Newsworldmarathi Mumbai : Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंगळवारी राजभवनमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर छगन भुजबळ यांची वर्णी लागली. त्यानंतर छगन भुजबळ यांना पुन्हा अन्न व नागरी पुरवठा खाते दिले जाईल, अशी दाट शक्यता वर्तवली जात होती. अखेर याबाबत शासकीय आदेश काढण्यात आला आहे. छगन भुजबळ यांच्याकडे अपेक्षेप्रमाणे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली.
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यानंतर भुजबळांकडील हे खाते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने धनंजय मुंडे यांच्याकडे सोपवले होते. आता पुन्हा एकदा भुजबळांकडे अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मुंडे यांच्याकडे असलेले मंत्रालयातील दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयही भुजबळ यांना देण्यात आले आहे. दरम्यान, छगन भुजबळ यांनी शुक्रवारी आपल्या खात्याची सूत्रे स्वीकारली. त्यांनी शुक्रवारी आपल्या दालनात येऊन विभागाचा आढावाही घेतला. दरम्यान, छगन भुजबळ यांना शासकीय निवासस्थान म्हणून मलबार हिल येथील सातपुडा बंगला देण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना राज्याच्या मंत्रीपदाची शपथ दिली. यावेळी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, विधान परिषदेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. छगन भुजबळ यांना धनंजय मुंडे यांचे खाते मिळणार असल्याची राजकीय चर्चा सुरु होती. आता त्यांना धनंजय मुंडेंचेच खाते मिळाले आहे.


Recent Comments