Newsworldmarathi Mumbai: Sanjay Raut : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांच्यातील संभाव्य एकजूट पुन्हा चर्चेत आली असून, यासंदर्भात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. नारायणगाव येथे पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी स्पष्ट केले की, ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील एकत्र येण्यास कोणताही अडथळा नाही.
राऊत म्हणाले, “या विषयावर चर्चा झाली तर ती फक्त राज ठाकरे यांच्याशीच होऊ शकते. परंतु, महाराष्ट्रातील मराठी समाजाच्या कल्याणासाठी आणि स्वाभिमानासाठी जर गट-तट विसरून सगळे एकत्र आले, तर हीच बाळासाहेब ठाकरे यांना खरी मानवंदना ठरेल.”
बाळासाहेब ठाकरे यांचे संपूर्ण जीवन मराठी माणसाच्या हक्कासाठी समर्पित होते, हे सांगताना राऊत यांनी असेही नमूद केले की, “मराठी समाजाच्या हितासाठी एखादे पाऊल मागे घ्यावे लागले तरी त्यात काही गैर नाही. आम्ही त्यासाठी सदैव तयार आहोत, आणि त्यात आम्हाला कमीपणा वाटत नाही.”
मुंबई हे मराठी माणसाचे हृदयस्थान असल्याचे सांगून राऊत यांनी मराठी समाजात एकजुटीचे आवाहन केले. राजकीय मतभेद बाजूला ठेवून मराठी समाजासाठी ठोस पावले उचलण्याची ही वेळ असल्याचे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.
विशेष म्हणजे, भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेही उद्धृत करत राऊत म्हणाले की, “ठाकरे बंधू जर मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येत असतील तर त्याचा भाजपला आनंदच होईल.” मुनगंटीवार हे नेहमीच शिवसेना-भाजप युतीसाठी आग्रही होते, हे देखील राऊत यांनी नमूद केले.
या विधानामुळे आगामी राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वाचा बदल घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संभाव्य एकत्रीकरणाच्या चर्चांना नवसंजीवनी मिळाल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर आता सर्वांचे लक्ष ठाकरे बंधूंनी पुढे काय भूमिका घेतात याकडे लागले आहे.


Recent Comments