Newsworldmarathi Beed : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बेताल व निराधार विधानं करणाऱ्या बीड पोलीस दलातील बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले यांनी परळी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात आणि ईव्हीएम मशिनमध्ये छेडछाड झाल्याबाबत संभ्रम निर्माण करणारी वक्तव्ये केली होती. या पार्श्वभूमीवर आता निवडणूक विभागाने त्यांच्या विरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परळी निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार अण्णा वंजारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रणजीत कासले यांनी भारत निवडणूक आयोग आणि शासनाविषयी बदनामीकारक व खोटी विधानं करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला आहे. लोकसेवक असतानाही त्यांनी भारताची सार्वभौमत्व आणि सुरक्षितता धोक्यात येईल अशी वक्तव्ये करून निष्काळजीपणा दाखवला.
कासले यांनी असेही म्हटले की, त्यांच्या बँक खात्यात २१ नोव्हेंबर २०२४ रोजी १० लाख रुपये जमा झाले होते आणि हे पैसे परळी विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएम मशिनपासून दूर राहण्यासाठी आणि छेडछाडीवर गप्प बसण्यासाठी दिले गेले, असा दावा त्यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे निवडणूक प्रक्रियेबद्दल जनतेमध्ये संशय निर्माण होऊ शकतो, तसेच निवडणूक आयोग आणि शासनाची विश्वासार्हता धोक्यात येऊ शकते.


Recent Comments