BJP Politics : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मधून हकालपट्टी झालेले नाशिकचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला मंगळवारी (17 जून) दुपारी 1 वाजता मुहूर्त ठरला आहे. मात्र, या प्रवेशापूर्वी रात्री उशिरा पक्षश्रेष्ठींच्या बैठकीत हिरवा कंदील मिळाला असला, तरी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना याची माहितीच नव्हती, यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बडगुजर हजारो समर्थकांसह मुंबईला रवाना झाले असताना, बावनकुळेंच्या अनभिज्ञतेच्या वक्तव्याने पक्षप्रवेशावर टांगती तलवार निर्माण झाली होती.
बावनकुळे काय म्हणाले?
चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, “बडगुजरांच्या पक्षप्रवेशाबाबत मला काहीच माहिती नाही. स्थानिक पदाधिकारी, खासदार आणि आमदारांशी सल्लामसलत न झाल्यास पक्षप्रवेश होत नाही. नाशिकमधील स्थानिक नेत्यांचा बडगुजरांच्या प्रवेशाला विरोध आहे, कारण निवडणुकीत आम्ही एकमेकांविरोधात लढलो आहोत.” स्थानिक पातळीवरील नाराजी आणि गेल्या निवडणुकीतील वैरामुळे बडगुजरांचा प्रवेश रोखला जाऊ शकतो, असे त्यांनी सूचित केले.
बडगुजरांचा आत्मविश्वास
बावनकुळेंच्या वक्तव्याने संभ्रम निर्माण झाला असताना, बडगुजरांनी मात्र आत्मविश्वास दाखवला. “मी मुंबईत गेल्यावर सर्व काही स्पष्ट होईल. सर्व ठरलं आहे, त्याशिवाय मी जातोय का?” असा सवाल त्यांनी पत्रकारांना केला. पक्षश्रेष्ठींच्या रात्रीच्या बैठकीत प्रवेशाला मंजुरी मिळाल्याने बडगुजरांचा मार्ग मोकळा झाला आहे.
नाशिकच्या राजकारणात खळबळ
शिवसेना (UBT) मधून शिस्तभंगाच्या कारणास्तव हकालपट्टी झालेल्या बडगुजरांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, त्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले. मात्र, नाशिकमधील भाजपच्या स्थानिक नेत्यांचा विरोध आणि बावनकुळेंना माहिती नसल्याने हा प्रवेश सावळा गोंधळात सापडला होता. आता पक्षश्रेष्ठींच्या मंजुरीनंतर बडगुजरांचा प्रवेश निश्चित मानला जात असून, यामुळे नाशिकच्या राजकारणात नवे वादळ येण्याची शक्यता आहे.


Recent Comments