पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) ची 48 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पारितोषिक वितरण समारंभ येत्या गुरुवारी, 23 जानेवारी रोजी आयोजित केला आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे राजकीय वर्तुळात या कार्यक्रमाला विशेष महत्त्व आहे.
कार्यक्रमादरम्यान वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कारासह अन्य पुरस्कार वितरित करण्यात येणार आहेत. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, तसेच संस्थेचे विश्वस्त आणि नियामक मंडळ सदस्य यांचीही उपस्थिती असेल, अशी माहिती व्हीएसआयचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या कार्यक्रमावर सहकार आणि साखर क्षेत्रातील व्यक्तींनी लक्ष ठेवले आहे, कारण हा कार्यक्रम सहकार क्षेत्रातील महत्त्वाचे संकेत देऊ शकतो.
सभेमध्ये सभासद कारखान्यांना आणि विभागवार जास्तीत जास्त उसाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना ऊसभूषण, राज्यस्तरीय ऊसभूषण, साखर कारखान्यातील आणि संस्थेमधील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना वैयक्तिक, साखर कारखान्यांना विभागवार तांत्रिक कार्यक्षमता, सर्वोत्कृष्ट ऊसविकास आणि संवर्धन, सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन, सर्वोत्कृष्ट आसवनी, सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन, नावीन्यपूर्ण आणि तांत्रिकदृष्ट्या सर्वोत्तम कारखाना, सर्वोत्कृष्ट उद्योजक कारखाना यांना विविध पुरस्कार दिले जाणार आहेत. प्रशस्तिपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, असे वळसे पाटील यांनी सांगितले.
सन 2023-24 वर्षामध्ये सर्वाधिक ऊस उत्पादन घेतल्याबद्दल एकूण सहा शेतकऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. उत्कृष्ट कामगिरीबद्दल एकूण 13 सहकारी आणि सात खासगी साखर कारखान्यांना पुरस्कार प्राप्त झाले आहेत. साखर कारखान्यांतील अधिकाऱ्यांना वैयक्तिक सात बक्षिसे तसेच संस्थेतील अधिकारी आणि कर्मचारी यांना पाच वैयक्तिक बक्षिसे या वेळी देण्यात येतील, असेही वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.