Newsworld Pune : हवेत उंचउंच उडणारी विमाने, हेलिकॉप्टर पाहण्याची हौस कोणाला नसते ? लहान मुलांसाठी तर विमाने, हेलिकॉप्टर, रॉकेटचे दर्शन म्हणजे आनंदाची सर्वोत्तम पर्वणीच ! आत्तापर्यंत फक्त पुस्तके, बातम्या व चित्रपटात विमाने, हेलिकॉप्टर व रॉकेट पाहीलेल्या विद्यार्थ्यांनी थेट विमाने, हेलिकॉप्टर व रॉकेटचे मॉडेल प्रत्यक्षात पाहण्याचा आनंद घेतला. इतकेच नव्हे, तर काही काळ विद्यार्थी स्वप्नांपेक्षा प्रत्यक्षात अंतराळाची सफर अनुभवताना त्यामध्ये अक्षरशः हरवुन गेले !
साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे अध्यक्ष पियुष शहा व गंधाली शहा यांच्यावतीने नारायण पेठ येथील सुमारे पन्नास विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिवसानिमित्त शिवाजीनगर येथील महापालिकेच्या “एव्हिएशन गॅलरी’ची सफर घडविण्यात आली. एव्हिएशन गॅलरीमधील विमान, हेलिकॉप्टर, रॉकेट, ड्रोनचे विविध प्रकार, त्यांच्या प्रतिकृती, अंतराळवीर व त्यांच्या रॉकेटचा अंतराळातील प्रवास जाणुन घेताना विद्यार्थी त्यामध्ये हरवुन गेले होते. विद्यार्थ्यांनी विमान उड्डाणाचा इतिहासापासुन ते सध्याच्या युगातील अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त विमान उद्योग क्षेत्राचा प्रवासही यानिमित्ताने जाणुन घेतला. विमान, हेलिकॉप्टर, रॉकेट नेमके कसे उडते ? विमानतळावरुन विमाने नेमकी कशी ये-जा करतात ? जगभरात विमानांचे कोणकोणते प्रकार आहेत ? कोणत्या कंपन्यांची विमाने सध्या आकाशात फिरतात ? भारतीय हवाई दलाची विमाने कशी असतात ? भारतीय अंतराळवीरांचा प्रवास नेमका कसा घडतो ? यांसारख्या मुलांच्या चेहऱ्यावरील अनेक प्रश्नांना या सफरीमध्ये उत्तरे मिळाली. विमानांचे “टेक ऑफ’ ते “लॅंडींग’ पर्यंतचा प्रवासही या निमित्ताने उलगडा. विद्यार्थ्यांनी “एव्हीएशन गॅलरी’चा मनापासुन आनंद तर घेतलाच, त्याशिवाय “आम्हीही वैमानिक होणार’, “आम्हीही अंतराळवीर बनणार’ असा चंगही विद्यार्थ्यांनी यावेळी बांधला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका माया कोथळीकर, शिक्षिका सिद्धी घुले, स्नेहा तांबुसकर, सोनाली वहिले, “एव्हिएशन गॅलरी’चे प्रमुख सुजीत सेंडकर, अनुश्री तळेकर, हनुमंत केदार, साईनाथ मंडळाचे अध्यक्ष पियुष शहा, गंधाली शहा उपस्थित होते.