Newsworldmarathi Mumbai: राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा करण्याच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरे गट एकत्र येणार आहेत. ५ जुलै रोजी मुंबईत या निर्णयाविरोधात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, या मोर्चात मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र सहभागी होणार आहेत.
या ऐतिहासिक एकत्र येण्याची घोषणा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी केली. यानंतर मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या संवादाची माहिती दिली.
राऊत यांनी सांगितले की, “राज आणि उद्धव ठाकरे यांनी कोणतेही आढेवेढे न घेता एकमेकांच्या भूमिकेचा आदर केला असून, दोघेही मातृभाषेच्या मुद्द्यावर एकमताने पुढे आले आहेत.” त्यांनी याला एक भावनिक आणि भाषिक अस्मितेचा लढा असल्याचे म्हटले.
राज्यातील शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या विरोधात असलेले वातावरण लक्षात घेता, ठाकरे बंधूंचे एकत्र येणे हे राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानले जात आहे. ५ जुलैचा मोर्चा मातृभाषेच्या रक्षणासाठी आणि शैक्षणिक स्वायत्ततेच्या समर्थनार्थ असणार आहे.
या एकत्रित आंदोलनामुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये नवे वळण येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


Recent Comments