विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याकरीता सोयीसुविधा उपलब्ध करुन द्या : उपमुख्यमंत्री
Newsworldmarathi Pune : पेरणे फाटा येथे १ जानेवारी २०२५ रोजी आयोजित विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याकरीता येणाऱ्या अनुयायींची गैरसोय टाळण्याच्यादृष्टीने आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, सोहळा शांततेत आणि उत्साहात साजरा व्हावा याकरीता सर्व संबंधित विभागांनी उत्तम नियोजन करावे, याकरीता शासनाच्यावतीने निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
हवेली तालुक्यातील मोजै पेरणे फाटा येथे १ जानेवारी २०२५ रोजी होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पूर्वतयारीबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार ज्ञानेश्वर कटके, प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पिंपरी चिंचवडचे पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था तथा बार्टीचे महासंचालक सुनील वारे, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता बप्पा बहीर आदी उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले, येत्या १ जानेवारी रोजी विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या अनुयायांची संख्या लक्षात घेता त्यादृष्टीने सर्व बाबींचे सूक्ष्म नियोजन करावे. गतवर्षीच्यावेळी राहिलेल्या त्रुटींची पूर्तता होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. परिसरात वाहतूक कोंडी होणार नाही याकरीता वाहतूक व्यवस्था, वाहनतळाचा आराखडा तयार करावा, स्वच्छतेसाठी पथकांची नियुक्ती आणि स्वच्छतागृहांसाठी पुरेशा प्रमाणात पाण्याची सुविधा करावी. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची संख्याही विचारात घ्यावी.
पोलीस विभागाने वाहतुकीचे नियोजन करुन कायदा व सुव्यवस्थेबाबत नियोजन करावे. पीएमपीएमएलने पुरेशा बसेसची व्यवस्था करावी. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाने रस्त्यांची डागडुजी करून घ्यावी. अनुयायांची संख्या लक्षात घेऊन सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिकांही सुलभरित्या विजयस्तंभास अभिवादन करता येईल, याबाबत दक्षता घ्यावी. रुग्णवाहिका, प्रथमोपचार पेटी पुरेशा प्रमाणात ठेवाव्यात. एकंदरीत अभिवादन सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित विभागाने समन्वयाने कामे करावीत, अशाही सूचना श्री. पवार म्हणाले.बैठकीपूर्वी श्री. पवार यांनी विजयस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.
पाटील म्हणाले, विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याकरीता येणाऱ्या अनुयायांची संख्या विचारात घेऊन जिल्हा प्रशासनाच्यावतीने सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त यांनी स्वतः विजयस्तंभ परिसराला भेट देवून आढावा घेतला आहे. त्यांच्या सूचनेनुसार कार्यवाही करण्यात येत आहे. विविध संघटनेच्या प्रतिनिधी सोबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन त्यांच्या सूचनाही विचारात घेतल्या जात आहेत, अभिवादन सोहळा यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे, असेही पाटील म्हणाले.
यावेळी विजयस्तंभ परिसराचे सुशोभिकरण, प्रकाशव्यवस्था, स्टॉल, मंडप उभारणी, वाहनतळ, वाहतूक आराखडा, आरोग्य सुविधा, भोजनव्यवस्था, पिण्याचे पाणी, रस्त्यांची दुरुस्ती, तात्पुरते शौचालय उभारणी, स्वच्छतेसाठी घंटागाड्या, स्वच्छता, आपत्तकालीन प्रसंगी अग्नीशमन वाहनांची व्यवस्था, विद्युत व्यवस्था, हिरकणी कक्ष, आपत्ती व्यवस्थापन आदींबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीस पुणे शहरच्या उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे, हवेलीचे उपविभागीय अधिकारी यशवंत माने यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे महानगरपालिका, पीएमआरडीए अग्नीशमन विभाग, जिल्हा परिषद, पोलीस विभाग, पीएमपीएमएल, आरोग्य विभाग, राज्य उत्पादन शुल्क आदी विभागांचे अधिकारी तसेच भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे, माजी उप महापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्र्यांकडून सारथी संस्थेच्या नव्या इमारतीची पाहणी
Newsworldmarathi Pune : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी शिवाजीनगर येथे नव्याने बांधण्यात आलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानवविकास संस्था (सारथी) मुख्यालयाच्या इमारतीची पाहणी केली. यावेळी उपमुख्यमंत्री यांनी नवीन इमारतीच्या कामाबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर यांनी पवार यांचे स्वागत केले.
यावेळी पवार म्हणाले सारथी संस्थेच्या अडीअडचणीबाबत लवकरच मार्ग काढण्यात येईल व संस्थेस आवश्यक असणारा निधी लवकरच उपलब्ध करुन देण्यात येईल. सारथी संस्थेच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सारथी संस्थेचे अध्यक्ष निंबाळकर यांनी संस्थेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत झालेल्या प्रगतीचा व संस्था राबवीत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी सारथी संस्थेचे संचालक मधुकर कोकाटे, उमाकांत दांगट, नवनाथ पासलकर, व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, निबंधक संजीव जाधव आदी उपस्थित होते.
राज्यात वाळू माफियांना पायबंद घालू : महसूलमंत्री बावनकुळे
Newsworldmarathi Pune : जनतेला त्रासदायक ठरलेल्या महाराष्ट्रातील वाळू माफियागिरीला पायबंद घालण्यासाठी सरकार विशेष लक्ष देईल. वाळू विषयक सुलभ धोरण आणू.” अशी घोषणा राज्याचे महसूल मंत्री चन्द्रशेखर बावनकुळे यांनी केली. ते म्हणाले,” जनतेला वाळू सहज उपलब्ध होईल असे सुलभ धोरण देशातील कोणत्या राज्यात आहे, त्यासंदर्भात अभ्यास करून महाराष्ट्रात वाळूविषयक सुलभ धोरण अस्तित्वात आणू.”
महसूल मंत्री चन्द्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधला. महसूल विभागामुळे जनतेला त्रास होतो आहे; हे मी बघू शकणार नाही. ‘जनता सर्वोपरी..’ असे आपले कामजाजाचे धोरण राहणार असून देशातील सर्वांत चांगला महसूल विभाग महाराष्ट्राचा असेल अशी ओळख मी निर्माण करेन, असा निर्धार बावनकुळे यांनी व्यक्त केला.
झुडपी जंगल जमिनींचा प्रश्न मार्गी लावणार
ते म्हणाले,”राज्यात सुमारे 86 हजार हेक्टर झुडपी जंगल जमिनींचा प्रश्न प्रलंबित असून, यामुळे अनेक विकास प्रकल्प रखडले आहेत. या जमिनी प्रामुख्याने विदर्भात अधिक असून,यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात खटला चालू आहे. याखटल्याच्या बाबतीत न्यायालयात पाठपुरावा करून, हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू.”
जनतेचे हेलपाटे कमी करू
शेतकरी-शेतमजूरांशी संबंधित असणाऱ्या या खात्यात अनेक कायद्यांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. त्याचा अभ्यास करून राज्याच्या विकासाची गती वाढविण्यात येईल, असे सांगून बावनकुळे म्हणाले, की कागदपत्रांशी निगडित नागरिकांची महसूल खात्याशी संबंधित अनेक कामे असतात. नागरिकांना या कामांसाठी तलाठी कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय ते शासनस्तरापर्यंत कमीत कमी हेलपाटे मारून काम कसे करता येईल, यासंबंधी लवकरच उपाययोजना आखू आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा देवू.”
मुद्रांक शुल्क, जमाबंदी आयुक्त तसेच वाळूशी संबंधित धोरणांमध्ये सुलभीकरण करण्याचा तसेच वाळूमाफियांना पूर्णपणे पायबंद घालण्याचा माझा प्रयत्न आहे, असे सांगून बावनकुळे म्हणाले, धोरण प्रक्रियेत सुलभीकरण आणण्यासाठी इतर राज्यांतील उपयुक्त कायद्यांचाही अभ्यास करणार असून येत्या काळात महसूल विभागात सकारात्मक बदल आपल्याला पाहायला मिळतील.
सरकारमध्ये योग्य समन्वय
बहु पक्षीय सरकार समजुतीने चालवावे लागते. त्यासाठी समन्वय आवश्यक असतो. महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये समन्वय असून, खातेवाटपामध्येही तो दिसून आला आहे. तसेच, पालकमंत्रिपदांचे वाटप करतानाही कोणतीही कुरबूर न होता आमचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याबरोबर योग्य समन्वय साधून पालकमंत्रिपदांचे वाटप करतील, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.
छगन भुजबळ हे महायुतीतील महत्त्वाचे नेते असून, त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे त्यांच्या बाबतीत योग्य निर्णय घेतील, असेही बावनकुळे यांनी भुजबळ यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
राहुल गांधी यांचा दौरा म्हणजे नौटंकी
राहुल गांधी यांचा परभणी येथील दौरा हा नौटंकी आहे. परभणी येथे घडलेली घटना निश्चितच दुर्दैवी असून, घटनेतील आरोपी मनोरुग्ण आहे. आरोपीला पोलिसांनी तत्काळ अटक केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. तरीसुद्धा केवळ राजकारण करण्यासाठी राहुल गांधी हे परभणीचा दौरा करत आहेत. परंतु, मागासवर्गीय, ओबीसी असे सर्व समाज राज्यात एकत्र गुण्यागोविंदाने नांदत असून, कोणताही समाज त्यांच्या या राजकारणाला बळी पडणार नाही. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणुकीत पराभूत केले. डॉ. आंबेडकर हे संसदेच्या कोणत्याही सभागृहात येऊ शकणार नाहीत, यासाठी राजकारण केले. त्यामुळे जनतेलाही काँग्रेस आणि राहुल गांधी यांची नौटंकी कळत असल्याचे चन्द्रशेखर बावनकुळे म्हणाले.
शि. द. फडणीस यांना रोटरी व्होकेशनल एक्सलन्स ॲवॉर्ड
Newsworldmarathi Pune : जानेवारीत आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या रोटरी डिस्ट्रिक्ट मराठी साहित्य संमेलनात सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांचा रोटरी व्होकेशनल एक्सलन्स ॲवॉर्ड देऊन गौरव केला जाणार आहे, अशी माहिती प्रांतपाल 3131चे शितल शहा यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
शनिवार, दि. 4 आणि रविवार, दि. 5 जानेवारी 2025 या कालावधीत यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रोटरी डिस्ट्रिक्ट मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. व्यवसायिक सेवा देताना सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तीस मानाचे रोटरी व्होकेशनल एक्सलन्स ॲवॉर्ड देऊन गौरविले जाते. संमेलनाचे निमित्त साधून फडणीस यांचा गौरव केला जाणार आहे.
वयाच्या शंभरीत पदार्पण केलेले शि. द. फडणीस हे आजही तेवढ्याच उर्जेने आणि उमेदिने कार्यरत आहेत. आजही त्यांची व्यंगचित्रे विविध माध्यमांधून प्रसिद्ध होत असून ते आपल्या व्यंगचित्रांद्वारे लोकांना हसवत आहेत. व्यंगचित्रे समाजातील विसंगतीवर टिकात्मक पद्धतीने भाष्य करणारी असतात हा समज फडणीस यांच्या व्यंगचित्रांमधून खोटा ठरला आहे. त्यांच्या शब्दविरहित चित्रांनी खमंग, खुसखुशीत विनोद निर्मिती केली आहे. अनेक लेखकांची पुस्तके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांच्या मख्यपृष्ठांद्वारे त्यांची व्यंगचित्रे समाजमनास भिडली आहेत. शि. द. फडणीस यांच्या प्रयत्नाने कायदाच्या माध्यमातून चित्रकारांना कॉपीराईटचे हक्क मिळवून दिले आहेत. शि. द. फडणीस यांची व्यंगचित्रे देश-परदेशातील आर्ट गॅलरीमध्ये झळकली आहेत.
शाम खामकर यांना भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार
रंगत-संगत प्रतिष्ठानचा
पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे मराठीतील आद्य शायर भाऊसाहेब पाटणकर यांच्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध कवी, गझलकार शाम खामकर (खडकवाडी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) यांचा भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्काराने गौरव केला जाणार आहे.
कार्यक्रम रविवार, दि. 29 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार भवन, दुसरा मजला, नेवी पेठ येथे होणार असून पुरस्काराचे वितरण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ कथाकार भारत सासणे यांच्या हस्ते होणार आहे. सन्मानपत्र, शाल, श्रीफल असे पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून सिने-नाट्य अभिनेत्री, कवयित्री भाग्यश्री देसाई यांची उपस्थिती असणार आहे.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात गझल मुशायरा आयोजित करण्यात आला असून यात प्रमोद खराडे, नचिकेत जोशी, डॉ. मंदार खरे, सुनिती लिमये, नूतन शेटे, कविता क्षीरसागर, चंचल काळे, डॉ. मृणालिनी गायकवाड, स्वाती यादव, उर्मिला वाणी, डॉ. मृदुला कुलकर्णी-खैरनार, प्रभा सोनवणे, स्वप्नील पोरे यांचा सहभाग असणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
‘पुरुषोत्तम’चे लॉटस्चे गुरुवारी वितरण
Newsworldmarathi Pune : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचे लॉटस् गुरुवार, दि. 26 डिसेंबर रोजी काढण्यात येणार असून स्पर्धेला शुक्रवार दि. 27 रोजी सुरुवात होणार आहे.
महाअंतिम स्पर्धा दि. 27 ते दि. 29 डिसेंबर 2024 या कालावधीत पुण्यात होणार आहे. अंतिम स्पर्धेत पोहोचलेले सर्व संघ शुक्रवारी (दि. 26) पुण्यात दाखल होणार आहेत. त्यानंतर स्पर्धेचे लॉटस् काढण्यात येणार आहे. पुण्यासह अमरावती, रत्नागिरी, संभाजीनगर आणि कोल्हापूर विभागातील पारितोषिकप्राप्त एकांकिकांचे सादरीकरण होणार असून यातून महाअंतिम फेरीतील विजेता ठरणार आहे. महाअंतिम फेरी भरत नाट्य मंदिर येथे पाच सत्रात होणार आहे. दि. 27 आणि दि. 28 रोजी सकाळी 9 ते 1 आणि सायंकाळी 5 ते 9 आणि दि. 29 रोजी सकाळी 9 ते 1 या वेळात स्पर्धा होणार आहे. पारितोषिक वितरण सभारंभ दि. 29 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला असून पारितोषिकांचे वितरण ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी यांच्या हस्ते होणार आहे.
आंतरराष्ट्रीय उड्डाणे आता नव्या टर्मिनलवरून
Newsworldmarathi Pune : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जुन्या टर्मिनलवरुन होणारी सर्व उड्डाणे आता नव्या टर्मिनल वरून होणार असून याची अंमलबजावणी आजपासून करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. उड्डाणांसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक तयारीचा आढावा मंत्री मोहोळ यांनी विमानतळाच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतला.
पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनल काही महिन्यांपूर्वी सुरु करण्यात आले असून या टर्मिनलवरुन होणाऱ्या उड्डाणांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवण्यात आली आहे. मात्र इमिग्रेशनच्या यंत्रणेबाबतची निर्माणाधीन प्रक्रिया आता पूर्णत्वास गेली आहे. मंत्री मोहोळ यांनी या सर्व प्रक्रियेचा आढावा घेतला आणि तांत्रिक बाबींसंदर्भात माहितीही घेतली.
याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, ‘पुणे विमानतळावरुन आताच्या घडीला एकूण ३ मार्गांवरून ५ आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरु असून ही सर्व उड्डाणे नव्या टर्मिनलकडे स्थलांतरित करण्यात आली आहेत. आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी पुणेकर प्रवाशांसाठी आजवर जुनेच टर्मिनल वापरले जात होते, ज्यावर अद्ययावत सुविधांचा अभाव होता. आता मात्र आंतरराष्ट्रीय प्रवासाची सुरुवात सुखकर होणार आहे.’
‘इमिग्रेशन संदर्भातील तांत्रिक प्रक्रिया पूर्णत्वास नेऊन नवे टर्मिनल आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. पुणे विमानतळाच्या विकासासाठी मोदी सरकार कटिबद्ध असून अद्ययावत सुविधा उपलब्ध करुन देण्याची मालिका अशीच अखंडित राहील’, असेही केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले.
चांगले साहित्यिक सक्षम अधिकारीही असतात : नंदकर
Newsworldmarathi Pune : लेखनाच्या माध्यमातून लेखकाला आत्मिक समाधान मिळते. प्रशासकीय अधिकारी म्हणून कामकाज करताना जे अनुभव येतात ते साहित्यकृतीच्या मांडण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे चांगले अधिकारी हे चांगले साहित्यिक असतात तसेच चांगले सहित्यिक सक्षम अधिकारीही असतात, असे प्रतिपादन पुणे महापालिका उपायुक्त राजीव नंदकर केले.
मराठी भाषा संवर्धन समिती, पुणे महानगरपालिका व संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनात आज (दि. 23) ‘चांगला साहित्यिक कार्यक्षम अधिकारी नसतो का?’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. अतिरिक्त आयुक्त (जीएसटी) वैशाली पतंगे यांनी चर्चासत्राचे संचालन केले.
नंदकर पुढे म्हणाले की, आजच्या काळात या विषयावर टीका टिप्पणी केली जाते. पण साहित्यिक अधिकारी कधीच काम टाळत नाही. तर त्याच्या मनातल्या साहित्यकृती समाजासमोर याव्यात असा त्याचा प्रयत्न असतो. प्रत्येक अधिकाऱ्यांनी तीन वर्षातील कामकाजाचा आढावा शासनास सादर करावा. ज्यायोगे अधिकाऱ्यातील साहित्यिकाची लेखनाची आवड वाढण्यास मदत होऊ शकते.
मराठी भाषा संवर्धन समितीच्या उपसंचालक अंजली ढमाळ म्हणाल्या, चांगला अधिकारी साहित्यिक असणे हा मानाचा तुरा आहे; कारण आपण आधी माणूस नंतर अधिकारी असतो. त्यातून सेवेची भावना गतिमान होते. समाजातील बारिक-सारिक बदल, अनुभव अधिकाऱ्याच्या मनात दडलेल्या साहित्यिकाला टिप कागदप्रमाणे टिपता आले पाहिजेत. समोरच्या व्यक्तीच्या मनातील वेदना समजल्यास प्रश्नातून मार्ग काढता येणे शक्य होते.
मानवी मनाचे विविध कंगोरे समजावून घेऊन लेखनाच्या माध्यमातून मांडता आले पाहिजेत. म्हणजे मानवी अवस्थेला शब्दातून व्यक्त करता आले पाहिजे, असे मत आयकर विभागाचे उपायुक्त महेश लोंढे यांनी व्यक्त केले.
विद्या पोळ-जगताप म्हणाल्या, अधिकारी आणि साहित्यिक या दोन स्वतंत्र भूमिका आहेत. असे असले तरीही शासकीय काम आणि साहित्य निर्मित यामध्ये फारकत करता येत नाही; कारण चांगला अधिकारी आणि साहित्यिक परस्परांना पूरक असतात. यासाठीच विविध साहित्यिक उपक्रम ठिकठिकाणी घेण्यात यावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
समाजातील प्रत्येक घटकाने साहित्य निर्मिती करण्याचा प्रयत्न करावा जेणे करून समाजातील विविध प्रश्नांची मांडणी समजापुढे येऊ शकेल, असे विचार वैशाली पतंगे यांनी व्यक्त केले.
उल्का नाईक-निंबाळकर म्हणाल्या, संवेदनशील, साहित्यिक हळवे मन कठोर निर्णय घेणार का असा प्रश्न अनेकदा निर्माण होत असतो; पण दोनही विषय वेगवेगळे असतात.
१२५० मृदंगांच्या एकत्रित वादनातून स्वरब्रम्हाची अनुभूती
Newsworldmarathi Pune जय जय विठोबा रखुमाई चा गजर, तब्बल १२५० मृदंगांचा एकत्रित निनाद आणि त्याला टाळांची सुरेख साथ… अशा भारलेल्या वातावरणात हिंदू सेवा महोत्सवात महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या १२५० हून अधिक मृदंग वादकांनी भक्तिमय वादन कलेचा सुरेल आविष्कार सादर केला. मृदंगांचा स्वर टिपेला पोहोचताना पुणेकर देखील टाळ्यांच्या माध्यमातून या भक्तीरसात न्हाहून निघाले आणि प्रत्यक्षपणे हा स्वरब्रह्माची अनुभूती घेतली.
हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेतर्फे हिंदू सेवा महोत्सवाचे आयोजन स.प.महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले आहे. त्यामध्ये एकत्रितपणे १२५० मृदंगांचे वादन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार श्रीकांत भारतीय, हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे राष्ट्रीय संयोजक गुणवंत कोठारी, संस्थेचे अध्यक्ष अशोक गुंदेचा, महोत्सवाचे अध्यक्ष कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, संस्थेचे महामंत्री किशोर येनपुरे, उपाध्यक्ष पंडित शिवकुमार श्री, इस्कॉनचे संजय भोसले, स्वामीनारायण मंदिरचे राधेश्याम अग्रवाल, चरणजितसिंग सहानी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, महेश सूर्यवंशी, ह.भ.प.चिदंबरम महाराज साखरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात नमन आणि त्यानंतर पंचपदीने झाली. रूप पाहता लोचनी… सुंदरते ध्यान उभे विटेवरी… पुंडलिक वरदे हरी विठ्ठल … तुमच्या नामघोषासह मृदंग आणि टाळांचा गजर झाला. वादनाची सांगता सांगता आरतीने ने झाली. यावेळी जेष्ठ वादकांसह युवक-युवती आणि बाल वादक देखील सहभागी झाले होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, देशात कुंभाची तयारी सुरूआहे मात्र इथे देखील एक कुंभच पाहायला मिळत आहे. उपासना आणि आराधनेचे बळ वाढवणे, हा यामागील उद्देश आहे. मंदिरांनी सामाजिक काम करावे आणि माणसात परमेश्वर ओळखावा, ही मूळ कल्पना आहे. हिंदू धर्म पाच हजार वर्षांपेक्षा जास्त काळ आक्रमणे होऊन देखील टिकला. धर्म टिकून ठेवण्याची प्रेरणा मंदिरांनी दिली. त्यामुळे त्यांचे महत्त्व खूप मोठे आहे.
अशोक गुंदेचा म्हणाले, चार दिवसीय महोत्सव विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामधील १२५० मृदुंग वादकांनी एकत्रित मृदंग वादनाचा केलेला कार्यक्रम हा सर्वोच्च बिंदू होता. महोत्सवात १२६ मठ मंदिरांनी सहभाग घेत १८० स्टॉल द्वारे आपल्या सेवा कार्याची माहिती दिली.
पुणे हादरलं! मद्यधुंद डंपर चालकाने फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडलं
Newsworldmarathi : Pune Wagoli Accident महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हिट अँड रनच्या घटना वाढताना दिसून येत आहेत. पुण्यात काही महिन्यांपूर्वी घडलेल्या अपघाताने देशभर खळबळ उडाली होती. अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत कारने दोघांना चिरडले होते. त्यानंतर या घटना लगातार होताना दिसून आल्या. अशात पुण्यात आणखी एक भीषण अपघात घडला आहे. पुण्यातील वाघोली परिसरात पुन्हा एक हिट अँड रनचा प्रकार घडलाय. यामुळे एकच खळबळ उडालीये
(Newsworldmarathi Pune news)
वाघोली परिसरात फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना डंपरने चिरडल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली. यात 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय. या दुर्घटनेतील मृतांमध्ये दोन बालकांसह त्यांच्या काकाचा समावेश आहे. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींमधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
नेमकं काय घडलं?
वाघोली येथील केसनंद फाट्यावरुन पुण्याच्या दिशेने येताना हा अपघात घडला. रात्री 12 ते 1 च्या सुमारास वाघोली चौकातील वाघोली पोलीस ठाण्यासमोरच ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बिल्टवेल इंटरप्राईजेस कंपनीचा हा डंपर असून डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती आहे. (Newsworldmarathi pune News)
फुटपाथवर झोपलेले कामगार हे अमरावतीहून पुण्यात कामासाठी आले होते. अपघात घडला त्यावेळी फुटपाथवर 12 जण झोपले होते. तर काहीजण फूटपाथच्या बाजूला असलेल्या झोपडीत झोपले होते. गाढ झोपेत असतानाच काळाने त्यांचा घात केला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झालाय.
तर, जखमींना तातडीनं ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अपघातात जखमी झालेले सर्व कामगार रविवारी रात्रीच अमरावती येथून कामासाठी आले होते. या घटनेनंतर पुण्यात खळबळ उडाली आहे. (Newsworldmarathi pune News)
धुक्यामुळे विमानसेवा विस्कळीत
Newsworldmarathi Pune : सध्या महाराष्ट्रात थंडीने जोर धरला असून पुणे जिल्ह्यातही याचा प्रभाव स्पष्टपणे जाणवत आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात थंडीचा जोर वाढला असून, शनिवारच्या पहाटे धुक्याच्या चादरीने संपूर्ण शहर झाकून गेले. यामुळे रस्ते वाहतूक आणि विमानसेवांवरही मोठा परिणाम झाला. धुक्यामुळे दृश्यता कमी झाल्याने तब्बल 22 विमानांच्या उड्डाणांना उशीर झाला, ज्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
हे परिस्थिती लक्षात घेता, प्रशासनाने धुक्यामुळे होणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी सावधगिरीचे उपाय करणे गरजेचे आहे. यामध्ये वाहनचालकांनी अधिक काळजीपूर्वक वाहन चालवणे आणि प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था ठेवणे याचा समावेश होतो.
शनिवारी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरपडलेल्या दाट धुक्यामुळे सकाळी 6 ते दुपारी 12 दरम्यान विमानसेवा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली. एकूण 22 विमानांच्या उड्डाणांना अडथळा निर्माण झाला, ज्यामुळे उड्डाणांना अर्ध्या तासापासून तीन तासांपर्यंत विलंब झाला. दिल्लीनंतर बेंगळुरू, अहमदाबाद, रांची, हैदराबाद, किशनगड, चेन्नई, बँकॉक या ठिकाणी जाणाऱ्या विमानांना उशीर झाला. धुक्याचा परिणाम फक्त उड्डाणांवरच नाही तर आगमन विमानांवरही दिसून आला. पुण्यात येणारे एक विमान दाट धुक्यामुळे निर्धारित वेळेत उतरू शकले नाही आणि दुसऱ्या शहराकडे वळवावे लागले. यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. विमानतळ प्रशासनाने अशा परिस्थितीत प्रवाशांना माहिती देण्यासाठी तत्परता दाखवणे आणि पर्यायी व्यवस्था पुरवणे गरजेचे आहे. तसेच, धुक्याच्या अशा घटनांसाठी विमानसेवेचे नियोजन सुधारण्यासाठी उपाययोजना केली जावी. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनलमुळे विमानसेवा अधिक विस्तारली असून, विमान उड्डाणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर्षीच्या तुलनेत विमानांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषत: शनिवार आणि रविवार हे दिवस सर्वाधिक व्यस्त असतात, ज्या दिवशी 200 पेक्षा अधिक उड्डाणे होत आहेत. पुण्यातून देशातील 35 विमानतळांसह तीन आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी थेट कनेक्टिव्हिटी प्रदान केली जात आहे, ज्यामुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर प्रवास मिळत आहे. तथापि, शनिवारी धुक्यामुळे उड्डाणांना उशीर झाल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ही परिस्थिती विमानतळाच्या कार्यक्षमतेसाठी एक आव्हान ठरू शकते, त्यामुळे व्यवस्थापनाने अशा घटनांवर उपाययोजना करण्यासाठी अधिक प्रभावी योजना आखणे गरजेचे आहे.
अखेर खातेवाटप झाले…गृहखात भाजपकडे तर नगरविकास शिवसेनेकडे
महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बहुप्रतीक्षित खातेवाटपाचा निर्णय अखेर जाहीर झाला आहे. यामध्ये प्रमुख खाती पुढीलप्रमाणे वाटप करण्यात आली आहेत: गृहखाते भारतीय जनता पक्षाकडेच राहणार असून नगरविकास खाते शिवसेना शिंदे गटाकडे तर अर्थखाते अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे देण्यात आले आहे.
ही खातेवाटप रचना सत्तेत असलेल्या महायुती सरकारमधील प्रमुख पक्षांमध्ये ताकदीच्या संतुलनाचा भाग मानली जात आहे. गृहखाते भाजपकडे ठेवून या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी त्यांनी स्वतःकडे राखली आहे, तर नगरविकास आणि अर्थखात्याचे वाटप संबंधित पक्षांच्या जबाबदारीला अनुरूप ठरले आहे.
हे खातेवाटप आगामी राजकीय रणनीती आणि कामकाजाच्या स्वरूपावर महत्त्वपूर्ण परिणाम करणार आहे.
कोणत्या मंत्र्यांना मिळालं कोणतं खातं?
कॅबिनेट मंत्री
1. चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
2. राधाकृष्ण विखे पाटील जलसंधारण (गोदावरी व कृष्णा खोरे विकास)
3. हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण
4. चंद्रकांत पाटील उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
5. गिरीश महाजन – जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आ व्यवस्थापन
6. बबनराव पाटील – पाणीपुरवठा
7. गणेश नाईक- वन
8. दादाजी भसे शालेय शिक्षण
9. संजय राठोड : माती व पाणी परीक्षण
10. धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
11. मंगलप्रभात लोढा कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
12. उदय सामंत उद्योग व मराठी भाषा
13. जयकुमार रावल – विपणन, प्रोटोकॉल
14. पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन
15. अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकर
16. अशोक उईके आदिवासी विकास मंत्रालय
17. शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
18. आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान
19. दत्तात्रय भरणे क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
20. अदिती तटकरे महिला व बालविकास
21. शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम
22. माणिकराव कोकाटे – कृषी
23. जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज
24. नरहरी झिरवाळ अन्न व औषध प्रशासन
25. संजय सावकारे कापड
26. संजय शिरसाट सामाजिक न्याय
27. प्रताप सरनाईक – वाहतूक
28. भरत गोगावले – रोजगार हमी, फलोत्पादन
29. मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन
30. नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे
21 आकाश फुंडकर – कामगार
32. बाबासाहेब पाटील – सहकार
33. प्रकाश आबिटकर सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
राज्यमंत्री (State Ministers)
34. माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण
35. आशिष जयस्वाल अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय
36. मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा
37. इंद्रनील नाईक उच्च आणि तंत्र शिक्षण, आदिवासी विकास आणि पर्यटन
38. योगेश कदम – गृहराज्य शहर
39. पंकज भोयर – गृहनिर्माण,
महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार : राऊत
Newsworldmarathi Pune : महापालिका निवडणुका जवळ आल्याने सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत आणि विधानसभा निवडणुकीतील यश-अपयशाचे विश्लेषण करत पुन्हा पक्षबांधणीच्या प्रक्रियेत गुंतले आहेत. विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुका शिवसेना (ठाकरे गटासाठी) प्रतिष्ठेचा मुद्दा ठरल्या आहेत.
संजय राऊत यांनी पुण्यात केलेल्या वक्तव्याने ही चर्चा अधिक गाजू लागली आहे. त्यांनी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिल्याने शिवसेना (ठाकरे गट) आपली ताकद दाखवण्यास सज्ज असल्याचे दिसते. स्वबळावर लढण्याच्या या भूमिकेमुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढू शकतो, पण त्याचवेळी इतर पक्षांशी असलेल्या युतीच्या शक्यता कमी होण्याचीही शक्यता आहे.
सध्या राज्यात सत्ताधारी भाजप-शिंदे गट मजबूत स्थितीत आहे, त्यामुळे स्वबळावर लढण्याचा निर्णय शिवसेनेला आव्हानात्मक ठरू शकतो. महापालिका निवडणुकीतील निकाल या भूमिकेच्या यश-अपयशाचे खरे मूल्य ठरवतील, आणि त्याचा आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांवरही परिणाम होईल.
संजय राऊत यांनी दिलेले वक्तव्य महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर मोठा प्रकाश टाकते. त्यांच्या मते, सध्या सरकारचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि महापालिका निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे. अशा वेळी शिवसेना (ठाकरे गट) कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्षबांधणी मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. पिंपरी-चिंचवड आणि पुणे येथे कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी बैठका आयोजित केल्याचे त्यांच्या वक्तव्यात स्पष्ट होते.
राऊत यांनी विधानसभेतील पराभवावर जास्त वेळ घालवण्याऐवजी पुढे पाहण्याची गरज असल्याचे सुचवले आहे. ते कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहेत, विशेषतः गेल्या काही निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवांनंतर कार्यकर्त्यांचे मनोबल टिकवणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे.
त्यांनी ईव्हीएमविषयी लोकांमध्ये असलेल्या शंका आणि पुन्हा मतदानाची मागणी याचा उल्लेख केला, ज्यामुळे लोकांच्या मनातील रोष व अशांतता समोर येते. राऊत यांनी या भावना समजून घेण्याचा आणि त्याचा आदर करण्याचा संदेश दिला आहे, ज्यामुळे पक्ष लोकांशी जोडलेला राहू शकेल.
त्यांचे हे वक्तव्य आगामी निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती ठरवण्यात आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यात महत्त्वाचे ठरू शकते. तसेच, लोकांशी संवाद साधून त्यांच्या अपेक्षा आणि अडचणी समजून घेण्याचा हा प्रयत्न ठाकरे गटाच्या राजकीय रणनीतीतील महत्त्वाचा टप्पा आहे.
युवक काँग्रेसकडून रास्ता रोको
Newsworldmartahi Pune : गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू छिब यांना आसाम पोलिसांनी केलेल्या बेकायदेशीर अटकेचा देखील निषेध केला.
युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बालगंधर्व चौकात जमून रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान युवक काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.
यावेळी प्रदेश युवक काँग्रेसचे सहभागी एहसान खान, शहराध्यक्ष सौरभ अमराळे, प्रसार माध्यम विभागाचे अध्यक्ष अक्षय जैन,ग्रामीण अध्यक्ष उमेश पवार ,प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे,प्रथमेश आबनावे,मेघश्याम धर्मावत,आनंद दुबे,हृषीकेश विरकर ,अभिजित चव्हाण,सद्दाम शेख ,मुरलीधर बुधराम,धनराज माने,अक्षय अवचिते मारुती तलवारे,हर्षद हांडे,पवन खरात यांच्या सोबत असंख्य कार्यकर्ते होते.
महाराष्ट्र युवक काँग्रेस सहप्रभारी एहसान खान म्हणाले, “अमित शहा यांचे वक्तव्य अतिशय लज्जास्पद आहे. हे त्यांच्याच मनातील विचार आहेत, जे त्यांच्या तोंडून बाहेर आले. त्यांना या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा.”
युवक काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष अक्षय जैन म्हणाले, “गौतम अदानींवर कारवाई करण्याऐवजी आणि संसदेच्या संयुक्त संसदीय समितीकडून (JPC) चौकशी करविण्याऐवजी सरकार विरोधी पक्षनेते श्री राहुल गांधी यांच्यावर खोटे आरोप लावत आहे. तसेच युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष यांना आसाम पोलिसांनी अटक करणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे.”
पुणे शहर युवक काँग्रेस अध्यक्ष सौरभ अमराळे म्हणाले, “सरकारची ही चाल फक्त मुख्य प्रश्नांवरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी आहे आणि त्यांना या गोष्टींत अडकवून ठेवण्यासाठी आहे. त्यामुळे आम्ही रस्त्यावर उतरून या अन्यायाविरुद्ध लढा देत आहोत.”
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा महायुतीकडून कायम सन्मान : आ. गोरखे
Newsworldmarathi Nagpur : डॉ बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न असेल किंवा त्यांचे लंडनमधील घर असेल सोबतचआंबेडकर जयंतीला सार्वजनिक सुट्टी असेल ,भारतामध्ये संविधान दिन साजरा करणे असेल ही जबाबदारीची काम ही आमच्या केंद्र शासनाने व महायुती सरकारनेच केले याचा मला अभिमान आहे.
असे परखड मत विधान परिषदे 260 अन्वये इंदू मिल वर बोलताना आमदार अमित गोरखे यांनी व्यक्त केले.
राज्य शासनाने दिनांक 19 मार्च, 2013 रोजी दादर चैत्यभूमीजवळील इंदू मिल क्र.6, येथील सुमारे 4.84 हेक्टर जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाच्या कामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची ‘विशेष नियोजन प्राधिकरण’ म्हणून नियुक्ती केली.असून . 11 ऑक्टोबर 2015 रोजी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ संपन्न झालेला आहे.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या भूमीवर बुद्ध धम्माची दीक्षा घेतली त्या दीक्षाभूमीला राज्य शासनाने दिलेली जमीन अपुरी असल्याने तेथे येणाऱ्या अनुयायांसाठी ही जागा अपुरी पडत आहे त्यामुळे दीक्षाभूमीला आणखी 57 एकर जागा उपलब्ध करून देण्यात यावी. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारक विकसित करण्यासाठी आपल्या राज्य शासनाने खर्च ३०५ कोटी ६२ लाख २९ हजार १७३ इतका भरून निधी दिला असून आहे. त्यानंतर ११ मार्च २०२४ रोजी झालेल्या बैठकीत अण्णाभाऊ साठे यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था, चिरागनगर, घाटकोपर येथे बांधण्याबाबत परवानगी देऊन प्राप्त झाली असून लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण होईल.
भारतीय जनता पक्षाने रिकामे आती घेतले आहे ती जवळजवळ 47% होऊन जास्त झालेली असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वेळोवेळी सन्मान करण्याचे काम हे भारतीय जनता पक्ष व महायुती सरकारने वेळोवेळी केलेल्या असून आजतागायत काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमानच करण्याचे काम केले आहे. शाडो प्राईम मिनिस्ट्री ची स्थापना ज्यावेळी सोनिया गांधी सरकारने केली होती. त्यावेळी सर्वप्रथमता घटनेचे उल्लंघन करण्याचे काम काँग्रेस सरकारने केले आहे.भंडारा पोटनिवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाडण्याचे कामही याच काँग्रेस सरकारने केलेले आहे.
हिंदू कोर्ट मिल हे ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडले त्यावेळी सर्वप्रथम त्या विरोध करण्याचे काम देखील याच काँग्रेस सरकारने केलेले आहे आणि त्याचमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रीपदाचा राजीनामा देखील दिला होता.आणि त्याच वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसने अस्पृश्यांसाठी काय केले हे पुस्तक देखील लिहिले होते 1967 साली ज्यावेळी आणीबाणी लागली त्याच वेळी इलाहाबाद कोर्टाने सगळे अधिकार काढून घेतले अशा प्रकारचे संविधान विरोधी काम वेळोवेळी काँग्रेस पक्षाने केलेले असून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान करण्याचे काम हे वेळोवेळी आमच्या केंद्र सरकारनेच आणि महायुती सरकारने च केलेले आहे.
त्याबद्दल सरकारच्या अभिनंदन केले व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मूळ गाव असणाऱ्या वाटेगावात साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे भव्य दिव्य स्मारक व्हावे यासाठी भरीव निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली. सोबतच अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची गरज असून राज्य शासनाने ही या गोष्टीचा विचार करावा. सोबतच मातंग समाजासह संपूर्ण साहित्यिकांची असलेली मागणी म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देऊन गौरविण्यात यावे अशी मागणी हिवाळी अधिवेशनात बोलताना आमदार अमित गोरखे यांनी केली.
‘शिव गौरव गाथा’ महानाट्यातून उलगडला शौर्याचा इतिहास
Newsworldmarathi Pune : छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, प्रशासन आणि विचार धारेवर आधारित तसेच ज्या ज्या क्रान्तिकारकांनी शिवरायांकडून प्रेरणा घेऊन भारत मातेसाठी कार्य केले, अशा महावीरांना वंदन करीत शिवगौरव गाथा हे महानाट्य सादर झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट, यांच्या जीवनाचे पैलू उलगडून दाखविण्यासोबतचा भारतीयांच्या शौर्याचा इतिहास मांडण्यात आला.
हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेतर्फे हिंदू सेवा महोत्सवाचे आयोजन स.प.महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले आहे. त्यामध्ये महानाट्य शिव गौरव गाथा चे सादरीकरण झाले. याप्रसंगी डॉ. सुनील काळे, हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे अध्यक्ष अशोक गुंदेचा, महोत्सवाचे अध्यक्ष कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, संस्थेचे महामंत्री किशोर येनपुरे, उपाध्यक्ष पंडित शिवकुमार श्री, इस्कॉनचे संजय भोसले, स्वामीनारायण मंदिरचे राधेश्याम अग्रवाल, चरणजितसिंग सहानी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्या प्रशासन व दृष्टीकोनाबद्दल काही प्रसंग यामध्ये आहेत. संख्येने काही शेकडो असलेले मावळे हजारोंच्या मुघल सैन्यलाल कोणत्या प्रेरणेमुळे नामोहरम करू शकले, याबाबी महानाट्यात ठळकपणे दर्शविण्यात आल्या. जिजाऊंचे बालशिवाजींना रामायणातील कथा सांगण्याचे प्रसंग आणि त्यातून संस्कार कसे घडतात, हे देखील दाखविण्यात आले आहे. अफजलखान वध हा गाण्याच्या माध्यमातून सुरेखपणे दाखविण्यात आला आहे.
लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, स्वातंत्रवीर सावरकर, महात्मा फुले, लहुजी वस्ताद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस या सारख्या असंख्य पुढारी आणि क्रांतिकारकांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन भारत मातेसाठी महान कार्य केले. हे सर्व पात्र त्यांच्या प्रेरणेविषयी महानाट्यात सांगत होते. संजय भोसले लिखित आणि दिग्दर्शित या महानाट्यात भारतीय एकात्मतेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा संदेश देण्यात आला आहे.
निर्मिती डॉ. जनार्दन चितोडे यांची होती. महानाट्याचे सादरीकरण संवाद, गाणी, पोवाडे आणि आकर्षक नृत्याच्या माध्यमातून केले आहे. नृत्य दिग्दर्शन मयूर वैद्य यांनी केले.
ऐतिहासिक काळात नेणारे नेपथ्य, भव्य असा असा रंगमंच, आकर्षक वेशभूषा आणि उत्तम प्रकाशयोजना या महानात्याची वैशिष्ट्ये आहेत. जवळपास १५० कलाकारांनी हे महानाट्य सादर केले आहे.
जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत आरोग्य शिबीर
Newsworldmarathi Pune : रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद अंगिकारुन कार्यरत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे महा आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेतर्फे स.प. महाविद्यालय मैदानावर हिंदू सेवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये ट्रस्टची दोन भव्य दालने उभारण्यात आली आहेत.
महा आरोग्य शिबीराचे उद्घाटन रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते श्री गणेशाच्या प्रतिमेचे पूजन करून झाले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांसह विश्वस्त व सुवर्णयुग तरुण मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, महा आरोग्य शिबीर दालनात मोफत रक्त, नेत्र, दंत, हृदय आजार, डोळे, श्रवण, त्वचा अशा २६ हून अधिक विभागांमध्ये विविध प्रकारच्या तपासण्या व आजारांवरील निदान करण्यात येत आहे. पहिल्या दोन दिवसात ५ हजारहून अधिक रुग्णांनी या शिबिरातील सेवांचा लाभ घेतला आहे. या तपासण्या व सुविधांकरिता २८ हून अधिक रुग्णालये आणि संस्थानी सहभाग घेतला आहे.
मुख्य दालनात श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरातील गणरायाचे लाईव्ह दर्शन येथील दालनामध्ये होईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मुख्य मंदिराची भव्य रंगावली व ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांची संपूर्ण माहिती या दालनामध्ये माहिती व छायाचित्रे स्वरूपात देण्यात आली आहे. तरी पुणेकरांनी आरोग्य सुविधांचा लाभ घेण्यासोबतच ट्रस्टच्या सामाजिक कार्याची माहिती घेण्याकरिता रविवार, दि.२२ डिसेंबर पर्यंत सकाळी ९ ते रात्री १० यावेळेत भेट द्यावी, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
परराज्यात मराठी अधिकाऱ्यांना उत्तम वागणूक
Newsworldmarathi Pune : आपण राहतो त्या राज्यात पोस्टींग मिळावे यासाठी अधिकाऱ्यांचा सतत प्रयत्न असतो. मात्र इतर राज्यांमध्ये काम केल्याने आपण नक्कीच समृद्ध होतो आणि त्याचा आपल्याला फायदाच होतो. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या कार्याचा संपूर्ण देशात सन्मान केला जातो, त्यामुळे इतर राज्यात जाऊन काम करताना मराठी अधिकाऱ्यांना उत्तम वागणूक दिली जाते, असे मत प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या आणि निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
मराठी भाषा संवर्धन समिती, पुणे महानगरपालिका व संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनात ‘इतर राज्यातील प्रशासकीय कार्यसंस्कृती व अनुभव’ या विषयावर परिसंवादाचे आज (दि. 21) आयोजन करण्यात आले होते. आसाम आणि मेघालय येथे 15-16 वर्षे काम केल्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेतलेले आयएएस अधिकारी विशाल सोळंकी, तसेच 15 वर्षांपासून राजस्थानमध्ये कार्यरत असणारे आयपीएस अधिकारी संतोष चाळके आणि 39 वर्षे सेवेत असलेले अरुण उन्हाळे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
प्रशासनातील गमतीशीर गोष्टी..
इतर राज्यात काम करताना तेथील भाषा, संस्कृती यांच्याशी जुळवून घ्यावे लागते. त्यावेळेला काही मजेशीर प्रसंग घडतात. याविषयी चाळके म्हणाले, माझी राजस्थानात नियुक्ती झाली तेव्हा मी पोलिस स्टेशनमध्ये 5 जणांची नियुक्ती केली. ही नियुक्ती करताना मी त्यांचे काम, पद या गोष्टी विचारात घेतल्या. मात्र त्याठिकाणी मिना ही प्रमुख जात असल्याने मी सुद्धा मिना जातीचा आहे आणि त्यामुळे मी 3 मिना जातीच्या लोकांची नियुक्ती केल्याचे बोलले जायला लागले. मी राजस्थानी नाही तर महाराष्ट्रातून आलो आहे हे समजल्यावर माझ्या पत्नीचे नाव मिनल आहे तर ती तरी मिना जातीची असेल असेही त्या लोकांना वाटले. मला तोपर्यंत याविषयी अजिबातच कल्पना नव्हती. पण नंतर मात्र हा सगळा गैरसमज दूर झाला आणि काम सुरळीतपणे सुरू झाले.
प्रशासनातही विविधेत एकता..
भारतात विविधतेत एकता आहे असे आपण म्हणतो किंवा ऐकतो. पण प्रशासनात काम करत असताना आम्हाला त्या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव येतो. इतर राज्यांमध्ये काम करताना भाषा, संस्कृती, अन्न वेगळे असले तरी प्रेम, दु:ख, निसर्ग, जवळीक या गोष्टी सगळीकडे सारख्याच आहेत हे प्रकर्षाने जाणवते. निवडणूक निरीक्षक म्हणून कार्यरत असताना महाराष्ट्राबरोबरच इतर राज्येही बरीच प्रगत असल्याचे जाणवले, असे उन्हाळे म्हणाले.
राजकीय अधिकाऱ्यांकडून दिली जाणारी वागणूक..
प्रशासकीय अधिकारी आणि पुढारी यांचा अतिशय जवळचा संबंध असतो हे आपल्या सगळ्यांना माहितच आहे. पण महाराष्ट्राबाहेर पुढाऱ्यांकडून अधिकाऱ्यांना किंवा अगदी वाहनचालकांनाही अतिशय आदराची वागणूक दिली जाते. महाराष्ट्रात हे चित्र अभावानेच पाहायला मिळते. मुख्यमंत्र्यांपासून ते अगदी आमदार, नगरसेवक असे सगळेच जण आसाम किंवा राजस्थानसारख्या राज्यांमध्ये अधिकाऱ्यांचा आदर करतात असे सोळंकी म्हणाले.
वरिष्ठांची सापत्न वागणूक लेखनातील अडथळे
Newsworldmarathi Pune : शासनात कार्यरत असताना सहकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळणारी सापत्न भावाची वागणूक, असूया, तांत्रिक धोरणात्मक अडचणी, समाजाशी संवाद तुटणे, गैरसमज, तिरस्कार, आत्मगौरव अथवा आत्मवंचनेत येऊ शकणारे अडकलेपण, अशा आव्हानांना सामोरे जावे लागल्याची भावना शासकीय सेवेत राहून लिखाण करणाऱ्या सिद्ध हस्त लेखकांनी व्यक्त केली.
मराठी भाषा संवर्धन समिती पुणे महानगरपालिका आणि संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनातील ‘अधिकाऱ्यांसाठी साहित्य लेखनातील आव्हाने’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. माजी प्रशासकीय अधिकारी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे, माजी प्रशासकीय अधिकारी, पानिपतकार विश्वास पाटील, राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त किरण कुलकर्णी मंचावर होते. सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रल्हाद कचरे यांनी संवाद साधला. बालगंधर्व रंगमंदिरात संमेलन सुरू आहे.
भारत सासणे म्हणाले, उत्तम साहित्यकृती निर्माण करण्याकरीता सतत वैविध्यपूर्ण वाचन होणे आवश्यक आहे. आजूबाजूला घडत असलेल्या घटना, माणसे, सामान्यांच्या आयुष्यातील वस्तुस्थिती रूपत्माकपद्धतीने मांडणे, वास्तववाद साहित्यकृतीतून दर्शविणे गरजेचे असते. समकालीन साम्यवादी लेखकांच्या रोषाला तसेच त्यांच्याकडून पसरविलेल्या मिथकला, कारस्थानांनाही अनेकदा सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत सर्व आघाड्यांवर लढत राहत संयम आणि अस्सलपणाची उपासना केल्यास उत्तम दर्जाची साहित्यकृती निर्माण होते.
विश्वास पाटील म्हणाले, आपल्याजवळ असलेल्या कलेविषयी श्रद्धा ठेवणे, माध्यमावर उत्तम पकड असणे, शब्दांची आराधना करणे, अनुभूती जाणीवपूर्वक समजून घेणे या गोष्टी साहित्यकृतीची निर्मिती करताना अत्यंत उपयोगी ठरतात. मनन-चिंतन करत अभ्यासपूर्ण लेखानातून जीवनातील अनेक अनुभव मांडताना ते आपल्यामध्ये रुजावे लागतात, त्यांचा मंद सुगंध सुटला की त्या अनुभूतींशी तन-मनाने एकरूप व्हावे लागते आणि त्यातूनच अजरामर कलाकृती निर्माण होते.
किरण कुलकर्णी म्हणाले, लेखन करणे आणि ते लोकांपर्यंत पोहोचविणे या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. आजच्या सामाजिक अवस्थेत अचूकतेपेक्षा वेगाला नको इतके महत्त्व दिले गेले आहे. यातूनच सुमारीकरणाची लाट अंगावर आली आहे. यातून वाचण्यासाठी सवंगतेच्या आहारी न जाता, खोटेपणाची भर न घालता आशयपूर्ण लेखन होणे आवश्यक आहे.
शासकीय सेवेतही विवेकी वृत्तीने साहित्यनिर्मिती शक्य : गायकवाड
Newsworldmarathi Pune : प्रत्येक शासकीय कार्यालय हा अतरंगी जनसामान्यांच्या चित्रविचित्र अनुभवांचा खजिना असतो. संवेदनशील अधिकारी या अनुभवांतून विवेकी वृत्तीने साहित्यनिर्मिती करू शकतात. असे अनुभव लेखन वाचकांसह त्या लेखकाला मोठ्या आनंदाचा ठेवा देते, हा स्वानुभव आहे. त्यामुळे सरकारी सेवेतील बंधनांची सबब न सांगता अधिकारी कर्मचारी यांनी लेखन करावे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक आणि यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांनी आज (दि. 21) येथे केले.
मराठी भाषा संवर्धन समिती पुणे महानगरपालिका आणि संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन 20 ते 22 डिसेंबर दरम्यान पुण्यात आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी गायकवाड बोलत होते. बालगंधर्व रंगमंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या व्ोळी राज्याचे माजी मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे, ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, निवडणूक आयोग अधिकारी किरण कुलकर्णी, सूर्यदत्त इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, वसंत म्हस्के, सचिन ईटकर, संवाद पुणेचे सुनील महाजन व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते अजानवृक्षाला जलार्पण करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.
गायकवाड म्हणाले, प्रशासकीय अधिकारी अनेकदा सरकारी सेवेची सबब सांगतात. पण शासकीय सेवेत असूनही उत्कृष्ट साहित्य निर्माण केल्याची कित्येक उदाहरणे आहेत. त्यांचे आदर्श ठेवून लेखन केले जावे. शासकीय कार्यालयात कुठलेही काम घेऊन येणारा माणूस अधिकाऱ्याला इरसाल अनुभवांचा खजिना देऊन जातो. आपण संवेदनशील मनाने ते अनुभव कच्चा माल म्हणून वापरावेत आणि लेखनाला गती द्यावी. मात्र लिहिताना शासकीय परिपत्रकांची बोजड, नीरस भाषा टाळावी. सोपे, सुगम आणि सुस्पष्ट लिहावे. सदसद्विवेकबुद्धी जागी ठेवावी, हे सांगताना गायकवाड यांनी कथन केलेल्या अनुभवांनी सभागृह हास्यकल्लोळात बुडून गेले.
सकारात्मक बाजू पहावी : डॉ. नितीन करीर
डॉ. नितीन करीर म्हणाले, मी लेखक म्हणून नाही तर वाचक या भूमिकेतून संमेलनात सहभागी झालो आहे. अलीकडे बरेच लेखन ग्राहकाभिमुख होत आहे, असे माझे निरीक्षण आहे. वेदनेतून, दु:खातून निर्माण होणारे लेखन कमी होत आहे. शासकीय सेवेतील अधिकाऱ्यांनी संवेदनशीलता जपावी आणि न्यून शोधण्याऐवजी सकारात्मक बाजू पहावी. यातून अधिकाऱ्यांच्या हातून चांगले लेखन होण्याची शक्यता वाढेल. तसेच शासकीय अधिकाऱ्यांविषयीची जनमानसातील प्रतिमा बदलण्यास मदत होईल,.
भारत सासणे म्हणाले, ‘शासकीय नोकरी ही जीवनाकडे आणि जगाकडे पाहण्याची विशाल खिडकी आहे. अधिकाऱ्यासमोर येणारा प्रत्येक अर्ज, प्रत्येक फाईल एखादे दु:ख, वेदना असू शकते. अधिकाऱ्यांनी संवेदनशीलता जपणे आवश्यक आहे’.
प्रत्येकाचे आयुष्य सात-बाराचा उतारा : विश्वास पाटील
विश्वास पाटील यांनी स्वतःच्या कार्यकालातील महसूल विभागातील अनेक किस्से सांगितले. महसूल विभाग हा लेखनासाठी उत्तम खुराक किंवा कडबा आहे, असे ते म्हणाले. प्रत्येकाचे आयुष्य हा जणू सात बाराचा उतारा आहे, याचा प्रत्यय शासकीय सेवेत असताना मिळाला. सध्याच्या काळात साहित्य, संस्कृती, भाषेला मोबाईल नावाचा शत्रू निर्माण झाला आहे. त्याचा योग्य तेवढाच वापर केला जावा आणि अधिकारी मंडळींनी व्ोळेत लेखणी हाती घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला.
लेखन समाजासाठी दिशादर्शक ठरेल : चंद्रकांत पुलकुंडवार
चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, शासकीय सेवेत असतानाही अनुभवांचे संकलन, कथन, लेखन या पद्धतीने दस्तऐवजीकरण हे आपल्याप्रती समाजाचे देणे आहे, ही भावना महत्त्वाची आहे. बहुतेक अधिकारी चरितार्थ या हेतूने सरकारी नोकरीकडे पाहतात. त्यातील सेवाभाव लुप्त झाला आहे. त्यामुळे सामाजिक अभिसरणाचे प्रतिबिंब अधिक उठावदार दिसते. मात्र शासकीय अधिकाऱ्यांनी उत्तमोत्तम साहित्यनिर्मिती केल्याची अनेक उदाहरणे आहेत, जे लेखन समाजाला दिशादर्शक, मार्गदर्शक ठरणारे आहे.
तरुणांचा सहभाग वाढावा : अविनाश धर्माधिकारी
अविनाश धर्माधिकारी म्हणाले, शासन या नावाचे एक विश्वकुटुंब आहे, असाव्ो. शासकीय अधिकारी हे एखाद्या कुटंबप्रमुखासारखी जबाबदारी निभावणारे असावेत. शासकीय पदांवर कामासाठी निवड ही सेवेची संधी मानावी. आपल्या भारतीय व महाराष्ट्रातील जनतेमध्ये संतविचार आणि छत्रपती शिवरायांच्या कार्याची गुणसूत्रे वाहात आली आहेत. शासकीय सेवेत मानवी मनाचे वैशिष्ट्यपूर्ण दर्शन घडते. त्या दर्शनाची अभिव्यक्ती कथा, कादंबरी, कविता, ललित लेखन अशा विविध स्वरुपात घडू शकते. शासकीय अधिकाऱ्यांच्या या संमेलनात यापुढे तरुणाईचा सहभाग वाढावा आणि या क्षेत्रातील प्रतिभा बहरून यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आयुक्त राजेंद्र भोसले यांनी संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून मनोगत व्यक्त केले. शासकीय अधिकाऱ्यांच्या अशा प्रकारच्या संमेलनाच्या निमित्ताने परस्पर देवाणघेवाण होईल आणि सोहार्दाचे वातावऱण निर्माण होईल. प्रशासनातील अधिकारीही लक्षवेधक साहित्यनिर्मिती करू शकतात, हे या संमेलनाच्या प्रतिसादावरून लक्षात येत आहे. पुणे मनपाने यासाठी पुढाकार घेतला. अधिकाऱ्यांनाही आत्मपरिक्षणाची संधी मिळेल, त्यांच्यातील सुप्त कलागुण समोर येतील आणि पुनर्मूल्यांकनाचा अवकाश प्राप्त होईल, असे ते म्हणाले.
निमंत्रक सुनील महाजन यांनी शासकीय अधिकाऱ्यांमधील सुप्त लेखनगुणांना अवकाश मिळावा तसेच व्यासपीठ मिळावे, म्हणून हे संमेलन आयोजित केल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सोनाली घुले-हरपळे, प्रांजल शिंदे-चोभे यांनी केले तर आभार राजीव नंदकर यांनी मानले.