मिशन अयोध्या; २४ जानेवारीला चित्रपटगृहात
Newsworldmarathi Team : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या ऐतिहासिक निर्मितीनंतर भारतातील रुपेरी पडद्यावर प्रभू श्रीरामांची महिमा उलगडणारा पहिला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘मिशन अयोध्या’ या चित्रपटाच्या माध्यमातून अयोध्येतील प्रभू श्रीरामांना प्रेक्षकांना पाहण्याची संधी पहिल्यांदाच रसिकप्रेक्षक आणि महाराष्ट्रातील रामभक्तांना मिळणार आहे.
अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराची स्थापना झाल्यानंतर भारतातील कोणत्याही चित्रपटाचे चित्रीकरण तेथे झाले नसून ही संधी दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे आणि आपल्या छत्रपती संभाजीनगरचे निर्माते कृष्णा दादाराव शिंदे, योगिता कृष्णा शिंदे त्यांच्या ‘आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.’ निर्मित ‘मिशन अयोध्या’ या चित्रपटाद्वारे उपलब्ध झाली आहे.
भारतीय इतिहास, संस्कृती आणि आध्यात्मिकतेचा अभूतपूर्व संगम असलेल्या या चित्रपटामुळे प्रेक्षकांना प्रभू श्रीरामांच्या अयोध्येचे मनोहारी दर्शन या चित्रपटातून येत्या २४ जानेवारी २०२५ रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहांतून होणार आहे. या चित्रपटाच्या विशेष प्रमोशन्ससाठी आज या चित्रपटाचे निर्माते कृष्णा दादाराव शिंदे, योगिता कृष्णा शिंदे लेखक दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे, चित्रपटातील व्यक्तिरेखा छत्रपती शिवाजी विद्यालय, संभाजी नगर या शाळेचे इतिहास विषयाचे शिक्षक अजित देशमुख सर यांची व्यक्तिरेखा साकारणारे निलेश देशपांडे व कारसेवक विचारे यांच्या भूमिकेतील डॉ. अभय कामत आणि अभिनेत्री तेजस्वी पाटील, सागर गुंजाळ इत्यादी खास उपस्थित होते.
मिशन अयोध्या
दिग्दर्शकाचे मनोगत
लेखक – दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे
प्रत्येक चित्रपट दिग्दर्शित करीत असताना मी त्या विषयाशी प्रामाणिक राहून त्या गोष्टीला न्याय देण्याचा दिग्दर्शक म्हणून नेहमी प्रयत्न करतो. अशावेळी जेव्हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय त्या चित्रपटाच्या गोष्टीशी निगडित असतो तेव्हा मी त्या चित्रपटाशी भावनिक पातळीवर जोडला जातो. आणि तो चित्रपट माझ्यासाठी खास बनतो. असंच काहीसं या “मिशन अयोध्या”चित्रपटाबद्दल माझ्यासोबत घडले आहे. 6 डिसेंबर 1992 रोजी जेव्हा बाबरी मस्जिद जमीन दोस्त झाली.
भारताच्या इतिहासातील ती एक अभूतपूर्व घटना होती. त्या घटनेच्या परिणाम सर्व देशवासीयांच्या मनावर झाला त्याला मी सुद्धा अपवाद नव्हतो. एका मोठ्या न्यायालयीन संघर्षानंतर रामजन्मभूमी मंदिराला परवानगी मिळाली आणि अयोध्ये मध्ये भव्य राममंदिर उभं राहिलं. पण त्यामुळे भारतीय राजकारणाला मिळालेल्या दिशेशी माझं मन संतुष्ट नव्हतं आणि पुढच्या पिढ्यांचा जेव्हा मी विचार करू लागलो तेव्हा मानसिक त्रास होऊ लागला आणि मनात निर्माण झालेली विचारांची घुसमट असह्य होऊ लागली. म्हणूनच प्रभू श्रीरामांनी घुसमट बाहेर व्यक्त करण्यासाठी “मिशन अयोध्या” चित्रपटाची योजना केली असावी असं मला वाटतं. माझ्या निर्मात्यांनी या मिशनला सिनेमाच्या रूपात सत्यात उतरवण्यासाठी मला जी संधी दिली त्याबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत.
“मिशन अयोध्या” हा एक चित्रपट नसून एक आव्हानात्मक प्रवास आहे, जो प्रत्येक राम भक्ताला, देशवासीयांना आपल्या सोबत पुढे नेणारा आहे. हे “मिशन” प्रभू श्रीरामाच्या हृदयाशी प्रत्येकाला जोडणारा आहे तोडणारे नव्हे
अजित पवार व्यासपीठावर असताना सुप्रिया सुळे अन् पंकजा मुंडेंची गळाभेट
राजकारणात वैचारिक मतभेद आणि आरोप-प्रत्यारोप हे जरी सामान्य असले, तरी वैयक्तिक नातेसंबंध वेगळ्या स्तरावर टिकवून ठेवणे हे काही नेत्यांसाठी महत्वाचे असते. सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांचे उदाहरण हेच दाखवते की राजकीय मतभेद असूनही व्यक्तिशः सौहार्दपूर्ण संबंध राखता येतात. पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे यांनी अजितदादा व्यासपीठावर असताना एकमेकींना मिठी मारली.
बारामतीतील या प्रसंगातून असे स्पष्ट होते की राजकीय व्यासपीठावरील संघर्ष हा फक्त त्यांच्या भूमिकांचा भाग आहे आणि तो वैयक्तिक जीवनात प्रतिबिंबित होत नाही. अशा घटना केवळ राजकारणातील मानवतावादी बाजू दाखवत नाहीत तर समाजातही एक सकारात्मक संदेश देतात की मतभेद असले तरी परस्पर आदर कायम ठेवावा.
यासारख्या घटना नेहमीच चर्चेचा विषय ठरतात आणि लोकांना राजकारणाच्या पलीकडील नातेसंबंधांची झलक दाखवतात.
छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, आमदार पंकजा मुंडे, क्रीडा-युवक-कल्याण-अल्पसंख्याक विका व औफाक मंत्री दत्तात्रय भरणे, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे उपस्थित होते.
बारामतीतील या प्रसंगाने राजकीय वर्तुळात आणि माध्यमांमध्ये चांगलीच चर्चा रंगवली. सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्यातील दिलखुलास भेट, हस्तांदोलन आणि मिठी या गोष्टींनी राजकीय मैत्रीचा एक वेगळा अध्याय उलगडला. विशेष म्हणजे, याच व्यासपीठावर अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांची उपस्थिती होती, ज्यामुळे या प्रसंगाला आणखी रंगत आली.
सुनेत्रा पवार यांनी पंकजा मुंडे यांना हास्याने प्रतिसाद दिला, परंतु सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात संवाद न झाल्यामुळे विविध तर्क-वितर्क मांडले गेले. मात्र, पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे यांच्या या उघडपणे दिलखुलास भेटीमुळे राजकारणातील वैयक्तिक सौहार्दाची एक झलक समोर आली.
हा प्रसंग केवळ राजकीय मतभेदांच्या पलीकडे जाऊन मानवी नातेसंबंधांचे महत्त्व अधोरेखित करतो, हे नक्की. यामुळे कार्यक्रमस्थळी आणि माध्यमांमध्ये विविध चर्चांना उधाण आले, आणि हा प्रसंग अनेकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
पुण्यातून पहिली कुंभमेळा विशेष गाडी रवाना
Newsworldmarathi Pune : कुंभमेळ्यासाठी पुण्यातून पहिली विशेष रेल्वे गाडी उत्तर प्रदेशातील प्रयागराजसाठी रवाना करण्यात आली. यावेळी ढोल ताशांच्या गजरात, प्रवाशांचे स्वागत करण्यात आले. आयआरसीटीसी मार्फत भारत गौरवची विशेष रेल्वे पुण्याहून कुंभमेळ्यासाठी बुधवारी (दि.15) सोडण्यात आली. हिरवा झेंडा दाखवल्यानंतर सायंकाळी सात वाजून 50 मिनिटांनी कुंभमेळा विशेष रेल्वे गाडी प्रयागराजच्या दिशेने रवाना झाली.
ज्येष्ठ प्रवाशांच्या हस्ते फीत कापून या गाडीचे उद्घाटन करण्यात आले. केंद्र शासनाच्या ‘देखो अपना देश’ या योजनेअंतर्गत भारतगौरव ही विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. ही गाडी पुणे, वाराणसी, प्रयागराज, आयोध्या, पुणे अशी धावणार आहे. यावेळी रेल्वेच्या पुणे विभागाचे झोनल मॅनेजर गुरूराज सोन्ना व अन्य उपस्थित होते.
रेल्वे गाडीत विशेष सुविधा : पुण्यातून कुंभमेळ्यासाठी विशेष गाडीचे नियोजन केले आहे. या गाडीमध्ये प्रवाशांना सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत. गाडीमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक, सीसीटिव्ही, जेवणाची व्यवस्था असणार आहे. तसेच, कुंभमेळ्याच्या ठिकाणी राहण्यासाठी टेंटसिटीची व्यवस्था करण्यात आली आहे. येथेही प्रवाशांना सर्व सुविधा उपलब्ध असणार आहेत. प्रथमोपचार सुविधा देखील असणार आहे.
बारामतीच्या विकासाने पंकजा मुंडे भारवल्या
Newsworldmarathi Mumbai : बारामतीत विविध विकासकामांच्या उद्घाटनांच्या निमित्ताने आलेल्या राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी बारामतीच्या विकासाची पाहणी केली. बारामती शहरासह मतदारसंघात झालेल्या सर्वांगीण विकासाने त्या अक्षरशः भारावून गेल्या. बारामतीच्या प्रत्येक विकासकामाकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारकाईने लक्ष असते. दादांच्या व्यक्तिमत्त्वातील काटेकोरपणा, शिस्तबद्धता, वक्तशीरपणा, नियोजनबद्धता, झपाटून काम करण्याची पद्धत यांसह खूप काही गोष्टी अजितदादांकडून शिकण्यासारख्या असल्याचे सांगत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे तोंडभरून कौतुक केले. बारामतीच्या धर्तीवरच आपल्या स्वतःच्या मतदारसंघासह मराठवाड्याचा विकास करण्याचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला.
राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. या निमित्ताने त्यांनी बारामती शहरासह बारामती तालुक्यातील विविध विकासकामांना भेट देऊन त्यांची सविस्तर माहिती घेतली. बारामतीच्या विकासाबद्दल भरभरून बोलताना त्या म्हणाल्या, “एका वेगळ्या विकासाच्या दृष्टीतून बारामती आणि बारामतीचा विकास बघण्याचा आज योग आला. बारामती मतदारसंघात झालेली विविध विकासकामे, त्यांचा दर्जा हा अत्यंत सुंदर आहे. बारामती मतदारसंघातील प्रत्येक कामावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारकाईने लक्ष असते. त्यांचा दिवस सकाळी सहा वाजता सुरू होतो. प्रत्येक काम नियोजनबद्ध पद्धतीने करण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळेच त्याचे प्रतिबिंब बारामतीतील प्रत्येक विकासकामांमध्ये दिसत आहे.
काटेकोरपणा, वक्तशीरपणा यांसह उपमुख्यमंत्री अजित दादांच्या अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. बारामतीच्या विकासाशी अजितदादांचे वेगळे नाते निर्माण झाले आहे, त्यांच्या प्रदीर्घ अनुभवासह अनेक वर्षे सत्तेत असल्याचा फायदा बारामतीच्या विकासात निश्चित झालेला आहे. बारामतीत झालेल्या विकासकामांच्या धर्तीवरच माझ्या मतदारसंघासह मराठवाड्याचा विकास करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन,” असा निर्धार यावेळी व्यक्त करत मंत्री पंकजा मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह बारामतीच्या विकासाचे विशेष कौतुक केले.
आमदारांनो साधे राहा, प्रतिमा जपा : नरेंद्र मोदी
Newsworldmarathi Mumbai : सामान्य जनता बोलत नाही, पण तिचे तुमच्या कारभारावर बारीक लक्ष असते, तेव्हा चांगली प्रतिमा जपा, बडेजाव नको; साधे राहा. बदल्यांच्या फायली घेऊन फिरत बसू नका. महायुतीचा धर्म पाळून पुढे जा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी महायुतीचे सर्व आमदार आणि मंत्र्यांच्या बैठकीत दिला.
आयएनएस सभागृहात झालेल्या दोन तासांच्या संवादात मोदी यांनी विकासविषयक काही आमदार, मंत्र्यांची मते जाणून घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी उपस्थित होते. फडणवीस यांनी प्रास्ताविकात महायुतीचे मोठे यश आणि सरकारची भविष्यातील वाटचाल यावर मत व्यक्त केले.
मोदी यांनी त्यांच्या भाषणात तिन्ही पक्षांच्या मंत्री, आमदारांशी भावनिक संवाद साधताना काही कठोर मतेही व्यक्त केली. पैसा नाही तर चांगली प्रतिमा महत्त्वाची आहे.
बदल्यांच्या फायली घेऊन फिरू नका, या शब्दात त्यांनी सगळ्यांचे कान टोचले. मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना बदल्यांच्या अनेक फायली यायच्या, मी ते बंद केले होते, असेही ते म्हणाले.
महायुतीच्या तीन पक्षांमधील समन्वय खाली गावांपर्यंत गेला पाहिजे. तिन्ही पक्षांच्या नेते, कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या कार्यक्रम, सभांना जायला हवे. डबे पार्टी करा, असा सल्लाही मोदी यांनी
फडणवीसांचा ‘देवाभाऊ’ असा उल्लेख
मुख्यमंत्री फडणवीस यांचा उल्लेख ‘देवाभाऊ’ असा करत त्यांच्या नेतृत्वात चांगले सरकार सक्षमपणे चालेल, असा विश्वासही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.
निःस्पृहपणे जनसेवा कशी करायची हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून शिकायला हवे. संघकार्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे, अशी भावनाही मोदी यांनी बोलून दाखविली.
देश मी पंतप्रधान होण्याआधी पाहून झालेला होता. मला या गोष्टीचा खूपच फायदा झाला. तुम्हीही फिरले पाहिजे, खेड्यात मुक्कामी राहिले पाहिजे, संवाद वाढविला पाहिजे, अशा अपेक्षा मोदी यांनी यावेळी व्यक्त केल्या.
देवयानी पवार करणार वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे नेतृत्व
Newsworldmarathi Pune : बारामतीतील देवयानी पवार वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस येथे होणाऱ्या वार्षिक बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. २० ते २४ जानेवारी दरम्यान स्वित्झर्लंड येथील दावोस येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीसाठी तरुण उद्योजक व ग्लोबल शेपर्स कम्युनिटीच्या बारामती हबच्या सदस्या देवयानी पवार यांची निवड करण्यात आली आहे.
ग्लोबल शेपर्स कम्यूनिटीच्या जगभरातील ५० प्रतिनिधींच्या शिष्टमंडळासाठी निवडलेल्या २ भारतीयांमध्ये देवयानी पवार यांचा समावेश आहे. ग्लोबल शेपर्स कम्युनिटी हा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा एक उपक्रम असून या अंतर्गत जगभरातील युवक हे आपापल्या भागातील स्थानिक, प्रादेशिक यांबरोबरच जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी एकत्रितपणे काम करतात
या निवडीबाबत बोलताना देवयानी पवार म्हणाल्या, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसारख्या प्रतिष्ठित व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची मिळालेली संधी ही मी माझा सन्मान समजते. दावोसच्या या भेटीमध्ये मला जागतिक नेत्यांसोबतच सकारात्मक काम करीत समाजात बदल घडविणाऱ्या अनेकांना भेटण्याची आणि त्यांसोबत नेटवर्किंग करण्याची संधी मिळेल. याबरोबरच या परिषदे दरम्यान वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक असलेले क्लॉस श्वाब यांसोबत होणाऱ्या एका विशेष सत्रासाठी देखील मी उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.
या व्यासपीठाचा उपयोग स्थानिक पातळीवर भारतासाठी आणि माझ्या सहकारी हब्ससाठी नव्या कल्पना आणि प्रगतीशील उपक्रम राबवण्यासाठी मी करणार असल्याचे देवयानी पवार यांनी सांगितले.
दरवर्षी जानेवारी महिन्यात दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक आयोजित करण्यात येत असते. जागतिक व्यवसाय, विविध देशांतील सरकारे, मीडिया आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधींचे गट सध्याच्या काळातील गंभीर समस्या सोडवण्यासाठी आणि त्यावरील उपायांवर चर्चा करण्यासाठी या ठिकाणी एकत्र येतात. कोलॅबोरेशन फॉर दी इंटेलिजन्स एज ही या वर्षीच्या वार्षिक सभेची संकल्पना आहे.
मोठी बातमी! सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला
Newsworldmarathi Mumbai : अभिनेता सैफ अली खान यांच्या मुंबईतील बांद्रा येथील निवासस्थानी रात्री २ वाजता एक अज्ञात व्यक्ती घुसला आणि त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सैफ यांच्या गळ्यावर १० सेंटीमीटरचा जखम झाला असून, त्यांच्या हात आणि पाठीवरही जखमा आहेत.
सैफ यांना तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्या जखमांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णालयातील डॉक्टरांच्या माहितीनुसार, सैफ यांच्या शरीरावर ६ वार झाले असून, त्यापैकी दोन गंभीर आहेत, ज्यापैकी एक त्यांच्या मणक्याजवळ आहे.
या घटनेच्या तपासासाठी मुंबई पोलिसांनी सात पथकांची स्थापना केली आहे. सुरुवातीच्या तपासानुसार, हल्लेखोराने सैफ यांच्या घरातील हाऊस हेल्पच्या खोलीतून प्रवेश केला आणि नंतर मुलांच्या खोलीत गेला. हाऊस हेल्पने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे झालेल्या गोंधळात सैफ यांनी हस्तक्षेप केला आणि त्यांच्यावर हल्ला झाला.
सैफ यांच्या पत्नी करीना कपूर यांनी माध्यमांना दिलेल्या निवेदनात सांगितले की, “घरात चोरीचा प्रयत्न झाला. सैफ यांच्या हाताला जखम झाली असून, त्यांच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली आहे. कुटुंबातील इतर सदस्य सुरक्षित आहेत. आम्ही माध्यमे आणि चाहत्यांना विनंती करतो की, कृपया संयम बाळगा आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, कारण पोलिस योग्य तपास करत आहेत.
धुक्यात हरवली वाट
Newsworldmarathi Pune : पुणे शहरात सध्या कधी कडाक्याची थंडी कधी ऊन तर कधी पावसाचा खेळ सुरु आहे. पण आज सकाळी पहाटेच्या वेळी शहरात अनेक ठिकाणी कात्रज, सातारा रोड, बिबवेवाडी स्वारगेट या परिसरात दाट धुक्यानी महामार्गावरील व अंतर्गत रस्त्यावरील वाटा हरवून गेले होते. गडद धुक्यामुळे सर्व वातावरण धूसर बनले होते. ‘वाट एक जुनी, हरवली दाट धुक्यात लपलेले दवबिंदू कुठे चमकतात पानात’, या कवितेसारखे आल्हाददायक चित्र सर्वत्र पाहायला मिळाले. या धुक्यामुळे सकाळी नऊपर्यंत सूर्यदर्शन देखील झाले नव्हते. सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांनी गडद धुक्याची अनुभूती घेतली.
‘मॉर्निंग वॉक’ला दाट धुक्याची अनुभूती
‘सकाळ’च्यावेळी मॉर्निंग वॉकला जात असलेल्या नागरिकांना शनिवारी पडलेल्या दाट धुक्यामुळे निसर्गातील सौंदर्य पाहायला मिळाले. अचानक पडलेल्या या धुक्याने मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्यांना सुखद अनुभव घेता आला. दाट धुके पडल्याने त्याचा आनंद घेतला. गेल्या आठ दिवसांपासून वातावरणात बदल होऊन रात्री कडाक्याची थंडी पडत असून सकाळच्यावेळी धुक्याची झालर पाहायला मिळत आहे.शिवाय अचानक पाऊस देखील हजेरी लावत आहे. काळी शाळेला जाणारी मुले बोचऱ्या थंडीने कुडकुडत होती. पुणे-मुंबई महामार्गावरदेखील प्रचंड धुके पसरले होते. पहाटे साडेपाचपासून जाणवणाऱ्या धुक्यात वाढ होत असल्याचेही अनेकांनी सांगितले.
पहाटे धुक्याची चादर
पुणे शहरात आज पहाटे धुक्याची चादर पसरली होती. पहाटे पाचपासून धुके दाटले ते सकाळी साडे आठपर्यंत कायम होते. दाट धुक्यामुळे पुढील व्यक्ती दिसणेही अवघड झाले. त्यामुळे १५ ते २० फुटावरील दृश्य पाहण्यास देखील अडचण निर्माण झालेली होती. सकाळी पडलेल्या धुक्याचे क्षण अनेकांनी आपल्या घराच्या खिडकी, गॅलरी, गच्चीवरून मोबाइलमध्ये टिपले
सातारा रोड, बिबवेवाडी परिसरात पावसाच्या सरी
Newsworldmarathi Pune : सातारा रोड आणि बिबवेवाडी परिसरात अचानक पाऊस सुरू झाल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. अशा अचानक येणाऱ्या पावसामुळे वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागली. हिवाळ्याच्या दिवसात पाऊस आल्याने नागरिकांनाची भांबेरी उडाली. पुण्यातील सातारा रोड बिबवेवाडी परिसरात पावसाच्या सरी बरसल्या. यामुळे वाहतूक कोंडीसारख्या समस्यांनाही नागरिकांना सामोरे जावे लागले.
धनंजय मुंडेच सरपंच संतोष देशमुखचे खरे खुनी; आरोपामुळे राज्यात खळबळ
Newsworldmartahi Mumbai : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेने महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. या अत्यंत क्रूर हत्येमुळे गावकऱ्यांमध्ये आणि देशमुख कुटुंबीयांमध्ये दु:ख आणि संताप आहे. या प्रकरणी तपास करताना आरोपी वाल्मिक कराडवर मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मकोका दाखल केल्याने या प्रकरणाचा तपास अधिक तीव्रतेने होईल आणि गुन्हेगारांना कडक शिक्षेसाठी मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा आहे. देशमुख कुटुंब आणि मस्साजोग गाव न्यायाच्या प्रतीक्षेत असून प्रशासनावर या प्रकरणी कारवाई करण्यासाठी प्रचंड दबाव आहे.
वाल्मिक कराडवर मकोकाचा गुन्हा दाखल झाल्याने परळीमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. दोन दिवस कडकडीत बंद केलाय. सर्वत्र वातावरण पेटलेलं असताना मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांनी खळबळजनक आरोप केला आहे.
वाल्मिक कराड सुटायला नको, बीडची केस अंडर ट्रायल चालवण्यात यावी. बीड मधील हत्या धनंजय मुंडे यांनी करायला लावली असा आम्हाला संशय आहे. खंडणीतून झालेल्या खून मध्ये धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा आम्हाला संशय आहे.
दरम्यान, खंडणीतले आरोपी, खुनातील आरोपी यांनी कोणाला फोन केले, कोणाला भेटले हे सगळे चार्जशीट मध्ये यायला पाहिजे असे देखील जरांगे पाटील म्हणालेत. ना जातीचं देणे घेणे नाही, फक्त पैसे पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी खंडणी आणि खुनातील सगळ्या आरोपींवर मकोका आणि ३०२ कलम लावला असे म्हणत हे पाप धनंजय मुंडेंचं आहे, पाप झाकण्यासाठी धनंजय मुंडे ओबीसींना मध्ये घेतोय असा हल्लबोल जरांगे यांनी मुंडे यांच्यावर बीड प्रकरणावरून केला आहे.
युवा उद्योजक पुनीत बालन यांचा रसिकाग्रणी पुरस्काराने सन्मान
Newsworldmarathi Pune : पुण्यातील युवा उद्योजक पुनीत बालन यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल स्वर झंकार महोत्सवात रसिकाग्रणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पं. अतुलकुमार उपाध्ये, पं. विजय घाटे आणि पद्मश्री हरिहरन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
देशात सर्वाधिक शहरांमध्ये स्वर झंकार संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते. पुण्यात या महोत्सवाचे सोळावे वर्ष आहे. संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांनी या महोत्सवात वादन केले आहे. याच मोहत्सवात पुनीत बालन यांच्या विविध क्षेत्रातील अतुलनीय अशा सामाजिक कार्याची दखल घेऊन उपाध्ये व्हायोलिन वादन विद्यालयाच्यावतीने स्व. दाजी काका गाडगीळ यांच्या स्मरणार्थ रसिकाग्रणी हा मानाचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याप्रसंगी जावेद अली, राहुल देशपांडे, राजस उपाध्ये आणि तेजस उपाध्ये यांचीही उपस्थित होती.
बालन यांनी त्यांच्या मातोश्री इंद्राणी बालन फाऊंडेशनच्या माध्यमातून काश्मीर खोऱ्यात भारतीय सैन्य दलाच्या बंद पडलेल्या १५ शाळांचे नूतनीकरण करून त्या पुन्हा सुरू करून त्या चालविण्यासाठी लष्कराबरोबर सामंजस्य करार केला आहे. याशिवाय दिव्यांग विद्यार्थ्यांची शाळा ते चालवतात. अतिरेकी हल्यात बळी गेलेल्या मुलांना खेळापासून विविध प्रकारची मदतही बालन यांच्या फाऊंडेशनच्या माध्यमातून आणि वैयक्तिकरित्याही केली जाते. याशिवाय उदयोन्मुख खेळाडूंना विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी लागणारी सर्वोतोपरी मदतही ‘पुनीत बालन ग्रुप’च्या माध्यमातून ते करतात. काश्मीरमध्ये सर्वांत उंचीचा तिरंगा ध्वज उभारण्याचे काम त्यांनी केले. याशिवाय गरजु रुग्णांना मदत, वेगवेगळ्या मोहत्सवाबरोबरच धार्मिक कार्यातही बालन यांच्याकडून नेहमीच मोलाचे मदत कार्य केले जाते.
हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’चे उत्सवप्रमुख आणि विश्वस्त म्हणून काम करत असताना कोविड महामारीच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सवाला मदतीचा हात देण्याचे मोठे काम बालन यांनी केले. त्यांच्या याच वेगवेगळ्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना स्वर झंकार मोहत्सवात सन्मानित करण्यात आले.
‘‘स्वर झंकार संगीत महोत्सवात ‘रसिकाग्रणी’ पुरस्काराने सन्मान झाल्याने मनस्वी आनंद झाला. मी करत असलेल्या समाज कार्यासाठी या पुरस्काराने भविष्यात अधिक चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी निश्चितपणे प्रोत्साहन मिळाले असून या पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल मी आयोजकांचा मनापासून आभारी आहे.’’
– पुनीत बालन, युवा उद्योजक
पुणे विद्यापीठ चौकातील वाहतुकीत बदल
Newsworldmarathi Pune : गणेशखिंड रस्त्यावरील आचार्य आनंदऋषीजी चौक (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) येथे मेट्रोच्या दुमजली उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू असल्याने वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. हे बदल १५ जानेवारी २०२५ पासून लागू होणार असून, पुढील आदेश येईपर्यंत ते कायम राहतील.
वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे यांनी यासंबंधी आदेश जारी केले आहेत. या बदलामुळे वाहनचालकांना होणाऱ्या गैरसोयी टाळण्यासाठी खालील पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले आहे:
गणेशखिंड रस्ता टाळून वाहनचालकांनी पाषाण रस्ता, बावधन मार्ग, किंवा अन्य पर्यायी रस्त्यांचा उपयोग करावा. विद्यापीठ चौकाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी एकतर्फी वाहतूक मार्ग तयार केला जाईल.रस्त्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून वाहतुकीवरील ताण कमी करावा. बांधकाम काळात वाहतूक सुरळीत ठेवणे आणि कोंडी टाळणे यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे सर्व वाहनचालकांसाठी आवश्यक आहे.
वाहतूकीत पुढील प्रमाणे असतील बदल
बाणेरकडून शिवाजीनगर कडे जाणारी वाहतूक –
बाणेरकडून येणारी वाहतूक औंध रस्त्यावर वळविण्यात येणार आहे. राजभवन समोरून (पंक्चर) वाहनांनी वळून पुन्हा गणेशखिंड रस्त्यावर यावे. तेथून इच्छितस्थळी जावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त झेंडे यांनी केले आहे.
शिवाजीनगरकडून औंधकडे जाणारी वाहतूक –
शिवाजीनगरकडून औंधकडे जाणारी वाहने विद्यापीठ चौकातून सरळ औंध रस्त्याने इच्छितस्थळी जातील.
औंधकडून शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक –
औंधकडून शिवाजीनगरकडे जाणारी वाहने चतु:शृंगी पोलीस ठाण्याजवळील विद्यापीठाच्या मिलिनयम गेटमधून वळविण्यात येणार आहे. तेथून बाहेर पडणारी वाहने विद्यापीठाच्या आवारातून इच्छितस्थळी जातील.
नागरीकांनी वरील मार्गाचा वापर करावा तसेच वाहतुक कर्मचारी तथा स्वयंसेवक यांना सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
अजितदादा घेणार मोठा निर्णय? धनंजय मुंडेच्या अडचणीत वाढ
अजित पवार यांनी केलेलं “चुकीची माणसं बाजूला करावी लागतात” हे विधान सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेचा विषय बनलं आहे. विशेषतः, धनंजय मुंडे यांच्या संदर्भातील ही वक्तव्यं असल्याचं मानलं जातंय.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप आणि त्यांचं राजकीय भविष्य यावरून अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. काहींनी असा अंदाज वर्तवला आहे की, लवकरच धनंजय मुंडे यांचा राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे सुपूर्द होऊ शकतो. यामुळे अजित पवार गटाच्या अंतर्गत हालचालींवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
हे वक्तव्य पवारांच्या नेतृत्वाखालील गटातील शिस्त आणि जबाबदारी कायम ठेवण्याचा इशारा असू शकतो. मात्र, या वक्तव्यामुळे राजकीय संघर्ष उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढील काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी निर्णायक ठरतील.
संतोष देशमुख हत्याप्रकरणात मुख्य आरोपी वाल्मिक कराडला महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलमान्वये (मकोका) गुन्हा दाखल केल्यानंतर आणि त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांसह काही सत्ताधारी नेतेही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोरदारपणे करत आहेत.
अशा परिस्थितीत, अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर स्पष्ट भूमिका घेतली, ज्यामुळे मुंडेंना मोठा धक्का बसल्याचं दिसतंय. अजित पवार यांनी यापूर्वी मुंडेंची पाठराखण केली होती, परंतु आता त्यांच्या “चुकीची माणसं बाजूला करावी लागतात” या वक्तव्यामुळे संकेत मिळतात की, पवार गटाने याप्रकरणी आपली भूमिका कठोर केली आहे.
या घटनाक्रमामुळे मुंडेंच्या मंत्रीपदाचे भवितव्य धोक्यात आले असून, सत्ताधारी गटात अंतर्गत दबाव आणि अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे. पुढील निर्णयांवर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे.
नेमक अजितदादा काय म्हणाले?
वाल्मिक कराडवर मकोका दाखल करण्यात आल्यानंतर माध्यमांनी अजित पवारांना घेरले. यावेळी त्यांनी पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्यावर प्रश्न उपस्थित केला. त्यावर बोलताना अजित पवारांनी स्पष्ट भुमिका मांडली. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार…कुणाकडे काही पुरावे असतील त्यांनी आम्हाला द्यावे, त्यांच्यावर आम्ही कारवाई करु, मी पण शेतकरी आहे. शेतकरी म्हणूनच बोलतोय. चुकीची माणसं असतील तर बाजूला करावे लागते. आम्ही चौकशी कर…कोणालाही पाठीशी घालणार नाही, अस पवारांनी यावेळी स्पष्ट केलं.
बीड जिल्ह्याची लेक करणार भारताचं नेतृत्व
Newsworldmarathi Beed : आपल्या बीड जिल्ह्यातील मौजे कळंबअंबा, ता-केज येथील सुकन्या कु. प्रियंका हनुमंत इंगळे हिची खो – खो वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय खो-खो संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील एका कन्येने देशाचे नेतृत्व करण्याचा मान मिळवणं ही गोष्ट खूपच अभिमानास्पद आहे………..!!
बीडच्या केज तालुक्यातील कळमअंबा येथील मूळ रहिवासी असलेल्या प्रियंका हनुमंत इंगळे या युवतीची “खो-खो ” च्या भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड झालीय. आज 13 पासून सुरू होणाऱ्या खो-खो वल्डकप स्पर्धेत प्रियंका ही भारतीय संघाच्या कर्णधार पदाची धुरा सांभाळणार आहे.
आंतरराष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय खो-खो संघाच्या कर्णधारपदी प्रियंका इंगळेची निवड करण्यात आली आहे. तिच्या निवडीबद्दल तालुक्यातील सर्वच क्षेत्रातून तिचे अभिनंदन केले जात आहे.
तालुक्यातील कळंबआंबा येथील हनुमंत इंगळे हे मागील काही वर्षांपासून रोजगाराच्या निमित्ताने भोसरी (जि. पुणे) येथे स्थायिक झाले. वडील हनुमंत इंगळे व आई सविता इंगळे या दाम्पत्याला प्रियंका व प्रणय अशी दोन मुले आहेत. शालेय शिक्षण घेत असताना प्रियंकाला खेळाची आवड निर्माण झाली. त्यामुळे तिची खेळातील आवड विचारात घेऊन त्यांनी तिला राजमाता जिजाऊ क्रीडा मंडळाच्या माध्यमातून प्रशिक्षक अविनाश करवंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खो-खो प्रशिक्षण दिले. तिने निवडलेल्या क्षेत्रात मेहनत व सराव करून खो-खो सारख्या क्रीडा प्रकारात नैपुण्य संपादन केले. त्यामुळे तिला सात वेळा खो-खो च्या राष्ट्रीय संघात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. या मिळालेल्या संधीचे सोने करत तिने भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात आपले योगदान दिले. तिच्या या उत्कृष्ट कामगीरीची दखल घेऊन तिला यापूर्वी क्रीडा क्षेत्रातील राणी लक्ष्मीबाई व राजमाता अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. 12 ते 19 जानेवारी 2025 याकालावधीत नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टडियमवर होणार्या खो-खोच्या विश्वकपसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये मुलीच्या संधाची कर्णधार म्हणून प्रियंका हनुमंत इंगळे हिची निवड झाली आहे. सध्या दिल्लीत खो-खो च्या वर्ल्डकपची जोरदार तयारी सुरू आहे. भारतीय खो -खो संघाचे अध्यक्ष सुधांगु मित्तल यांच्या नेतृत्वाखाली गेल्या एक महिन्यापासून खेळाडू सराव करत आहेत.
खो-खो स्पर्धेत जगभरातील चोवीस देशांचे खो-खो संघ सहभागी होत आहेत. कर्णधारपद प्रियंका इंगळे हिला मिळाले आहे. तिच्या या संघात आश्विनी शिंदे, रेश्मा राठोड, भिलार देवजीभाई, निरमला भाटी, निता देवी, चैत्रा आर, सुभाश्री सिंग, मगाई माजी, अंशु कुमारी, वैष्णवी बजरंग, मसरीन शेख, मिनू, मोनिका व नाझिया या खेळाडूंचा भारतीय खो-खो संघात समावेश आहे. प्रशिक्षकपदी प्राची वाईकर यांची निवड झाली आहे. सव्वीस वर्षीय प्रियंका इंगळेने आतापर्यत खो-खोच्या 17 राष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या आहेत. सध्या प्रियंका खेळाडूंच्या कोट्यातून पुणे येथे क्रीडा अधिकारी पदावर नुकतीच सेवेत रूजू झाली आहे.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक राबवा : निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम
Newsworldmarathi Pune : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या बर्न्ट मेमरी, मायक्रो कंट्रोलरच्या तपासणी आणि पडताळणी प्रक्रियेच्या अनुषंगाने यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी अर्थात यशदा येथे एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेवरील नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत व्हावा यासाठी ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवा, असे निर्देश श्री. चोक्कलिंगम यांनी यावेळी दिले.
यावेळी राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी, भारत निवडणूक आयोगाचे अवर सचिव कनिष्क कुमार, पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. जितेंद्र डूडी यांच्यासह राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे (बीईएल) अभियंता उपस्थित होते.
श्री. चोक्कलिंगम यावेळी म्हणाले, लोकसभा निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल होती. त्याबाबत न्यायालयाने सुनावण्या घेऊन, पक्षकारांचे म्हणणे ऐकून ईव्हीएम पूर्णतः विश्वसनीय असल्याचा निकाल दिला. याबरोबरच लोकांच्या ईव्हीएममधील मायक्रोकंट्रोलर चीपबाबत ज्या तक्रारी, शंका आहेत त्या देखील दूर व्हाव्यात यासाठी यंत्रणा निर्माण करावी, असे न्यायालयाने भारत निवडणूक आयोगाला निर्देशित केले. त्यादृष्टीने आयोगाने बीईएलच्या साहाय्याने ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या बर्न्ट मेमरी, मायक्रो कंट्रोलरच्या तपासणी आणि पडताळणीसाठी तांत्रिक प्रमाणित कार्यपद्धती तयार केली आहे.
ते पुढे म्हणाले, निवडणुकीनंतर या चीपमध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप करून निकालात बदल (मॅनीप्युलेशन) करण्यात आलेले नाही या बाबत नागरिकांची खात्री करणे यादृष्टीने या कार्यपद्धतीला महत्त्व आहे. लोकांचा निवडणूक प्रक्रियेवर विश्वास राहावा यासाठी ही कार्यपद्धती राबवायची आहे. त्यामुळे ही तपासणी व पडताळणी प्रक्रिया व्यवस्थितरित्या राबविण्याची मोठी जबाबदारी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांवर आहे. ही नवीन पद्धती असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी समजून घ्यावी यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे श्री. चोक्कलिंगम म्हणाले.
किरण कुलकर्णी म्हणाले, राजकीय पक्ष आणि उमेदवारांमधील संभ्रम दूर व्हावा या उद्देशाने या कार्यपद्धतीबाबत संक्षिप्त माहिती देणे ही जिल्हा निवडणूक अधिकारी यांची जबाबदारी आहे. त्यादृष्टीने पक्ष आणि उमेदवारांसोबत बैठक आयोजित करण्यात यावी, असेही ते म्हणाले.
यावेळी बीईएलच्या अभियंत्यांनी या तांत्रिक कार्यपद्धतीबाबत सादरीकरण केले तसेच ईव्हीएमच्या बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅटच्या पडताळणीचे प्रात्यक्षिक करून दाखवले. जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी मांडलेल्या विविध शंकांचे निरसनही यावेळी करण्यात आले.
शासनाच्या क्रिडा खात्यात ६९० कोटींचा घोटाळा
Newsworldmarathi Pune : महाराष्ट्राच्या क्रिडा खात्याने व्यायामशाळा साहित्य यासाठी १५० कोटी रुपये तर क्रिडा साहित्यासाठी ८० कोटी रुपयांचे टेंडर मागवले आहे. हे टेंडर २०२४-२५ या वर्षांसाठी ऑक्टोबर २०२४ मध्ये मागवण्यात आले आहे. या दोन्ही टेंडर्ससाठी काही विशिष्ट कंपन्या डोळ्यासमोर ठेऊन अटी घालण्यात आल्या आहेत असे दिसते. हा सुमारे २३० कोटींचा क्रिडा आणि व्यायाम क्षेत्रासाठी केलेला भ्रष्टाचार आहे असे सकृत दर्शनी दिसत आहे. ही दर करार निश्चिती तीन वर्षांची होणार असल्याने यात ६९० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करण्याच्या डाव आहे.
हे दर करार शासनाच्या शासनाच्या अन्य विभागातही अंमलात आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीने या विषयात लक्ष घालून हे टेंडर रद्द करावे आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्याच यासाठी पात्र ठरतील याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ता सुनील माने यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी या प्रकरणासाठी क्रिडा आयुक्तांसह संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणीही केली.
याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले, या निविदेमध्ये केंद्रीय दक्षता आयोगाचे नियमही पायदळी तुडवण्यात आले आहेत. या निवेदेतील अटींनुसार क्रिडा व व्यायामशाळा या क्षेत्रांशी सबंधित नसलेल्या कंपन्यांना पात्र ठरवण्यासाठी अटी घालण्यात आल्या आहेत. या क्षेत्रातील तसेच या कामाचा अनुभव असणाऱ्या कंपन्यांना स्पर्धेबाहेर काढण्यासाठी ही घातक खेळी खेळली जात आहे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात किमान १० हजार लोक अशा क्षेत्रात काम करतात, सरकारच्या अशा धोरणांमुळे हे कर्मचारी बेरोजगार होतील आणि या कंपन्या महाराष्ट्र सोडून जातील असे या क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे.
क्रिडा व व्यायाम साहित्यांव्यतिरिक्त कुठल्याही किटचा पुरवठा केलेली कोणतीही कंपनी या निविदेत पात्र ठरणार आहे. सिंगल ऑर्डर मध्ये ५०० ठिकाणी अशा किटचा पुरवठा देण्याचा देण्याचा अनुभव असावा अशी अट यामध्ये घालण्यात आली आहे. असे कोणते कीट हे स्पष्ट नाही. अशाप्रकारे एकाच वर्क ऑर्डरमध्ये ५०० ठिकाणी क्रिडा आणि व्यायाम साहित्य पुरवलेली कोणतीही कंपनी अस्तित्वात आहे का? क्रिडा विभागाने आत्तापर्यंत कधीही १६ कोटींपेक्षा मोठे टेंडर काढले नाही. या टेंडर मधील ५२ कोटींची सिंगल ऑर्डर मिळालेली कंपनी पात्र ठरेल अशी अट आहे. ही कोणासाठी घालण्यात आली आहे ? १५० कोटींच्या टेंडर साठी ४० टक्के रकमेचे म्हणजे ६० कोटींचे काम केलेली कंपनी पात्र ठरेल अशी अट आहे. याचा अर्थ या क्षेत्राशी संबंध नसलेली कंपनी किंवा कंपन्या पात्र करण्याचा हा सरकारचा डाव आहे काय ? संबंधित कामासाठी कंपन्यांचे पॉझिटिव्ह नेटवर्थ १० कोटी रुपयांचे ठरवण्यात आले आहे. कोरोनाच्या दोन वर्षात क्रिडा आणि व्यायाम क्षेत्रातील कंपन्या जवळपास बंद पडल्या होत्या. त्यांचे कोरोना काळातील नेट वर्थ पॉझिटिव्ह कसे असू शकेल याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे.
२०२२ -२३ मध्ये याबाबतच्या १५० कोटींच्या टेंडर मध्ये बयाना रक्कम (EMD) ५ लाख रुपये मागवण्यात आली होती. यावर्षी याच प्रकारच्या १५० कोटी रुपयांच्या टेंडर साठी १.५ कोटी बयाना रक्कम मागवण्यात आली आहे. याचा अर्थ छोट्या कंपन्यांनी यात भाग घेऊ नये असा आहे. याची चौकशी झाली पाहिजे. त्याचप्रमाणे २०२२-२३ मध्ये ३ वर्षात १० कोटींचे व्यायामशाळेच्या साहित्य पुरवठा व बसवण्याचा अनुभव ग्राह्य धरण्यात आला होता. यावेळेच्या निविदेमध्ये २०१९ -२० ते २०२३ -२४ या कालावधीत निविदा रकमेच्या म्हणजे १५० कोटी रकमेच्या ३५ टक्के रकमेपर्यंत काम केलेली कंपनी पात्र करण्याचा प्रयत्न आहे.
क्रिडा साहित्य पुरवण्याच्या निविदेतही आधीच्या निविदेत असलेले ४ लाख रुपयांची बयाना रक्कम या निविदेसाठी म्हणजे ८० कोटी साठी यंदा ८० लाख करण्यात आली आहे. या निविदेसाठीही कंपनीला ५० टक्केंची म्हणजे ४० कोटींची उलाढालीची अट पात्र करावी लागणार आहे.
याचाच अर्थ सरकारला या क्षेत्रातील संबंधित अनुभवी कंपन्यांची मुस्कटदाबी करायची आहे. सबंधित निविदेतील अटीनुसार महाराष्ट्रातील या क्षेत्रातील कुठल्याही कंपन्या पात्र ठरू शकणार नाहीत. ज्या कंपन्यांच्या दृष्टीने या अटी घालण्यात आल्या आहेत त्यांचे क्रिडा व व्यायाम साहित्याचे उत्पादन युनिट आहे काय ? याची चौकशी झाली पाहिजे. क्रिडा खात्याच्या या भ्रष्ट कारभारामुळे राज्यातील क्रिडा व व्यायामाच्या साहित्याची खरेदी प्रक्रिया खोळंबली असून या क्षेत्राला त्याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर तातडीने कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे.
या निविदेनुसार ३ वर्ष किंवा अधिक काळ दरनिश्चिती होणार असल्याने क्रिडा खात्यासह अन्य विभागातही ही निकोप स्पर्धा बंद होऊन एकाधिकारशाही निर्माण होणार आहे. त्यामुळे हे टेंडर तातडीने रद्द करून त्याऐवजी नवीन सुधारीत टेंडर आणावे लागेल. १५० कोटींच्या टेंडरमध्ये तांत्रिक पात्रतेत वार्षिक उलाढालीच्या अटीमध्ये तफावत आहे. याबाबत अधिकारी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांची नावे गोवत आहेत. मुख्यमंत्र्यांनी याबाबत ही खुलासा केला पाहिजे अशी मागणी माने यांनी यावेळी केली.
मस्साजोगमध्ये आज आंदोलन; देशमुख यांच्या भावाचा आत्महत्येचा इशारा
Newsworldmarathi Pune : संतोष देशमुख प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांसह गावकऱ्यांनी लढा उभारला आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी गावकऱ्यांची आणि कुटुंबियांची मागणी आहे.
आज संपूर्ण गावकऱ्यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाद्वारे संबंधित प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, जेणेकरून आरोपींवर त्वरीत व कठोर कारवाई केली जाईल.
हा लढा पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वाचा ठरणार असून, या प्रकरणावर प्रशासन काय निर्णय घेते हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना होऊनही आरोपींवर कठोर कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप वाढत आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी वाल्मीक कराडवर मोक्का (MCOCA) लावण्यात यावा, अशी ठाम मागणी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख व गावकऱ्यांनी केली आहे.
ग्रामस्थ व कुटुंबीयांनी वारंवार न्यायाची मागणी केली असतानाही ठोस कारवाई झाली नाही, त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यांनी थेट मोबाइल टॉवरवर चढून आत्महत्येचा इशारा दिला आहे.
ही परिस्थिती अधिक गंभीर होऊ नये यासाठी प्रशासनाने त्वरीत हस्तक्षेप करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. या मागण्या मान्य न झाल्यास ग्रामस्थांचा रोष आणखी वाढू शकतो आणि परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी महिना झाला असूनही आरोपींवर ठोस कारवाई न झाल्याने गावकऱ्यांमध्ये संताप उफाळला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड पुण्यात सीआयडी अधिकाऱ्यांसमोर शरण आला होता, तर आणखी तीन आरोपींना बीड पोलिसांनी अटक केली होती. प्रकरणाचा तपास सध्या सीआयडी आणि एसआयटी मार्फत सुरू आहे.
संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी मुख्य आरोपी वाल्मीक कराडवर मोक्का लावण्याची मागणी केली आहे. मात्र, अद्याप मोक्कासारखा कठोर कायदा लागू करण्यात न आल्याने गावकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
ग्रामस्थ व देशमुख कुटुंबियांनी प्रशासनावर दबाव आणण्यासाठी आज मोबाइल टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनामुळे परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने यावर त्वरित तोडगा काढून आरोपींवर कठोर कारवाई करणे अत्यावश्यक झाले आहे.
पुणे ते जोधपूर रेल्वे दररोज सुरू करा : मगराज राठी
Newsworldmarathi Pune : पुणे ते जोधपूर रेल्वेसेवा नियमित करण्याची मागणी राजस्थानी समाज संघाकडून करण्यात आली आहे. या मागणीचे पत्र केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना संघाचे अध्यक्ष मगराज राठी यांनी दिले आहे. मागणीबाबत सकारात्मक विचार करू, असे आश्वासन वैष्णव यांनी दिले असल्याचे राठी यांनी सांगितले.
शहरात मुख्यतः जोधपूर, बाडमेर, पाली, सिरोही, जालोर या जिल्ह्यांमधील नागरिकांचे पुण्यात मोठ्या प्रमाणावर वास्तव्य असून सद्यःस्थितीत पुणे ते जोधपूर आठवड्याला एकच रेल्वेसेवा आहे. ती पुरेशी नसून ही रेल्वेसेवा दररोज सुरू करावी, तसेच चिंचवड रेल्वे स्थानकावरही या रेल्वेचा थांबा सुरू करावा, असे निवेदनात नमूद केले आहे.
पुणे ते जोधपूर दररोजची रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी राजस्थानी समाजाकडून महत्वाची मानली जात आहे. पुण्यात राहणाऱ्या राजस्थानी समाजाचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य लक्षात घेता, त्यांची त्यांच्या मूळ जिल्ह्यांशी नियमितपणे जोडणी होणे आवश्यक आहे.
सध्या पुणे ते जोधपूर फक्त आठवड्यातून एकदाच रेल्वे चालते, जी समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अपुरी ठरत आहे. त्यामुळे ही रेल्वेसेवा दररोज सुरू करावी, तसेच चिंचवड स्थानकावर थांबा मिळावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या मागणीवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. ही सेवा नियमित झाल्यास प्रवाशांसाठी मोठा फायदा होईल आणि महाराष्ट्र-राजस्थान या दोन राज्यांतील संपर्क अधिक सुलभ होईल.
सार्वजनिक प्रकल्पांवर चोरांचा डल्ला; पुण्यात मेट्रो खांबांची चोरी
पुण्यात चोऱ्या आणि गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यामध्ये एक धक्कादायक घटना म्हणजे शिवाजीनगर परिसरातील मेट्रोचे खांब चोरल्याचा प्रकार. चोरट्यांनी दोन लाख रुपये किमतीचे खांब चोरल्याचे उघडकीस आले आहे.
या प्रकरणी पुणे पोलिसांनी जलद कारवाई करत सहा जणांना अटक केली आहे. या गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, या चोरट्यांनी मेट्रोच्या बांधकामासाठी उभारण्यात आलेले खांब चोरून नेले होते.
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात चोऱ्या, हत्यांच्या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. या घटनेमुळे शहरातील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन मोठ्या गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
या घटनेनंतर शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पुण्यातील सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी अधिक सतर्क राहून पावले उचलण्याची गरज आहे, असे नागरिकांकडून सुचवले जात आहे.
पुण्यातील शिवाजीनगर भागात झालेल्या **मेट्रोच्या खांब चोरीच्या प्रकाराने** मोठी खळबळ उडवली आहे. कामगार पुतळा परिसरातून दोन लाख रुपये किमतीचे लोखंडी खांब चोरीला गेल्याचे उघडकीस आले. या घटनेमुळे मेट्रो प्रकल्पाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलिसांनी जलद कारवाई करत सहा चोरट्यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे गणेश मच्छिंद्र कांबळे,अनिकेत महेंद्र कांबळे, तौसिफराज फैजअहमद शेख,शमशुद्दीन युसुफअली शेख मन्सुरी,वसीम अयुब पठाण, मुस्तफा मुस्तकीम शेख आहेत.
या प्रकरणाचा तपास सुरू असून, चोरी कशी आणि कोणत्या हेतूने झाली याचा शोध घेतला जात आहे. प्राथमिक तपासात हे स्पष्ट झाले आहे की, आरोपींनी संगनमत करून मेट्रोच्या बांधकामासाठी असलेले खांब चोरले.
या घटनेने पुण्यात सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षेवर आणि गुन्हेगारी रोखण्यासाठीच्या यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. पोलिसांनी सुरक्षेत अधिक दक्षता बाळगण्याची आणि अशा घटनांना प्रतिबंध करण्यासाठी कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गिकेचे काम सध्या सुरू आहे. शिवाजीनगर न्यायालय परिसरातील कामगार पुतळा परिसरात मेट्रोचे साहित्य ठेवण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी कांबळे, शेख, मन्सुरी, पठाण यांनी कामगार पुतळा परिसरात लोखंडी खांब चोरून नेले होते. लोखंडी खांब विकून त्यातून पैसे कमावण्याचा हेतू असल्यानं त्यांनी हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पोलिसांनी सहा आरोपींना बेड्या ठोकल्या असून तपास सुरू आहे.
तीन-चार महिन्यात महापालिका निवडणुका; देवेंद्र फडणवीसांचे संकेत
Newsworldmarathi Pune : शिर्डी येथे झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) महाराष्ट्र अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले. या अधिवेशनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही उपस्थिती होती, ज्यामुळे या कार्यक्रमाला अधिक महत्त्व प्राप्त झाले.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात महापालिका निवडणुकीवर जोर देत राज्यातील सर्व महापालिका जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी विरोधकांवर टीका करताना सांगितले की, विरोधकांकडे कोणतेही ठोस नेतृत्व किंवा धोरण नाही आणि त्यांची भूमिका केवळ टीका करण्यापुरती मर्यादित आहे.
फडणवीस यांनी भाजपच्या भविष्यातील योजनांचा उल्लेख करत सांगितले की, राज्यात विकासाचे नवे पर्व उभारण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या सहकार्याने महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे. याशिवाय, त्यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीसाठी जोरदार तयारी करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला राज्यभरातून भाजप नेते, पक्ष कार्यकर्ते आणि समर्थक जमले होते. राज्यात पक्षाचे अस्तित्व बळकट करणे, तळागाळातील कार्यकर्त्यांशी संपर्क साधणे आणि आगामी निवडणुकीसाठी महत्त्वाच्या राजकीय चर्चेत गुंतणे हा या अधिवेशनाचा उद्देश होता. देवेंद्र फडणवीस यांचा सहभाग हा पक्षासाठी महत्त्वाचा क्षण होता.
शिर्डी येथील भाजप अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वोट जिहाद भाग २ या संदर्भात गंभीर आरोप करत राज्यातील बांगलादेशी घुसखोरांबाबत चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, नाशिकच्या अमरावती आणि मालेगावसारख्या तालुक्यांमध्ये अशा सुमारे १०० प्रकरणांची नोंद झाली आहे, जिथे ५० वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक बेकायदेशीररित्या जन्म प्रमाणपत्रे आणि इतर कागदपत्रे मिळवत आहेत.
फडणवीस यांनी या प्रकरणाकडे लक्ष वेधत असेही स्पष्ट केले की, अशा घुसखोरांना महाराष्ट्रात राहू दिले जाणार नाही आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. त्यांनी सांगितले की, ही बाब फक्त एका जिल्ह्यापुरती मर्यादित नाही तर राज्याच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका आहे.
मुख्यमंत्र्यांनी याबाबत प्रशासनाला कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी सांगितले की, अशा प्रकारांच्या विरोधात राज्य सरकार शून्य सहनशीलतेची भूमिका घेत आहे, आणि बेकायदेशीर घुसखोरीला थारा दिला जाणार नाही.
हे विधान फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधण्यासाठीही वापरले, असे सांगून की, अशा गंभीर प्रकरणांकडे दुर्लक्ष करून काही राजकीय नेते फक्त आरोप-प्रत्यारोप करण्यात व्यस्त आहेत.
शिर्डी येथील भाजप अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर भाष्य केले. त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना “एकजूट आणि तयारी” या दोन गोष्टींवर भर देण्याचे आवाहन केले.
ते म्हणाले, “‘एक हैं ते सुरक्षित हैं’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मंत्र आपल्या मार्गदर्शनासाठी आहे.” यावर आधारित, त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आणि आगामी आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयारी करण्याचे सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मुंबई, ठाणे, नागपूर यांसारख्या महत्त्वाच्या नागरी संस्थांच्या निवडणुका 2022 च्या सुरुवातीपासून प्रलंबित आहेत. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातील न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून, येत्या तीन ते चार महिन्यांत या निवडणुका पार पडतील, असे त्यांनी जाहीर केले.
फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना असेही सांगितले की, विधानसभा निवडणुकीतील यशावर विसंबून राहण्याऐवजी, नव्या आव्हानांना तोंड देण्यासाठी मेहनत घेणे आवश्यक आहे. स्थानिक पातळीवरील सशक्त संघटना आणि जनतेशी संपर्क वाढवणे, ही आगामी निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी महत्त्वाची रणनीती असेल.
त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना तळागाळातील जनतेशी नाळ जोडून पक्षाचे बळ वाढवण्याचे आवाहन केले आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आगामी विजयासाठी जोरदार तयारी करण्यास सांगितले.