Newsworldmarathi Pune: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला रामराम ठोकल्यानंतर पुण्याच्या राजकारणात हालचालींना वेग आला असून, प्रशांत जगताप थोड्याच वेळात काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे पुणे शहरातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीतील अंतर्गत घडामोडींमुळे प्रशांत जगताप नाराज होते. विशेषतः शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येण्याच्या चर्चेनंतर त्यांनी उघडपणे आपली भूमिका मांडली होती. त्यानंतर त्यांनी पक्षाच्या शहराध्यक्षपदाचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. २६ वर्षे राष्ट्रवादीसोबत काम केलेल्या प्रशांत जगताप यांच्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.
राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांशी त्यांचा संपर्क वाढल्याची चर्चा होती. अखेर आज त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. प्रशांत जगताप यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला पुणे शहरात संघटनात्मक बळ मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
या प्रवेशाकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले असून, पुढील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.


Recent Comments