Newsworld Team : Success Story दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर माणूस अवघड गोष्टीही सहज साध्य करतो आणि अशा व्यक्तीला अनेकांचे साह्य प्रोत्साहनही मिळते, याचे हे एक सुंदर उदाहरण आहे. रामदास स्वामी म्हणलेच आहेत – केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे। यत्न तो देव जाणावा अंतरी धरिता बरे||
वाशीम पासून पंचवीस किलोमीटर लांब एका खेड्यातील, ग्रामीण भागातील एका युवकाची ही एक प्रचंड प्रेरणादायी सक्सेस-स्टोरी आहे. हातावर पोट असलेल्या शेतकऱ्याच्या घरी जन्माला आलेल्या युवकाच्या संघर्षाची ही कहाणी आहे.
वेद कुमार सांगतात की,
वारकरी संप्रदायातील आध्यात्मिक विचारांची बैठक असलेल्या गरीब कुटुंबातील युवकाची ही कहाणी आहे. ग्रामीण भागातून मुंबई-पुणे गाठताना अनेक चॅलेंजेस भेडसावत असतात, तिकडे ‘दिल्ली दूर है’ म्हणजे नेमकी किती दूर असेल, याचा विचारही मनाला शिवला नसेल अशा युवकाची ही कहाणी आहे. शालेय जीवनात जिल्ह्याच्या ठिकाणी गेल्यावर राहण्याची व्यवस्था नसल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात रात्रीचा मुक्काम करणाऱ्या युवकाची ही कहाणी आहे! पण, घरच्या माऊलीने अशा परिस्थितीतही एक हट्ट मात्र कायमच धरला होता आपल्या लेकराकडे, तो म्हणजे आम्ही इकडे कसेही सांभाळू स्वतःला पण तू शिक्षण घे.. भरपूर शीक आणि स्वतःच्या पायावर उभा रहा. एवढीच काय ती एकमेव अपेक्षा!
असा हा युवक बारावी पूर्ण करून पुण्यात आला आणि पॉलिटिकल सायन्स मध्ये आपले शिक्षण घेऊ लागला. घरची परिस्थिती पाहता, खेडेगावातून पुण्यासारख्या ठिकाणी येणे हेच मोठे दिव्य! ते कसेबसे जुळले तर त्यात गावाकडून आलेल्या युवकांचा पाय सहजच घसरेल असा फर्ग्युसन कॉलेज सारखा माहौल – प्रचंड distractions!! पण या आपल्या कहाणीतील युवकाचा मात्र एकच फोकस, शिक्षण एके शिक्षण!! अशात, गावाकडून पैसे मागविणे शक्य नसल्याने या युवकाने आपल्या कॉलेजच्याच सेक्युरिटी एजन्सीतील गोविंदअण्णा यांच्याकडे एकच तगादा लावला, आणि रात्रपाळीत त्याच कॉलेजच्या सेक्युरिटी गार्डची नोकरी मिळवली. ‘कमवा आणि शिका’ ही काही कोणती सरकारी योजना नव्हे, तर मजबुरी आणि जिद्द होती या युवकाची!
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या विकास काकतकर यांनी आपल्या ऑफिसमध्ये बोलावून या युवकाची अतिशय आपुलकीने चौकशी केली आणि परिस्थिती समजून घेतली. Mr.&Mrs.काकतकर यांनी मग या युवकाला केवळ अभ्यासावर फोकस करायचा प्रेमळ सल्ला आणि तेवढ्याच प्रेमाने एकप्रकारे दमच दिला! फी, हॉस्टेल सगळी व्यवस्था आपल्या पदरचे पैसे देऊन काकतकर दाम्पत्याने केली. मन लावून अभ्यास करत मग त्या युवकानेही आपली फर्ग्युसनमधील इनिंग्स तर पूर्ण केलीच, पण त्यानंतर दिल्लीत जाऊन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन मधून जर्नलीजम पण पूर्ण केले!!
त्याच सुमारास, देवेन्द्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांना आपली दिल्ली येथील कामे पाहण्यासाठी एक योग्य व्यक्तीची आवश्यकता निर्माण झाली. त्यांनी ही आपली गरज बोलून दाखवली, तेंव्हा त्यांच्या परिचयातील एका व्यक्तीने या युवकाचे नाव सुचवले आणि जात, ग्रामीण पार्श्वभूमी, आडनाव असल्या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता देवेन्द्र फडणवीस यांनी या युवकाला संधी देण्यास क्षणार्धात होकार दिला!! देवेन्द्र फडणवीस यांचे दिल्ली-स्थित पीए म्हणून पुढच्या काळात या युवकाने प्रामाणिकपणे काम करत जीवापाड परिश्रम घेतले आणि त्यांच्या ‘पर्सनल टीम’चा एक अविभाज्य भाग बनले.
आजच्या घडीचे राज्यातील निर्विवादपणे सगळ्यात पावरफुल नेते देवेन्द्रजी फडणवीस यांच्या जवळच्या या माणसाला कधी कोणी विचारलं, की आजवर कोणत्या कामाचे सर्वाधिक समाधान लाभले.. तर तुम्हाला त्यांच्या घरच्या, त्या माऊलीच्या विचारांमधील धार्मिक, अध्यात्मिक बैठकीची प्रचिती आल्याशिवाय राहवणार नाही. देवेन्द्रजी यांच्या सुचनेनुसार त्यांनी केलेल्या अनेक कामांपैकी स्वातंत्र्यसैनिकाच्या पत्नीला 23 वर्षांनंतर मिळवून दिलेली पेन्शन, अनेक गरजू रुग्णांना मदत व्हावी यासाठी केलेला पाठपुरावा, परदेशात अडकलेल्या अनेक मराठी विद्यार्थी, पर्यटकांना युद्धकाळात, कोविडकाळात भारतात परत आणण्यासाठी साऊथ ब्लॉक मध्ये ठाण मांडून बसणे यांसारख्या अनेक गोष्टी सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरून समाधान ओसांडून वाहत असते. त्याहून महत्वाचं म्हणजे, यांना कधी ‘आय मी मायसेल्फ’ करताना कोणी पाहिलं नाहीये, उलट यांच्या सहवासात लोकांना कमालीची विनम्रताच अनुभवायला मिळते.
या कहाणीत मी ज्या युवकाबद्दल सांगत आहे, ते युवक आहेत मनोजजी मुंडे. देवेन्द्रजी फडणवीस यांचा 5 तारखेला मुख्यमंत्रीपदी शपथविधी झाल्यानंतर देवेन्द्रजी यांनी मनोजजी यांची ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी, अर्थात ओएसडी (सिएमओ) म्हणून नेमणूक केली आहे. सिक्युरिटी पासून सुरु झालेला हा मनोज यांचा प्रवास अतिशय संघर्षमय राहिला आहे. पण जिद्ध आणि ध्येय असेल तर माणूस काहीही साध्य करू शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे.