Newsworld mumbai : Sharad Pawar : दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या सरहद संस्था आयोजित अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शरद पवार (Sharad Pawar) यांची निवड करण्यात आली.
सरहद संस्था आयोजित अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि.२१, २२, २३ फेब्रुवारी २०२५ या काळात दिल्लीला होणार आहे. यापूर्वी १९५४ साली दिल्लीला ३७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. त्याचे स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ, संमेलनाध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी तर उद्घाटक तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरू होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला या संमेलनानंतर बळ मिळाले आणि १ मे १९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्यानंतर दिल्लीला एकदाही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले नाही. नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.
या पार्श्वभूमीवर ७० वर्षांनी दिल्लीत होणाऱ्या य संमेलनाचे आयोजन सरहद संस्थेद्वारे केले जात असून त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसेचे नेते राज ठाकरे, नितीन गडकरी आदी नेत्यांना विविध कार्यक्रमात संस्थेने निमंत्रित केले होते.दिल्ली ही देशाची राजकीय राजधानी असल्यामूळे येथे होणारे संमेलन सर्वसमावेशक व्हावे या भावनेतून संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी अनुभवी, ज्येष्ठ व साहित्यरसिक व्यक्ती व्हावी असा संयोजक समितीने प्रयत्न केला त्यातून शरद पवार यांना संस्थेने केलेली विनंती पवार यांनी मान्य केली.
शरद पवार हे केवळ उत्तम वाचक अथवा साहित्यप्रेमी नसून महाराष्ट्रातून सांस्कृतिक आणि साहित्यिक चळवळीशी प्रारंभापासून जोडले गेले आहे. त्यांनी छत्रपती संभाजीनगर, नाशिक, चिपळूण आणि सासवड येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले आहे. तर, १९९० मध्ये त्यांनी स्वागताध्यक्ष व्हावे असे पुण्यातील संमेलनात समितीने ठरविले होते मात्र, त्यावर्षी ते होऊ शकले नाही. यंदा दिल्लीमध्ये महाराष्ट्राची अस्मिता ज्या व्यक्तींभोवती केंद्रीत असते त्यातून सर्वात ज्येष्ठ नाव शरद पवार यांचे आहे. त्यांच्या अनुभवांमुळे हे संमेलन अविस्मरणीय होईल आणि राजकारणाच्या पलिकडे जाऊन मराठी भाषा आणि संस्कृतीचा जागर करणारे ठरेल, असा विश्वास नहार यांनी व्यक्त केला.