Newsworldmarathi Mumbai: मध्य रेल्वेच्या मुंब्रा आणि दिवा स्थानकादरम्यान आज सकाळी घडलेल्या भीषण लोकल अपघाताने संपूर्ण मुंबई हादरली. या दुर्घटनेत चार प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून, राज्यातील वाढत्या लोकवस्ती आणि नागरी व्यवस्थेच्या अपयशावर कडाडून हल्ला चढवला आहे.
“बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांमुळे शहरांचा धागादोरा सुटला”
पुण्यात पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले, “राज्यात रोज होणाऱ्या अपघातांमागे नियोजनशून्य नागरीकरण आणि बाहेरून येणाऱ्या अनियंत्रित लोंढ्यांचा मोठा वाटा आहे. कोण कुठून येतंय, काय करतंय हे कुणालाच माहित नाही. मुंबईसह राज्यातील शहरांचा बोजवारा उडाला आहे.”
“रेल्वे अपघात ही फक्त यंत्रणांची चूक नाही, ही एक सामाजिक शोकांतिका”
राज ठाकरे यांनी सांगितले की, “मुंब्र्याचं धोकादायक वळण नवीन नाही. प्लॅटफॉर्मवरची गर्दी जीवघेणी आहे. दरवाजे लावले तर लोक गुदमरून मरतील, आणि न लावल्यास फूटबोर्डवरून लटकून प्रवास करावा लागतो. ही स्थिती गंभीर असून तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे.”
रेल्वे मंत्र्यांना राज ठाकरेंचा थेट इशारा
“रेल्वे मंत्री संध्याकाळी एका लोकलमध्ये सामान्य प्रवाशांबरोबर प्रवास करून पाहावं. त्यांच्या डोळ्यांद्वारे खरं वास्तव दिसेल. परिस्थिती सुधारली नाही, तर आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल,” असा इशारा त्यांनी दिला.
शहरांचं विद्रुपीकरण आणि माणसाच्या जीवाची किंमत नाही
“मेट्रो आणि मोनो रेल्वेने प्रश्न सुटणार नाहीत. शहरांमध्ये ट्रॅफिक, पार्किंग, सार्वजनिक वाहतूक सर्व काही ढासळलं आहे. अपघात तर आता रोजचंच झाले आहेत. देशात माणसाच्या जीवाची किंमत शून्य आहे. बंबही पोहोचू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे.”


Recent Comments