कोथरूडसह पुण्यात कुठेही पाणी साचू नये याची दक्षता घ्या; आमदार चंद्रकांतदादा पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
Newsworldmarathi Pune: हवामान विभागाने यंदा ११७ टक्के पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे पूर्वीचे अनुभव पाहता; ज्या दिवशी अतिरिक्त पाऊस होईल, त्या दिवशी कोथरुडसह शहरात कुठेही पाणी साचणार नाही, ते प्रवाहित होईल; याची दक्षता घ्या, अशा सूचना नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्या. तसेच, पावसमुळे निर्माण होणाऱ्या समस्या जलदगतीने सोडविण्यासाठी कोथरुड मतदारसंघात एक नोडल अधिकारी नेमावा, अशी सूचना ना. पाटील यांनी यावेळी दिली.
कोथरुड मतदारसंघातील पावसाळापूर्व कामांचा आढावा ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी आज घेतला. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी., ओमप्रकाश दिवटे, दिनेश गोमारे, आपत्ती व्यवस्थापनचे उपायुक्त गणेश सोनुने, आशा राऊत, कर विभागाचे अविनाश संकपाळ यांच्या सह महापालिकेचे इतर अधिकारी, तीनही प्रभागातील विविध विभागांचे अधिकारी, भाजप कोथरूड मध्य मंडल अध्यक्ष निलेश कोंढाळकर, दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर यांच्या सह सर्व माजी नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी यांनी पुणे शहरासह कोथरूड मतदारसंघातील पावसाळी पूर्व कामांची माहिती ना. पाटील यांना दिली. यात प्रामुख्याने पाणी वाहून नेणाऱ्या शहरातील २०१ मुख्य नाले असून; त्यापैकी १५ नाले हे कोथरुड मतदारसंघात असल्याची माहिती दिली. ह्या नाल्यांची सफाई ८० टक्के पूर्ण झाली असून उर्वरित काम जलदगतीने पूर्ण केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यावर नामदार पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, पुणे शहरासह मतदारसंघातील नाले सफाईची कामे जलदगतीने पूर्ण करावीत, अशा सूचना दिल्या. तसेच,मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी १०० स्वयंसेवक नेमावी. त्यासोबतच, महापालिकेच्या माध्यमातून झालेल्या पावसाळा पूर्व कामांची पाहणी २४ तासांत अहवाल सादर करावा, अशा सूचना कोथरुड मधील सर्व माजी नगरसेवकांना केल्या.
यावेळी क्षेत्रीय कार्यालयांना कोणतेही अधिकार नसल्याने, दरवेळी अधिकाऱ्यांना कामांसाठी मुख्यालयात जावे लागते, त्यामुळे अनेक नागरी समस्या दीर्घकाळ रेंगाळतात, असा मुद्दा बैठकीत मांडला गेला. त्यावर नामदार पाटील यांनीही हा प्रश्न सुटला पाहिजे; अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावर अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. यांनी अधिकारांचे विकेंद्रीकरण करुन क्षेत्रीय कार्यालयांना निधी उपलब्ध करून देण्यास सकारात्मकता दर्शविली. तसेच, पावसाळ्यात अनेक भागात दुषित पाणी पुरवठ्याची समस्या मांडण्यात आली. ही गंभीर बाब असल्याने त्याचेही नियोजन करण्याची सूचना ना. पाटील यांनी यावेळी केली. दरम्यान, या बैठकीत वीजपुरवठा खंडित होणे, झाडांच्या फांद्या वेळेत काढणे यांसह इतर विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
Solapur Crime : मायेनं जवळ गेलेल्या चिमुकलीची बापाकडून हत्या; दफन केलेला मृतदेह बाहेर काढला, असं काय घडलं?
Newsworldmarathi solapur: बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. जन्मदात्या बापाने आपल्या पोटच्या मुलीचा गळा दाबून हत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, अटक करण्यात आली आहे. ओगसिद्ध रेवणसिद्ध कोठे असे नराधम बापाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रावणी ही आपल्या वडिलांसोबत दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर गावात राहत होती. आरोपी ओगसिद्धला एक मुलगा आणि तीन मुली आहेत. पत्नी सिव्हिल रुग्णालयात उपचार घेत होती. तर दोन मुली आणि मुलगा गावातील आजोळी राहण्यास गेले होते. घटनेच्या दिवशी मयत श्रावणी वडिलांजवळ मायेने झोपण्यासाठी गेली होती.
दरम्यान, नराधम बापाने आधी चिमुकलीचा गळा आवळून हत्या केली, नंतर घराशेजारी खड्डा खोदून तिचं प्रेत पुरलं. शुक्रवारी सकाळी आजोबा रेवणसिद्ध यांनी नात श्रावणी कुठंय. अशी चौकशी केली. तसेच गावात आणि आजोळी शोध घेतला, पण काही श्रावणी मिळाली नाही. त्यावेळी वस्तीवर जमलेल्या नातलगांच्या लक्षात आलं की, घराशेजारील खड्ड्यात नव्याने माती टाकलेली आहे आणि चिखलात पावलांचे ठसे उमटलेले दिसतात.
मात्र, नातलगांचा संशय वाढल्याने ओगसिद्ध याच्यावर दबाव टाकला. त्यावेळी त्याने “मीच गळा दाबून खून केला आणि तिला पुरलं” अशी थेट कबुली दिली आहे. या प्रकरणी मंद्रूप पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, आरोपीला ताब्यात घेतलं आहे. या निर्घृण हत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह ताब्यात घेतला असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.
भीमनगर वासियांचा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा
Newsworldmarathi Pune: एरंडवना येथील शिला विहार कॉलनी मधील भीम नगर वसाहतीच्या पुनर्वसनामध्ये बिल्डर कडून फसवणूक झाली आहे. या संदर्भयकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि न्याय मिळवण्यासाठी स्थानिक आमदार व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयावर शनिवारी भीम नगर वासियांचा बिऱ्हाड मोर्चा धडकला.
रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या बिऱ्हाड मोर्चात देविदास ओव्हाळ, जावेद शेख, हरी बागडे, सुनिल डमरे, दादू गायकवाड, सुदाम शिंदे, उमा साठे, स्नेहल गायकवाड, रेश्मा पल्ला, रईसा शेख, निशिकांत पोळ, प्रतीक डंबाळे, प्रभू सुनगर, सिकंदर मुलाणी यांच्यासह स्थानिक रहिवासी सहभागी झाले होते.
भीम नगर येथील 216 कुटुंबीयांचे पुनर्वसन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मार्फत करण्याचा बोगस प्रस्ताव भक्ती एंटरप्राइजेस मार्फत दाखल करण्यात आलेला आहे. या संदर्भामध्ये यापूर्वीच बिल्डरसह 20 जणांविरुद्ध कोथरूड पोलीस ठाणे येथे फसवणूक व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच योजनेच्या मंजुरीसाठी स्थानिक मूळ रहिवाशां ऐवजी बाहेरची बोगस लाभार्थी तयार करण्याचा गंभीर प्रकार बिल्डर कडून करण्यात आलेला आहे व त्याद्वारे स्थानिक नागरिकांना भीम नगर पासून सुमारे नऊ किलोमीटर अंतरावर सक्तीने पुनर्वसन करण्याचा घाट सध्या बिल्डरने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकारणामार्फत घातलेला आहे. हा अन्याय असल्याने याविरुद्ध भीम नगर झोपडपट्टी धारक मोठ्या प्रमाणात संघर्ष करत आहेत.
यावेळी बोलताना राहुल डंबाळे म्हणाले, झोपडपट्टी धारकांची एसआरए च्या नावाखाली होत असलेली लुगडणूक व फसवणूक याचे उत्तम उदाहरण म्हणून भीम नगर कडे पाहता येईल, अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी शहरातील सर्व झोपडपट्टी धारकांनी व त्यांच्या संस्था संघटनांनी एकत्रित लढा उभारावा. सक्तीचे पुनर्वसन रद्द करून आम्हाला आहे त्या ठिकाणी राहून द्यावे व त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करावे अशी विनवणी पाटील यांच्याकडे करण्यात आल्याचे डंबाळे यांनी सांगितले. चंद्रकांत पाटील नियोजित कार्यक्रमामुळे सांगली येथे असल्याने त्यांचे निवेदन पाटील यांचे स्वीय सहाय्यक राहुल देशपांडे यांना देण्यात आले.
महाराष्ट्रात चाललंय काय? पुण्यानंतर नाशिकमध्ये विवाहितेची आत्महत्या; सासरच्यांची मारहाण अन पैशांचा तगदा….
Newsworldmarathi Nashik : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजं असताना नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उच्चभ्रू वस्ती असलेल्या गंगापूर येथे एका विवाहित महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भक्ती अथर्व गुजराती (वय-३७) असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर रोड परिसरातील अथर्व गुजराती यांची पत्नी भक्ती यांनी घरातील जाचाला कंटाळून गळफास घेऊन आयुष्य संपवले आहे. भक्तीच्या कुटुंबियांनी या प्रकरणी पोलिस ठाण्यात धाव घेतली. सासरच्या होणाऱ्या जाचाला कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.
भक्ती अथर्व गुजराती यांचे वडील दिलीप प्रभाकर माडीवाले हे सराफी व्यवसाय करतात. आपल्या मुलीने आत्महत्या केली, असे समजताच त्यांनी नाशिक येथे येऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. मृत भक्ती अथर्व गुजराती यांना ५ वर्षाचा मुलगा आहे. भक्ती यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी तिच्या फरार पतीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे राज्यात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. हे प्रकरण सध्या ताजे असतानाच नाशिकमध्ये एका विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले आहे. मृत भक्ती यांना सासरच्यांनी मारहाण केली, का पैशांचा तगदा लावला. भक्तीने टोकाचे पाऊल का उचलले? याचा तपास पोलिस करीत आहेत.
निलेश चव्हाण अजून फरार; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह…
Newsworldmarathi Pune : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणात मोठा तपास उलगडत आहे. तिच्या आत्महत्येनंतर झालेल्या पोलिस तपासात सासू-सासरा, पती, नणंद आणि मोठा दीर यांना अटक करण्यात आली आहे. वैष्णवीच्या आई-वडिलांनी केलेल्या आरोपानुसार, हगवणे कुटुंबीयांकडून सतत छळ होत होता. विशेषतः जमीन खरेदीसाठी 2 कोटी रुपयांची मागणी करत तिला मानसिक त्रास दिला जात होता.
वैष्णवीने या छळाला कंटाळून आत्महत्या केली, असे तिच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. ही आत्महत्या नसून खून असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणात पोलिसांनी एकूण 12 साक्षीदारांची चौकशी केली असून, काही महत्त्वाचे पुरावे समोर आले आहेत.
अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचे बाळ कस्पटे कुटुंबाला मिळू नये, यासाठी हगवणे कुटुंबीयांनी बाळ लपवून ठेवल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे या प्रकरणात भावनिक गुंतागुंत वाढली असून, संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणातील एक आरोपी नीलेश चव्हाण अद्याप फरार असून, तो नेमका कुठे आहे, याबाबत चर्चा सुरू आहे. पोलिसांचे तपास पथक त्याचा शोध घेत आहे, मात्र अद्याप तो सापडलेला नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अधिक कठोर तपासाची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
राज्यात कौशल्य विकास केंद्रांचे जाळे निर्माण व्हावे : मंत्री उदय सामंत
Newsworldmarathi Pune: समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित राहिलेल्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कौशल्य विकास केंद्र हे एक मुख्य साधन असून कौशल्यावर आधारित पिढी तयार होण्यासाठी महाराष्ट्रात कौशल्य विकास केंद्रांचे जाळे निर्माण झाले पाहिजे, असे मत राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. जनसेवा फाउंडेशन, पुणे संचलित “हीरा-कांचन” निराधार पुनर्वसन केंद्र येथे “एस. पी. मल्होत्रा कौशल्य विकास केंद्र”चे उद्घाटन आज उदय सामंत यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
जनसेवा फौंडेशनच्या कात्रज येथील भिलारेवाडी येथील निराधार केंद्रातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी या कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. यावेळी व्यासपीठावर जनसेवा फौंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. विनोद शहा, सचिव मीना शहा, खजिनदार राजेश शहा, विकफिल्ड उद्योग समुहाचे अश्विनी मल्होत्रा, पुरूषोत्तम लोहिया आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी कौशल्य विकास केंद्राचे सहाय्यक आयुक्त सागर मोहिते आणि समाज कल्याण विभाग सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांची विशेष उपस्थिती लाभली.
यावेळी राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी जनसेवा फौंडेशनच्या “एस. पी. मल्होत्रा कौशल्य विकास केंद्रा”ची पाहणी करून प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना उदय सामंत म्हणाले की, भारत हा कृषिप्रधान देश असून शेतीतूनही मुबलक उत्पादन घेऊन शेतकरी आपला विकास साधू शकतो, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे माझे वडिल आहेत. शेती पूरक उद्योगांना कौशल्य विकासाच्या कक्षेत आणल्यास शेतकऱ्यांच्या मुलांना मुबलक संधी उपलब्ध होतील.
शिक्षणाच्या माध्यमातून समाजसेवा कशी करता येते, याच्या मूर्तीमंत उदाहरणाची प्रचिती आज जनसेवा फौंडेशनच्या “एस. पी. मल्होत्रा कौशल्य विकास केंद्रा”ला भेट दिल्यावर आली, असे गौरवोद्गार सामंत यांनी यावळी काढले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनसेवा फौंडेशनचे संस्थापक- अध्यक्ष डॉ. विनोद शहा यांनी केले. प्रा. जे.पी. देसाई यांनी सूत्रसंचालन केले. जनसेवा फौंडेशनचे खजिनदार राजेश शहा यांनी आभार मानले.
पीएमपी भाडेवाढ कमी करून महिलांना सवलत द्यावी; माजी नगरसेविका राणी भोसले यांची मागणी
Newsworldmarathi Pune: पीएमपी प्रशासनाने अलीकडेच प्रवास भाडेवाढ केल्यामुळे महिला तसेच सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भार वाढला आहे. यामुळे ही भाडेवाढ तत्काळ कमी करावी, अशी मागणी माजी नगरसेविका राणी भोसले यांनी पीएमपीच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालिका दीपा मुधोळ-मुंडे यांच्याकडे निवेदानाद्वारे केली आहे.
राज्य शासनाने एसटी प्रवासात महिलांना सवलत देऊन स्तुत्य पाऊल उचलले आहे. तशीच सवलत पीएमपी प्रवासातही महिलांना मिळावी, जेणेकरून त्यांच्या आर्थिक अडचणी कमी होतील, असे भोसले यांनी नमूद केले.
कात्रज लेक टाऊन सोसायटी ते पुणे स्टेशन आणि शिवाजीनगर या मार्गावर सुरू असलेल्या बससेवेला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत होता. मात्र, लक्ष्मीनगर सोसायटी परिसरातील रस्त्याच्या कामामुळे सद्यःस्थितीत ही सेवा काही काळासाठी बंद करण्यात आली आहे. परिणामी, परिसरातील महिला व नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
या मार्गावरील बससेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणीही भोसले यांनी निवेदनात केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना दीपा मुधोळ-मुंडे यांनी संबंधित मागण्यांवर वरिष्ठस्तरावर लवकरच चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे भोसले यांनी सांगितले.
या मागण्यांमुळे सामान्य प्रवाशांच्या अडचणी दूर होतील व महिलांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राज्यात उद्या रेड अलर्ट; मंगळवार पर्यंत मुसळधार…
Newsworldmarathi Pune : राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक हवामानविषयक माहिती समोर आली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, तो शुक्रवारी (२३ मे) तीव्र कमी दाबाच्या पट्टयात रूपांतरित झाला आहे. अद्याप या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर झालेले नसले, तरी या हवामानातील बदलामुळे राज्यात मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
दक्षिण कोकण किनाऱ्यावर कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र झाल्यामुळे, २४ ते २८ मे या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विशेषतः रविवार (२५ मे) रोजी संपूर्ण राज्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
शुक्रवारी दक्षिण कोकण किनाऱ्यावरील पूर्व-मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र झाले असून, ते पुढील २४ तासांत उत्तरेकडे सरकणार असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि उत्तर तेलंगण ओलांडून दक्षिण छत्तीसगडपर्यंत पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आहे.
या बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी तयारी ठेवावी, तसेच निचऱ्याची व्यवस्था करावी, असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात येत आहे. राज्यातील नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Election Commission : आता मतदान केंद्राच्या बाहेर ठेवता येणार मोबाईल; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
Newsworldmarathi Mumbai: Election Commission : मतदारांच्या सोयीसाठी आणि मतदान दिवशीच्या व्यवस्थापनात सुधारणा करण्याच्या उद्देशाने केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांना मोबाईल ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. तसेच यापुढे उमेदवारांचे मदत बूथ हे आता मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या पलीकडे ठेवावे, असंही या निर्णयात नमूद केले आहे.
मोबाईल फोनचा ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये वाढता वापर लक्षात घेता तसेच वृद्ध, महिला आणि दिव्यांग मतदारांना येणाऱ्या अडचणींचा विचार करता आयोगाने मतदान केंद्राच्या बाहेरच मोबाईल ठेवण्याची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.
१०० मीटरच्या आत केवळ बंद अवस्थेतील मोबाईल्स नेण्यास परवानगी राहील. प्रचाराच्या संदर्भातही बदल करत मतदान केंद्राच्या १०० मीटर अंतराच्या आत मनाई करण्यात आली आहे. मतदान दिवशी उमेदवारांनी मतदारांसाठी अनौपचारिक ओळखपत्र देण्यासाठी ठेवलेले मदत बूथ हे आता मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या पलीकडे ठेवावे लागणार आहेत.
भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ.सुखबीर सिंग संधू व डॉ.विवेक जोशी यांच्या नेतृत्वाखाली, भारत निवडणूक आयोग मतदान प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत पार पाडण्याबरोबरच मतदारांसाठी सुविधा सुधारण्यासाठी सातत्याने नवकल्पना राबवत असल्याचे भारत निवडणूक आयोगाने कळविले आहे.
राज्यात कोरोना रुग्णांची सौम्य वाढ; पुण्यात ४ तर मुंबईत सर्वाधिक ३५ रुग्ण
Newsworldmarathi Mumbai: राज्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येमध्ये सौम्य वाढ होत असून, २३ मे रोजी एकूण ४५ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबईत सर्वाधिक ३५ रुग्ण, पुण्यात ४, कोल्हापूर व रायगड येथे दोन, तर ठाणे व लातूर येथे एक असे रुग्ण आढळून आले आहेत.
यामुळे २२ मेपर्यंत मुंबईतील एकूण कोरोना रुग्णसंख्या १८३ वर पोहोचली आहे. जानेवारी २०२५ पासून राज्यात एकूण ६,८१९ कोविड चाचण्या करण्यात आल्या असून, त्यांपैकी २१० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात एकट्या मुंबईत १८३ रुग्ण सापडले आहेत.
त्यापैकी आतापर्यंत 81 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या असलेल्या सक्रिय रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याने ते घरीच उपचार घेत आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
सर्दी, खोकला आणि तापसदृश लक्षणे दिसून आलेल्या रुग्णांची कोरोना तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये कोविडबाधित रुग्ण आढळल्यास त्याला पालिकेच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. तसेच काही उपनगरातील रुग्णालयात रुग्णांसाठी विशेष बेड आणि विशेष खोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

