Newsworldmarathi Rajapur: राजापूर तालुक्यातील रायपाटण येथे १७ एप्रिल रोजी सकाळी नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा नदीच्या पात्रात पाय घसरून बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गंधार अमित पळसुलेदेसाई (१५ मु. रायपाटण, कदमवाडी) असे दुर्घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो रायपाटण येथील जिजामाता विद्यामंदिरात इयत्ता नववीमध्ये शिकत होता.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गंधार गुरुवारी सकाळी परीक्षा देऊन घरी निघाला होता. वाटेतच असलेल्या अर्जुना नदीवर हातपाय धुण्यासाठी मित्रांसमवेत तो गेला असता, नदीच्या पात्रातील एका दगडावर त्याचा पाय घसरला आणि तो पाण्यात बुडाला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी गंधारला पाण्यातून बाहेर काढले आणि नजीकच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. शवविच्छेदनानंतर गंधारचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. गुरुवारी १७ एप्रिल रोजी सायंकाळी रायपाटण येथील स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात गंधार याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, मोठा भाऊ, काका, आजी-आजोबा आणि इतर कुटुंबीय आहेत. दुःखद घटनेमुळे रायपाटण परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


Recent Comments