Homeपुणेघड्याळाच्या अटीमुळे राष्ट्रवादीत दुरावा; अजित पवार–शरद पवार युती फिस्कटली, शरद पवार गटाची...

घड्याळाच्या अटीमुळे राष्ट्रवादीत दुरावा; अजित पवार–शरद पवार युती फिस्कटली, शरद पवार गटाची महाविकास आघाडीशी पुन्हा जवळीक

Newaworldmarathi Pune: पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटप आणि निवडणूक चिन्हावरून मतभेद झाल्याने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातील संभाव्य युती अखेर फिस्कटली आहे. त्यामुळे शरद पवार गटाने पुन्हा एकदा महाविकास आघाडीसोबत चर्चा सुरू केली असून पुण्यात भाजपविरोधात व्यापक आघाडी उभी राहण्याची चिन्हे दिसत आहेत.

शुक्रवारी दुपारी दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची जागावाटपासाठी बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार गटाकडून शरद पवार गटाला केवळ ३५ जागा देण्याचा प्रस्ताव आणि ‘घड्याळ’ या निवडणूक चिन्हावरच निवडणूक लढवण्याची अट घालण्यात आली. ही अट पक्षाच्या स्वतंत्र अस्तित्वाला धोका पोहोचवणारी असल्याचे सांगत शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीतून बाहेर पडत युतीला नकार दिला. त्यामुळे जागावाटप आणि चिन्हावरून मतभेद उफाळून आल्याने युती तुटल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, रात्री उशिरापर्यंत रास्ता पेठेतील शांताई हॉटेल येथे महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक सुरू होती. या बैठकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षासह समविचारी पक्ष एकत्र येऊन भाजपविरोधात लढण्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे.

२०२६ च्या महापालिका निवडणुकीत भाजपविरोधात जोरदार रणसंग्राम उभा करण्यासाठी पुण्यात सर्वपक्षीय आघाडीच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपने आधीच अजित पवार गटासोबतची युती तोडून मैत्रीपूर्ण निवडणुकीची घोषणा केली होती. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. मात्र, काँग्रेसने अजित पवार गटाशी युती नको अशी ठाम भूमिका घेतल्याने परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आणि अखेर घड्याळाच्या अटीवरून युतीला पूर्णविराम मिळाला.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments