एकनाथ शिंदेनी लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा दिली; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत”; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका

काश्मीरमधील मिनी स्वित्झर्लंड अशी ओळख असलेल्या पहलगाम येथे मंगळवारी दहशतवादी हल्ला ( Pahalgam Terror Attack ) झाला. या हल्ल्यात २६ निष्पाप हिंदू भारतीयांची हत्या करण्यात आली. यात ६ महाराष्ट्रातील लोकांचाही समावेश होता. तसेच, या घटनेनंतर महाराष्ट्रातील अनेक पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये अडकले होते. त्यांना महाराष्ट्रात परत आणण्याकरता महाराष्ट्र सरकारकडून प्रयत्न करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) स्वत: श्रीनगरला गेले आणि त्यांनी एका अतिरिक्त विमानातून महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांना सुखरूप परत आणले. याबाबत माहिती देताना, शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला. त्यावर शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. काय म्हणाले नरेश म्हस्के… माध्यमांना माहिती देत असताना म्हस्के म्हणाले होते की, “काश्मीरमधून महाराष्ट्रात परतणाऱ्या लोकांपैकी काही लोक तिथे रेल्वेने गेले होते. सीरआरपीएफच्या कॅम्पमध्ये राहत होते, ते आयुष्यात कधीही विमानात बसले नव्हते. त्या लोकांना विमानाने आणण्याची व्यवस्था एकनाथ शिंदे यांनी केली. एकनाथ शिंदे तिथे गेल्याने अधिकाऱ्यांना प्रोत्साहन मिळाले, काम करण्याची स्फूर्ती वाढली. एक जबाबदार माणूस गेला तर तुम्ही त्याला कुरघोडी आणि श्रेयवाद म्हणता. ४५ लोक रेल्वेने गेले होते, पहलगाममध्ये अडकले, सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये राहिले. त्यांच्या खाण्याचे वांदे होते. त्या लोकांना एकनाथ शिंदेंनी विमानतळावर आणलं, ते लोक पहिल्यांदा विमानात बसले.” म्हस्के यांच्या या विधानाने वाद निर्माण झाला असून, त्यांच्यावर टीका केली जात आहे. रोहिणी खडसे यांची टीका… दहशतवादी हल्ल्यासारख्या गंभीर विषयात महाराष्ट्रात दुर्दैवाने श्रेयवादाची लढाई सुरू आहे. सध्याची वेळ ही सगळ्यांनी एकत्र येऊन या परिस्थितीला सामोरे जाण्याची आहे. पण खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. ही उपकाराची भाषा महाराष्ट्रातली जनता खपवून घेणार नाही. एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदावर बसवून महाराष्ट्रातील जनतेने उपकार केले आहेत.

मेंढरं वळणारा बिरदेव मोठा साहेब झाला..

0
Newsworldmarathi Team: नुकताच युपीएससी सिव्हिल सर्व्हिस परीक्षेचा निकाल लागला. देशभरातून लाखो मुलांनी सर्वस्व पणाला लावलेल्या या परीक्षेत जेमतेम हजारभर विद्यार्थ्यांनी यशाला कमान घातली. कुणी IAS तर कुणी IPS तर कुणी इतर पदे मेरिटनुसार पटकावली. यातच बिरदेव डोणे 551 व्या क्रमांकाने परीक्षा उत्तीर्ण झाला आणि IPS पदाला त्याने गवसणी घातली. बिरदेव कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका मेंढपाळाचा मुलगा.जात्याच हुशार पण घरची परिस्थिती नाजूक. जळोची गावातील डाॅ राजेंद्र चोपडे यांचा पुतण्या प्रांजल चोपडे हे coep ला दोन वर्षे ज्युनिअर, सिव्हिल इंजिनिअरिंग चा विद्यार्थी. मुले बिरदेव ची चेष्टा करायची. प्रांजल चोपडे यांनी अवतार पाहूनच ओळखले, हा आपल्यापैकी म्हणजे धनगर जातीचा असणार, आणि नाव विचारल्यावर नावावरून खात्रीच झाली. बिरदेवला ही पुण्यासारख्या ठिकाणी कुणीतरी आपलं भेटलं ह्याचं हायसं वाटलं. सिनिअर्स चा त्रास कमी होण्यासाठी बिरदेव प्रांजल यांना चिकटून राहू लागला. दोघांची चांगली गट्टी झाली. प्रांजल यांनी इंजिनिअरिंग झाल्यानंतर वर्षभर नोकरी केली आणि केंद्रीय स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडला. पुढे बिरदेव ही सिव्हिल इंजिनिअर झाला आणि त्यानेही स्पर्धा परीक्षेच्या मार्गाने जाण्याचे ठरवले. नोकरीच्या मागे न लागता बिरदेव ह्या परीक्षेच्या बेभरवशी आणि खडतर मार्गावरून चालू लागला.या कठीण प्रवासात सीओई पी मध्येच शिकणाऱ्या अक्षय सोलनकर याचीही बिरदेव ला वेळोवेळी सगळ्या प्रकारची मदत झाली.प्रांजल चोपडे हे दोन वर्षांपूर्वी UPSC अंतर्गत फॉरेस्ट ऑफीसर म्हणुन सिलेक्ट झाले. बिरदेव चा यशाचा शोध चालूच होता. तो आज संपला. आज दुपारी युपीएससी चा निकाल आला. प्रांजल चोपडे यांनी यादीत बिरदेव चे नाव शोधले. 551 व्या क्रमांकावर बिरदेव चे नाव दिसल्यावर बिरदेव ला बातमी देण्यासाठी आणि अभिनंदन करण्यासाठी फोन लावला. तर बिरदेव भर उन्हात मेंढरे चरायला घेउन माळावर गेलेला. तू का मेंढरे घेउन गेलास विचारले असता वडील आजारी असल्याने मीच सध्या मेंढरे घेउन जातोय, बिरदेव उत्तरला. बिरदेव च्या वडिलांचे किडनी च्या मुतखड्याचे ऑपरेशन दोन महिन्यापूर्वी झालेले. पैशाची ओढाताण असल्याने बिरदेव ने प्रशिक्षण चालू असलेल्या प्रांजल आणि दुसरा कोल्हापूर चाच मित्र आशिष पाटील (IAS) या दोघांना मदतीसाठी फोन केला होता. आशिषची कोल्हापूरचा असल्यामुळे त्याच्या ओळखीने तेथील खाजगी मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलला ऑपरेशन ची सोय केली होती. ऑपरेशन झाले पण काहीतरी complication झाले (बिरदेव च्या भाषेत ऑपरेशन बिघडले). तर वडील आजारी असल्याने आमचा हा आय पी एस निकाल लागला त्यादिवशी त्यामुळे मेंढरे घेउन माळावर चारत होता. असा हा बिरदेव चा आय पी एस पर्यंतचा प्रवास. जाता जाता बिरदेव चा एक किस्सा सांगितला पाहिजे. दुष्काळात तेरावा महिना तसा बिरदेव चा मोबाईल काही दिवसांपूर्वी पुण्यात हरवला. बिरदेव पोलीस तक्रार द्यावी म्हणून पोलिसात गेला. पोलिसांनी तक्रार घ्यायला टाळाटाळ केली. बिरदेव ने प्रशिक्षणाला गेलेल्या मित्रांच्या मदतीने पोलीस तक्रार नोंदवली. तक्रार घ्यायलाच टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांनी तक्रार घेतली पण अजून फोन काही सापडला नाही. बिरदेव अधूनमधून फोन सापडला का विचारायला पोलीस स्टेशनला जात होता, तेव्हा तपास चालू आहे, सापडला की कळवू हे ठराविक साच्याचे उत्तर बिरदेव ला मिळत होते. हाच बिरदेव आज भारतीय पोलीस सेवेच्या सर्वात उच्च पदासाठी निवडला गेला आहे. स्वतः भोगलेल्या हालअपेष्टा आणि उपेक्षा आणि उपसलेले कष्ट यांची जाणीव ठेऊन तो देशसेवा करेल याबाबत मनात तीळमात्र शंका नाही.

कोंढावा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यलयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली तंबाखू मुक्त कार्यालय शपथ..

0
Newsworldmarathi Pune: राज्य सरकारच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या १०० दिवसांचा ७ कलमी कृती आराखडा अंतर्गत कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयात तंबाखू मुक्त कार्यालय शपथ विधी आणि “वाचाल तर वाचाल” उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांचे आयोजन कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त लक्ष्मण कादबाने यांच्या संकल्पनेतून करण्यात आले. “वाचाल तर वाचाल” या उक्तीचा संदर्भ देत, वाचनाचे महत्त्व आणि मोबाईल युगात वाचनाची गरज यावर सहायक आयुक्त यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यानंतर, दुपारी ३ वाजता डॉ. दत्ता कोहिनकर लिखित “सुखी जीवनाचा पासवर्ड” या पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तंबाखू मुक्त कार्यालय करण्याची शपथही घेतली. या कार्यक्रमास उप अभियंता राखी चौधरी, प्रशासन अधिकारी सुनील मोरे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राजू दुल्लम, जालिंदर कदम, अधीक्षक श्री. जीवन मराळे, उप अधीक्षक मोनिष बधे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यातील 3 हजार मेंढपाळांच्या बँक खात्यात ७ कोटी जमा; काय आहे योजना? घ्या जाणून…

0
Newsworldmarathi Mumbai: पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या वतीने राज्यातील भटक्या जमाती (भज-क) प्रवर्गातील धनगर व तत्सम समाजातील 3054 मेंढपाळांना सन 2024-25 या वर्षासाठी चराई अनुदानापोटी 7.33 कोटी अनुदानाचे थेट हस्तांतरण (डीबीटी)द्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. मेंढ्यांच्या चराईकरिता राज्यातील मेंढपाळांना अर्थ सहाय्य उपलब्ध झाल्यामुळे मेंढपाळांना शाश्वत उत्पन्नाचा स्रोत्र निर्माण झाला आहे आणि त्यांच्या आर्थिक प्रगतीस हातभार लागला असल्याची भावना पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये मेंढीपालन व्यवसाय हा पूर्णपणे स्थलांतरित पद्धतीने केला जातो. पावसाळी हंगामामध्ये मेंढपाळ त्यांच्या मूळ गावी परत आल्यानंतर पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये मेंढ्यांना चराईकरिता क्षेत्र उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे चाऱ्याअभावी मेंढ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन त्यांची उत्पादकता कमी होऊन मेंढपाळ कुटुंबाचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे राज्यामधील मेंढपाळ कुटुंबाना माहे जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये मेंढ्यांसाठी चाऱ्याची कमतरता भरून काढण्यासाठी चराई अनुदान देण्याची योजना पशुसंवर्धन विभाग व इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभाग यांच्यामार्फत राबविली जात असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. राज्यामध्ये या योजनेसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळामार्फत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले असून लॉटरी पद्धतीने संगणकीय प्रणालीद्वारे त्यांची निवड यादी तयार करण्यात आलेली होती. जिल्हा व तालुकानिहाय धनगर व तत्सम मेंढपाळांची संख्या विचारात घेऊन जिल्हा व तालुकानिहाय लक्षांक देण्यात आले होते. त्यामधून पात्र मेंढपाळ कुटुंबाना माहे जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीसाठी प्रति माह ६ हजार रुपये असे एकूण २४ हजार रुपये चराई अनुदान देण्यात आले, असल्याची माहिती पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शितलकुमार मुकणे यांनी दिली आहे. चराई अनुदान मिळाल्यामुळे मेंढपाळ कुटुंबाना त्यांच्या मेंढ्याकरिता चारा उपलब्ध झाल्याने मेंढ्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा होऊन मेंढपाळाच्या आर्थिक उत्पन्नामध्ये भर पडत आहे. या योजनेद्वारे राज्यामधील ३०५४ लाभार्थीना रु. ७.३३ कोटी अनुदान थेट लाभधारक हस्तांतरण (DBT) द्वारे लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे. याबाबत पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ रामास्वामी एन. यांनी पाठपुरावा केला.

पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ ‘मिशन मोड’वर

0
Newsworldmartahi Pune: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना आणण्याची मोहीम आणखी वेग घेत असून शुक्रवारी २३२ प्रवाशांसाठी विशेष विमानाचे नियोजन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. इंडिगो कंपनीचे हे विमान शुक्रवारी दुपारी श्रीनगरवरून महाराष्ट्राकडे झेपावणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून गेल्या ४८ तासांपासून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ महाराष्ट्रातील प्रवाशांना परत आणण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करत असून विशेष विमानांची व्यवस्था करत आहे. गुरुवारी मोहोळ यांच्या प्रयत्नातून १८३ प्रवासी महाराष्ट्रात परतले असून आज शुक्रवारी २३२ प्रवासी महाराष्ट्राकडे येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या प्रवाशांना परतण्याची मोफत व्यवस्था करण्यात आली असून राज्य सरकार या विमानांचा खर्च करणार आहे. केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले ‘महाराष्ट्रातील सर्व पर्यटकांना आणण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू असून जम्मू ते श्रीनगर हा रस्ता बंद असल्याने काही पर्यटक जम्मू येथे अडकलेले आहेत. शिवाय रेल्वेने गेलेल्या प्रवाशांनाही रेल्वे गाड्या रद्द झाल्याचा फटका बसला असून महाराष्ट्रातील सर्व पर्यटकांना श्रीनगरमार्गे आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. नागरिकांचे अजूनही जम्मू-काश्मीरच्या विविध भागातून फोन कॉल्स येत असून त्यांची व्यवस्था केली जात आहे. पुतणीचे लग्न काही तासांवर; मंत्री मोहोळ मात्र वॉररुममध्येच ! केंद्रीय मंत्री मोहोळ यांची पुतणी अश्विनी हिचा आज (शुक्रवार) विवाह असून गेले काही दिवसापासून मोहोळ कुटुंबियांकडून याची जोरदार तयारी केली जात आहे. मात्र असे असले तरी गेल्या तीन दिवसांपासून मोहोळ स्वतः वॉररूममध्येच व्यस्त आहेत. काश्मीरमध्ये अडकलेल्या नागरिकांचे येणारे फोन, त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क आणि आवश्यक ती मदत करणे यातच मोहोळ स्वतः व्यस्त आहेत. त्यामुळे एकीकडे मोहोळ कुटुंब ‘लग्नघर’ असताना स्वतः मात्र महाराष्ट्रातील नागरिकांना काश्मीरमधून परत आणण्याच्या ‘मिशन’ वरच असल्याचे पाहायला मिळाले.

राज्यातील शाळांची माहिती आता एका क्लिकवर; सरकारचा मोठा निर्णय

0
Newsworldmarathi Mumbai: राज्यातील ग्रामीण, शहरी भागातील प्राथमिक शिक्षणाचे संस्कार केंद्र असणाऱ्या अंगणवाडी, विविध माध्यमांच्या शाळांच्या कामकाजात एकसूत्रीपणा आणण्यासाठी मोबाईल अॅपच्या माध्यमातून जिओ टॅगिंग करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व शाळा, अंगणवाडी केंद्रांना छायाचित्रांसह संबंधित माहिती येत्या ३० एप्रिलपर्यंत अॅपवर नोंदवणे बंधनकारक केले आहे. शिवाय संबंधित शाळांनी भरलेल्या माहितीची खातरजमा करण्याची जबाबदारी शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. शाळांना त्यांचा युडायस कोड किंवा युडायस प्लसमधील संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी नोंदवलेला मोबाइल क्रमांक टाकून या अॅपमध्ये लॉगिन करावे लागणार आहे. त्यानंतर शाळेची युडायस प्लसमध्ये भरलेली माहिती या अॅपमध्ये दिसेल. शाळेचे जीआयएस करून शाळेचे नाव, शाळेची संपूर्ण इमारत, किचन शेड, मुलांचे व मुलींचे स्वच्छतागृह सुविधा, पिण्याच्या पाण्याची सुविधा असे एकूण ५ फोटो समाविष्ट करावे लागतील. हा अर्ज भरताना संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी शाळेच्या आवारात उपस्थित राहून फोटो, माहिती अद्ययावत करण्याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. ‘महास्कूल जीआयएस’ अॅप विकसित शाळांचे ठिकाण, भौगोलिक अंतर आणि उपलब्ध सोयीसुविधांची माहिती मिळवण्यासाठी राज्य शासनाने सर्व शाळांचे जिओ टॅगिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ‘महास्कूल जीआयएस’ हे अॅप विकसित केले आहे. या अॅपमध्ये शाळेचे नाव, संपूर्ण इमारत, किचन शेड, स्वच्छतागृहाची सुविधा, पाण्याची सुविधा यांचे फोटो अपलोड करून माहिती भरण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांकडे देण्यात आली आहे. ही माहिती शैक्षणिक सुधारणा, पायाभूत सुविधांचे नियोजन आणि संसाधनांचे वितरण यासाठी महत्त्वाची ठरेल.या जिओ टॅगिंग प्रक्रियेमुळे राज्यातील शैक्षणिक व्यवस्थेत पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढणार आहे.

पुस्तक देण्यासाठी घरी आला अन् विनयभंग करून गेला; शिक्षकास तीन वर्षे सक्तमजुरी

Newsworldmartahi Kolhapur: दहावीचे पुस्तक देण्यासाठी घरी आलेल्या मुलीचा विनयभंग केल्याची घटना ९ फेब्रुवारी २०१९ मध्ये दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास घडली होती. आरोपी शिक्षक महेश नारायण नाजरे (वय-५८, रा. फुलेवाडी रिंगरोड, कोल्हापूर.) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश (१) पी. एफ. सय्यद यांनी तीन वर्षे सक्तमजुरी तसेच १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी बुधवारी २३ एप्रिल रोजी या खटल्याचा निकाल लागला आहे. या प्रकरणी सरकारी वकील ॲड. मंजूषा पाटील यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी महेश नाजरे हा शिक्षक आहे. गुन्हा घडलेल्या दिवशी आरोपी पीडित मुलीच्या घरी दहावीचे इतिहासाचे पुस्तक आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी मुलीच्या आईने पुस्तकाच्या झेरॉक्स काढून त्या नाजरे यांच्या घरी पोहोच करण्यास तिच्या मुलीला सांगितले. त्यानुसार ती दुपारी सव्वाबाराच्या सुमारास पुस्तकाच्या झेरॉक्स घेऊन आरोपी नाजरे याच्या घरी गेली. दरम्यान, त्यावेळी तो त्याच्या घरात मोबाइलवर अश्लील चित्रफिती बघत बसला होता. घरात दुसरे कोणी नसल्याचे पाहून त्याने मुलीशी अश्लील कृत्य केले. तिला आतल्या खोलीत ओढून नेत असतानाच तिने हिसडा देऊन घरी पळून गेली. या प्रकरणी तिच्या आईने करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. न्यायाधीशांनी आरोपी नाजरे याला बाललैंगिक प्रतिबंधक कायदा म्हणजेच पॉक्सोंतर्गत कलम ८ नुसार ३ वर्षे सक्तमजुरी, पाच हजार रुपये दंड आणि कलम १२ नुसार १ वर्ष सक्तमजुरी तसेच पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

PM Narendra Modi : दहशतवाद्यांच्या काळजात धडकी भरणार; मोदींकडून ‘आरपार’च्या लढाईची घोषणा; म्हणाले, आता गाडण्याची वेळ…

Newsworldmarathi pune : PM Narendra Modi : बिहारमधील मधुबनी जिल्ह्यात पंचायती राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी आपले भाषण सुरू केले. भाषण सुरू करण्यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. तसेच पहलगाम हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केले. पहलगाम हल्ल्यावर भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी ज्या क्रूरतेने निष्पाप नागरिकांना मारले त्याबद्दल संपूर्ण देश दुःखी आहे. कोट्यवधी नागरिक दुःखी आहेत. संपूर्ण देश सर्व पीडित कुटुंबांच्या दुःखात त्यांच्यासोबत उभा आहे. उपचार घेत असलेल्या कुटुंबातील सदस्य लवकर बरे व्हावेत यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पुढे बोलताना मोदी म्हणाले, मित्रांनो, या दहशतवादी हल्ल्यांमध्ये कोणीतरी आपला मुलगा गमावला, कोणीतरी आपला भाऊ गमावला, कोणीतरी आपला जोडीदार गमावला, त्यापैकी काही बंगाली बोलत होते, कोणी कन्नड बोलत होते, तर काही मराठी बोलत होते. कोणीतरी गुजराती होते. आज, कारगिलपासून कन्याकुमारीपर्यंत, त्या सर्वांच्या मृत्युबद्दल समान दुःख आहे. रागही तसाच आहे. देशाच्या शत्रूंनी भारताच्या श्रद्धेवर हल्ला करण्याचे धाडस केले आहे. मी अगदी स्पष्ट शब्दात सांगू इच्छितो की, हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आणि कट रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळेल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिला. जम्मू काश्मीर खोऱ्यातील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी उच्चस्तरीय बैठक घेते पाकिस्तानवर कठोर कारवाई सुरु केली. सिंधू पाणी करार रद्द करत इतर पाच मोठे निर्णय घेण्यात आले. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर नरेंद्र मोदी यांची पाहिलीच जाहीर सभा गुरुवारी झाली. यावेळी पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर कठोर शब्दांत पाकिस्तानला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इशारा दिला.

चुलता, चुलतीच्या त्रासाला कंटाळून पुतण्याची आत्महत्या; आंबेगाव तालुक्यातील घटना

Newsworldmarathi Pune : आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथे जमिनीच्या वादातून तसेच चुलता आणि चुलतीकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून पुतण्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. निखिल अजय मिंडे (वय २८) असं या तरुणाचं नाव आहे. ही घटना मंगळवारी (दि. २२) सकाळी मांदळेवाडी येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी रोहित अजय मिंडे यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मृत निखिलचा चुलता संजय नारायण मिंडे व चुलती कुंदा संजय मिंडे (दोघे रा. कौलीमळा थोरांदळे, पाटीलमळा रोड, ता. आंबेगाव) यांच्यावर मंचर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहित अजय मिंडे, निखिल मिंडे व त्याचे कुटुंबीय थोरांदळे येथे राहत आहेत. फिर्यादी रोहित यांचा चुलता संजय नारायण मिंडे यांच्यात शेतजमिनीच्या वाटपावरून वाद सुरू होते. त्याबाबत घोडेगाव न्यायालयात दावा दाखल असून, तो न्यायप्रविष्ट आहे. रविवारी (दि. २०) फिर्यादी रोहित आणि निखिल तसेच चुलता संजय, चुलती कुंदा यांच्यात जमिनीच्या वादातून भांडण झाले होते. चुलता संजय याने फिर्यादी रोहित व निखिल यांच्याविरोधात मंचर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतरसुद्धा चुलता व चुलतीने फिर्यादी रोहित आणि निखिल यांना शिवीगाळ केली होती. त्यामुळे फिर्यादी आणि त्याचा भाऊ निखिल मानसिक तणावाखाली होते. त्यातूनच निखिलने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास मंचर पोलीस करत आहेत.

माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या मेहुण्यासह पाचजणांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Newsworldmarathi Sangali: मिरज तालुक्यातील बेडग येथे शेत जमिनीचा ताबा घेण्यासाठी मारहाण करून शेतातील झोपडी पडली. याप्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे मेहुणे व युवा राष्ट्रवादीचे माजी पदाधिकारी यांच्यासह पाच जणांविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंडे यांचे मेहुणे जितेंद्र ऊर्फ बाळासाहेब ओमासे, रघु नागरगोजे, नेताजी ओमासे, मल्हारी खाडे, स्वप्निल साबळे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत राहुल सुरेश ओमासे (वय 24, रा. बेडग) यांनी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे मेहुणे जितेंद्र ओमासे व राहुल ओमासे यांच्यात बेडग येथील दीड एकर शेतजमिनीच्या मालकीवरून वाद आहे. याबाबत न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. न्यायालयाकडून आदेश मिळाल्याचा दावा करत २२ एप्रिल रोजी जितेंद्र ओमासे, रघु नागरगोजे, नेताजी ओमासे, मल्हारी खाडे, स्वप्निल साबळे हे सर्वजण राहुल ओमासे यांच्या शेतात गेले. जमीन ताब्यात घेण्यासाठ राहुल यांना झोपडीतून घराबाहेर काढून त्यांची झोपडी पाडली. राहुल यांचे वडील सुरेश यांना मारहाण केली व त्यांच्या आईला शिवीगाळ केली, असं तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात जितेंद्र ओमासे यांच्यासह चार साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहितान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयितांना अद्याप अटक केली नसून अधिक तपास सुरु आहेत.