Homeबातम्या“मृत्यूचे खापर प्रवाशांवर फोडू नका”; रेल्वे व्यवस्थापनावर शरद पवारांचा संताप

“मृत्यूचे खापर प्रवाशांवर फोडू नका”; रेल्वे व्यवस्थापनावर शरद पवारांचा संताप

Newsworldmarathi Mumbai: मध्य रेल्वेच्या दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान झालेल्या दुर्दैवी अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “प्रवाशांवर त्यांच्या मृत्यूचं खापर फोडून चालणार नाही,” असे स्पष्ट शब्दांत सांगत त्यांनी रेल्वे प्रशासनाला जबाबदार धरले आहे.

शनिवारी सायंकाळी कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये भीषण दुर्घटना घडली. दुसऱ्या दिशेने येणाऱ्या लोकलमुळे दोन ट्रेनमधील अंतर कमी झाल्याने फुटबोर्डवर उभ्या असलेल्या प्रवाशांचा तोल गेला आणि अनेकजण खाली पडले. त्यात सहा जणांचा मृत्यू झाला असून, काही जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शरद पवारांनी ट्विटरवरून भावना व्यक्त करत म्हटले, “या घटनेत मृत्यू झालेल्या निष्पाप प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जखमी प्रवाशांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो. मात्र, ही घटना गंभीर इशारा आहे.”

दररोज मृत्यू… आणि कुणीच जबाबदार नाही?

पवार यांनी यावेळी रेल्वेच्या व्यवस्थापनावरही कठोर टीका केली. “मध्य रेल्वेवर दररोज सरासरी ६ ते ७ प्रवाशांचा मृत्यू होतो हे अत्यंत धक्कादायक आहे. वाढती गर्दी हे मुख्य कारण असतानाही रेल्वे प्रशासन गांभीर्याने उपाययोजना करताना दिसत नाही. अशा दुर्घटनांनंतर जबाबदारी टाळण्याचा प्रकार बंद झाला पाहिजे,” असे ते म्हणाले.
शरद पवारांनी ‘या’ केल्या मागण्या

लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाज्यांची अंमलबजावणी तातडीने करावी
गर्दी कमी करण्यासाठी लोकल फेऱ्या वाढवाव्यात
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात
रेल्वेच्या वेळापत्रकाचे अचूक नियोजन करण्यात यावे
दुर्घटना ही केवळ आकडेवारी नाही

“मृत्यू हे केवळ आकडेवारी नसतात, त्यामागे एक कुटुंब उद्ध्वस्त होतं. म्हणूनच अशा दुर्घटनांवर फक्त आकडे फेकून जबाबदारी झटकणं हा अन्याय आहे,” असे म्हणत पवारांनी रेल्वे प्रशासनाला जागं होण्याचे आवाहन केले.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments