Newsworld Pune : बुधवार पेठेत मागील १९ वर्षांपासून वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी कार्यरत असलेल्या रेव्ह. हरीभाऊ वाघमोडे पाटील प्रतिष्ठानतर्फे जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून ‘मार्ग हक्काचा, सन्मानाचा’ या विशेष थीमवर आधारित कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
बुधवार पेठ प्रांगणात आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात आकर्षक रांगोळी आणि कॅंडललाइट मार्चने झाली. या मार्चद्वारे एचआयव्ही/एड्समुळे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थितांना सुरक्षित लैंगिक संबंधांबाबत जागरूक करण्यासाठी फ्री कंडोम वितरण करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान, प्रतिष्ठानच्या प्रतिनिधी सारिका लष्करे यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, “समाजाच्या दुर्लक्षित घटकांना सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक त्या सुविधा आणि पाठिंबा देणे ही काळाची गरज आहे. अशा उपक्रमांद्वारे या घटकांना नवा आत्मविश्वास आणि समाजाचा स्वीकार मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेने आपल्या समर्थकांचे आणि सहभागींचे मनःपूर्वक आभार मानले, ज्यामध्ये संवाद फाउंडेशन, अलका ताई, सीमा ताई, आरतीताई, अमोल कांबळे, आकाश ससाणे, सागर भाऊ, चेतन भाऊ, तसेच API प्रतीक्षा शेडगे मॅडम यांचा विशेष उल्लेख करण्यात आला.
रेव्ह. हरीभाऊ वाघमोडे पाटील प्रतिष्ठानने वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी गेल्या अनेक वर्षांपासून चालवलेल्या कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडत असून, अशा उपक्रमांमुळे त्यांचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेले जात आहे.