खळबळजनक…! बदनामीच्या भीतीने १७ वर्षांच्या मुलीची आत्महत्या; मुंबईतील घटना

Newsworldmarathi Mumbai: मुंबईच्या साकिनाका परिसरात बदनामीच्या भीतीने एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी विनयभंगासह आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि पोक्सोच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच १९ वर्षांच्या आरोपी मित्राला साकिनाका पोलिसांनी अटक केली असून तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. नेमकं काय घडलं? मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगी आणि आरोपी तरुण एकाच परिसरात राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांची मैत्री झाली होती. त्यानंतर ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. अनेकदा सोशल मिडीयावर चॅट करताना तो तिच्याकडे तिचे अश्लील फोटो पाठविण्यास सांगत होता. त्याच्यावर विश्वास ठेवून तिनेही तिचे काही अश्लील फोटो पाठविले होते. याच फोटोवरुन त्याने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. सोशल मिडीयावर तिचे फोटो व्हायरल करुन तिची बदनामीची तो तिला धमकी देत होता. या धमकीमुळे मुलगी प्रचंड मानसिक तणावात होती. त्यातून आलेल्या नैराश्यातून तिने काही दिवसांपूर्वी तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येनंतर तिच्या मोठ्या भावाला हा प्रकार समजला. त्यानंतर त्याने आरोपी मित्राविरुद्ध साकिनाका पोलिसांत तक्रार केली. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच मित्राला शनिवारी पोलिसांनी अटक केली आहे. याच गुन्ह्यात त्याला दिंडोशीतील विशेष सत्र न्यायायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी विशेष सत्र न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.

खडसे-महाजन वाद विकोपाला; महाजनाकडून खडसेंविरोधात अब्रुनुकसानीचा दावा; प्रकरण काय?

Newsworldmarathi Mumbai: राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांचे राज्यात कार्यरत असलेल्या एका महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंध असल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी आता राष्ट्रवादीचे नेते व आमदार एकनाथ खडसे यांना महाजन यांनी आपल्या वकिलामार्फत अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे. सोबतच खडसे यांनी ज्या पत्रकाराचा हवाला देऊन हे वक्तव्य केले होते, ते पत्रकार अनिल थत्ते यांनाही नोटीस पाठवली असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. नेमकं प्रकरण काय? पत्रकार अनिल थत्ते यांनी काही दिवसांपूर्वी यूट्यूबवर अपलोड केलेल्या एका व्हिडीओत मंत्री गिरीश महाजन यांच्यासंदर्भात एक दावा केला होता. महाजन यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांचा सीडीआर दाखवत रात्री अपरात्री महिला अधिकाऱ्यांशी सातत्याने का बोलत असता? असा जाब विचारल्याचा दावा थत्ते यांनी आपल्या व्हिडीओतून केला होता. याचाच आधार घेत एकनाथ खडसे यांनी महाजनांना लक्ष्य केले होते. एका महिला आयएएस अधिकाऱ्याला रात्री दीड-दोन वाजता महाजन यांनी १०० वेळा कॉल केल्याचा दावा एकनाथ खडसेंनी केला होता. यानंतर महाजन-खडसे यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला होता. अखेर महाजन यांनी आपली बदनामी झाल्याचे सांगत आपल्या वकिलामार्फत खडसे यांच्यासह पत्रकार अनिल थत्ते यांना नोटीस बजावली आहे. नोटिशीमध्ये काय? कोणतेही सबळ पुरावे न देता पत्रकार अनिल थत्ते आणि एकनाथ खडसे यांनी आपल्यावर आरोप केले. जनमानसांत आपली प्रतिमा मलीन केली आहे. याप्रकरणी आपण आता कोर्टातच लढणार असल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. दरम्यान, आपल्याला कोणत्याही प्रकारची नोटीस मिळाली नाही, असं एकनाथ खडसे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

शालेय स्वच्छता साहित्य खरेदीची निविदा वादाच्या भोवऱ्यात; माजी नगरसेविका अर्चना पाटील यांचे आयुक्तांना पत्र

0
Newsworldmarathi Pune : महापालिका शिक्षण मंडळासाठी खरेदी करण्यात येत असलेली शालेय स्वच्छता साहित्य खरेदीही आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या खरेदीसाठी एका विशिष्ट ठेकेदाराला डोळ्यांसमोर ठेवून तो पात्र नसतानाही त्याला पात्र करून खरेदीची प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचा आरोप भाजपच्या माजी नगरसेविका अर्चना पाटील यांनी केला आहे. ही निविदा प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणीही त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांसाठी केलेली साहित्य खरेदी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. विभागप्रमुखांनी नकारात्मक अभिप्राय देऊनही चार कोटींची साहित्य खरेदी करण्यात आली. त्यानंतर आता शालेय स्वच्छता खरेदीच्या निविदा प्रक्रियेवरूनही पुन्हा तक्रारी आल्या आहेत. शिक्षण मंडळासाठी पालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाने लिक्विड अॅसिड, फिनेल व हार्डवेअर साहित्य खरेदीसाठी १ कोटीची निविदा प्रक्रिया | राबवली. मार्चअखेरीस या निविदा उघडण्यात आल्या. त्यात पात्र ठेकेदाराला काम देण्याचा प्रस्ताव भांडार विभागाकडून स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला. मात्र, माजी नगरसेविका पाटील यांनी केलेल्या तक्रारीनुसार संबंधित ठेकेदाराने अटी-शर्तीनुसार कागदपत्रांची पूर्तता केली नाही, असे असतानाही प्रशासनाने बेकायदेशीररीत्या त्याला पात्र केले आहे. दक्षता व लेखापरीक्षण विभागाने काढलेल्या आक्षेपांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे या निविदा प्रक्रियेची चौकशी करून ती रद्द करण्यात यावी, अशी मागणी पाटील यांनी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

हृदयद्रावक…! डीजेच्या आवाजाने तरुणाचा मृत्यू; नाका- तोंडातून रक्तस्राव…

Newsworldmarathi Nashik : नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत डीजेच्या आवाजाने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना नाशिक शहरातील पेठ रोडवरील फुलेनगर भागात घडली आहे. नितीन फकिरा रणशिंगे (वय-२३) असे मृत युवकाचे नाव आहे. नेमकं काय घडलं? डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येस रविवारी पेठरोड भागात निघालेल्या मिरवणुकीत रणशिंगे सहभागी झाला होता. फुलेनगर येथील तीन पुतळ्याजवळ सायंकाळी ७.३० च्या सुमारास डीजेचा दणदणाट सुरू असताना हा प्रकार घडला. डीजेच्या आवाजाचा त्रास झाल्यामुळे अचानक नितीनच्या तोंडातून, नाकातून रक्तस्राव सुरू झाला. ही बाब निदर्शनास येताच भाऊ आनंदा रणशिंगे यांनी त्यास तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. फुप्फुसाच्या क्षयरोगाने पीडित असल्याने नितीनवर चार वर्षांपासून उपचार सुरू होते. तो न्यूमोनिया या आजारावरही उपचार घेत होता. त्यातूनच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

संभाजी भिडेंवर कुत्र्याचा हल्ला; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Newsworldmarathi Pune : शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कुत्र्याने संभाजी भिडे यांच्या पायाला कडकडून चावा घेतला. यानंतर संभाजी भिडे यांना तातडीने सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दल अद्याप कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे आपल्या धारकऱ्यांसमवेत विविध ठिकाणी फिरतीवर असतात. सोमवारी रात्री भिडे गुरूजी सांगलीमध्ये होते. सांगलीच्या माळी गल्ली परिसरात एका धारकऱ्याच्या घरी ते जेवणासाठी गेले होते. जेवण आटोपून व इतर चर्चा संपवून ते रात्री ११ वाजताच्या सुमारास घराकडे निघाले. त्याच वेळी एका कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्या पायाचा चावा घेतला. यावेळी त्यांना काही अंशी दुखापत झाली. त्यांना लगेचच उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाचे समर्थन केले होते. “संभाजीराजे भोसले बोलतात ते १०० टक्के चूक आहे. वाघ्या कुत्र्याबाबत आपण वाचले आहे आणि ती कथा सत्य आहे. वाघ्या कुत्र्याने चितेत उडी घेतली हे सत्य आहे, त्यामुळे स्मारक म्हणून ते केलं आहे” असे म्हणत भिडे गुरूजींनी स्मारकाला समर्थन दर्शवले होते.

“राजेश डेम्बला यांच्यासोबत एआय आणि संस्थापकांच्या मानसिकतेचा अद्वितीय प्रवास!”

0
Newsworldmarathi Pune : पुणे गुजराती युथ फोरम (पीजीवायएफ) ने “एआय आणि संस्थापकांची मानसिकता” या विषयावर एक प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात दूरदर्शी उद्योजक आणि वक्ते श्री राजेश डेम्बला यांचा समावेश होता. या कार्यक्रमात त्यांनी कोंढवा बुद्रुक, पुणे येथील जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटर येथील भव्य क्रोम बँक्वेट येथे सहभाग घेतला. ४००+ हून अधिक उत्साही सहभागींसह, हा कार्यक्रम भव्य यशस्वी झाला, ज्यामुळे प्रेक्षकांना तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या भविष्याबद्दल ज्ञान, प्रेरणा आणि स्पष्टतेने समृद्ध केले. श्री राजेश डेम्बला यांचा प्रवास हा चिकाटी आणि दूरदृष्टीचा खरा पुरावा आहे. विनम्र सुरुवातीपासून ते मालिका उद्योजक बनण्यापर्यंत आणि भारताच्या तंत्रज्ञान आणि स्टार्टअप परिसंस्थेतील एक प्रसिद्ध नाव, त्यांची लवचिकता आणि स्वतः बनवलेल्या यशाची कहाणी प्रेक्षकांना खोलवर जाणवली. आजच्या वेगाने विकसित होत असलेल्या जगात कृत्रिम बुद्धिमत्ता, व्यवसाय उभारणी आणि संस्थापकाची मानसिकता राखण्यावरील त्यांच्या शक्तिशाली अंतर्दृष्टीचा उपस्थित असलेल्या प्रत्येकावर कायमचा प्रभाव पडला. या कार्यक्रमाचे विजेते पीजीवायएफचे व्यवस्थापकीय विश्वस्त आणि युवा सल्लागार राजेशभाई शाह आणि एसपीजीबीएसचे संयुक्त व्यवस्थापकीय विश्वस्त नैनेशभाई नंदू होते, ज्यांचे सतत पाठबळ, प्रोत्साहन आणि नेतृत्व तरुणांना सक्षम करण्यात आणि अशा समृद्ध कार्यक्रमांना चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पुणे गुजराती युवा मंच टीम सत्येन पटेल (संस्थापक अध्यक्ष), हर्षित देसाई आणि सिद्धार्थ शाह (उपाध्यक्ष), जीत गांधी (एसआयजी लीड), अंकिता पटेल (सचिव), तसेच आमचे उत्साही योगदानकर्ते विशाल पटेल, नितेश पटेल, उल्का शाह आणि वैशाली शाह यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम नावीन्यपूर्णता, शिक्षण आणि एकतेद्वारे समुदायाला सक्षम करण्याच्या सामूहिक प्रवासात आणखी एक मैलाचा दगड ठरतो.

ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्याचा उत्तरार्ध सुखाने जावा यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत : संदीप खर्डेकर

0
Newsworldmarathi Pune : मी अमेरिका दौऱ्यावर गेलो असताना मी बघितलं की तेथील समस्यांमध्ये “एकाकी ज्येष्ठ आणि वैफल्यग्रस्त तरुण” ही समस्या फार मोठी आहे. तेव्हाच ठरविले की आपल्या कडे ज्येष्ठ नागरिकांना त्यांचा वृद्धापकाळ आनंदाने, सुखाने व्यतीत करता येईल यासाठी प्रयत्न करायचे असे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले. ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्याचा उत्तरार्ध सुखाने जावा यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत आणि समाजाने त्यांना सन्मानाची वागणूक द्यायला हवी असेही खर्डेकर म्हणाले.आयुष्यभर कष्ट करून जे आपल्याला सुखात ठेवण्यासाठी धडपडत असतात त्यांना आनंदाने आयुष्याचा उत्तरार्ध व्यतीत करता यावा यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत, वृद्धापकाळ हे दुसरे बालपण असते म्हणून ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा समजून घेऊन त्यांना मदत करावी असेही संदीप खर्डेकर म्हणाले. याच भूमिकेला अनुसरून आज हनुमान जयंती आणि चैत्र पौर्णिमेनिमित्त क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि ग्लोबल ग्रुप तर्फे ज्येष्ठ नागरिक संघांना उपयुक्त वस्तू भेट देण्याच्या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला त्या वेळी ते बोलत होते. यावेळी मा. नगरसेविका व क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त मंजुश्री खर्डेकर,डहाणूकर कॉलनी हैप्पी कॉलोनी ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यवाह डॉ.शिरीष अमृतकर,सह कार्यवाह,राजेश टेंबे,खजिनदार शांताराम वाणी, सहकार्यवाह दत्तात्रय घाटे, उपाध्यक्ष सीमा माळवकर, सह खजिनदार चंद्रकांत टिकेकर,शैलाताई सातपुते,हरिभाऊ नेरकर इ मान्यवर उपस्थित होते.यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाला वॉटर कुलर डिस्पेन्सर भेट देण्यात आले. आमच्या ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात आणि सर्व सभासद एकोप्याने संघात पडेल ते काम करतात असे संघाचे कार्यवाह डॉ. शिरीष अमृतकर म्हणाले. आमच्या संघाला इंटरनॅशनल लॉन्जेव्हिटी सेंटर तर्फे कै.बी. जी. देशमुख सर्वोत्कृष्ट ज्येष्ठ नागरिक संघ 2024 हा पुरस्कार देण्यात आला असेही डॉ. अमृतकर म्हणाले. डॉ. रघुनाथ माशेलकर व श्री. जयंत उमराणिकर यांच्या हस्ते मिळालेल्या पुरस्काराने आमचा उत्साह दुणावला असून आम्ही अधिक जोमाने कार्यरत राहू असेही संघाच्या सदस्यांनी एकमुखाने जाहीर केले.आमच्या यशात संघाचे माजी अध्यक्ष व कार्यवाह यांचा मोठा सहभाग असल्याने नुकतेच त्यांचेही सत्कार करण्यात आल्याचे डॉ. अमृतकर म्हणाले. क्रिएटिव्ह फाउंडेशन उत्तम सामाजिक काम करत असून आम्ही त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो असे सांगून संघातर्फे संदीप खर्डेकर व मंजुश्री खर्डेकर यांना सन्मानित करण्यात आले. यापुढे क्रिएटिव्ह फाउंडेशन, ग्लोबल ग्रूप, मुकुलमाधव फाउंडेशन, नवलराय ए हिंगोरानी ट्रस्ट, वेस्टर्न इंडिया फोर्जिंग च्या वतीने अधिकाधिक सेवाकार्य करणार असल्याचे क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त सौ. मंजुश्री खर्डेकर यांनी जाहीर केले.

जय हनुमानाच्या जयघोषाने रंगला अखंड कात्रज कोंढवा परिसर…

0
Newsworldmarathi Pune : अखंड हिंदुस्थानाचे जनक असलेले प्रभु श्रीरामचंद्र व सेवाभावी पवनकुमार हनुमान यांचे मुनोत परीवाराने कात्रज कोंढवा परिसरात स्थापलेल्या एकमेव श्री दक्षिणमुखी हनुमान जन्मोत्सव व रोप्यमहोत्सवी वर्षानिमित्त कात्रज गावठाणातून भव्यदिव्य शोभायात्रेचे आयोजन केले होते. या शोभायात्रेची सुरुवात कात्रज गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथून करण्यात आली व सुंदरनगर येथील हनुमान मंदिर येथे समाप्ती करण्यात आली. यावेळेस एकता मित्र मंडळ चौक येथे नितिन शेलार यांनी शोभायात्रेचे स्वागत करून सर्वांसाठी थंडपेयाची सोय केली. शोभायात्रेत बलाढ्य बाहुबली हनुमान, घोड्याच्या रथामध्ये राम-लक्ष्मण व सीता यांच्या प्रत्यक्ष भूमिकेतील भक्तगण तसेच ढोल ताशा पथक यासोबतच महिलांचा विशेष पारंपरिक वेशभूषेतील फेटा परिधान केलेला सहभाग व परीसरातील अनेक बाल हनुमानांच्या सहभागाने शोभायात्रा नागरिकांसाठी विशेष लक्षणीय ठरली. शोभयात्रेमध्ये रामाची भूमिका मनोज छाजेड, सीता प्रिया छाजेड तर लक्ष्मणाच्या भूमिकेत मेहुल जयंत लुणावत यांनी हुबेहुब व लक्षवेधक भूमिका सादर केल्याबद्दल अशोक मुनोत यांनी व नागरिकांनी त्यांचे कौतुक करत औक्षण व साखर वाटून आनंद व्यक्त केला. संस्थापक अध्यक्ष अशोक मुनोत यांनी सन 2000 साली स्थापन केलेल्या कात्रज कोंढवा परिसरातील एकमेव दक्षिणमुखी हनुमान मंदिराचे यंदाचे रोप्य महोत्सवी वर्ष असून त्यानिमित्त सालाबादप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सक्षम फाउंडेशनचे निखिल मुनोत यांनी सांगितले, प्रसंगी परिसरातील शेकडो भाविक तसेच सक्षम फाउंडेशनचे स्वयंसेवक व पोलीस बांधवंनी एकेरी वाहतूक ठेवून मोलाचे सहकार्य केले. 30 ते 35 वर्षापासून कात्रज परीसरात वास्तव्यास असणारे मुनोत परिवार कुठलेही जाती-धर्म न मानता शिक्षण, सामाजिक, गोपालन तसेच अध्यात्मिक अशा अनेकविध क्षेत्रात निस्वार्थपणे स्वखर्चातून वर्षभर अनेकानेक सांस्कृतिक कार्यक्रम राबवत असल्याबाबत जन्मोत्सवप्रसंगी नागरिकांकडून शुभेच्छा देत कौतुक करण्यात आले. प्रसंगी हनुमानाची महाआरती व भाविकांना महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

वर्तमान परिस्थितीशी निर्भिडपणे लढा : ॲड. प्रकाश आंबेडकर

0
Newsworldmarathi Pune : इतिहास विसरलो तर वर्तमान परिस्थितीशी लढायला संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे इतिहास विसरू नका. तो समजून घ्या. आंबेडकरी चळवळीत आपण किती टप्पे गाठले याची जाणीव नसल्याने अनेकदा आपलेच लोक त्या चक्रात अडकतात. पण आपल्याला इतिहास माहिती असेल तर वर्तमान परिस्थिती निर्भिडपणे लढता येते, ती लढण्याची तयारी ठेवा असे आवाहन प्रबुद्ध भारतचे संपादक ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. आंबेडकरी चळवळीच्या कालखंडातील महत्त्वाच्या टप्प्यांचा दस्तऐवज असलेले “सम्यक ते वंचित : चळवळीचा दस्ताऐवज” या शांताराम पंदेरे यांनी संकलित केलेल्या ग्रंथाचे पुण्यातील निळू फुले सभागृहात प्रकाशन झाले. याप्रसंगी ॲड. आंबेडकर बोलत होते. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी वर्तमान सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर अत्यंत स्पष्टपणे भाष्य केले. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्याच्या आठवणींना उजाळा देताना, त्यांनी 1977 नंतरच्या राजकीय घडामोडी, रशियाच्या उदाहरणाने दाखवलेली दूरदृष्टी आणि मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनातील सरकारी लाठीमार आणि जनतेमध्ये पसरवलेली दहशत यावर सखोल विवेचन केले. ॲड. आंबेडकर म्हणाले, मी लोकांमध्ये बसून चर्चा केल्या, भीती दूर करण्यासाठी प्रयत्न केले. त्यातून नाशिक ते मुंबई लॉंग मार्चचा निर्णय झाला आणि त्यातून लोकांचा चळवळीवरचा आत्मविश्वास पुन्हा उभा राहिला. चळवळीत नेमकं काय साधायचं आहे, हे लक्षात ठेवा. टीकाकारांना घाबरण्याचे कारण नाही. निर्भिडपणे आपले मत मदत रहा. वाचन करून समजून घेणे, निर्णयक्षम होण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “टीव्हीवर जे दिसते आणि वर्तमानपत्रात जे छापून येते ते तपासून घ्या. लगेच खरे मानू नका, विचार करा, तपासा,” असा सल्लाही त्यांनी दिला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ज. वि. पवार, शांताराम पंदेरे, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, ज्येष्ठ नेते वसंतदादा साळवे, ज्येष्ठ पत्रकार प्रा. जयदेव डोळे, प्रा. संजीव चांदोरकर, ॲड. अरुण जाधव, दिशा पिंकी शेख, देवेंद्र उबाळे, पुष्पाताई इंगळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रबुद्ध भारतच्या कार्यकारी संचालक प्रा. अंजलीताई आंबेडकर, युवा नेते सुजात आंबेडकर, राजेंद्र पातोडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

कर थकवणाऱ्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई करा; युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांची मागणी

0
Newsworldmarathi Pune : दहा लाख रुपयांच्या अनामत रकमेसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तनिषा भिसे या गर्भवती महिलेला उपचार नाकारल्याने आणि वेळेत उपचार न मिळाल्याने गर्भवतीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आता नवीन वादात सापडले आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने २०१९ पासून पुणे महापालिकेचा तब्बल २७ कोटी ३८ लाख ६२ हजार ८७४ रुपयांचा मिळकत कर थकवला असल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानंतर रुग्णालयाविरोधात प्रचंड प्रमाणात रोष वाढला आहे. मिळकत कर थकवणाऱ्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर तत्काळ दंडात्मक कारवाई करावी यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने पुणे महानगरपालिका कर आकारणी व संकलन विभागाच्या उप आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील, विद्यार्थी काँग्रेस पुणे सरचिटणीस कृष्णा साठे, दीपक चौगुले, ज्ञानेश्वर जाधव, कुलदीप नाईकनवरे, देवेंद्र खाटीर, बाबा मिसाळ, सुनील कुसाळकर, ऋषिकेश आंधळे हे उपस्थित होते. खासदार सुप्रिया सुळे यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या थकीत मिळकत कर प्रकरणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. पुढील दोन दिवसात तत्काळ कायदेशीर बाबी तपासून रुग्णालयावर कारवाई करा अन्यथा गुरुवारपासून मी स्वतः युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह आंदोलनास बसणार असा इशाराही सुप्रिया सुळे यांनी महापालिकेला दिला आहे. सरकार या रुग्णालयास पाठीशी घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सर्वसामान्य पुणेकरांना एक न्याय आणि धनदांडग्यांना वेगळा न्याय अशी भूमिका घेता येणार नाही असेही सुळे यांनी म्हटले आहे.
पैश्यासाठी माणुसकीला काळीमा फासणाऱ्या, एका गर्भवती महिलेचा जीव घेऊन नवजात दोन जुळ्या मुलांना आईच्या मायेला पोरकं करणाऱ्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने २०१९ साला पासून २७ कोटी ३८ लाख ६२ हजार ८७४ रुपये इतका मिळकत कर भरला नाही. गेल्या ६ वर्षांपासून जर रुग्णालय कर भरत नसेल तर आजपर्यंत महापालिकेने या रुग्णालयावर कारवाई का केली नाही? सर्वसामान्य नागरिकांनी मिळकत कर भरला नाही तर घराला टाळे ठोकण्याची, शास्ती आणि जप्तीची तसेच दंड आकारण्याची कारवाई करण्यात महापालिका जी तत्परता दाखवते तीच तत्परता दाखवून, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर तत्काळ कारवाई करण्यात यावी. आमच्या निवेदनाची दखल घेऊन खासदार आदरणीय सुप्रिया ताई सुळे यांनी महापालिकेला 2 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. कायदेशीर बाबी तपासून दोन दिवसात उत्तर न दिल्यास व रुग्णालयावर कारवाई न केल्यास गुरुवारपासून सुप्रिया ताई स्वतः आमच्यासोबत आंदोलनास बसणार आहेत.
रोहन सुरवसे-पाटील सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस