Devendra Fadnavis : एक तेजस्वी तारा मावळला; देवेंद्र फडणवीसांनी नारळीकर यांना वाहिली श्रद्धांजली
Newsworldmarathi Mumbai : Dr. Jayant Narlikar : ज्येष्ठ वैज्ञानिक, खगोल शास्त्रज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे पुण्यात त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. झोपेत असतानाच त्यांनी शांतपणे वयाच्या ८६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारतीय विज्ञानविश्वावर शोककळा पसरली आहे.
ज्येष्ठ वैज्ञानिक, खगोल शास्त्रज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचं निधनामुळे वैज्ञानिक, साहित्यिक आणि शिक्षण क्षेत्रातील एक तेजस्वी तारा मावळला आहे. एक महान शास्त्रज्ञ आणि तितकाच मोठा लेखक आपण गमावला अशी प्रतिक्रिया समाजमाध्यमावर देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारळीकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ आणि विज्ञान लेखक, महाराष्ट्र भूषण जयंत नारळीकर यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. वैज्ञानिक विषयात साहित्य निर्मिती करून विज्ञानाचा प्रसार करण्यात त्याची अत्यंत मोलाची भूमिका राहिली. त्यासाठी जागतिक पातळीवर त्यांना पुरस्कारांनी गौरवण्यात आले. खगोल भौतिकी क्षेत्रात त्यांनी अनेक दशके संशोधन केले.
तसेच खगोल शास्त्रासारखा किचकट विषय अतिशय सोप्या शब्दात त्यांनी सामान्य वाचकांना समजावून सांगितला. वृत्तपत्रीय लेखनासोबतच मोठी ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली. मराठीतून त्यांचे लिखाण ही महाराष्ट्रीयन वाचक आणि जिज्ञासूंसाठी एक मोठी पर्वणीच होती.
पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांवरही त्यांनी काम केले. एक महान शास्त्रज्ञ आणि तितकाच मोठा लेखक आपण गमावला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, असं सेवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितले.
पुणे हादरले… ! शिवसेनेचे युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारेंच्या वाहनावर गोळीबार, बुलेट काच फोडून शिरली आत
Newsworldmarathi Pune: रेकॉर्डवरील गुन्हेगाराने शिवसेना युवा सेना जिल्हा प्रमुख निलेश घारे यांना धमकी देणारा फोन केला होता. त्यानंतर रात्री उशिरा त्यांच्या गाडीवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास गणपती माथा येथील निलेश घारे यांच्या कार्यालयाबाहेर घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश घारे हे आपल्या जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांसोबत बसले होते. कार्यालयाबाहेर त्यांची गाडी पार्क केली होती.
त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या काळ्या रंगाच्या क्रेटा कारवर गोळीबार केला. त्यातील एक गोळी त्यांच्या कारच्या काचेला लागली.
या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्हीमध्ये दोघे जण दुचाकीवरुन येताना दिसत आहेत. त्यातील एकाने आपल्याकडील पिस्तुलातून गोळी झाडताना निदर्शनास येत आहे. फॉरेन्सिक पथकाने येऊन परिसराचा पंचनामा करुन माहिती गोळा केली आहे.
दरम्यान, वारजे माळवाडी भागातील एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराने निलेश घारे यांना काल धमकीचा फोन केला होता. या धमकीच्या फोन बाबत घारे यांनी वारजे माळवाडी पोलिसांना माहिती दिली होती. मात्र, त्यानंतर काही वेळाने गोळीबाराची घटना घडली आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगार पसार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
या प्रकरणी पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले की, एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराने निलेश घारे यांना काल सायंकाळी धमकी दिली होती. तशी तक्रार त्यांनी वारजे पोलिस ठाण्यात केली होती. त्यानंतर ते रात्री कार्यालयात असताना त्यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. त्यातील एक गोळी कारच्या काचेला लागली आहे. काही वर्षांपासून निलेश घारे यांनी आपल्या जिवाला धोका असल्यामुळे पोलीस संरक्षण मिळावे, असा अर्ज देखील केला आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली आहे.
अजित पवार जातीयवाद्यांना पोसतात, त्याचे परिणाम भोगावे लागतील : मनोज जरांगे यांचा इशारा
Newsworldmarathi Beed : ओबीसी आरक्षणासाठी आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. खासदार छगन भुजबळ यांनी केलेल्या वर्णात्मक विधानांनंतर जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेत अजित पवारांवर जातीयवाद पोसल्याचा आरोप केला.
जरांगे म्हणाले, “छगन भुजबळ सातत्याने ओबीसी आणि मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या जातीयवादी विधानांवर अजित पवार काहीच बोलत नाहीत. याचा अर्थ ते त्यांना पाठीशी घालतात.”
ते पुढे म्हणाले, “अजित पवार जर भुजबळांसारख्या नेत्यांना पोसतील, तर त्याचे गंभीर परिणाम त्यांनाच भोगावे लागतील. आम्ही मराठा समाजासाठी न्याय मागतोय, पण काही जण मुद्दाम द्वेष पसरवत आहेत.”
जरांगे यांनी ओबीसी समाजातील अनेकांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला असल्याचे सांगितले. “काही मोजक्या नेत्यांमुळे संपूर्ण समाज बदनाम होतोय. आम्ही फूट पाडू इच्छित नाही, पण सतत अपमान सहन करणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
भुजबळांच्या विधानांनी समाजात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यावर अजित पवार गप्प बसल्याने, मराठा आंदोलकांमध्ये नाराजी पसरली आहे. मनोज जरांगे यांच्या या इशाऱ्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे.
Maharashtra Rain Update : नागरिकांनो काळजी घ्या…! राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Newsworldmarathi Pune: राज्यात ठिकठिकाणी पाऊस पडत आहे. दरम्यान, कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट आहे. तर मराठवाडा व विदर्भात पावसाचा यलो अलर्ट आहे. या दरम्यान अनेक जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह जोरदार, मध्यम स्वरूपाचा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यावर पावसाला अनुकूल असलेला कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. कर्नाटकच्या किनारपट्टीलगत चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईसह उपनगर आणि कोकणात अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
आज या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट
आजच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर तळकोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित भागांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला असून वीजांसह वादळी वाऱ्यांची शक्यता असल्याने नागरिकांनी सुरक्षित स्थळी थांबावे. एकूणच पाहता महाराष्ट्रातील हवामान सध्या मोठ्या प्रमाणावर बदलत असून, पुढील काही दिवसांत पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
राज्यात गेले काही दिवस वादळी पावसाचा अनुभव सुरू आहे. सकाळच्या वेळात उष्णता जाणवत असली तरी दुपारनंतर वादळी पावसाचे प्रमाण वाढत आहे. यामुळे तापमानात सतत चढ-उतार होत असून, उकाडा अधिक जाणवत आहे.
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांचे मंत्रिमंडळात कमबॅक, मंत्रिपदाची घेतली शपथ, नाराजीनाट्याचा शेवट गोड
Newsworldmarathi Mumbai : Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी १० वाजता हा शपथविधी सोहळा पार पडला.
बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासूनच भुजबळ यांना पुन्हा मंत्रिपद दिले जाणार अशी चर्चा होती. अखेर आज ही चर्चा खरी ठरली असून, भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा खात्याचे जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकार अस्तित्वात आल्यावर डिसेंबर २०२४ मध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. या विस्तारावेळी छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे भुजबळ काहीसे नाराज झाले होते. यानंतर त्यांनी विविध माध्यमातून आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती. अखेर भुजबळांची मंत्रिपदी वर्णी लागली असून, त्यांनी आज सकाळी दहा वाजता राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांची नाराजी दूर झाली आहे.
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन
Newsworldmarathi Pune: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे पुण्यात त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. झोपेत असतानाच त्यांनी शांतपणे शेवटचा श्वास घेतला.
डॉ. नारळीकर यांचा जन्म १९ जुलै १९३८ रोजी कोल्हापूर येथे झाला होता. त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून पीएच.डी. मिळवली आणि जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ सर फ्रेड हॉईल यांच्यासोबत ‘हॉयल-नारळीकर गुरुत्वाकर्षण सिद्धांत’ मांडला, ज्यामुळे त्यांचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकले.
भारतीय खगोलशास्त्राच्या क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. ‘आयुका’ (Inter-University Centre for Astronomy and Astrophysics) या संस्थेची स्थापना करून त्यांनी संचालक म्हणून दीर्घकाळ कार्य केले. त्यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मभूषण (१९६५) आणि पद्मविभूषण (२००४) या प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित केले.
त्यांच्या पत्नी डॉ. मंगला नारळीकर या देखील ज्येष्ठ गणितज्ञ होत्या. जुलै २०२३ मध्ये त्यांचे पुण्यात कर्करोगाने निधन झाले होते.
डॉ. नारळीकर यांच्या निधनाने भारतीय विज्ञानजगतात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
पुण्याच्या सायेशाचा आंतरराष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत झेंडा
Newsworldmarathi Pune: सेंट मेरीज ज्युनिअर कॉलेज, पुणेची १७ वर्षांची विद्यार्थिनी सायेशा राजेश गोयल हिने १२ ते १६ मे दरम्यान लंडन, युनायटेड किंगडम येथे झालेल्या इंग्लिश स्पीकिंग युनियनने आयोजित केलेल्या इंटरनॅशनल पब्लिक स्पीकिंग काँटेस्ट (IPSC) मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.
ही स्पर्धा जगभरातील ४७ देशांतील सहभागींसाठी अत्यंत प्रतिष्ठित मानली जाते. आपल्या देशात स्पर्धा देणाऱ्या १ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांमधून प्रत्येक देशातील एक विजेता निवडून अंतिम फेरीसाठी पाठवला जातो.
सायेशाने स्पर्धेदरम्यान भारताच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवत एक सर्जनशील सादरीकरण सादर केले. तिने कापड, भरतकाम आणि पारंपरिक विणकामांचा वापर करत भारताच्या विविधतेतील एकतेचे प्रतीक दाखवले. उपस्थित सर्वांनी तिच्या सादरीकरणाची स्तुती केली.
स्पर्धेदरम्यान सहभागी विद्यार्थ्यांना लंडन शहराची सफर घडवण्यात आली आणि तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून वक्तृत्वाचे प्रशिक्षण देण्यात आले. उपांत्य फेरीमध्ये उत्स्फूर्त भाषणे व महात्मा गांधींच्या “खरी एकता ही तीव्र परीक्षा सहन करूनही तुटत नाही” या विधानावर आधारित पूर्वतयारी केलेले भाषण घेण्यात आले. सायेशाने दोन्ही फेऱ्यांत उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम सहा स्पर्धकांमध्ये स्थान मिळवले.
१६ मे रोजी सायेशाने लंडनमधील प्रतिष्ठित रॉयल इन्स्टिट्यूशन येथे अंतिम फेरीत विल्यम शेक्सपियरच्या “We know what we are, but not what we may be” या विषयावर प्रभावी भाषण सादर केले. तिचे भाषण डिप्लोमॅट्स, राजदूत आणि उपस्थित प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे गौरवले.
सायेशाच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिला उपविजेतेपद मिळाले, ज्यामुळे भारताचे नाव जागतिक स्तरावर उजळले.
स्पर्धेनंतर भारताच्या उच्चायुक्त कार्यालयातील निधी चौधरी यांनी सायेशाची भेट घेऊन अभिनंदन केले.
हवाई दलाच्या जवानाच्या वेशात फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला पुण्यात अटक
Newsworldmarathi Pune : दक्षिणी कमांड मिलिटरी इंटेलिजन्स पुणे आणि पुणे शहराच्या खराडी पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत हवाई दलाच्या जवानाच्या वेशात फसवणूक करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली असल्याची माहिती पुणे पोलिसांनी रविवारी दिली.
पुणे पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी गौरव कुमार (वडिलांचे नाव – दिनेश कुमार) याच्या संशयास्पद हालचालींबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्याला अडवण्यात आले.
सखोल पडताळणी आणि निगराणीच्या प्रक्रियेनंतर, दक्षिणी कमांड मिलिटरी इंटेलिजन्स पुणे आणि खराडी पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने १८ मे रोजी रात्री ८:४० वाजता पुणे शहरातील खराडी परिसरात आरोपीला ताब्यात घेतले.
शोध मोहिमेदरम्यान, आरोपीकडून फसवणुकीसाठी वापरले गेलेले काही साहित्य जप्त करण्यात आले, ज्यामध्ये दोन हवाई दलाचे टी-शर्ट, एक हवाई दलाचा कॉम्बॅट पँट, एक जोडी हवाई दलाचे कॉम्बॅट शूज, दोन हवाई दलाचे बॅजेस, एक ट्रॅक सूट अप्पर समाविष्ट आहे, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली.
पुणे पोलिसांनी आरोपीवर भारतीय दंड संहिता (BNS) च्या कलम १६८ अंतर्गत खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपीचा चौकशी सुरू असून, त्याच्या कृत्यामागील हेतू आणि संभाव्य सुरक्षेशी संबंधित परिणाम तपासले जात आहेत. अधिक तपशील लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
BJP District Chief Fake List : भाजपच्या ८१ जिल्हाध्यक्षांची यादी व्हायरल; रवींद्र चव्हाणांनी दिलं स्पष्टीकरण
Newsworldmarathi Mumbai : BJP District Chief Fake List : : भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षांची एक यादी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गेल्या आठवड्यात भाजपच्या ५८ जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर झाल्यानंतर आता समाजमाध्यमांमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष २०२५ या नावाने ८१ जिल्हाध्यक्षांची बनावट यादी फिरत आहे.
या यादीतील नावांमुळे अनेकांचा संभ्रम निर्माण झाला होता. सोशल मीडियात बनावट ८१ जिल्हाध्यक्षांची यादी व्हायरल झाल्याने भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियात जिल्हाध्यक्षांची व्हायरल झालेली यादी बनावट असून तिचा पक्षाशी कोणताही संबंध नाही, असे रवींद्र चव्हाण यांनी एका निवेदनाद्वारे म्हटले आहे.
भारतीय जनता पक्षाने १३ मे रोजी राज्यातील ७८ पैकी ५८ जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. उर्वरित २० जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या
पक्षांतर्गत गटबाजी आणि राजकीय रस्सीखेच यामुळे लटकल्या आहेत. संपूर्ण राज्यात जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या करताना पक्षाने सदस्य नोंदणी हा निकष लावला आहे. जिल्हाध्यक्षपदासाठी मोठी चुरस आणि स्पर्धा असल्याने निवडीची प्रक्रिया खोळांबली आहे.
पक्षाने २० एप्रिल रोजी जिल्हाध्यक्ष निवडीसाठी त्या त्या निरीक्षकांची नेमणूक केली होती. संबंधित ठिकाणी पक्षनिरीक्षक जाऊन स्थानिक नेतृत्वाशी चर्चा करून आठवडाभरात प्रदेश कार्याध्यक्षांना अहवाल देणार होते. त्यानंतर १ मेपर्यंत जिल्हाध्यक्षांच्या निवडी जाहीर करण्यात येतील, असे पक्षाकडून सांगण्यात आले होते.
दरम्यान, सोशल मीडियात सध्या ८१ जिल्हाध्यक्षांची व्हायरल झालेली यादी बनावट असून तिचा पक्षाशी कोणताही संबंध नाही. सदरील बनावट यादीत अनेक चुकीची नावे असून ती हेतुपुरस्सरपणे पसरवण्यात येत आहेत. या प्रकारामुळे पक्षाची बदनामी होण्याची शक्यता असून खोटी माहिती प्रसारित करणाऱ्यांविरोधात सायबर क्राईम अंतर्गत पोलीस तक्रार दाखल करण्यात येणार आहे.
‘त्या’ यादीवर विश्वास ठेवू नका : विक्रांत पाटील
सोशल मीडियावर भाजप जिल्हाध्यक्ष २०२५ या नावाने फिरणारी ८१ जिल्हाध्यक्षांची यादी बनावट असून, तिचा पक्षाशी कोणताही संबंध नाही. आतापर्यंत भाजपच्या फक्त ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली असून अजून 22 जिल्हाध्यक्ष घोषित होणे बाकी आहे. त्यामुळे बनावट यादीवर विश्वास ठेवू नये असे आवाहन भाजप नेते विक्रांत पाटील यांनी केले आहे.
छत्रपती साखर कारखाना निवडणुकीची मतमोजणी सुरू
Newsworldmarathi Bhavaninagar : भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. सकाळी 9 वाजल्यापासून मतपत्रिकांची जुळवाजुळव सुरू झाली असून, पहाटे 11 वाजता सुरुवातीचे कल समोर येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे कारखान्याचे सभासद आणि हितचिंतक याकडे उत्सुकतेने लक्ष ठेवून आहेत.
या निवडणुकीबाबत निवडणूक निर्णय अधिकारी आणि बारामतीचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार, प्रथम ब प्रवर्गातील उमेदवारांचा निकाल जाहीर केला जाणार असून, त्यानंतर सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांची मतमोजणी होणार आहे.
काल शांततेत मतदान पार पडले. मतमोजणीची प्रक्रिया बारामतीच्या प्रशासकीय इमारतीतील यांत्रिकी भवन, जलसंपदा आणि लघु पाटबंधारे विभागाच्या दुसऱ्या मजल्यावर पार पडत आहे. यासाठी 38 टेबलांची रचना करण्यात आली असून मतमोजणी दोन फेरींमध्ये पूर्ण होणार आहे.
मतदानादरम्यान सुरुवातीला उन्हामुळे मतदारसंघात मतदानाची टक्केवारी 50% च्या आत होती. मात्र, दुपारी नागरिक मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी आले, त्यामुळे टक्केवारीत लक्षणीय वाढ झाली. एका मतदाराकडे दहा मतपत्रिका असतानाही मतदान प्रक्रियेने वेग पकडला.
या निवडणुकीदरम्यान काही मतदारांची नावे मतदान यादीतून गायब असल्याचे आणि काहींच्या नावांची नोंद चुकीच्या मतदान केंद्रावर झाल्याने काहीसा गोंधळ निर्माण झाला. तरीही मतदानाची प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली असून, थोड्याच वेळात निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

