Newsworldmarathi Pune: यंदा महाराष्ट्रावर जोरदार पावसाची ‘महावृष्टी’ होणार असून, मान्सून आज (२८ मे) संपूर्ण राज्य व्यापणार आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, जून ते सप्टेंबर या काळात राज्यात १०७ ते ११२ टक्के पाऊस पडणार आहे. विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.
जिल्हावार पावसाचा अंदाज:
कोकण: 107%
मध्य महाराष्ट्र: 110%
मराठवाडा: 112%
विदर्भ: 109%
ही माहिती दिल्लीतील पत्रकार परिषदेत पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन आणि हवामान विभागाचे प्रमुख डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी दिली. देशासाठी आधी दिलेला 105% पावसाचा अंदाज आता वाढवून 106% करण्यात आला आहे. हवामान विभागाने यंदा प्रथमच राज्यवार पावसाचे आकडे अधिक स्पष्टपणे सादर केले आहेत.
मुसळधार पावसाचा शेतकऱ्यांवर घाला
राज्यात मागील काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे ४०,९४९ हेक्टर क्षेत्रावरील पीकांचे नुकसान झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये भात, मूग, उडीद, मका, कांदा, भाजीपाला, आंबा, संत्रा, पपई, केळी यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सर्वाधिक नुकसान झालेली जिल्हे (हेक्टरमध्ये):
अमरावती: १२,५६५
बुलडाणा: ६,६९९
जळगाव: ४,५३८
नाशिक: ३,५२३
अहिल्यानगर: १,४४१
इतर जिल्हे: अकोला, लातूर, पालघर, सोलापूर, पुणे, सातारा
कृषी विभागाच्या अहवालानुसार, हवामानाची ही स्थिती पुढेही कायम राहिल्यास नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात भर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.


Recent Comments