Newsworldmarathi Mumbai: Election Commission : मतदारांच्या सोयीसाठी आणि मतदान दिवशीच्या व्यवस्थापनात सुधारणा करण्याच्या उद्देशाने केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांना मोबाईल ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. तसेच यापुढे उमेदवारांचे मदत बूथ हे आता मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या पलीकडे ठेवावे, असंही या निर्णयात नमूद केले आहे.
मोबाईल फोनचा ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये वाढता वापर लक्षात घेता तसेच वृद्ध, महिला आणि दिव्यांग मतदारांना येणाऱ्या अडचणींचा विचार करता आयोगाने मतदान केंद्राच्या बाहेरच मोबाईल ठेवण्याची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.
१०० मीटरच्या आत केवळ बंद अवस्थेतील मोबाईल्स नेण्यास परवानगी राहील. प्रचाराच्या संदर्भातही बदल करत मतदान केंद्राच्या १०० मीटर अंतराच्या आत मनाई करण्यात आली आहे. मतदान दिवशी उमेदवारांनी मतदारांसाठी अनौपचारिक ओळखपत्र देण्यासाठी ठेवलेले मदत बूथ हे आता मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या पलीकडे ठेवावे लागणार आहेत.
भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ.सुखबीर सिंग संधू व डॉ.विवेक जोशी यांच्या नेतृत्वाखाली, भारत निवडणूक आयोग मतदान प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत पार पाडण्याबरोबरच मतदारांसाठी सुविधा सुधारण्यासाठी सातत्याने नवकल्पना राबवत असल्याचे भारत निवडणूक आयोगाने कळविले आहे.


Recent Comments