Newsworld Mumbai : महाराष्ट्राचे 31 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आज पद व गोपनियतेची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
मुंबईत आझाद मैदान येथे हा शपथविधी सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री व्यासपीठावर उपस्थित होते.
शपथविधी सोहळ्याच्या अखेरच्या मिनिटांपर्यंत एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये सहभागी होणार की नाही? यावरून मोठे नाराजी नाट्य रंगले. मुख्यंमत्रीपदाचा शपथविधी सोहळा काही मिनिटांवर आला असताना अखेर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार हे जाहीर करण्यात आले. त्यामुळे महायुतीमधील धुसफूस कायम असून ती पुन्हा चव्हाट्यावर आली.