Newsworld Pune : जवळपास सहा महिने झालेत. विद्यार्थ्यांनी अर्ज भरले, निवडीची प्रक्रिया पार पडली. ज्यांच्याकडे थोडीफार आर्थिक स्थिरता होती, ते परदेशात शिक्षणासाठी गेले. तिथेही त्यांच्या अभ्यासक्रमाचे एक सत्र पूर्ण झाले. दरम्यान, राज्यात निवडणुकीची आचारसंहिता लागली आणि त्यामुळे अंतिम यादी रखडली. निवडणुकांचे निकाल लागले, राज्याला नवीन मुख्यमंत्री मिळाले, तरीही सारथीच्या विद्यार्थ्यांच्या अंतिम यादीला मात्र अद्याप मुहूर्त सापडत नाही.
यावर सारथीचे कोणीही अधिकारी किंवा महासंचालक ठामपणे काही सांगत नाहीत. मंत्रालयातील वरिष्ठांनाही यासंदर्भात निश्चित माहिती नाही. हा विभाग नियोजन विभागाच्या अंतर्गत येतो, म्हणजेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अखत्यारित आहे.
या परदेशी शिष्यवृत्तीच्या संदर्भात सहा महिने उलटूनही विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य पोहोचलेले नाही. त्यामुळे त्या शिष्यवृत्तीचा उपयोग काय, असा प्रश्न निर्माण होतो. तिकडे परदेशात गेलेले विद्यार्थी उसने पैसे, उपासमार करून किंवा मोठ्या कष्टाने रूम भाडे भरत आहेत. बहुतेकांनी कर्ज काढून शिक्षणाला सुरुवात केली आहे आणि शिष्यवृत्ती कधी मिळेल, या आशेवर आहेत. मात्र, या निष्ठुर प्रशासन आणि शासन व्यवस्थेला त्याची काहीच फिकीर नाही.अजून किती काळ विद्यार्थ्यांनी वाट पाहायची? हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतो, असे स्टुडंट हेल्पिंग हँडसचे अध्यक्ष अँड.कुलदीप आंबेकर यांनी सांगितले.