समाजसेवेच्या संकल्पातून वाढदिवस साजरा; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त व्यंकोजी खोपडे यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिर

0
Newsworldmarathi Pune: “वाढदिवस हा केवळ आनंदाचा क्षण न राहता, समाजासाठी काहीतरी देण्याचा संकल्पदिवस ठरावा,” असे मत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले. पुण्यात रक्ताचा तुटवडा भासत असताना, वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरासारखे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. माजी सरपंच व्यंकोजी खोपडे यांच्या पुढाकाराने, गोरक्षस्मृती फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी प्रभाग क्र. ३८ यांच्या वतीने कात्रज चौक भाजी मंडई येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिक, कार्यकर्ते आणि स्थानिक जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीची जाणीव दाखवली. या प्रसंगी बोलताना व्यंकोजी खोपडे म्हणाले, मुरलीधर मोहोळ यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर विश्वास दाखवून जनतेच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही परिसराच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. रक्तदान शिबिर हा या बांधिलकीचा एक छोटासा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला आमदार भीमराव तापकीर, अरुण राजवाडे, संदीप बेलदरे, राणी भोसले, डॉ. सुचेता भालेराव, अभिजित कदम, महेश कदम,विकास फाटे, दिगंबर डवरी, संतोष ताठे, गणेश निंबाळकर, आबासाहेब मांगडे, सुनील मांगडे, गणेश काळे, विक्रम भिलारे, निलेश धनावडे, महेश धूत आदी मान्यवर उपस्थित होते. रक्तदानानंतर सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. या वेळी मुरलीधर मोहोळ म्हणाले, “रक्तदान ही सर्वश्रेष्ठ मानवसेवा आहे. एका थेंब रक्ताने एखाद्याचे प्राण वाचू शकतात. व्यंकोजी खोपडे यांनी वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा हा उपक्रम राबवून एक आदर्श घालून दिला आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले. या सामाजिक उपक्रमामुळे कात्रज परिसरात “वाढदिवस म्हणजे समाजसेवेचा उत्सव” हा संदेश पोहोचला असून नागरिकांत सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे.

मंत्रिपद नसल्याने तानाजी सावंत वैफल्यग्रस्त : राष्ट्रवादीच्या रोहन सुरवसे पाटलांची टीका

0
Newsworldmarathi Pune: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. धाराशिव येथे शिवसेनेच्या कार्यक्रमात बोलताना, “राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही, पाण्यातून मासा बाहेर काढल्यावर जसा तडफडतो तशी राष्ट्रवादीची अस्वस्था आहे” अशी टीका आमदार तानाजी सावंत यांनी केली. यावरून महायुतीत नवा वाद रंगला आहे. आमदार तानाजी सावंत मंत्रिपद नसल्याने वैफल्यग्रस्त झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला युतीधर्माबद्दल उपदेशाचे डोस पाजण्यापेक्षा एक डोस स्वतः प्यावा म्हणजे युती धर्मात मिठाचा खडा पडणार नाही. असा टीकात्मक खोचक सल्ला राष्ट्रवादीचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी सावंतांना दिला आहे. रोहन सुरवसे-पाटील म्हणाले, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आपलं मंत्रिपद का काढून घेतलं? याच आत्मचिंतन सावंत यांनी करावं. महायुतीत एकत्र असताना महायुतीचे संस्कार पाळायचे नाही, मित्रपक्षावर पातळी सोडून टीका करत रहायची अशा कारणामुळेच त्यांना मंत्रिपद नाही. हे त्यांना अजून समजत नसेल तर मग अवघड आहे. महायुतीत असतानाही मित्रपक्षावर टीका केल्याने कार्यकर्त्यांमध्ये देखील तणावाचे वातावरण तयार होत आहे. तानाजी सावंत यांनी इथून पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत बोलताना भान ठेवून आणि जबाबदारीने बोलावे अन्यथा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शांत बसणार नाहीत. जशास तसं प्रत्युत्तर देताना संकोच बाळगला जाणार नाही असा इशाराही सुरवसे-पाटील यांनी दिला.

श्री सद्गुरू जंगली महाराज देवस्थान येथे भव्य दीपोत्सव सोहळा

0
Newsworldmarathi Pune: श्री सद्गुरू जंगली महाराज देवस्थान येथे श्री सद्गुरू जंगली महाराज भजनी मंडळाच्या वतीने भव्य दीपोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या दीपोत्सवाला यंदा विशेष महत्त्व होते, कारण मंडळाच्या स्थापनेला यंदा ८० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने मंदिराच्या परिसरात तब्बल १,००० दिव्यांची सजावट करण्यात आली होती. उजळलेल्या दिव्यांच्या प्रकाशात मंदिर परिसर उजळून निघाला आणि भक्तांनी जयघोषात वातावरण भारावून टाकले. भक्तगणांनी सामूहिक आरती, भजन आणि कीर्तनाद्वारे दिवाळी साजरी केली. मंदिराच्या प्रांगणात सुमारे पाच फूट आकारात श्री सद्गुरू माणिक प्रभू यांचे आकर्षक चित्र दिव्यांच्या सहाय्याने साकारण्यात आले होते. या चित्राने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दीपोत्सवाचे आयोजन अत्यंत भक्तिभावाने आणि पारंपरिक पद्धतीने पार पडले. कार्यक्रमानंतर प्रसादाचे वितरण करण्यात आले. भजनी मंडळाचे कार्यकर्ते आणि स्थानिक भक्तांच्या सहकार्याने हा दिव्य सोहळा यशस्वीपणे संपन्न झाला.

भाजपची निवडणूक तयारी वेगात; जिल्हा प्रभारी मुरलीधर मोहोळ तर पुणे महापालिका निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांची निवड

0
Newsworldmarathi Pune : भारतीय जनता पक्षाने आगामी महापालिका निवडणुकीसाठी पुण्याचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची निवडणूक प्रभारी (जिल्हा प्रमुख)  म्हणून तर  माजी सभागृह नेते गणेश बीडकर यांच्यावर पुणे महापालिका निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवली आहे. मोहोळ यांनी पूर्वी स्थायी समिती अध्यक्ष, महापौर म्हणून कार्यभार सांभाळला आहे तर बीडकर यांनी यापूर्वी नगरसेवक, गटनेता, स्थायी समिती अध्यक्ष तसेच सभागृह नेते म्हणून विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.  भाजपचे प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्रजी चव्हाण यांनी बुधवारी याबाबतची घोषणा केली. त्यानुसार जिल्हा निवडणूक प्रभारी केंद्रीय राज्यमंत्री मा. मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वात बीडकर यांच्याकडे पुणे शहराच्या निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.  ‘केंद्रात मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएचे तर राज्यात मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार सत्तेवर आहे. विकासाभिमुख धोरणांची आखणी आणि त्याची वेगवान अंमलबजावणी हे केंद्र आणि राज्य सरकारचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदार नक्कीच भारतीय जनता पक्ष आणि महायुतीवर विश्वास दाखवतील. पुणे महानगरपालिका, पुणे जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप, महायुतीच सत्तेवर येईल,असे मोहोळ म्हणाले. पक्षनेतृत्वाने ही संधी दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असेही मोहोळ यांनी नमूद केले. राज्यात भाजप व महायुतीला अनुकूल वातावरण आहे. पुणे महापालिकेत २०१७-२२ या काळात भारतीय जनता पक्षाचीच सत्ता होती. या पाच वर्षात पुणे शहराच्या भाजपने मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. यंदाही पुणेकर भाजप व महायुतीच्याच पाठीशी राहतील, याची मला खात्री आहे. शहर निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती केल्याबद्दल मी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मा. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्रजी चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा आभारी आहे. २०१७ च्या निवडणुकीतही निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी माझ्याकडे होती. त्या वेळेप्रमाणेच यंदाही भाजप, महायुती सत्तेवर येईल,’असा विश्वास बीडकर यांनी व्यक्त केला.

जुन्नर व शिरूरमधील बिबट्यांचे तातडीने स्थलांतर करणार : वनमंत्री गणेश नाईक वन्य प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी महत्वाचे निर्णय

0
Newsworldmarathi Mumbai: पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, राजगुरूनगर व शिरुर परिसरातील बिबट्यांमुळे मनुष्यहानी होणे ही दुर्देवी घटना आहे. यावर दीर्घ व तातडीच्या उपाययोजना करण्यात येतील. या परिसरातील बिबट्यांना पकडण्यासाठी 200 पिंजरे तातडीने लावण्यात येतील. आणखी एक हजार पिंजरे युद्धपातळीवर खरेदी करण्यात येणार आहेत. या परिसरातील बिबट्यांना पकडून त्यांचे तातडीने स्थलांतर करण्यात येईल. तसेच बिबट्यांची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी सॅटेलाईट आधारित कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ‘अर्लट’ देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांनी दिली. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, राजगुरूनगर व शिरुर परिसरातील बिबट्यांच्या मानवावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज वनमंत्री श्री. नाईक यांनी मंत्रालयात बैठक घेऊन तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. यावेळी माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, प्रवक्ते वसंतराव जाधव, जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके, जनता दलाचे प्रदेश अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांच्यासह विविध लोकप्रतिनीधी तसेच वनविभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल) एम. श्रीनिवास राव, मुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, पुण्याचे वनसंरक्षक आशिष ठाकरे आदी उपस्थित होते. पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व जिल्हा पोलीस प्रमुख संदीप सिंग गिल हे दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. वनमंत्री नाईक म्हणाले की, जुन्नर, आंबेगाव, राजगुरूनगर व शिरुर परिसरात बिबट्यांची संख्या वाढली आहे. त्यांना प्रतिबंध घालण्यासाठी व हल्ल्याच्या घटना घडू नयेत, यासाठी दीर्घ व अल्पकालीन उपाययोजना तातडीने राबविण्यात येतील. युद्धपातळीवर या परिसरात वन विभागांच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात येईल. केंद्र शासनाच्या परवानगीने या परिसरातील बिबट्यांना पकडून त्यांचे स्थलांतर वनतारा, इतर राज्यात किंवा ज्यांना अधिकार आहे अशा ठिकाणी ज्या ठिकाणी सोय उपलब्ध आहे, तेथे पाठविण्यात येतील. वनाशेजारील शेतीला व गोठ्यांना विद्युत तारांचे कुंपण लावणे, एआयच्या माध्यमातून बिबट्यांची हालचालीची माहिती नागरिकांना कळविणे, शेतीला दिवसा पूर्ण ताकदीने वीज पुरवठा करणे आदी उपाययोजना करण्याच्या सूचना आज देण्यात आल्या आहेत. तसेच या परिसरातील बिबट्यांना पकडण्यासाठी जिल्हा नियोजन निधीतून तातडीने 200 पिंजरे खरेदी करण्यात येतील. त्याशिवाय वन विभागाच्या निधीतून आणखी 1 हजार पिंजरे तातडीने खरेदीसाठी 10 कोटींचा निधी देण्याचे निर्देश देण्यात आले असून आहेत. वन विभागाला लागणारी वाहने, पिंजरे व इतर साहित्य तातडीने पुरविण्याचे व त्यासाठी लागणारा निधी देण्याचे निर्देश श्री. नाईक यांनी यावेळी दिले. नागरिकांच्या जिवीताचा प्रश्न असल्याने यासाठी कुठल्याही प्रकारे निधीची कमतरता पडू न देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या परिसरातील बिबट्यांची वाढती संख्या रोखण्यासाठी नसबंदीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावास लवकरात लवकर मान्यता मिळण्यासाठी सर्वपक्षीय नेते व वन अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ केंद्रीय वन मंत्री यांच्या भेटीसाठी घेऊन जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. गेल्या काही दिवसात या परिसरात बिबट्यांच्या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्देवी घटना आहे. कालच्या घटनेनंतर वन विभागाने तातडीने बिबट्याला जेरबंद करण्यात आले आहे. या बिबट्याचे तातडीने स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लवकरच या घटनास्थळी भेट देऊन लोकप्रतिनीधींबरोबर चर्चा करण्यात येईल, अशी माहितीही श्री. नाईक यांनी यावेळी दिली.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचं बिगुल वाजणार? 31 जानेवारीपूर्वी मतदान? आज 4 वाजता आयोगाची पत्रकार परिषद

0
Newsworldmarathi Pune: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग आज दुपारी चार वाजता एका महत्त्वाच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करणार आहे. ही पत्रकार परिषद राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांशी संबंधित असणार आहे. या परिषदेत निवडणुका कधीपर्यंत जाहीर केल्या जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी निवडणुकांमध्ये पहिल्या टप्प्यात राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. यासोबतच ३२ जिल्हा परिषदा आणि २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रमही या पत्रकार परिषदेत जाहीर केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२५ पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत आयोगाकडून निवडणूक कार्यक्र माचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले जाण्याची अपेक्षा आहे. ही घोषणा महाराष्ट्राच्या राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे

पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन झालेल्या जमिनींसाठी शेतकऱ्यांना प्रति एकर एक कोटी मोबदला मिळणार

0
Newsworldmarathi Pune: पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन झालेल्या जमिनींसाठी शेतकऱ्यांना प्रती एकरी एक कोटी रुपये भरपाई तसेच घर, गोटा, विहीर, बोरवेल, पाईपलाईन, फळझाडे, वनझाडे इत्यादी घटकांसाठी त्याच्या मूल्याच्या दुप्पट रक्कम नुकसानभरपाई दिली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. भूसंपादन झालेल्या सात गावांतील शेतकरी प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, “शासनाने दिनांक १७ मार्च २०२५ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, उचित भरपाई, पारदर्शकता आणि शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण या दृष्टीने २०१३ च्या भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत अधिनियमाच्या तरतुदींनुसार तसेच शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून शासकीय नियमांनुसार मोबदला मिळावा यासाठी प्रयत्न केले जातील,” असे त्यांनी स्पष्ट केले. ही बैठक एखतपूर, खानवडी, कुंभारवळण, मुंजवडी, पारगाव, उदाचीवाडी व वनपुरी या सात गावांतील शेतकऱ्यांसमवेत घेण्यात आली. बैठकीत शेतकरी प्रतिनिधींनी विविध मागण्या मांडल्या. चारपट ऐवजी पाचपट दर मिळावा अशी मागणी केली. जिल्हा नियोजन निधीतून गावांना अधिक निधी देण्याची मागणी केली. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पुन्हा गावागावात बैठक घेण्याची सूचना केली. बाजारभावानुसार एक कोटींचा दर अपुरा असल्याचे नमूद करून अधिक भरपाईची मागणी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या भूसंपादन प्रकरणातील निर्णयाचा संदर्भ देत उच्चतम बाजारमूल्यानुसार मोबदला द्यावा, तसेच विकसित प्लॉट मालकीहक्काने देण्यात यावेत अशी मागणी केली. प्रती एकरी ज्यादा मोबदला आणि ज्यादा विकसित भूखंड मिळावा अशी मागणी केली. या सर्व मागण्यांवर जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, “नियमांच्या चौकटीत राहून शेतकऱ्यांना अधिकाधिक न्याय मिळावा यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. संमतीने भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना मिळणारे शासननिर्धारित लाभ 1️⃣ संपादित जमिनीच्या क्षेत्राच्या 10% एवढा विकसीत भूखंड औद्योगिक/वाणिज्यिक/निवासी अथवा संमिश्र प्रयोजनाकरिता त्याच क्षेत्रात वाटप करण्यात येईल. (किमान 100 चौ.मी. भूखंडाची हमी) 2️⃣ प्रकल्पग्रस्त कुटुंबाचे घर संपादन झाले असल्यास, एरोसिटी (Aero City) मध्ये 250 चौ.मी. निवासी भूखंड मोबदला दराने दिला जाईल. 3️⃣ भूमिहीन होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना 750 दिवसांच्या किमान कृषी मजुरी इतकी रोख रक्कम त्रैमासिक हप्त्यांमध्ये दिली जाईल. 4️⃣ अल्पभूधारक ठरणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना 500 दिवसांच्या कृषी मजुरीएवढी रक्कम मिळेल. 5️⃣ घर संपादन झालेल्या कुटुंबांना 40,000 रुपयांचे स्थलांतर अनुदान दिले जाईल. 6️⃣ जनावरांच्या गोठा/शेड स्थलांतरासाठी प्रती गोठा 20,000 रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाईल. 7️⃣ प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील एका सदस्यास औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये एक अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येईल व पात्रतेनुसार नोकरीत प्राधान्य दिले जाईल.

विचार करण्याची शक्ती गमावली तर विनाश अटळ : दीपक घैसास यांचे मत

Newsworldmarathi Pune: “विचार करण्याची शक्ती हेच माणसाचे बलस्थान आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेच्या (एआय) काळात पुढची पिढी विचार करण्याची शक्तीच ‘आउटसोर्स’ करेल, अशी भीती आहे. विचार करण्याची क्षमता गमावली तर माणसाचे अस्तित्वच राहणार नाही. त्यामुळे ही शक्ती गमावू नये‘, असे मत ज्येष्ठ उद्योजक आणि अर्थतज्ज्ञ दीपक घैसास यांनी शनिवारी व्यक्त केले. ‘मायमिरर पब्लिशिंग हाऊस’च्या वतीने मनोज अंबिके लिखित ‘कर्णपुत्र आणि जन्मरहस्य’ या पुस्तकाचे प्रकाशन दीपक घैसास यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. मन:शक्ती केंद्राचे प्रमोद शिंदे, लेखक मनोज अंबिके, लक्ष्मीकांत ढापरे, प्रसाद ढापरे आणि विद्या अंबिके, या वेळी उपस्थित होत्या. घैसास म्हणाले, ‘कादंबरीच्या माध्यमातून कथा सांगणे हा एक भाग झाला. पण, या लेखनात तत्त्वज्ञान आहे. सूड भावनेने केलेल्या कर्मातून विनाश अटळ आहे. जगावरचे अटळ संकट दूर करण्याचा उद्देश असेल तर केलेले कर्म हे सत्कर्म ठरते, हे तत्त्वज्ञान अंबिके यांनी सांगितले आहे. बीजात अहंकार असतो त्यावेळी ते द्वैत रूपात असते. पण जेव्हा मातीत मिसळून माती मुल होते तेव्हा ते द्वैताकडून अद्वैताकडे जाते आणि त्याचा वृक्ष होतो. कादंबरीतील नायक सुवेधदेखील द्वैताकडून अद्वैताकडे प्रवास करत आहे. कादंबरीत प्रत्येक प्रकरणात अगदी चिमटी चिमटीने लेखकाने तत्त्वज्ञान मांडले आहे. आजच्या राजकारणात इंद्राची झलक पाहायला मिळते कारण त्यांच्यात सतत भीती असते. आपली सत्ता कोणी काबीज करेल हे भय त्यांच्या मनात असते. धाराशिवमधील मुलांना पाहतो तेव्हा त्यांच्यात शंकराचे प्रतीक मला जाणवते. कारण त्यांच्याकडे काहीही नसते तरी ते शांत आणि आनंदी असतात. नारायण मात्र त्याच्याकडे सर्वकाही असूनही शांत आणि आनंदी आहे ही त्याची प्रवृत्ती आहे. त्याच नारायणाचं तत्त्वज्ञान लेखकाने मांडलं आहे. कोहम प्रश्न विचारल्यानंतर सोहम उत्तर मिळते तेव्हा आत्मज्ञान प्राप्त होतं. कादंबरीतील सुवेधही सतत कोहम प्रश्न विचारतो त्यामुळेच त्याला आत्मज्ञान होतं. व्यक्तीच्या मनात कायम द्वंद्व सुरू असते. त्याला सतत खऱ्या खोट्यातून चांगल्या वाईट यातून निवड करावी लागते. क्रोध, मत्सर बाजूला सारून जेव्हा निर्णय घेतला जातो तेव्हा तो योग्यच ठरतो, असेही विचार त्यांनी मांडले. शिंदे म्हणाले, ‘कादंबरीच्या शेवटामध्ये नव्या पुस्तकाच्या लेखनाचा आरंभ आहे. प्रारब्ध, संघर्ष आणि साहस ही लेखनाची त्रिसूत्री आहे. मानवी स्वरुपातील वैशिष्ट्य प्रत्येक पात्रामध्ये अधोरेखित होत असून, त्यामुळे वाचक रममाण होतात. कर्ण आणि त्याचे पुत्र युद्धात मारले गेले तर हा कर्णपुत्र कोण असा प्रश्न उपस्थित होतो. महाभारतामध्ये उल्लेख नसलेल्या कर्णपुत्राची माहिती या कादंबरीतून मिळते. प्रारब्ध काहीही असले तरी आपण आपले कर्म आपल्या हातात आहे. लेखक एक तत्त्वचिंतक आहे. निर्णय घेताना आपला हेतू काय आहे त्यावर त्या निर्णयाचे यश अपयश अवलंबून असते असेही ते म्हणाले. प्रसाद ढापरे यांनी प्रास्ताविक केले. मनोज अंबिके यांनी मनोगत व्यक्त केले. विद्या अंबिके यांनी आभार मानले. श्रद्धा अंबिके यांनी सूत्रसंचालन केले.

पर्वती विधानसभा मतदारसंघातील १ लाख २० हजार ५२४ दुबार नावे वगळण्याची अश्विनी कदम यांची मागणी

0
Newsworldmarathi Pune: पर्वती विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांमध्ये तब्बल १ लाख २० हजार ५२४ दुबार नावे आढळल्याचा आरोप करत या नावांची तात्काळ वगळणी करण्याची मागणी पर्वती विधानसभा मतदारसंघातील अश्विनी नितीन कदम यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. या संदर्भात राज्य निवडणूक आयुक्तांना दिलेल्या पत्रात कदम यांनी नमूद केले आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार नावांबाबत आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. त्या आदेशाच्या अनुषंगाने पर्वती मतदारसंघात मोठ्या प्रमाणात डुप्लिकेट नावे असल्याचे निदर्शनास आले असून, त्यांची संपूर्ण यादी आयोगाला ईमेलद्वारे पाठवण्यात आली आहे. कदम यांनी पुढे नमूद केले आहे की, निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि न्याय सुनिश्चित करण्यासाठी या सर्व दुबार नावांची तपासणी करून त्यांची नावे तात्काळ वगळणी करण्यात यावी. याबाबत राज्य निवडणूक आयोगाने तातडीने निर्देश देऊन आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणामुळे पर्वती मतदारसंघातील मतदार याद्यांची विश्वसनीयता आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

यशराज टिळेकर यांची भाजप युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी निवड

0
Newsworldmarathi Pune: भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी यशराज टिळेकर यांना मिळाली असून त्यांच्या या नियुक्तीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. यशराज टिळेकर हे टिळेकर परिवारातील तिसऱ्या पिढीतील राजकीय कार्यकर्ते आहेत. त्यांच्या आजी श्रीमती रंजना (नानी) पुंडलिक टिळेकर या कोंढवा बुद्रुक परिसराच्या पहिल्या नगरसेविका होत्या. बालपणापासूनच त्यांनी टिळेकर परिवाराचा समाजसेवा व राजकीय प्रवास जवळून पाहिला आहे. संघ शाखेत नियमित सहभाग, संघ शिबिरात हजेरी, कॉलेजमध्ये हेड बॉय म्हणून जबाबदारी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत (ABVP) कार्यकर्ता म्हणून काम, कोंढवा नगर सहमंत्री आणि पुणे शहर एकलव्य संयोजक अशी विविध पदे त्यांनी समर्थपणे सांभाळली आहेत. गेल्या दोन वर्षांत विधानपरिषद सदस्य झाल्यानंतर त्यांनी भाजप संघटनेत सक्रिय काम सुरू केले आणि आता त्यांना युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली आहे.
ही केवळ पदाची नव्हे, तर मोठ्या जबाबदारीची सुरुवात आहे. मला खात्री आहे की यशराज हे पदाच्या न्यायाने काम करतील, यशराज याने लहानपणापासून हातात घेतलेला भारतीय जनता पक्षाचा झेंडा घेऊन समाजसेवा करण्याची प्रतिज्ञा कायम ठेवली आहे.
योगेश टिळेकर आमदार