामध्ये चक्क नवरीसाठी पाठवले हेलिकॉप्टर
अस्मिता ही भूम तालुक्यातील पाथरूड या मूळ गावची आहे. तिचा तालुक्यातीलच आकाश शिकेतोड याच्याशी शुक्रवारी विवाह सोहळा संपन्न झाला. या माध्यमातून आई-वडिलांचे छत्र हरपलेली एक अनाथ मुलगी शिकेतोड घराण्याची सून झाली. मुलीचे मामा लहू दासू माने यांनी पालक म्हणून कन्यादान केले. अतिशय भारावून टाकणाऱ्या या सोहळ्यासाठी अंतरवली येथील शेतकरी भास्कर शिकेतोड यांनी त्यांच्या या मुलाच्या लग्नामध्ये चक्क नवरीसाठी हेलिकॉप्टर पाठवले.
मामानी केला सांभाळ
अस्मिताची आई सुशिला व वडील केशव तिकटे यांचे निधन झाले आहे. या दोघांच्या मृत्यूने अस्मिताच्या डोक्यावरील छत्र हरवले होते. मामा लहू दासू माने हेही सर्वसाधारण शेतकरी असताना यांनी अस्मिता हिचा लहानपणापासून सांभाळ करून पोटच्या मुलीप्रमाणे पालनपोषण करून तिचा विवाह थाटामाटात लावून दिला. अस्मिताच्या सासू-सासऱ्यांनीही यापुढील पालकत्व स्वीकारत तिला हेलिकॉप्टरमधून लग्नस्थळी आणून स्वागत केल्याच्या क्षणाने सगळेच भारावून गेले होते.


Recent Comments