Newsworldmarathi Pune: २०१७ साली झालेल्या पुणे महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून सतीश बहिरट यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ – वाकडेवाडी परिसरातून, म्हणजेच प्रभाग क्रमांक ७ मधून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या विनंतीला मान देत त्यांनी स्वतःचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. हा निर्णय त्यांनी कोणतीही नाराजी न दाखवता घेतला, ही बाब पक्षातील त्यांच्या एकनिष्ठतेचे प्रतीक मानली जाते.
उमेदवारी मागे घेतल्यानंतरही सतीश बहिरट यांनी प्रचारापासून स्वतःला दूर ठेवले नाही. उलट, त्यांनी प्रभागातील सर्व भाजप उमेदवारांसाठी प्रभावीपणे प्रचार करत संघटन मजबूत करण्याचे काम केले. त्यांच्या मेहनतीचा परिणाम म्हणून संबंधित प्रभागात भाजपचे सर्व उमेदवार विजयी झाले. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात भाजपचा उच्च स्ट्राइक रेट राहण्यामागे बहिरट यांची निष्ठा, कार्यशैली आणि कार्यकर्त्यांशी असलेले सुसंवाद महत्त्वाचे ठरले.
तरीदेखील, या दीर्घकालीन योगदानानंतरही सतीश बहिरट यांना पक्षाकडून कोणतीही मोठी जबाबदारी अथवा संधी मिळालेली नाही, अशी चर्चा पक्षांतर्गत सुरू आहे. आता आगामी महापालिका निवडणुकीत गोखलेनगर – वाकडेवाडी परिसरातून, म्हणजेच प्रभाग क्रमांक ७ मधून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. या प्रभागातील दोन जागा सर्वसाधारण खुल्या गटासाठी असल्याने बहिरट यांच्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे मानले जात आहे.
वरिष्ठांचा शब्द पाळणाऱ्या आणि पक्षासाठी सातत्याने काम करणाऱ्या या एकनिष्ठ कार्यकर्त्याला यावेळी न्याय मिळणार का, याकडे पुण्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. बहिरट यांची उमेदवारी ही शहर पातळीवर चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


Recent Comments