बेकायदेशीर बिअर शॉपीविरोधात नागरिकांचा तीव्र संताप; तत्काळ परवाना रद्द करण्याची मागणी

0
Newsworldmarathi Pune: गगन अदिरा को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, वाघोली येथील ‘Booze Craving Beer And Wine Shop’ या बिअर शॉपीला दिलेला परवाना पूर्णपणे बेकायदेशीर आहे, अशी नागरिकांची ठाम भूमिका असून, सदर शॉपीविरोधात आज जोरदार आंदोलन करण्यात आले. सदर बिअर शॉपीस परवाना देताना स्थानिक सोसायट्यांचे व नागरिकांचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) घेण्यात आलेले नाही. तसेच शासकीय नियम धाब्यावर बसवून, अनधिकृतपणे परवाना प्राप्त करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या बिअर शॉपीमुळे परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांवर विपरीत सामाजिक व मानसिक परिणाम होत असून, परिसरातील शांतता व सुरक्षितता धोक्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर 25 एप्रिल 2025 रोजी भाजपा युवा मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप सातव यांच्या नेतृत्वाखाली संबंधित बिअर शॉपीसमोर गगन अधिरा, मॅजेस्टिक मेनहॅटन, पार्कलेन प्रीमियर, स्कायलाईट आदी सोसायट्यांतील नागरिकांनी तीव्र आंदोलन केले. तत्पूर्वी, 23 एप्रिल 2025 रोजी संदीप सातव यांनी पुणे जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डूड्डी तसेच राज्य उत्पादन शुल्क अधिकारी श्री. राजपूत यांच्याकडे नागरिकांचा हरकत नामा व स्वाक्षरीसह निवेदन सादर केले होते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळेच नागरिकांनी थेट आंदोलनाचा मार्ग स्वीकारत, परवाना रद्द करण्याची जोरदार मागणी केली आहे. निवेदनाच्या प्रतींसह संपूर्ण पुरावे सादर करण्यात आले असून, प्रशासनाने तत्काळ योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

…तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्याला घेराव घालणार; बच्चू कडूंचा इशारा

Newsworldmarathi sambhajinagar: शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे, लाडक्या बहिणीचे मानधन २१०० रुपये आणि दिव्यांगांच्या मानधनात वाढ करू, असं वचन महायुती सरकारने दिले होते. मात्र सत्ता मिळताच त्याचा विसर पडला आहे. त्यामुळे जून महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील बंगल्याला घेराव घालण्यात येईल, असा इशाराच प्रहारचे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. शहरातील संत एकनाथ रंगमंदिर येथे प्रहारचा विभागीय कार्यकर्ता मेळावा व संताजी धनाजी सन्मान पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. नेमकं काय म्हणाले बच्चू कडू बच्चू कडू म्हणाले, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, लाडक्या बहिणीचे मानधन २,१०० रुपये करू आणि दिव्यांगांच्या मानधनात वाढ करू, असे वचननाम्यात जाहीर केले होते; परंतु सत्ता मिळताच सरकार वचननामा पाळण्यास तयार नाही. त्यामुळे जून महिन्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील बंगल्याला घेराव घालण्यात येईल. पुढे म्हणाले, राज्यात निवडणुकीच्या तोंडावर आश्वासने देऊन महायुतीच्या नेत्यांनी मते मिळवली. परंतु आता ते बोलण्यास तयार नाही. त्यामुळे आता या नेत्यांना सळो की पळो करून सोडण्याची वेळ आली आहे. यापूर्वी मंत्र्यांच्या घरासमोर मशाल आंदोलन केले. आता १४ मे रोजी कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री यांच्या घरासमोर रक्तदान शिबीर आयोजित केले जातील. हे अभियान प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदारपणे राबवावे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यास सरकार तयार नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. दिव्यांगांचे मानधन पंधराशे रुपयांवर करण्यास सरकार तयार नाही, किमान वचननाम्याची तरी पूर्तता करा, असं बच्चू कडू यांनी यावेळी सरकारला बजावले आहे.

यंदा राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचा डिजिटल सर्वे; दलालांची साखळी मोडीत निघणार

Newsworldmarathi Mumbai : राज्य शासनाने शेतकऱ्यांना अधिक सुलभरीत्या शासकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि दलालांची साखळी मोडीत निघावी, यासाठी अॅग्रिस्टॅक प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. २०२५-२६ मध्ये कृषी उन्नती योजनेंतर्गत अॅग्रिस्टॅक प्रकल्पातील डिजिटल क्रॉप सर्व्हे होणार आहे. या वर्षात ८७३३.९७ लक्ष निधीच्या वार्षिक कृती आराखड्यातून खर्च होणार आहे. या योजनेंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच, शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच व शेतांचे भू-संदर्भीकृत यांचा माहिती संच एकत्रितरीत्या तयार करण्यात येत आहे. त्यामधील हंगामी पिकांचा माहिती संचअंतर्गत डिजिटल पीक सर्वेक्षण (डिजिटल क्रॉप सर्व्हे) राबविण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांपासून शेतीत यांत्रिकीकरणाबरोबरच अनेक बदल होत आहेत. कृषी उन्नती योजनेंतर्गत २०२५-२६ साठी अॅग्रिस्टॅक प्रकल्पातील डिजिटल क्रॉप सव्हे हा घटक राबविण्यासाठी केंद्र हिस्सा ६० टक्के (५२४०.३८ लाख) आणि राज्य हिस्सा ४० टक्के म्हणजे ३४९३.५९ लाख असा एकूण ८७३३.९७ लाख एवढ्या रकमेच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता दिली आहे. राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समितीच्या दि. २४ मार्चला आयोजित बैठकीत झालेल्या निर्णयानुसार २०२५-२६ साठी कृषी उन्नती योजनेंतर्गत अॅग्रिस्टॅक प्रकल्पातील डिजिटल क्रॉप सर्व्हे या घटकासाठी केंद्र हिस्सा ५२४०.३८ लक्ष आणि राज्य हिस्सा ३४९३.५९ लक्ष निधीच्या वार्षिक कृती आराखड्यास मंजुरी दिली आहे.

Ajit Pawar : महायुती सरकारचे काम चालते तीन शिप्टमध्ये; अजित पवारांनी दिनचर्याच सांगितली

0
Newsworldmarathi Pune : पुण्यात आज राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र या इमारतीचा भूमिपूजन सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. याशिवाय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत नव्या 20 दवाखान्यांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी अजित पवारांनी जम्मू-कश्मिरमधील पहलगाममधील हल्ल्याबाबत भाष्य करत सरकार 24 तास कार्यरत असलेल्या वेळापत्रकाची माहिती दिली. काय म्हणाले नेमकं अजित पवार? पुणे येथे एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमचे सरकार 24 तास जनतेच्या सेवेत असते. तसेच त्यांनी त्यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिनचर्या सांगितली. ते म्हणाले. मी पहाटे 4 वाजता उठतो. फिरतो, व्यायाम करतो. पहाटे ४ वाजता उठून कामाला सुरुवात करतो. यानतंर 10 ते 11 पर्यंत काम करतो. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 11 ते 2 काम करतात. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री 2 ते 4 या वेळेत काम करतात. त्यामुळे जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आमचे सरकार सदैव तत्पर आहे, असं अजित पवार म्हणाले. पुढे बोलताना म्हणाले, राज्य सरकारची कोणतीही कार्यालये भाडेतत्त्वावर ठेवायची नाहीत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जनतेला उत्तम सुविधा मिळाव्यात, यासाठी महायुती सरकार काम करत आहे. येत्या दोन-तीन वर्षात सर्व इमारतींचे काम पूर्ण झाले पाहिजे. मला सरकारी कार्यालये चांगली करण्याची आवड आहे. नागरिकांना आवश्यक सुविधा मिळायला पाहिजेत. पार्किंगची समस्या मोठी आहे. त्यामुळे आता बांधल्या जाणाऱ्या इमारतींमध्ये पार्किंगची व्यवस्था केली जाईल, असंही अजित पवार यांनी यावेळी सांगितले. दादा नेहमी आमच्या परीक्षा घेतात : प्रकाश आबिटकर प्रकाश आबिटकर म्हणाले, कामाची पध्दत, वेळ आणि जी गोष्ट आवडली नाही त्यावर तिथेच रिऍक्ट होतात, असे तुम्ही एकमेव राजकारणी आहात असं म्हणत अजित पवारांचं कौतुक केलं. आजही दादांनी परीक्षा घेतली की, सकाळी आठ वाजता ते आले. दादा नेहमी आमच्या परीक्षा घेतात आणि आमची अडचण होते, असं आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले.

आरोग्य सेवेसाठी पुणे राज्यातील दुसरे सर्वात महत्त्वाचे ठिकाण : मंत्री प्रकाश आबिटकर

0
Newsworldmarathi Pune: आरोग्य सेवा पुरविण्यासाठी पुणे हे राज्यातील दुसरे सर्वात महत्त्वाचे ठिकाण आहे. पुण्यात आरोग्य विभागाची अनेक राज्यस्तरीय कार्यालये आहेत. राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीमुळे आरोग्य विभागाची एकाच छताखाली येणार आहेत. यामुळे आरोग्य विभागाची सर्व कार्यालये एकाच ठिकाणी आल्यानंतर प्रशासकीय कामांमध्ये गतिमानता आणि दर्जेदार पायाभूत सुविधा आणि आरोग्य सुविधा देण्यास मदत होणार आहे, असं आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले. कुटुंब कल्याण भवन येथे आयोजित राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र इमारत भूमिपूजन आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत राज्यातील नवीन ४३ आपला दवाखान्यांच्या लोकार्पणप्रसंगी मंत्री प्रकाश आबिटकर बोलत होते. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज या इमारतीमध्ये प्रशिक्षण हॉल, व्हिडिओ कॉन्फरन्स हॉल, अभिलेख कक्ष, वाहनतळ, आदी पायाभूत सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे, या इमारतीचे काम नियोजित वेळेत पूर्ण करावे. आज लोकार्पण करण्यात आलेल्या नवीन आपला दवाखान्यांपैकी पुणे शहरात सात दवाखाने आहेत. या दवाखान्यांच्या माध्यमातून शहरी भागात झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरीब नागरिकांना अधिक गतिमान आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होतील, असे मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, सार्वजनिक आरोग्य विभागाचे काम समाजाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. आरोग्य विभागाने आतापर्यंत विविध महत्त्वाच्या मोहिमा यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. ग्रामीण आणि दुर्गम भागातही आपल्या सेवा पुरविल्या आहेत. या पुढील काळातही आरोग्य विभाग चांगली कामगिरी करून लोकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरवेल, असा विश्वास डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

१७ वर्षीय तरुणाची ५ जणांकडून गळा चिरून हत्या; नांदगाव परिसरात खळबळ

Newsworldmarathi Nandgao: नांदगाव तालुक्यातील वाखारी शिवारातुन एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पूर्ववैमनस्यातून पाच जणांनी मारहाण करत १७ वर्षीय मुलाची गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी रात्री वखारी परिसरात घडली आहे. रवींद्र उर्फ मुन्ना दिपक आहिरे (वय-१७, रा. बोधे.) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी रवींद्र अहिरे याचे वडील दिपक आहिरे (वय-४२) यांनी नांदगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी चौकशीची सूत्रे वेगाने फिरवत चार संशयितांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे नाव घेतल्याच्या पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वाखारी शिवारातील जंगलात या तरुणाचा मृतदेह आढळला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, मृतदेह ताब्यात घेऊन नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे. रवींद्र ऊर्फ मुन्ना आहिरे यास पूर्ववैमनस्यातून आकाश शरद सोनवणे, ऋषिकेश शरद पवार, विनोद शरद पवार, विजय एकनाथ सोनवणे, वींद्र अंकुश गायकवाड (सर्व रा. मोरवाडी साकुरी झाप, ता. मालेगाव) यांनी संगनमत करून ठार मारण्याचा कट रचून त्याच्या अंगावरील शर्ट फाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. तसेच त्याचा गळा धारधार शस्त्राने कापून त्यास तेथे सोडून पळून गेल्याचे मुलाच्या वडिलांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

संतापजनक…! मुलाचा वर्गात पहिला नंबर आणून देण्याच्या बहाण्याने महिला पालकावर शिक्षकांकडून बलात्कार

Newsworldmarathi Buldhana: बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. “तुमच्या मुलाला जास्त मार्क्स टाकून वर्गात पहिला नंबर आणून देतो, त्यासाठी आम्हाला खुश करावे लागेल….!” असं आमिष दाखवत एका महिला पालकावर दोन शिक्षकांनी वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना मलकापूर शहरात घडली आहे. या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने मलकापूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून, वर्गशिक्षकासह सहकारी शिक्षकांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्हीं आरोपी शिक्षकांना अटक केली आहे. समाधान इंगळे आणि अनिल थाटे अशी आरोपी शिक्षकांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, मलकापूर शहरातील नामांकित नूतन विद्यालयातील दोन शिक्षकांनी एका महिला पालकाला आपल्या जाळ्यात ओढत हे कृत्य केलं आहे. तुझ्या मुलाला आम्ही भरपूर मार्क्स देऊन नेहमीसाठी वर्गात पहिला नंबर आणून देऊ.., त्यासाठी आम्हाला खुश करावे लागेल…! असं म्हणत संधी साधून वारंवार बलात्कार केला आहे. दरम्यान, दोन्हीं आरोपीना न्यायालयात सादर केल्यानंतर न्यायालयाने दोन्ही शिक्षकांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. तसेच दोषींवर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

आमच्या मुलीला नंदवता येत नाही का? असं म्हणत जावयाला बेदम मारहाण

Newsworldmarathi Nagar: किरकोळ कारणावरून सासरच्या मंडळींनी चक्क जावयालाच मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे घडली आहे. याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गणेश बाजीराव ब्राम्हणे (वय-३१) यांनी सोनाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी गणेश दिलीप गव्हाणे, सचिन दिलीप गव्हाणे, दिलीप महादू गव्हाणे (सर्व रा. हिंगणी दुमाला ता. श्रीगोंदा) राजू जाधव (रा. चेडगाव, ता. राहुरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश ब्राम्हणे हे आपल्या घरी असताना त्या ठिकाणी आरोपी गणेश गव्हाणे, सचिन गव्हाणे, दिलीप गव्हाणे आणि राजू जाधव हे आले. आणि तुला आमच्या मुलीला नीट नांदविता येत नाही का? असा जाब विचारला. यावर फिर्यादी त्यांना समजावून सांगत असताना लोखंडी फायटर तसेच लोखंडी पाईपने व लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान वडील भांडण सोडविण्यासाठी मध्ये आले असता त्यांनाही लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. आमच्या नादी लागला तर एकेकाला जिवे ठार मारण्याची धमकी देऊन आरोपी त्या ठिकाणाहून निघून गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा अधिक तपास सोनाई पोलीस करत आहेत.

चितळे बंधूंची बाकरवडी आता ‘मिनी’ रूपात!

0
Newsworldmarathi Pune: आपल्या रुचकर आणि दर्जेदार उत्पादनांच्या जोरावर ग्राहकांच्या मनावर गेली ७५ वर्षे अधिराज्य गाजविणारे चितळे बंधू आपली जगप्रसिद्ध बाकरवडी आता नव्या ‘मिनी’ स्वरूपात घेऊन आले आहेत. चितळेंच्या या खमंग बाकरवडीचे हे नवे ‘मिनी’ रूप खवय्यांच्या विशेष पसंतीस देखील उतरत आहे. सध्या देशभरात आयपीएलचा उत्साह शिगेला पोहोचत असताना या क्रिकेट फिव्हरचे औचित्य साधत चितळे बंधूंनी ही ‘मिनी’ बाकरवडी सादर केली आहे. गेट मॅच रेडी विथ चितळे बाकरवडी म्हणजेच आयपीएल क्रिकेट सामन्याची तयारी चितळे बाकरवडी सोबतच असा संदेश देत सगळ्यांच्या आवडीची ही बाकरवडी नव्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. मिनी बाकरवाडीच्या साथीने क्रिकेटप्रेमींचा आयपीएल सामन्यांचा थरार अधिक रोमांचक होईल असा विश्वास व्यक्त करीत चितळे बंधूं मिठाईवालेचे भागीदार इंद्रनील चितळे म्हणाले, “आयपीएल दरम्यान क्रिकेट चाहते वेगवेगळ्या संघांमध्ये जरी विभागले गेले तरी खाद्यपदार्थ खऱ्या अर्थाने त्यांना एकत्र बांधून ठेवतात. आता चितळे बंधूंच्या या नव्या मिनी बाकरवडीसोबत आम्ही क्रिकेटरसिकांच्या रोजच्या क्रिकेट दिनचर्येचा एक अविभाज्य भाग बनणार आहोत याचा आम्हाला विशेष आनंद आहे.” आयपीएल ही भारतातील एक नावाजलेली आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली क्रिकेट स्पर्धा आहे त्यामुळेच आम्ही या क्रिकेट हंगामाच्या निमित्ताने मिनी बाकरवडी बाजारात आणण्याचा निर्णय घेतला. नजीकच्या भविष्यात या नव्या उत्पादनामुळे आम्ही भारताच्या नव्या बाजारपेठांमध्ये निश्चितच विस्तार करू, याची आम्हाला खात्री आहे असे चितळे बंधूं मिठाईवालेचे भागीदार केदार चितळे यांनी सांगितले. चितळे बंधू सध्या ७५ वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करून आपले अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघासोबत ते ‘स्नॅकिंग पार्टनर’ म्हणूनही जोडले गेले आहेत. अशातच ही मिनी बाकरवडी क्रिकेट रसिकांना चितळेंसोबत जोडणारा महत्वाचा दुवा ठरणार आहे.

डिजिटल पेमेंट व्यवहारांमध्ये टॉप ५ शहरांमध्ये पुण्याचा समावेश : वर्ल्डलाईन इंडियाचा रिपोर्ट

0
Newsworldmarathi Pune: देशात होणाऱ्या डिजिटल पेमेंट व्यवहारांमध्ये आकारमान (व्हॉल्यूम) आणि मूल्य (व्हॅल्यू) या दोन्ही बाबतीत पुणे शहराने सर्वोच्च पाच शहरांमध्ये स्थान मिळवले आहे. डिजिटल पेमेंटच्या एकूण व्यवहारांमध्ये पुणे शहराचा वाटा ११ टक्के असून तो २०२३ च्या दुसऱ्या सहामाहीत ८ टक्के होता. तसेच एकूण व्यवहार मूल्यामध्ये पुणे शहराचा वाटा १० टक्के असून त्यामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत ६ टक्के ची लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे. पेमेंट सेवांमध्ये जागतिक पातळीवर आघाडीवर असलेल्या वर्ल्डलाईन या कंपनीने आर्थिक वर्ष २०२४ च्या सहामाहीत (जुलै-डिसेंबर २०२४) त्यांच्याद्वारे प्रक्रिया केलेल्या डिजिटल व्यवहारांचा नवीनतम अहवाल प्रकाशित केला. यामध्ये भारतातील वेगाने विकसित होणाऱ्या पेमेंट इकोसिस्टममधील प्रमुख ट्रेंड मांडण्यात आले आहेत. त्यामध्ये ही माहिती समोर आली आहे. सर्वाधिक डिजिटल व्यवहार असलेल्या टॉप ५ शहरांमध्ये बेंगळुरू, नवी दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद या शहरांचा समावेश आहे. वर्ल्डलाईन इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश नरसिंहन म्हणाले, “डिजिटल व्यवहारांच्या संदर्भात भारतातील पहिल्या पाच शहरांमध्ये पुण्याला स्थान मिळाल्यामुळे त्याचे डिजिटल योगदान उठून दिसत आहे. कॅशलेस अर्थव्यवस्थेला त्यांनी जलदपणे स्वीकारले आहे हे त्यातून प्रतिबिंबित होत आहे. शहरातील गतिमान डिजिटल व्यवस्थेवर या टप्प्यामुळे प्रकाश पडत असून तंत्रकुशल लोक, भरभराटीला येत असलेले फिनटेक (अर्थ-तंत्रज्ञान) वातावरण आणि मजबूत डिजिटल पायाभूत सुविधा यांमुळे त्यांना चालना मिळत आहे. वर्ल्डलाईनमध्ये आम्ही व्यवसाय आणि ग्राहकांना दोन्ही सक्षम करणाऱ्या सुरक्षित, नाविन्यपूर्ण आणि समावेशक पेमेंट सोल्यूशन्सद्वारे या परिवर्तनाला चालना देण्यासाठी कटिबद्ध आहोत.” प्रमुख ग्राहक ट्रेंड दुकानातील खरेदी बळकट राहिली आणि त्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खालील व्यापारी श्रेणींचा समावेश होता : · किराणा दुकाने · रेस्टॉरंट्स · सेवा केंद्रे · कपड्यांची दुकाने · सरकारी सेवा · औषध दुकाने आणि रुग्णालये या श्रेणींचा एकूण इन-स्टोअर व्यवहारांमध्ये वाटा अंदाजे ६८ टक्के आणि एकूण मूल्यामध्ये ५३ टक्के होता. ऑनलाईन व्यवहारांना खालील गोष्टींनी चालना मिळाली : · ई-कॉमर्स · गेमिंग · उपयुक्तता बिलांची देयके · सरकारी सेवा · आर्थिक सेवा या वर्गांचा एकूण ऑनलाईन व्यवहारांमध्ये ८१ टक्के आणि मूल्यामध्ये ७४ टक्के वाटा होता