Newsworldmarathi Mumbai : मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघातर्फे पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदानासाठी दिल्या जाणाऱ्या सन २०२४ या वर्षीच्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारांची घोषणा आज मंत्रालयात करण्यात आली. प्रतिष्ठेचा कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार श्रीमती प्रतिमा जोशी यांना जाहीर झाला आहे.
उत्कृष्ट पत्रकार (मुद्रित) राज्यस्तरीय पुरस्कारासाठी लोकमत ‘सातारा’च्या प्रतिनिधी श्रीमती प्रगती पाटील यांची तर वृत्तवाहिनी उत्कृष्ट पत्रकार (दृकश्राव्य) पुरस्कारासाठी ‘एबीपी माझा’चे पुणे प्रतिनिधी श्री. मंदार गोंजारी यांची निवड करण्यात आली आहे. वार्ताहर संघाचा उत्कृष्ट सदस्य पुरस्कार ‘पुढारी’चे श्री. राजन शेलार यांना जाहीर झाला आहे.
सहा जानेवारी या पत्रकार दिनाचे औचित्य साधून आज या पुरस्कारांची घोषणा संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे आणि सरचिटणीस प्रवीण पुरो यांनी केली. ज्येष्ठ पत्रकार श्री. सुरेंद्र गांगण, श्री. संजय बापट आणि सदस्य सचिव श्री. भगवान परब यांच्या निवडसमितीने या पत्रकारांच्या नावांची पुरस्कारासाठी केलेली शिफारस मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या कार्यकारिणीने मान्य केली.सर्व पुरस्कार विजेत्यांचे मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे