कोंढवा-येवलेवाडीत रात्रपाळीत साफसफाई
Newsworldmarathi Pune: कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाकडून हद्दीत रात्रपाळीत साफसफाई, स्वच्छताविषयक कामकाज सुरू करण्यात आले आहे. क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त लक्ष्मण कादबाने आणि वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राजू दुल्लम यांच्या पुढाकाराने कोठीनिहाय सेवकांना स्वच्छतेबाबत आणि सुरक्षतेबाबत मार्गदर्शन करून आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
या वेळी आरोग्यनिरीक्षक अभिजित सूर्यवंशी, प्रशांत कर्णे, साहिल धोत्रे आणि कोठीकडील मुकादम, रात्रपाळीतील सेवक उपस्थित होते. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपायुक्त संदीप कदम, परिमंडळ चारचे उपायुक्त प्रशांत ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या सर्वच साफसफाई कर्मचाऱ्यांकडून हे काम हाती घेतले आहे.
पुण्यात नवरा-बायकोच्या भांडणात ११ महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू; अंधश्रद्धेचा संशय
Newsworldmarathi Pune: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून, नवरा-बायकोच्या भांडणात ११ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ही दुर्दैवी घटना केडगाव गावात घडली असून, अवधूत मेंगवडे असं मृत बालकाचं नाव आहे. या प्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सचिन मेंगवडे हे आपल्या कुटुंबासह केडगाव येथे वास्तव्यास आहेत. किरकोळ कारणावरून त्यांचे आणि त्यांच्या पत्नीचे भांडण सुरू झाले. भांडणाचा राग आला असताना पत्नीने नवऱ्यावर हल्ला करण्यासाठी त्रिशूल उचलले. मात्र, तो त्रिशूल चुकून बाजूला असलेल्या भावजयेच्या कडेला लागला आणि तिथेच असलेल्या ११ महिन्यांच्या अवधूतच्या पोटात घुसला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. निष्पाप पुतण्याचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेत तपास सुरू केला आहे.
दरम्यान, ही घटना अंधश्रद्धेमुळे घडली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. भांडणाच्या प्रसंगी त्रिशूलचा वापर आणि त्यामागील हेतू याची चौकशी सुरु असून, पोलिस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार; खलिस्तानी हात असल्याचा संशय
Newsworldmarathi Team: प्रसिद्ध विनोदवीर कपिल शर्माने नुकतेच कॅनडामधील ब्रॅम्पटन शहरात ‘Kap’s Café’ सुरू केले होते. आपल्या पत्नी गिन्नी चतरथ हिच्यासह मोठ्या थाटात या कॅफेचे उद्घाटनही करण्यात आले होते. उद्घाटनाचे फोटो आणि व्हिडीओ कपिलने स्वतः आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत आनंद व्यक्त केला होता.
मात्र, या नव्या उपक्रमाला काही काळानंतर मोठा धक्का बसला आहे. ‘Kap’s Café’वर अज्ञात इसमांकडून गोळीबार करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोरांनी कॅफेवर तब्बल १० ते १२ गोळ्या झाडल्या असून, या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे स्थानिक परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
कॅफेच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून या घटनेनंतर काही स्टोरीज शेअर करण्यात आल्या आहेत. गोळीबाराच्या घटनेनंतर जे लोक मेसेज किंवा डायरेक्ट मेसेज (DM)द्वारे पाठिंबा देत आहेत, अशा सर्वांचे त्यांनी आभार मानले आहेत. तसेच, वेळीच हस्तक्षेप करणाऱ्या कॅनडा पोलिसांचेही त्यांनी आभार मानले आहेत.
या हल्ल्यामागे खलिस्तानी दहशतवाद्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, कॅनडातील सुरक्षा यंत्रणा या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास करत आहेत. सुदैवाने या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कपिल शर्माच्या कॅफेवर हल्ला झाल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी धोरणात्मक सहकार्याच्या दिशेने ठाम पाऊल
Newsworldmarathi Mumbai: राज्यातील मृद व जलसंधारण विभागाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच धोरणात्मक सहकार्याच्या उद्देशाने विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात मार्गदर्शन केले.
त्यांच्यासह सचिव गणेश पाटील, मृदुला देशपांडे (उपसचिव, मृद व जलसंधारण विभाग), रणदिवे (मुख्य कार्यकारी अधिकारी, वसुंधरा पाणलोट क्षेत्र विकास, पुणे) प्रमुख उपस्थित होते. या बैठकीला अपर्णा पाठक, कोमल धस, शिरीष कुलकर्णी, रमेश भिसे, संतोष राऊत, लतिका राजपूत, अरुण शिवकर, मंगल कुलकर्णी, कल्पेश कुलकर्णी, अश्लेषा खंडागळे, तसेच सुनिता मोरे यांची ऑनलाइन उपस्थिती होती.
बैठकीच्या सुरुवातीस राज्यातील दुष्काळी भागांमध्ये अद्यापही मूलभूत पाण्याच्या उपलब्धतेचा प्रश्न गंभीर असल्याचे अधोरेखित करताना मंत्री संजय राठोड म्हणाले, “दुष्काळमुक्त महाराष्ट्र हे आपले सामूहिक ध्येय असले पाहिजे. जलसंधारणात लोकसहभाग अत्यंत आवश्यक आहे.”
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जलसंधारणाच्या योजनांमध्ये पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि लोकसहभाग वाढवण्यासाठी काही ठोस उपाय सुचवले. “काम करू इच्छिणाऱ्या संस्थांसाठी आपण छोटे-छोटे युनिट तयार करू. उपसभापती कार्यालयाकडून अशा १५ विश्वासार्ह स्वयंसेवी संस्थांची यादी दिली जाईल. त्या संस्थांना पुढील कामात सहभागी करून घेतले जाईल,” असे त्या म्हणाल्या.
त्याचबरोबर, जल व मृदसंधारण क्षेत्रात आदर्श काम करणाऱ्या गावांची सादरीकरणे आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले. राज्यभरातील कार्यरत स्वयंसेवी संस्थांसाठी एक राज्यस्तरीय चर्चासत्र आयोजित करण्याचा प्रस्तावही डॉ. गोऱ्हे यांनी मांडला.
विशेष म्हणजे, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सूचनाही दिल्या. “सामाजिक संस्थासाठी नियमावली बनवून सर्वसमावेशक धोरण ठेवावे. त्यामध्ये लाडक्या बहिणी, एकल महिला यांना जल व मृदसंधारणाच्या कामात सहभागी करून घेता येईल. यामुळे त्यांना आर्थिक व सामाजिक स्थैर्य प्राप्त होईल,” असे त्या म्हणाल्या.
तसेच भटक्या व विमुक्त समाजासाठी विशेष उपक्रम तयार करून त्यांचे सक्षमीकरण करण्यावर भर देण्यात यावा, अशी सूचना त्यांनी केली. याशिवाय, “चौथ्या महिला धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता करताना, त्यानुसार विभागाच्या योजना व धोरणे तयार करावीत,” असेही त्या स्पष्टपणे नमूद केले.
या बैठकीत पुढील काळात केवळ योजना सादरीकरणापुरते मर्यादित न राहता “क्रियान्वयन, मूल्यांकन आणि लोकसहभाग” या तीन मुख्य मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून धोरणात्मक बैठका घेण्यावर एकमत झाले. भविष्यात पावसाचे प्रमाण, भूजल पातळी, शाश्वत सिंचन योजना आणि गावस्तरावर महिला पाणी समित्यांचा सहभाग यावरील सादरीकरणांची मालिका घेण्याची कल्पनाही बैठकीत मांडण्यात आली.
कात्रज – हडपसर मेट्रो त्वरित सुरू करा; आमदार योगेश टिळेकर यांची मागणी
Newsworldmarathi Pune: हडपसर विधानसभा मतदारसंघात सिव्हील कोर्ट ते कोंढवा बुद्रुक व खुर्द, येवलेवाडी मेट्रो मार्गास मंजुरी मिळाली आहे. हडपसर-सासवड रोड, हडपसर-लोणी काळभोर देखील मार्गिका मंजूर झाल्या
आहेत. या मार्गामुळे हडपसरमधून शहरासाठी कनेक्टिव्हिटी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. परंतु, पहिल्या टप्प्यात कात्रज ते हडपसर ही मेट्रो मार्गिका प्राधान्याने सुरू करावी, अशी मागणी आमदार टिळेकर यांनी केली.
सावता महाराज समाधी सोहळा…
संत सावता महाराज यांचा समाधी सोहळा २० जुलैला अरणमध्ये होत आहे. काशी कापडी समाजाला पालखीचा मान असतो. पालखीचे नियोजन विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व्यवस्थापनाने करावे, अशी मागणी पंढरपूर येथे हरताळे दिंडी मठात संत सावता महाराज धर्मदाय न्यास व भाविकांनी केली आहे. याचा खर्च मंदिर व्यवस्थापनाने करावा, असा आदेश सभापतींनी द्यावा, अशी मागणी आमदार टिळेकर यांनी केली.
विधान परिषदेत केलेल्या मागण्या…
अहिल्या-सावित्री सृष्टी उभारावी
पुण्यात महाज्योतीचे स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करावे
छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाला निधी द्यावा
हडपसर ते यवत या उन्नत मार्गाची व्याप्ती वाढवावी
उड्डाण पूल भैरोबानालापासून यवतपर्यंत न्यावा
मुख्य रस्त्यांची दुरूस्ती तातडीने व्हावी
पुण्यातील ढोल-ताशा पथकांना दिलासा; पारंपरिक वाद्यांवर खटले नाहीत; सहआयुक्त रंजनकुमार शर्मा
Newsworldmarathi Pune: महाराष्ट्रातील सण-उत्सवांमध्ये पारंपरिक वाद्यांना विशेष महत्त्व आहे. विशेषतः गणेशोत्सवात ढोल-ताशा पथकांची मिरवणुकीत महत्वाची भूमिका असते. अशा पारंपरिक वाद्यांबाबत पुण्यातील पथकांना दिलासा देणारी बातमी मिळाली आहे. पुणे शहराचे पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, ढोल-ताशा वाजवण्यावर कोणतेही गुन्हे दाखल केले जाणार नाहीत. भूतकाळात जर अशा प्रकारचे खटले दाखल झाले असतील, तर ते थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
ढोल-ताशा महासंघाच्या बैठकीत शर्मा यांनी पथकांच्या सरावाच्या वेळेबाबतही मार्गदर्शन केले. रात्री १० नंतर ढोल-ताशांच्या सरावामुळे नागरिकांना त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारी पोलिस नियंत्रण कक्षात येतात. त्यामुळे, सर्व पथकांनी सराव वेळेआधी सुरू करून तो रात्री १० पूर्वीच संपवावा, असे आवाहन त्यांनी केले.
पारंपरिक वाद्यांचा सन्मान राखत, सार्वजनिक शांततेचेही भान ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. या निर्णयामुळे पारंपरिक वाद्यप्रेमी आणि ढोल-ताशा पथकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भारतीय टेनिसपटू राधिका यादवची वडिलांकडून गोळ्या झाडून हत्या
Newsworldmarathi Hariyana: भारतीय टेनिसची उदयोन्मुख खेळाडू राधिका यादव (२५) हिची तिच्याच वडिलांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. आरोपी वडिलांचे नाव दीपक यादव असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
ही घटना गुरुवारी सकाळी १०.३० वाजता गुरुग्राममधील सेक्टर ५७ येथील पहिल्या मजल्यावरील घरात घडली. राधिकावर तिच्या वडिलांनी तीन गोळ्या झाडल्या. गंभीर अवस्थेत तिला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
हत्या का केली याबाबत विचारणा केली असता, आरोपी वडिलांनी दिलेल्या कबुलीजबाबात धक्कादायक माहिती समोर आली आहे. दीपक यादव यांच्या म्हणण्यानुसार, राधिकाने सुरु केलेली टेनिस अकादमी आणि सोशल मीडियावरील तिची सक्रियता यावरून तो नाराज होता. तिच्या reel व्हिडीओंमुळे समाजात टोमणे ऐकावे लागत असल्याचे त्याने सांगितले. यावरूनच रागाच्या भरात त्याने राधिकाची हत्या केली, असे समजते.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून राधिकाच्या अकाली मृत्यूने क्रीडा क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
तुकडे बंदी कायदा रद्द! संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या लक्षवेधी प्रश्नावर राज्य सरकारची मोठी घोषणा
Newsworldmarathi Mumbai: विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीने महत्वपुर्ण लक्षवेधी सभागृहात मांडली. यामध्ये तुकडे बंदी कायदा रद्द करून नागरी क्षेत्रामध्ये जे जमिनीचे तुकडे झाले आहेत, त्यांना कायदेशीर करावे अशी मागणी आमदार खताळ यांनी केली. यावर महसूल मंत्री बावनकुळे यांनी तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची मोठी घोषणा विधानसभेत केली आहे. या निर्णयाने राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
तुकडेबंदी कायद्यामुळे मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र राज्यभर आहे. वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणामुळे जमीनीची खरेदी-विक्री मोठ्याप्रमाणावर होत आहे. यामध्ये लाखो कुटुंबांनी एक-दोन गुंठे जमीन खरेदी करून बांधकामे केली आहेत, मात्र यानंतर कायदेशीर बाबींमुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात आमदार अमोल खताळ यांनी सभागृहात अत्यंत महत्वाची लक्षवेधी मांडून सरकारचे लक्ष वेधले असता, राज्य सरकारकडून मोठ्या क्रांतीकारी निर्णयाची घोषणा करण्यात आली आहे.
या संदर्भात महसूल मंत्री बावनकुळे यांनी सभागृहात सांगितले की, 15 दिवसात याबाबत एसओपी केली जाणार आहे. यामध्ये 1 जानेवारी 2025 पर्यंत जे तुकडे झाले, तुकडी बंद कायदा असल्याने व्यवहार करता येत नाही. तुकडे बंदी कायदा रद्द केला जाईल. एक एसओपी केली जाईल. महसूल, नगरविकास, जमाबंदी आयुक्त या वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती गठित केली जाईल. ही समिती एसओपी करेल. सुमारे 50 लाख लोकांना याचा फायदा होईल. या संदर्भातील 15 दिवसात सूचना असतील, तर कराव्यात असेही बावनकुळे यांनी आवाहन केलं आहे.
संगमनेर शहरालगतच्या गावांमध्ये तुकडेजोडबंदी कायदा लागू होत नाही, अंमलबजावणीबाबत स्पष्टता द्यावी. 1947 च्या तुकडेजोडबंदी कायद्याच्या कलम ३ नुसार नगरपालिका हद्दीपासून दोन मैलांपर्यंतचा भाग व रिजनल प्लॅनमधील गावे या कायद्याच्या कक्षेत येत नाहीत. संगमनेर नगरपरिषद हद्दीलगत घुलेवाडी, गुंजाळवाडी, सुकेवाडी, कासारवाडी, समनापूर, संगमनेर खुर्द या गावांमध्ये नागरिकांनी एक-दोन गुंठ्याचे भूखंड खरेदी केले आहेत. मात्र तुकडेबंदी कायद्यामुळे अडथळा निर्माण होत आहे,”अमोल खताळ, आमदार
सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण; पडळकरांच्या वक्तव्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड; पवार कुटुंबावर नाव न घेता टीका
Newsworldmarathi Mumbai: भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी हिंदुत्ववादी मोर्चादरम्यान केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. पुण्यात सांगलीतील ऋतुजा पाटील हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ हिंदुत्ववाद्यांनी मोर्चा काढला होता. या मोर्चात भाषण करताना पडळकरांनी पवार कुटुंबावर नाव न घेता टीका केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.
पडळकरांनी आपल्या भाषणात “एका गटाचे लोक एका मोर्चामध्ये पुढे पुढे करत आहेत. ते घर पण तसंच आहे. संकष्टीच्या दिवशी उपवास असतो, पण त्या दिवशी मटण आणायचं. एकादशीच्या दिवशी चिकन आणायचं. त्या घरातील लोक एकादशीच्या दिवशी दगडूशेठ गणपतीला मटण खाऊन जातात,” असे म्हटले. याचवेळी त्यांनी “तिची सासू ख्रिश्चन आहे, नवरा ब्राह्मण आहे, बाप मराठा आहे आणि आई दुसरीच आहे. असं ते कॉकटेल कुटुंब आहे,” असे विधान करून अप्रत्यक्षपणे पवार कुटुंबावर निशाणा साधला.
या वक्तव्यामुळे पडळकरांना टीकेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. सुप्रिया सुळे व शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना त्यांनी वापरलेली भाषा आक्षेपार्ह ठरू शकते, अशी प्रतिक्रिया अनेक राजकीय नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. आता या विधानावर राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सुदर्शन चौधरी यांच्या उपक्रमातून समाजसेवेचा आदर्श
Newsworldmarathi Pune: कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ अथवा भेटवस्तू देण्याऐवजी शालेय साहित्य दान करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाला मित्र परिवाराने भरभरून प्रतिसाद दिला असून, सुमारे १४,००० वह्या व इतर शालेय साहित्य जमा करण्यात आले.
या उपक्रमाअंतर्गत, आज सोरतापवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत २१० विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच वह्या वाटप करण्यात आल्या. एकूण १०५० वह्यांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसून आला.
कार्यक्रमात उपस्थित असलेल्या उद्योगपती तानाजीशेठ चोरघे यांनी शाळेसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी मोठ्या क्षमतेचा वॉटर फिल्टर देण्याची घोषणा केली, ज्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.
या उपक्रमासाठी गावच्या सरपंच सुप्रियाताई चौधरी, तानाजीशेठ चोरघे, डॉ. नितीन चौधरी, सनी चौधरी, अमित चौधरी, सोनाशेठ कड सुहास चौधरी, राहुल गाढवे तसेच मंडळातील अनेक तरुण सहकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुदर्शन चौधरी यांच्या या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक संदेश गेला असून, वाढदिवस साजरा करण्याचा हा अनोखा आणि विधायक मार्ग सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

