Newsworldmarathi Beed: राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांची राजकीय कारकीर्द सध्या संकटग्रस्त आणि आव्हानात्मक टप्प्यावर आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर राज्यभरात तीव्र संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणात मुंडे यांचे निकटवर्तीय आणि ‘राईट हँड’ म्हणून ओळखले जाणारे वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार गुंतले असल्याचे निष्पन्न झाले. परिणामी, धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.
या घडामोडीनंतर मुंडे यांना बेल्स पाल्सी या आजाराने ग्रस्त केले. शारीरिक आणि मानसिक तणावामुळे ते सार्वजनिक जीवनातून दूर राहिले. जवळपास अज्ञातवासात गेलेल्या मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी इगतपुरी येथे विपश्यना ध्यानसत्रात सहभाग घेतला. याच कालावधीत त्यांच्या डोळ्यांचेही ऑपरेशन करण्यात आले.
विपश्यना पूर्ण केल्यानंतर धनंजय मुंडे सोमवारी बीडमध्ये परतले. त्यांच्या या पुनरागमनाकडे राजकीय वर्तुळासह त्यांच्या समर्थकांचेही लक्ष लागले होते. बीडमध्ये आगमन केल्यानंतर मुंडे यांनी सर्वप्रथम माजलगावचे दिवंगत माजी आमदार आर.टी. देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी लातूर येथे झालेल्या अपघातात देशमुख यांचा मृत्यू झाला होता.
धनंजय मुंडे यांच्या या भेटीद्वारे त्यांनी पुन्हा सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत, असा सूर स्थानिक पातळीवर उमटू लागला आहे. विपश्यना आणि उपचारांमुळे त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याची माहितीही सूत्रांकडून समजते.


Recent Comments