Newsworld marathi Mumbai : मुंबईसह पुण्याच्या राजकीय आणि मीडियाच्या वर्तुळात मुख्यमंत्री पदासाठी केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्या नावाची गेल्या दोन दिवसांपासून चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर यासंबंधीचे मेसेज फिरत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात भाजप पुन्हा धक्कातंत्र देणार का, याबाबत जोरदार चर्चा आहे. सोशल मीडियावर त्यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली असून, मोहोळ यांनी मात्र या चर्चेत कुठलेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरविण्यासाठी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची गुरुवारी रात्री बैठक झाली. त्यात फडणवीस यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, शुक्रवारी दिवसभरात मुख्यमंत्री कोण होणार, याची अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात आहेत.
राज्यात महायुतीला दणदणीत बहुमत मिळाले असले,
तरी मुख्यमंत्री कोण हे अधिकृतरीत्या जाहीर झालेले नाही. त्यातच पुण्याचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांचे नावही मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत आले आहे.