Newsworldmarathi Pune : पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये सन २०२३ नोव्हेंबर महिन्यात एका पस्तीस वर्षीय गृहिणी महिलेचे किडनी ट्रान्सप्लांट ऑपरेशन झाले होते. किडनी निकामी झालेल्या स्त्री रुग्णाला तिच्या आईनेच किडनी दान केली होती. आई आणि मुलीचा रक्तगट वेगळा असला तरी डॉक्टर आणि हॉस्पिटलच्या आत्मविश्वासामुळे किडनी ट्रान्सप्लांट ऑपरेशन करण्यात आले होते. मात्र ऑपरेशन झाल्यानंतर संबंधित महिलेला गेल्या वर्षभरातील बारा महिन्यात अकरा वेळा आयसीयू मध्ये ऍडमिट करावे लागले होते.
गेल्या वर्षभराच्या काळात संबंधित हॉस्पिटलमध्ये त्यांनी 52 लाख रुपये खर्च केले होते. आताही ऍडमिट असताना २४ लाख बिलापैकी बारा लाख रुपये बिल भरले होते. मात्र व्हेंटिलेटर वर असताना उपचारादरम्यानच आज रविवारी सकाळी ०९. ०० वाजता त्यांचे निधन झाले. वर्षभरात संबंधित ३५ वर्षीय महिला अकरा वेळा आयसीयू मध्ये अतिदक्षता विभागात उपचार घेत होती. या काळात ५२ लाख रुपये खर्च केल्यानंतर देखील त्यांची प्राणांची झुंज अपयशी ठरली.
रविवारी सकाळी ०९ वाजता त्यांचा मृत्यू झाल्या नंतर हॉस्पिटलमध्ये निर्णय घेणारे एकही अधिकारी उपस्थित नव्हते. पैसे स्वीकारणाऱ्या बिलिंग मधील अधिकाऱ्यांशिवाय तिथे कोणीही उपस्थित नव्हते. सकाळी ०९ वाजल्यापासून ते दुपारी ०२ वाजेपर्यंत हॉस्पिटल मधील प्रत्येक केबिन कुलूप बंद अवस्थेत होत्या. मयत रुग्णाचे भाऊ आणि पती यांनी बिल माफ करून मृतदेह ताब्यात मिळवण्यासाठी हॉस्पिटल प्रशासनाकडे रडून दया याचना केली, मात्र बिल भरा मगच मृतदेह मिळेल, असा असंवेदनशील, भयंकर पवित्रा रुग्णालयाचे अधिकारी आणि कर्मचारी घेत राहिले. रविवार असल्याने सर्वांनाच सुट्टी आहे आम्ही कोणीही काही निर्णय घेऊ शकत नाही, असेच त्यांनी सांगितले.
सुमारे दहा तास झाले तरी मृतदेह मिळत नाही म्हणून मयत रुग्णाचे सर्वच नातेवाईक जहांगीर हॉस्पिटलमध्येच उपोषणाला बसले. मयत रुग्णाच्या भाऊ आणि पतीने रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांना लेखी अर्ज करून मदत मागितली. त्याचप्रमाणे त्यांनी शासनाच्या ही विविध विभागांना लेखी अर्ज करून मदत मागितली.
जहांगीर हॉस्पिटल मध्ये सायंकाळी ०७ वाजता सुरू झालेले उपोषण रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण आणि कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चेतन मोरे यांच्या मध्यस्थीने मार्ग काढून अवघ्या अर्ध्या तासात संपवले. बारा लाख रुपयांचे बिल संपूर्ण माफ केल्यानंतर आणि भविष्यातही या बिलाची मागणी कुठल्याही परिस्थितीत करणार नाही असे हॉस्पिटल कडून वचन घेतल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला.
यावेळी बोलताना रुग्णहक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले की, गंभीर अवस्थेतील रुग्णाला ऍडमिट करताना किंवा रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर रविवारी हॉस्पिटल मधील मोफत उपचार घेण्यासाठीचे कोणते अधिकारी उपलब्ध नसतात, ही चुकीची परंपरा मोडीत काढली पाहिजे. सदर मध्ये आयुक्त कार्यालयाने देखील हॉस्पिटल विभाग रविवारी सुरू ठेवला पाहिजे. रुग्णालय प्रशासनाने देखील निर्णय घेणारा किमान एखादा अधिकारी रविवारच्या दिवशी हॉस्पिटलमध्ये नियुक्त केला पाहिजे.
यावेळी मयत रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्ण हक्क परिषदेला धन्यवाद दिले. यावेळी परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण, कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चेतन मोरे, आशिष कांबळे आणि रुग्ण हक्क परिषदेच्या पुणे शहर अध्यक्ष सौ. अपर्णा मारणे साठे उपस्थित होत्या. यावेळी मुख्यमंत्री विशेष वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक, डॉ. निखिल इंगळे यांनीही रुग्णालय प्रशासनाला मृतदेह तात्काळ नातेवाईकांच्या ताब्यात द्या, यासंदर्भातील आदेश दिले होते.
मातंग समाजाच्या अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी यासाठी रुग्ण हक्क परिषदेला धन्यवाद दिले, अशी माहिती रुग्ण हक्क परिषदेच्या पुणे शहराध्यक्ष सौ. अपर्णा मारणे साठ्ये यांनी दिली.