Homeपुणेमोठा निर्णय! ९ जानेवारीपासून श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात विकासकामांसाठी तीन महिने दर्शन...

मोठा निर्णय! ९ जानेवारीपासून श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात विकासकामांसाठी तीन महिने दर्शन बंद राहणार

Newaworldmarathi Pune : महाराष्ट्र शासनाकडून १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. या आराखड्यातील महत्त्वाच्या टप्प्यांची अंमलबजावणी आणि प्रत्यक्ष बांधकामाच्या काळात भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याच्या उद्देशाने ९ जानेवारी २०२६ पासून पुढील तीन महिन्यांसाठी मंदिर दर्शन तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, महाशिवरात्रीचा कालावधी १२ फेब्रुवारी २०२६ ते १८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे.

२३ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा प्रशासन, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान संस्थान, विश्वस्त, स्थानिक दुकानदार आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या संयुक्त बैठकीत सविस्तर चर्चा करून सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. विकास आराखड्यानुसार सभामंडप व पायरी मार्गाचे नव्याने बांधकाम करण्यात येणार असून, भाविकांच्या सुरक्षितता, सोयी-सुविधा आणि गर्दी व्यवस्थापनावर विशेष भर देण्यात येणार आहे. यासाठी जुना सभामंडप हटवून संरचनात्मक व स्थापत्य स्वरूपाची मोठ्या प्रमाणावर कामे केली जाणार आहेत.

सन २०२७ मध्ये त्र्यंबकेश्वर-नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, कुंभकाळात भीमाशंकर येथे मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक पायाभूत सुविधा, सुरक्षित प्रवेश-निर्गमन व्यवस्था आणि गर्दी नियंत्रणाची कामे वेळेत पूर्ण करणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

दर्शन बंद असले तरी मंदिरातील नित्य पूजा, अभिषेक व धार्मिक विधी परंपरेनुसार सुरू राहतील. या कालावधीत मंदिर परिसरात प्रवेश व प्रत्यक्ष दर्शन सेवा उपलब्ध राहणार नाही. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी भाविक व नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

“श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराचा विकास हा दीर्घकालीन सुरक्षितता, सुविधा आणि भाविकांच्या सोयीसाठी अत्यंत आवश्यक आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही कामे नियोजनबद्ध व वेळेत पूर्ण करण्यासाठी मंदिर तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय मंदीर संस्थानने घेतलेला असून भाविकांनी व स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासन यांना पूर्ण सहकार्य करावे.”

-जितेंद्र डूडी,
जिल्हाधिकारी

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments