Newsworld Pune : राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने दिनांक 14 ते 22 डिसेंबर 2024 या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित *पुस्तक महोत्सवा*त खडकी शिक्षण संस्थेने उत्साहाने सहभाग घेतला आहे.
यावेळी संस्थाध्यक्ष श्री. कृष्ण कुमार गोयल यांनी उपस्थित विद्यार्थ्यां, शिक्षकां, व पालकांना मार्गदर्शन केले. त्यांनी “पुस्तकाचा ध्यास म्हणजे जीवनाचा विकास आहे,” असे सांगत वाचनाची महती विशद केली. प्रत्येकाने वाचनाचा छंद जोपासत आपल्या जीवनाला नवा आयाम द्यावा, असे ते म्हणाले.
प्राचार्य सहसचिव डॉ. संजय चाकणे यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात होणाऱ्या पुस्तक महोत्सवाची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सर्व विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना या महोत्सवात सहभागी होऊन वाचन संस्कृतीचा आनंद लुटण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमात खडकी शिक्षण संस्थेच्या प्राचार्य, मुख्याध्यापक, विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आपला उत्साह व्यक्त केला.
पुस्तक महोत्सवामुळे वाचन संस्कृतीस चालना मिळणार असून, विद्यार्थी व नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.