Newsworldmarathi Mumbai: “शिवसेना जमीनदोस्त होणार” या गिरीश महाजन यांच्या विधानानंतर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “शिवसेना संपवणं तुमच्या दहा पिढ्यांना देखील शक्य नाही,” अशा शब्दांत त्यांनी महाजनांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलंआहे.
गिरीश महाजन म्हणजे पक्षफोडाचा दलाल : संजय राऊत
संजय राऊत म्हणाले, “भ्रष्ट, ठेकेदार आणि दबावाचं राजकारण करणारे गिरीश महाजन हे भाजपकडून नेमलेले एक पक्षफोडू दलाल आहेत. पोलीस आणि पैशाच्या जोरावर लोकांना धमकावत ते आमचा पक्ष तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ज्या दिवशी सत्ता आमच्याकडे येईल, त्या दिवशी पक्ष बदलणारा पहिला माणूस गिरीश महाजन असणार, याची खात्री बाळगा.”
“शिवसेनेनेच चड्डीची नाडी बांधायला शिकवलं”
गिरीश महाजन यांना उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना लाज वाटायला हवी, असं म्हणत राऊत पुढे म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने तुम्हाला राजकारणात उभं केलं. शिवसेनेनेच तुम्हाला चड्डीची नाडी बांधायला शिकवलं. आता तुम्ही शिवसेनेला संपवण्याची भाषा करता? ही तुमची ओळख विसरू नका.” असंही राऊत म्हणाले.
“भयग्रस्त महाजन पक्ष सोडायला तयार होते”
“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना गिरीश महाजन यांच्यावर चौकशा सुरू झाल्या होत्या. त्यावेळी ते पक्ष सोडून शांत बसण्याच्या तयारीत होते. निरोप पाठवत होते की ‘मी राजकारणातून बाहेर पडतो.’ हे डरपोक आहेत. त्यावेळी घाबरून गेले होते,” असा गौप्यस्फोट देखील संजय राऊत यांनी केला.
“महाजन, शाह आणि भाजप महाराष्ट्रद्रोही!”
संजय राऊत म्हणाले, “अमित शाह हे शिवसेना संपवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. महाराष्ट्र द्रोही लोकांनी आमचा विचार संपवण्याचा विडा उचललाय. पण शिवसेना विचारांचा पक्ष आहे. हे केवळ काही माणसं फोडून होणारं काम नाही.”
“राजकारण नाचेगिरी नाही”
“गिरीश महाजन यांचा अभ्यास कच्चा आहे. त्यांचं वागणं नाचेगिरीसारखं आहे. पाच माणसं फोडून पक्ष फोडल्याचा दावा करणं हास्यास्पद आहे. नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसमुक्त भारताचा नारा दिला, पण त्यांच्याच काळात काँग्रेस बळकट झाली आणि भ्रष्टाचार वाढला. त्यामुळे भाजपची लाजिरवाणी अवस्था आहे,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला.


Recent Comments