Newsworldmarathi Akola: शहरात गुन्हेगारीचा कहर पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय कौसल यांचे धाकटे बंधू आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त अभियंता संजय कौसल (वय 60) यांची थरारक हत्या करण्यात आली आहे. आरोपीचा महेंद्र पवार असं नाव असून तो जामिनावर बाहेर असलेला सराईत गुन्हेगार आहे.
रणपिसे नगरात दिवसाढवळ्या खून
ही घटना अकोल्यातील रणपिसे नगरमधील मुरलीधर टॉवर परिसरात घडली. महेंद्र पवारने धारदार लोखंडी टिकासने संजय कौसल यांच्या डोक्यावर आणि छातीत अनेकवार वार केले, ज्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
गुन्हेगाराच्या पार्श्वभूमीमुळे खळबळ
महेंद्र पवार याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. एका प्रकरणात तो तुरुंगात गेला होता आणि अलीकडेच जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर काही दिवसांतच त्याने ही हत्या केली. जुन्या वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
सीसीटीव्हीत कैद, आरोपी अटकेत
ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी तत्काळ तपास सुरु केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आरोपीला अटक केली आहे.
नव्या एसपींसमोर मोठं आव्हान
विशेष म्हणजे, अकोल्याचे नवीन जिल्हा पोलिस अधीक्षक आर्चित चांडक यांनी नुकतेच पदभार स्वीकारला असून त्यांच्या कार्यकाळातील पहिल्याच आठवड्यातच ही गंभीर घटना घडल्याने प्रशासकीय स्तरावरही खळबळ उडाली आहे.
राजकीय व सामाजिक क्षेत्रात संताप
संजय कौसल हे अकोल्यातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व आणि काँग्रेस नेत्याचे बंधू असल्याने त्यांच्या हत्येने राजकीय व सामाजिक क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांनी पोलिसांकडून अधिक कडक कारवाईची मागणी केली आहे.


Recent Comments