Newsworld Marathi Pune : जे. पी. श्रॉफ फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणारा सस्टेनेबिलिटी क्रुसेडर पुरस्कार यावर्षी पुण्यातील मॅग्नस व्हेंचर्सचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक असलेले उद्योजक आलोक काळे यांना जाहीर झाला आहे.’सस्टेनेबिलिटी स्टार्ट-अप’ या विभागामध्ये काळे यांना हा पुरस्कार जाहीर झाला असून येत्या २० डिसेंबर रोजी हॉटेल शेरेटन ग्रँड येथे संपन्न होणाऱ्या कार्यक्रमात पद्मविभूषण नारायण मूर्ती यांच्या हस्ते तो प्रदान करण्यात येईल. जे. पी. श्रॉफ फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या या सस्टेनेबिलिटी क्रुसेडर पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे.
सस्टेनेबिलिटी क्रुसेडर पुरस्कार समितीचे अध्यक्ष व औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) माजी महासंचालक पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, एमसीसीआयएच्या इलेक्ट्रॉनिक क्लस्टर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप भार्गव, हनीवेलचे व्यवस्थापकीय संचालक आशिष गायकवाड, फाईव्ह एफचे अध्यक्ष गणेश नटराजन व जे पी श्रॉफ आदी मान्यवर यावेळी उपस्थित असतील.
बांधकाम व्यवसाय क्षेत्रात कार्यरत असताना या क्षेत्राचा विकास अधिक शाश्वत करण्याबरोबरच शाश्वततेकडे आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यासाठी आलोक काळे हे गेली दहा वर्ष संशोधन विकासात काम करीत आहेत, त्यांच्या याच प्रयत्नांचा सन्मान म्हणून त्यांना यावर्षीच्या सस्टेनेबिलिटी क्रुसेडर पुरस्काराने गौरविण्यात येत आहे.
काळे यांनी जगातील सर्वात कमी कार्बन फूटप्रिंट असलेल्या आयजीबीसी ग्रीनप्रो आणि जीआरआयएचएने प्रमाणित केलेल्या पर्यावरणपूरक उत्पादनांची निर्मिती करण्यासाठी अथक परिश्रम केले असून लँडफिलमधून औद्योगिक कचरा वळविणे आणि बांधकाम उद्योगाचे नैसर्गिक संसाधनांवरील अवलंबित्व कमी करण्यावर त्यांचा विशेष भर आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मॅग्नस व्हेंचर्सने मागील तीन वर्षांत आपल्या उद्योगात अनेक पटींनी वाढ केली असून कंपनीच्या वतीने शाश्वत अशी टाईल्स, स्टोन अडेझिव्ह, प्लास्टर, ब्लॉक ज्योंटिंग मोर्टर, ग्राऊट्स व स्क्रिड्स यांसारखी टिकाऊ उत्पादने देखील बाजारात आणण्यात आली आहेत. सध्या या उत्पादनांना पुण्यातील अग्रगण्य बांधकाम कंपन्यामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे हे महत्त्वाचे.
सस्टेनेबिलिटी क्रुसेडर पुरस्काराबद्दल – २०२३ सालापासून जे. पी. श्रॉफ फाऊंडेशनच्या वतीने औद्योगिक विकास व पर्यावरण संवर्धन अशा दोन्हीचा समतोल साधत शाश्वत व नाविन्यपूर्ण प्रयत्नांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सस्टेनेबिलिटी क्रुसेडर पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. याशिवाय पर्यावरण-जागरूक अशा व्यावसायिक मॉडेलची गरज देखील अधोरेखित केली जाते.