परिमॅच स्पोर्ट्सच्या वतीने प्रो कबड्डी लीगच्या स्पर्धाकांसोबत परिसंवाद

0
Newsworldmarathi Pune : खेळाडूंच्या पोषाख निर्मितीमधील एक लोकप्रिय ब्रॅण्ड असलेल्या आणि प्रो कबड्डी लीगचे एक सहयोगी प्रायोजक असलेल्या परिमॅच स्पोर्ट्सच्या वतीने लीगमधील स्टार खेळाडूंना प्रत्यक्ष भेटण्याची संधी आणि खेळाडूंना शुभेच्छा सत्राचे खास आयोजन करण्यात आले होते. या विशेष कार्यक्रमात तमिळ थलैवाजचा सचिन तंवर, गुजरात जाएंटसचा राज साळुंके आणि दिल्ली दबंगच्या योगेश दहियाचा समावेश होता. या ६० मिनिटांच्या कार्यक्रमात चाहत्यांना लीगमध्ये खेळणाऱ्या कबड्डीपटूंचे वैयक्तिक जीवन, कौशल्य आणि उत्कटता याविषयी जाणून घेता आले. कार्यक्रमाची सुरुवात छोट्याशा स्वागताने झाली. त्यानंतर चाहत्यांच्या कबड्डी ज्ञानाची चाचणी घेणारी एक स्पर्धा घेण्यात आली. त्यानंतर प्रश्नेत्तराच्या सत्रात खेळाडूंनी त्यांचा प्रेरणादायी प्रवास, दैनंदिन दिनचर्या, सर्वोच्च स्तरावर कामगिरी करण्यासाठी आवश्यक असलेली उर्जा या विषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या. व्यावसायिक कबड्डीच्या दुनियेतील एक वेगळीच झलक दिसून आल्याने चाहते मोहित झाले होते. त्याचबरोबर कबड्डी पर्वाविषयीचे ट्रुथ आणि डेयर, रोमांचक तंदुरुस्ती आवहाने आणि कबड्डीची थीम असलेल्या ट्रिव्हिया अशा विविख कार्यक्रमात चाहते खेळाडूंसोबत सामील झाले होते. दडपणाखाली झालेल्या सामन्यात शारीरिक तंदुरुस्ती, मानिसक लवचिकता कशी राखली या विषयी खेळाडूंनी चाहत्यांना माहिती देत मार्गदर्शन केले. या सगळ्या मनोरंजनाच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांना खेळाडूंशी संवाद साधण्याची मान्यता देण्यात आली. उपस्थित चाहत्यांना त्यांच्या आवडत्या खेळाडूसोबत अविस्मरणीय क्षण टिपण्याची संधी देत आणि त्यांची सही मिळवून देत या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सहभागी खेळाडूंना परिमॅच स्पोर्ट्सच्या वतीने स्मृतिचिन्ह देण्यात आले. पीकेएलचे सहयोगी प्रायोजक आणि खेळाडूंचा ब्रॅण्ड म्हणून कबड्डी चाहत्यांचा अनुभव वाढवणे आणि त्यांना आवडणाऱ्या खेळाच्या जवळ आणणे हे आमचे ध्येय आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने केवळ खेळाडूंचाच गौरव केला नाही, तर कबड्डीला देशभरातील एक प्रिय खेळ बनवणाऱ्या चाहत्यांचाही सन्मान केला, अशी परिमॅच स्पोर्ट्सच्या कार्यालयाच्या वतीने टिप्पणी करण्यात आली.

धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानतर्फे सांस्कृतिक कला महोत्सव

0
Newsworldmarathi Pune : मनोहारी गणेश वंदना, आदिशक्तीचा जागर… कर्णमधुर गीतांचे व पोवाड्यांचे गायन… प्रबोधनपर नाटिकांचे सादरीकरण… भारुडांतून अंधश्रद्धा निर्मूलन… वारकरी वेशात हरिनामाचा गजर अन देशभक्तीपर गीतांचा गहिवर… नेत्रदीपक नृत्याविष्कार… विद्यार्थ्यांतील कलागुणांचे, सृजनशीलतेचे मनमोहक सादरीकरण पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा केलेला कडकडाट अन भरभरून कौतुक! निमित्त होते, धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान संस्थेत आयोजित सांस्कृतिक कला महोत्सव सप्ताहाचे! सलग सात दिवस धायरी येथील धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान शैक्षिणक संकुलात वार्षिक सांस्कृतिक कला महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. संस्थेच्या सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांनी आपापली कला या महोत्सवात सादर केली. विविध कला, परंपरा व सृजनशीलतेचे दर्शन घडवणारा हा महोत्सव पाहण्यासाठी विद्यार्थी, पालक व परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. विद्यार्थ्यांनी गणेश वंदना, आदिशक्तीचा जागर, कोळी नृत्य, कव्वाली, पाणी अडवा पाणी जिरवा, मिशन मंगलम, खंडोबाचा जागर, महाराष्ट्राची संतपरंपरा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित विविध प्रसंग व पोवाडे आणि विविध नाटिकांच्या माध्यमातून सादरीकरण केले. मोबाईल पाहण्याचे दुष्परिणाम आणि खेळाचे फायदे यावर भाष्य करणारी नाटिका, विविध ऐतिहासिक प्रसंगावर गीतांच्या माध्यमातून केलेले भाष्य, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि हिरकणी यांच्या इतिहासाची महती पटवून देणारे प्रसंग सादर केले. देशभक्तीपर गीतांतून ‘जय जवान, जय किसान’चा नारा दिला. भारतरत्न स्वर्गीय रतन टाटा यांनाही गीतांच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या सांस्कृतिक महोत्सवासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लाऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, शिक्षण विभागाच्या सुवर्णाताई फणसे, प्रशांत नेटवटे, संस्थेचे अध्यक्ष काकासाहेब बंडोजी चव्हाण, पदाधिकारी नंदूशेठ बंडोजी चव्हाण, भीमराव बंडोजी चव्हाण, सचिव सुधाकरराव जाधवर, संचालक अनिकेत काकासाहेब चव्हाण, संचालिका सुनिता काकासाहेब चव्हाण, हर्षदा अनिकेत चव्हाण, रवीना अवधूत चव्हाण यांच्यासह धायरी व परिसरातील सर्व मान्यवर उपस्थित होते. महोत्सवाचे नियोजन विविध शाखांचे मुख्याध्यापक विकास कुंभार, विलास खाडे, माधव काकडे, डॉ. सुनीता चव्हाण, दीपक खेडकर, वंदना काकडे, मदन सूर्यवंशी यांनी सर्व शिक्षकांच्या सहकार्याने केले. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांसह पालकांनी अतिशय मोलाचे योगदान दिले. “धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान गेली २५ वर्षे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी कार्यरत आहे. आपल्या विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने दरवर्षी हा सांस्कृतिक महोत्सव आयोजिला जातो. त्यातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. त्यांच्यात नवी ऊर्जा निर्माण होते. विद्यार्थी, शिक्षक व पालकांच्या एकत्रित मेहनतीमुळे यंदाचा महोत्सव अतिशय दर्जेदार झाला आहे.” – काकासाहेब चव्हाण, अध्यक्ष, धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान

तांदळाच्या नवीन सीझनमध्ये आंबेमोहोरच्या भावात तेजी

0
Newsworldmarathi Pune : पुणेकरांच्या विशेष पसंतीच्या आंबेमोहोर तांदळाचे भाव नवीन सीझनच्या सुरवातीलाच गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ ते २० % ने वाढून घाऊक बाजार पेठेत ८००० ते ९००० रु. प्रति क्विंटलवर पोहोचले आहेत. मागील वर्षी सीझनच्या सुरुवातीला हे दर ७००० ते ७५०० निघाले होते. यावर्षी साधारणतः ५०० ते १००० रुपये प्रति क्विंटलने आंबेमोहोर तांदळाची भाववाढ झाली आहे. या भाववाढीचे प्रमुख कारण म्हणजे सप्टेंबर मध्ये केंद्र सरकारने नॉन बासमती तांदळा वरची निर्यात बंदी उठवली. तसेच त्यावेळी असणारे २० टक्के निर्यात कर सुद्धा सरकारने कमी केला आहे. त्यामुळे आंबेमोहोर तांदळाला परदेशातून खूप मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. महाराष्ट्रात येणाऱ्या एकूण आंबेमोहोर तांदळापैकी ८०% तांदूळ हा मध्य प्रदेश मधून तर उर्वरित २०% तांदूळ आंध्र प्रदेश या राज्यांमधून येतो. यावर्षी या दोन्ही राज्यांमध्ये आंबेमोहोर तांदळाचे उत्पादन कमी झालेले आहे. त्याच बरोबर अनेक निर्यातदार व्यापाऱ्यांनी यावर्षी जागेवरच अधीक प्रमाणावर तांदळाची खरेदी केली आहे. त्यामुळे वरील भाववाढ झालेली आहे. साधारणतः डिसेंबर महिन्याच्या शेवटी नविन आंबेमोहोर तांदळाची आवक होण्यास सुरवात होते. सुगंधी आंबेमोहोर तांदळाचा राजा म्हणून ओळखला जातो. हा तांदूळ महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे बारा महिने वापरला जातो. विशेषतः पुण्यात आंबेमोहोर तांदळाला खूप मोठी मागणी आहे. परंतु यावर्षी पुणेकरांना आंबेमोहोर तांदूळ १० ते १५ रु. प्रति किलो महाग खरेदी करावा लागणार आहे. वर्षभर वापरल्या जाणाऱ्या बासमती, आंबेमोहोर, इंद्रायणी व सुरती कोलम या तांदळापैकी आंबेमोहोरला चांगली मागणी आहे. यावर्षी बासमती तांदळाच्या दरांपर्यंत आंबेमोहोर तांदळाचे दर पोहोचतील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तसे झाल्यास हा एक विक्रम होईल. त्याचबरोबर आंबेमोहोर तांदळाचे दर हे यावर्षी कमी होण्याची शक्यता खूप कमी आहे असा अंदाज ही व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. आंबेमोहोर तांदळाचे सर्वाधिक उत्पादन मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये होते. महाराष्ट्रात कामशेत, भोर याभागात काही प्रमाणात त्याचे उत्पादन घेतले जाते. काही वर्षांपूर्वी आंबेमोहोरचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात घेतले जात होते. परंतू हा तांदूळ पिकणाऱ्या पुणे, मावळ, भोर, कामशेत या पट्यात झपाट्याने शहरीकरण वाढले व जमिनींना चांगला भाव आला म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांनी जमीनी विकल्या. हे वर्षातून एकदाच घेतले जाणारे पीक असल्यामुळे आणि पीक येण्यास जास्त वेळ लागत असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी त्याचे उत्पादन घेणे कमी केले. म्हणून आंबेमोहोर महाराष्ट्रातून कमी होत चालला आहे. अशी माहिती जयराज आणि कंपनीचे संचालक व तांदळाचे निर्यातदार धवल शहा यांनी दिली.

पुण्यात होणार दोन महापालिका? मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मोठे विधान..

0
Newsworldmarathi Pune : महापालिकेत हद्दीलगतच्या गावांच्या समावेशानंतर राज्यातील सर्वांत मोठी महापालिका बनलेल्या पुणे महापालिकेवरील प्रशासकीय ताण दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आता आणखी उशीर न करता पुणे महापालिकेचे विभाजन करावेच लागेल, अशी स्पष्ट भूमिका उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी मांडली. हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी पुण्यासह पिंपरी-चिंचवडचा विकास वेगाने होत असल्याने तेथेही वेगळी पालिकेची गरज अधोरेखित करून, पुण्याच्या पूर्व व पश्चिम बाजूस स्वतंत्र महापालिका कराव्यात, अशी मागणी केली. पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे शहरातील नवनिर्वाचित आमदार व मंत्र्यांसोबत वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात बोलताना पाटील व तुपे यांनी ही भूमिका मांडली. पुणे महापालिकेच्या परिसरात प्रचंड वेगाने होणारे नागरीकरण पाहता व ३२ गावांच्या समावेशानंतर पालिका प्रशासनावरील वाढलेला ताण पाहता पुण्यासाठी आणखी एका महापालिकेची गरज आहे, ही भूमिका ‘महाराष्ट्र टाइम्स’ने सातत्याने लावून धरली आहे. पाटील व तुपे यांनीही या भूमिकेचे समर्थने केल्याने सरकार लवकरच याबाबत सकारात्मक पाऊल टाकेल, अशी आशा निर्माण झाली आहे. सुमारे तीन वर्षांपासून पुण्यासह अनेक शहरांमध्ये प्रशासकराज आहे. नगरसेवक नसल्याने नागरिकांची कामे अडत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात न्यायालयातील याचिकांचा निकाल जानेवारीत अपेक्षित आहे. त्यानंतर प्रभागरचना, हरकती सूचना यासाठी काही कालावधी द्यावा लागेल. मार्च, एप्रिलमध्ये परीक्षा असतील. मे महिन्याच्या आसपास आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रश्नांना न्याय देता येईल, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी महापालिका निवडणुकांच्या तारखांचे सूतोवाच केले. पूर्व, पश्चिम पुणे महापालिका ‘पुणे सुपरफास्ट वेगाने विस्तारत आहे. पुण्याची वाढ कोणी रोखू शकणार नाही. आत्ताच मोठ्या प्रमाणावर समस्या जाणवू लागल्या आहेत. २५ वर्षांनंतर काय परिस्थिती असेल, सांगता येत नाही. गुंठेवारी वाढत राहिली, तर नव्याने विकसित होणाऱ्या भागांत कोणत्याही आरक्षणांसाठी जागाच उरणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर पुणे शहराच्या पूर्व व पश्चिम बाजूंना नव्या महापालिका करणे आवश्यक आहे. त्यासाठीचा निर्णय आत्ताच घ्यावा लागेल,’ असे चेतन तुपे यांनी स्पष्ट केले.

ख्रिसमस सणानिमित्त पुणे शहरात वाहतुकीत बदल

0
Newsworldmarathi Pune : ख्रिसमस सणानिमित्त पुणे कॅम्प भागातील महात्मा गांधी मार्गावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक सुरळीत रहावी म्हणून २४ व २५ डिसेंबर २०२४ रोजी दोन्ही दिवस सायं. ७ वा. ते गर्दी संपेपर्यंत वाहतुकीत आवश्यकतेनुसार तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात येत आहेत. याअंतर्गत वाय जंक्शन वरुन महात्मा गांधी मार्गाकडे येणारी वाहतूक ही १५ ऑगस्ट चौक येथे बंद करुन ती कुरेशी मशिद व सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात येणार आहे. इस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूक बंद करुन सदरची वाहतूक एसबीआय हाऊस चौक उजवीकडे वळून तीनतोफा चौक सरळ लष्कर पोस्ट अशी वळविण्यात येणार आहे. व्होल्गा चौकातून महमंद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून सदरची वाहतूक सरळ ईस्ट स्ट्रीट मार्गाने इंदिरा गांधी चौकाकडे सोडण्यात येईल. इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून सदरची वाहतूक इंदिरा गांधी चौकातून लष्कर पोलीस ठाणे चौकाकडे वळविण्यात येईल. सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून सदरची वाहतूक ताबूत स्ट्रीट मार्गाने पुढे सोडण्यात येईल, असे आदेश पुणे वाहतूक. शाखेचे पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे यांनी जारी केले आहेत.

माजी उपमहापौर सुनिता वाडेकर यांच्या प्रयत्नातून बोपोडी येथे शव वाहिनी

0
Newsworldmartahi Pune माजी उपमहापौर सुनिता परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून आणि निधीतून बोपोडी येथील मुक्तिधाम स्मशानभूमीतील पहिल्या मजल्यावर बांधण्यात आलेल्या अत्याधुनिक गॅस शवदाहिनी आणि प्रदूषण रोधक चिमणीचे लोकार्पण आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी रिपब्लिकन पक्षाचे नेते परशुराम वाडेकर, माजी नगरसेवक आनंद छाजेड, रिपब्लिकन पक्षाचे शिवाजीनगर विधानसभा अध्यक्ष अविनाश कदम, निलेश वाघमारे, सचिन चव्हाण ,ज्वेल अँथोनी, रुपेश पिल्ले, रिकेश पिल्ले, संजय पिल्ले, बाळू मोरे, बापू रणदिवे, आप्पासाहेब वाडेकर, कलावती भंडारी, नंदा निकाळजे, आरती देठे आणि परिसरातील नागरीक व पदाधिकारी उपस्थित होते. “मुळा आणि पवना नदीच्या संगमावर असलेल्या मुक्ती धाम स्मशानभूमी बोपोडी येथे पूर आल्यानंतर स्मशानभूमी पाण्यात गेल्याने नागरिकांचे अंत्यविधीसाठी हाल होत होते. म्हणून या ठिकाणची गॅस शवदाहीनी पहिला मजला बांधून वर नव्याने बांधण्यात बसविण्यात आली आहे. यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली ,तरी सुद्धा नागरिकांना इतरत्र अंत्यविधीसाठी जावे लागणार नाही असे आश्वासन यावेळी माजी उपमहापौर सुनिता परशुराम वाडेकर यांनी दिले.

मंत्रीपदाची सूत्रे स्वीकारताच उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शन मोडवर

Newsworldmarathi Mumbai : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘वित्त व नियोजन’सह ‘राज्य उत्पादन शुल्क’ मंत्रीपदांची सुत्रे हाती घेताच आज मंगळवारी (दि.24) मंत्रालयात दोन्ही विभागांसह शासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वित्त, नियोजन आणि उत्पादनशुल्क विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. मंत्र्यांचे खातेवाटप होताच उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शन मोडवर आले असून करसंकलन आणि महसुलवाढीच्या प्रक्रियेत सुसुत्रता, सुधारणा आणत ‘रिझल्ट ओरियंटेड’ काम करण्याचे निर्देश त्यांनी आज वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. अधिकाऱ्यांनी पारदर्शक कारभार करावा. करचोरी, करगळती रोखण्याच्या कर्तव्यात हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात ‘वित्त व नियोजन’ विभागासह ‘राज्य उत्पादन शुल्क’ विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विभागांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी वित्त व नियोजन विभागाचे राज्यमंत्री ॲड. अशिष जयस्वाल, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, वस्तू व सेवा कर विभागाचे राज्य आयुक्त आशीष शर्मा, वित्त विभागाच्या (वित्तीय सुधारणा) सचिव शैलजा ए., लेखा व कोषागारे विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपसचिव रविंद्र औटे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहआयुक्त विश्वनाथ इंदिसे, सहआयुक्त सुनिल चव्हाण, अपर आयुक्त यतीन सावंत, उपायुक्त सुभाष बोडखे, उपायुक्त शंकर जगताप आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी प्रलंबित योजना, आवश्यक निधी, तसेच राज्याच्या उत्पन्नाचा आढावा घेतला. या बैठकीत राज्यातील महसुली सुधारणा, शेती विकास, औद्योगिक गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती यांसारख्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या आणि सामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी वित्तीय योजना आणण्यावर भर देण्याच्या सूचना देत राज्याच्या महसूल वाढीसाठी करचोरी, करगळतीसह गैरकारभार रोखण्याच्या सूचना दिल्या. करसंकलनाचे उद्दीष्ट गाठण्यासाठी सर्व सुविधा पुरविण्यात येतील परंतु कामात परिस्थितीत हयगय चालणार नसल्याचे सांगत रिझल्ट ओरियंटेड काम करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा सविस्तर आढावा घेतला. राज्यातील बेकायदा दारूविक्रीवर कडक निर्बंध आणण्यासाठी पारदर्शक व्यवस्था उभारण्याचे निर्देश दिले.

२७-२८ डिसेंबर दरम्यान राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता

0
Newsworldmarathi Mumbai : कालपासून राज्यातील विविध भागांमध्ये काही प्रमाणात आभाळी हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. २६ डिसेंबर रोजी कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील दक्षिणेकडील तुरळक भाग; २७ डिसेंबर रोजी खानदेश (नाशिक विभाग), मध्य महाराष्ट्र (पुणे विभाग), उत्तर मराठवाडा, आणि पश्चिम विदर्भातील विविध ठिकाणी; आणि २८ डिसेंबर रोजी खानदेश, मराठवाडा (प्रामुख्याने उत्तरेकडील जिल्हे), आणि विदर्भातील काही भागांमध्ये मेघ गर्जनेसह पावसाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. या भागातील शेतकऱ्यांनी या पुढील कृषी सल्ला आणि हवामानाच्या अंदाजांकडे लक्ष ठेवावे आणि त्यानुसार नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

ई-वीकमुळे उद्योजकतेला वाव : दीपक शिकारपूर

0
Newsworldmarathi Pune : गरवारे महाविद्यालयाने आयोजित केलेल्या ई-वीकमुळे विद्यार्थ्यांमधील कलागुणांना आणि उद्योजकतेला नक्कीच वाव मिळेल, असा विश्वास ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या गरवारे वाणिज्य महाविद्यालयातील आंत्रप्रेन्युअरशीप, इन्क्युबेशन अँड स्टार्टअप सेलतर्फे ई-वीकचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बिझेनस एक्झिबिशनचे उद्घाटन डॉ. शिकारपूर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमास महाविद्यालयाच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष राहुल मिरासदार, नियमक मंडळाचे सदस्य डॉ. राजीव हजरनीस, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर देसरडा यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रदर्शनाच्या प्रत्यक्ष मांडणीबरोबरच आभासी प्रदर्शन मांडणीचा वापर उद्योजकता वाढविण्यासाठी करावा, असे आवाहन डॉ. शिकारपूर यांनी या वेळी केले. नव्या उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळून त्यांनी स्वतःचे उद्योग स्थापन करावेत या भूमिकेतून ई-वीक या उपक्रमाची सुरुवात करण्यात आल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर देसरडा यांनी प्रास्ताविकात सांगितले. ई-वीकमध्ये व्यवसायाच्या नवनवीन संकल्पना, ब्रँडींग इत्यादी विषयांवर आंतरमहाविद्यालयीन स्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, ज्यात विविध महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते.

‘हे’ दादाचं होणार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री?

0
Newsworldmarathi Pune : पुण्याच्या पालकमंत्री पदावरून यंदाही “दोन दादा” म्हणजेच अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे. गेल्या काही काळात हे पद पुण्यातील राजकीय महत्त्व आणि विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जात आहे. अजित पवार, ज्यांना पुण्यातील स्थानिक पातळीवर मोठा जनाधार आहे आणि ते विद्यमान उपमुख्यमंत्रीही आहेत, यांना या पदावर पुन्हा दावा मजबूत करण्याची संधी आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि प्रशासकीय कौशल्याचा आधार घेऊन त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय पुण्यासाठी घेतले आहेत, जे त्यांच्या बाजूने जाऊ शकतात. दुसरीकडे, चंद्रकांत पाटील, ज्यांना भारतीय जनता पक्षाचा मोठा पाठिंबा आहे, त्यांनीही पालकमंत्री म्हणून चांगले कामगिरी केली असल्याचा दावा आहे. त्यांनी पुण्यातील पायाभूत सुविधा आणि इतर प्रकल्पांवर भर दिला आहे, जे त्यांना वरचढ ठरवण्यासाठी महत्त्वाचे ठरू शकते. पदावर कोण ठरतो याचा निर्णय केवळ पक्षीय समीकरणांवर नाही तर राजकीय दबाव, गटबाजी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अंतिम निर्णयावर अवलंबून असेल. ही रस्सीखेच केवळ स्थानिक नव्हे, तर राज्याच्या राजकारणातील महत्त्वाचा भाग ठरणार आहे. फडणवीस सरकारच्या खातेवाटपानंतर आता सर्वांच्या नजरा पालकमंत्री पदांच्या वाटपाकडे वळल्या आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद नेहमीच महत्त्वपूर्ण मानले जाते, कारण पुणे हे महाराष्ट्राच्या राजकीय, आर्थिक, आणि शैक्षणिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा या पदावर दीर्घ काळापासून मजबूत दावा आहे. त्यांनी पालकमंत्री म्हणून पुण्यात अनेक मोठ्या विकासकामांना गती दिली आहे, ज्यामुळे त्यांचा या पदासाठी पुन्हा दावा मजबूत आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि स्थानिक पातळीवरील प्रभावाचा विचार करता, त्यांना या पदावर ठेवले जाऊ शकते, असे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. तथापि, भारतीय जनता पक्षाकडूनही या पदासाठी चंद्रकांत पाटील किंवा इतर महत्त्वाच्या नेत्यांचा दावा होऊ शकतो. भाजपचा स्थानिक गड मजबूत करण्यासाठी हा पदभार त्यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. यामुळे या पदासाठी फडणवीस सरकारला संतुलन साधत कसरत करावी लागणार आहे. या रस्सीखेचीत कोण वरचढ ठरेल हे पक्षीय गटबाजी, स्थानिक आमदारांचे समर्थन आणि मुख्यमंत्र्यांचा अंतिम निर्णय यावर अवलंबून आहे. त्यामुळे पालकमंत्री पदाचे वाटप हा आगामी राजकीय समीकरणांसाठी निर्णायक मुद्दा ठरू शकतो. पुणे जिल्ह्यातील पालकमंत्री पदासाठी सुरू असलेल्या राजकीय चर्चेत “जिल्ह्यातील जास्त आमदारांच्या फॉर्म्युला” हा महत्त्वाचा मुद्दा मानला जात आहे. पुणे जिल्ह्यातील 21 आमदारांपैकी 9 आमदार भाजपचे आहेत, तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडे 8 आमदार आहेत. या गणितानुसार भाजपला पालकमंत्री पद देणे तर्कशुद्ध वाटत आहे, ज्यामुळे चंद्रकांत पाटील यांचा दावा अधिक मजबूत होतो. तथापि, पुणे जिल्ह्याचे राजकीय महत्त्व आणि अजित पवार यांचा प्रभाव पाहता, हा फॉर्म्युला अपवाद ठरू शकतो. अजित पवार यांचे पुणे जिल्ह्यातील दीर्घकालीन योगदान, प्रशासकीय अनुभव, आणि स्थानिक पातळीवरील त्यांचा मजबूत जनाधार यामुळे त्यांना या पदावर कायम ठेवण्याचा विचार होऊ शकतो. याशिवाय, शिंदे-फडणवीस सरकारला तीन पक्षांच्या (शिवसेना-शिंदे गट, भाजप, आणि राष्ट्रवादी – अजित गट) गटबाजी सांभाळून निर्णय घ्यावा लागणार आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री असून, त्यांच्या नेतृत्वाखालील गटाला महत्त्व देण्याच्या दृष्टिकोनातूनही त्यांना हे पद दिले जाऊ शकते. शेवटी, हे पद पक्षीय समीकरणांपेक्षा सरकारच्या एकूण धोरणांवर, स्थानिक विकास प्रकल्पांवरील भर, आणि राजकीय संतुलनावर अवलंबून असेल. त्यामुळे पुणे जिल्हा “अपवाद” ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजित पवार आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे नेहमीच राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू राहिले आहे. 2019 च्या महाविकास आघाडी सरकारपासून ते सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारपर्यंत, या पदावर वारंवार राजकीय रस्सीखेच झाली आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदासोबत पालकमंत्रीपदाची जबाबदारीही समर्थपणे पेलली आहे, ज्यामुळे त्यांच्या या पदावरील नेतृत्वाला स्थानिक आणि राज्यस्तरीय राजकारणात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात, चंद्रकांत पाटील यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले होते. मात्र, अजित पवारांच्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर, त्यांनी पुन्हा हे पद आपल्या बाजूने वळवले. यावरून स्पष्ट होते की अजित पवार हे केवळ राजकीय दबावच नव्हे, तर जिल्ह्याच्या विकासाबाबत आग्रही भूमिका घेतात. आता, भाजपचा “जास्त आमदार” फॉर्म्युला पाहता चंद्रकांत पाटील यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. पण, अजित पवारांचा राजकीय वजन आणि पुण्यातील स्थानिक समर्थन लक्षात घेता, ते पुन्हा हे पद खेचून आणतील का? हा मोठा प्रश्न आहे.