मुंबईनंतर पुण्यातही मनसे–शिवसेना युती; जागावाटपावर एकमत

0
Newsworldmarathi Pune: मुंबई पाठोपाठ आता पुण्यातही महापालिका निवडणुकीसाठी मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युती अंतिम टप्प्यात पोहोचली असून, जागावाटपावर प्राथमिक एकमत झाले आहे. भाजपविरोधात ताकद एकवटण्यासाठी महाविकास आघाडी आणि समविचारी पक्षांमध्ये समन्वय वाढत असून, पुण्यातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, पुणे महापालिकेच्या एकूण जागांपैकी काँग्रेस पक्षाला सुमारे ८० जागा देण्यावर सहमती झाली आहे. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांना प्रत्येकी किंवा एकत्रितपणे सुमारे ६५ जागा देण्याचा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे. उर्वरित १५ ते २० जागा मित्र पक्ष आणि समविचारी घटकांसाठी राखीव ठेवण्याबाबत चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे समजते. मुंबईत युतीचा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर पुण्यातही तसाच फॉर्म्युला राबवण्यावर पक्षनेतृत्वाचा भर आहे. पुण्यातील स्थानिक परिस्थिती, प्रभागरचना, उमेदवारांची ताकद आणि मागील निवडणुकांचे निकाल लक्षात घेऊन जागावाटप करण्यात येत आहे. मनसेकडून काही विशिष्ट प्रभागांवर विशेष दावा करण्यात आला असून, त्या प्रभागांमध्ये मनसेचे संघटन मजबूत असल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, युतीच्या घोषणेमुळे पुण्यातील राजकीय वातावरण तापले असून, भाजपविरोधात थेट लढत होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये समन्वय वाढत असला तरी काही प्रभागांमध्ये अंतर्गत स्पर्धा कायम राहण्याची शक्यता आहे. आगामी काही दिवसांत युतीची अधिकृत घोषणा आणि उमेदवारांची प्राथमिक यादी जाहीर होण्याची शक्यता असून, पुणे महापालिका निवडणुकीत रंगतदार सामना पाहायला मिळणार आहे.

पुणे महापालिका निवडणुकीत भाजपचा ‘नो रिलेटिव्ह’ फॉर्म्युला; आमदार-खासदारांच्या शिफारशींना कात्री

0
Newaworldmarathi Pune: पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी रविवारी (ता. २८) संध्याकाळनंतर जाहीर होण्याची शक्यता असतानाच, त्याआधीच शहरातील आमदार आणि खासदारांना धक्का देणारी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या निवडणुकीत आमदार व खासदारांनी त्यांच्या मुला-मुलींसाठी तसेच जवळच्या नातेवाईकांसाठी केलेल्या शिफारशींना उमेदवारी दिली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे प्रतिष्ठा पणाला लावून प्रयत्न करणाऱ्या लोकप्रतिनिधींना मोठा झटका बसल्याचे चित्र आहे. पुणे महापालिकेच्या १६५ जागांसाठी भाजपकडून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी तब्बल २३०० हून अधिक इच्छुकांनी अर्ज सादर केले असून, त्यामुळे पक्षांतर्गत स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याशिवाय, इतर पक्षांतील दहापेक्षा अधिक माजी नगरसेवकांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केल्याने उमेदवारी मिळवण्यासाठीची चुरस आणखी तीव्र झाली आहे. परिणामी, काही प्रभागांत मूळ भाजप कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळणार नाही, अशीही चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील काही आमदार आणि खासदारांनी आपल्या मुला-मुलींसह नातेवाईकांना उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार लॉबिंग केल्याची माहिती आहे. मात्र, पक्षाने स्पष्ट भूमिका घेत आमदार-खासदारांच्या नातेवाईकांना उमेदवारी न देण्याचा निर्णय कळवला आहे. तथापि, एखादा नातेवाईक पूर्वीपासून भाजपमध्ये सक्रिय असून संघटनात्मक कामाचा अनुभव असल्यास, अशा इच्छुकाचा स्वतंत्रपणे विचार केला जाऊ शकतो, असेही वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट केले आहे. उमेदवार निवडीत पक्षाची शिस्त, संघटनात्मक काम आणि निवडणूक जिंकण्याची क्षमता या निकषांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे संकेत मिळत असून, त्यामुळे पुण्यातील भाजपच्या अंतर्गत राजकारणाला चांगलाच वेग आला आहे.

बिडकरांचा नागरिक भेटींचा धडाका; ६० हजारांहून अधिक नागरिकांशी थेट संवाद

0
Newsworldmarathi Pune: महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्यास अवघे दोन दिवस उरले आहेत. दुसरीकडे संभाव्य उमेदवारांकडून प्रचाराचा धडका सुरू आहे. पुणे महानगरपालिकेचे भाजपा निवडणुक प्रमुख गणेश बिडकर हे प्रभाग क्रमांक २४ कसबा गणपती – कमला नेहरू हॉस्पिटल – केईएम हॉस्पिटल प्रभागातून लढणार आहेत. बिडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयातून नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचे अविरतपणे काम सुरू असताना, दुसरीकडे गेल्या नऊ महिन्यांमध्ये जवळपास 60 हजारांच्यावर नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेत बिडकर यांनी संवाद साधला आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून बिडकर यांनी राबवलेले ‘नागरिक जनसंपर्क अभियान’ हे केवळ प्रचारापुरते मर्यादित न राहता, थेट जनतेच्या प्रश्नांशी जोडले गेले आहे. या कालावधीत त्यांनी ६० हजारांहून अधिक नागरिकांशी प्रत्यक्ष भेट घेऊन संवाद साधत, प्रभागातील समस्या, अपेक्षा आणि नागरिकांच्या सूचना जाणून घेतला आहे. दररोज किमान ६० ते ७० घरे आणि २५० ते ३५० नागरिकांना भेटण्याचा शिस्तबद्ध कार्यक्रम राबवण्यात येत असून, या अभियानात पत्नी गौरी बिडकर आणि कन्या पूर्वा यांचाही सक्रीय सहभाग आहे. त्यामुळे हा जनसंपर्क केवळ राजकीय न राहता, विश्वास आणि आपुलकीचा संवाद ठरत असल्याचे चित्र आहे. प्रभागातील पाणी, आरोग्य, रस्ते, स्वच्छता, प्रशासकीय अडचणी अशा मूलभूत प्रश्नांवर नागरिकांशी थेट चर्चा करून, त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याचा प्रयत्न या अभियानातून केला जात आहे. त्यामुळे बिडकर यांची “निवडणुकीच्या वेळी दिसणारे उमेदवार” नव्हे, तर सातत्याने नागरिकांमध्ये राहणारे लोकप्रतिनिधी अशी ओळख आणखीन अधोरेखित झाली आहे. याबद्दल बोलताना गणेश बिडकर म्हणाले, “नागरिकांना भेटतो, तेव्हा त्यांच्याकडून मला माझ्या कामाचा थेट फीडबॅक मिळतो. तो माझ्यासाठी सगळ्यात मूल्यवान असतो. नागरिक आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्यामध्ये पारदर्शकता हवी, असे मी मानतो. त्यामुळे आत्तापर्यंत ज्यांना ज्यांना भेटलो आहे, त्यांच्याकडून मिळालेल्या प्रतिक्रिया ऐकून आपले काम नागरिकांपर्यंत पोहोचलेले आहे, याचे समाधान आहे”.

मोठा निर्णय! ९ जानेवारीपासून श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात विकासकामांसाठी तीन महिने दर्शन बंद राहणार

0
Newaworldmarathi Pune : महाराष्ट्र शासनाकडून १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. या आराखड्यातील महत्त्वाच्या टप्प्यांची अंमलबजावणी आणि प्रत्यक्ष बांधकामाच्या काळात भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याच्या उद्देशाने ९ जानेवारी २०२६ पासून पुढील तीन महिन्यांसाठी मंदिर दर्शन तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, महाशिवरात्रीचा कालावधी १२ फेब्रुवारी २०२६ ते १८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे. २३ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा प्रशासन, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान संस्थान, विश्वस्त, स्थानिक दुकानदार आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या संयुक्त बैठकीत सविस्तर चर्चा करून सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. विकास आराखड्यानुसार सभामंडप व पायरी मार्गाचे नव्याने बांधकाम करण्यात येणार असून, भाविकांच्या सुरक्षितता, सोयी-सुविधा आणि गर्दी व्यवस्थापनावर विशेष भर देण्यात येणार आहे. यासाठी जुना सभामंडप हटवून संरचनात्मक व स्थापत्य स्वरूपाची मोठ्या प्रमाणावर कामे केली जाणार आहेत. सन २०२७ मध्ये त्र्यंबकेश्वर-नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, कुंभकाळात भीमाशंकर येथे मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक पायाभूत सुविधा, सुरक्षित प्रवेश-निर्गमन व्यवस्था आणि गर्दी नियंत्रणाची कामे वेळेत पूर्ण करणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. दर्शन बंद असले तरी मंदिरातील नित्य पूजा, अभिषेक व धार्मिक विधी परंपरेनुसार सुरू राहतील. या कालावधीत मंदिर परिसरात प्रवेश व प्रत्यक्ष दर्शन सेवा उपलब्ध राहणार नाही. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी भाविक व नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
“श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराचा विकास हा दीर्घकालीन सुरक्षितता, सुविधा आणि भाविकांच्या सोयीसाठी अत्यंत आवश्यक आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही कामे नियोजनबद्ध व वेळेत पूर्ण करण्यासाठी मंदिर तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय मंदीर संस्थानने घेतलेला असून भाविकांनी व स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासन यांना पूर्ण सहकार्य करावे.”
-जितेंद्र डूडी, जिल्हाधिकारी

घड्याळाच्या अटीमुळे राष्ट्रवादीत दुरावा; अजित पवार–शरद पवार युती फिस्कटली, शरद पवार गटाची महाविकास आघाडीशी पुन्हा जवळीक

0
Newaworldmarathi Pune: पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटप आणि निवडणूक चिन्हावरून मतभेद झाल्याने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातील संभाव्य युती अखेर फिस्कटली आहे. त्यामुळे शरद पवार गटाने पुन्हा एकदा महाविकास आघाडीसोबत चर्चा सुरू केली असून पुण्यात भाजपविरोधात व्यापक आघाडी उभी राहण्याची चिन्हे दिसत आहेत. शुक्रवारी दुपारी दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची जागावाटपासाठी बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार गटाकडून शरद पवार गटाला केवळ ३५ जागा देण्याचा प्रस्ताव आणि ‘घड्याळ’ या निवडणूक चिन्हावरच निवडणूक लढवण्याची अट घालण्यात आली. ही अट पक्षाच्या स्वतंत्र अस्तित्वाला धोका पोहोचवणारी असल्याचे सांगत शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीतून बाहेर पडत युतीला नकार दिला. त्यामुळे जागावाटप आणि चिन्हावरून मतभेद उफाळून आल्याने युती तुटल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत रास्ता पेठेतील शांताई हॉटेल येथे महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक सुरू होती. या बैठकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षासह समविचारी पक्ष एकत्र येऊन भाजपविरोधात लढण्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. २०२६ च्या महापालिका निवडणुकीत भाजपविरोधात जोरदार रणसंग्राम उभा करण्यासाठी पुण्यात सर्वपक्षीय आघाडीच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपने आधीच अजित पवार गटासोबतची युती तोडून मैत्रीपूर्ण निवडणुकीची घोषणा केली होती. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. मात्र, काँग्रेसने अजित पवार गटाशी युती नको अशी ठाम भूमिका घेतल्याने परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आणि अखेर घड्याळाच्या अटीवरून युतीला पूर्णविराम मिळाला.

ॲड. राजश्री अडसूळ यांना नागरिकांचा पाठिंबा; प्रभाग ७ मध्ये काँग्रेसला बळ

0
Newaworldmarathi Pune: प्रभाग क्रमांक ७ मध्ये काँग्रेसच्या ॲड. राजश्री अडसूळ यांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रभागात प्रत्यक्ष भेटीगाठी सुरू केल्या असून, नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, समस्या आणि अपेक्षा जाणून घेत आहेत. या भेटीदरम्यान स्थानिक नागरिकांकडून त्यांचे स्वागत केले जात असून, सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ॲड. राजश्री अडसूळ या प्रभाग क्रमांक ७ मधून काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवार म्हणून पुढे येत असून, गेल्या अनेक वर्षांपासून त्या काँग्रेस पक्षासाठी सातत्याने कार्यरत आहेत. संघटनात्मक काम, सामाजिक उपक्रम तसेच नागरिकांच्या प्रश्नांबाबतची त्यांची भूमिका यामुळे त्या प्रभागात ओळखीचे आणि विश्वासार्ह नाव ठरल्या आहेत. पक्षाच्या विविध आंदोलनांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला असून, तळागाळातील कार्यकर्त्यांशी त्यांचा थेट संपर्क कायम आहे. प्रभागातील नागरिकांशी संवाद साधताना मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य आणि महिला प्रश्न यांसारख्या मुद्द्यांवर नागरिक आपली मते मांडत आहेत. या सर्व मुद्द्यांची नोंद घेऊन भविष्यात महापालिकेत प्रभावीपणे मांडण्याचा निर्धार ॲड. अडसूळ यांनी व्यक्त केला आहे. नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक ७ मध्ये काँग्रेसला बळ मिळत असल्याचे संकेत मिळत असून, आगामी निवडणुकीच्या दृष्टीने ही घडामोड महत्त्वाची मानली जात आहे.

पुण्यातील भाजप–शिवसेना युतीचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात; फडणवीस–सामंत भेटीची गणेश बिडकरांची पोस्ट चर्चेत

Newsworldmarathi Pune: पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांची युती जवळपास निश्चित झाल्याचे संकेत मिळत आहेत. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे नेते तथा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत युतीबाबत अंतिम चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे पुढील काही तासांत युतीची तसेच दोन्ही पक्षांतील जागावाटपाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पुणे भाजपचे निवडणूक पोस्ट प्रमुख गणेश बिडकर यांनी सोशल मीडियावर टाकलेली एक पोस्ट सध्या जोरदार चर्चेत आहे. या पोस्टमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री उदय सामंत आणि स्वतः गणेश बिडकर एकत्र दिसत आहेत. या फोटोमुळे पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप–शिवसेना युतीला अंतिम रूप दिले गेल्याचा अंदाज बांधला जात आहे. गणेश बिडकर यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उदय सामंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. यावेळी भाजपचे गणेश बिडकर आणि शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांचीही उपस्थिती आहे. उदय सामंत यांच्याकडे शिवसेनेची पुण्याची जबाबदारी असून, राहुल शेवाळे हे मुंबईतील युतीच्या चर्चांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. तर पुण्यातील युतीच्या समन्वयाची जबाबदारी भाजपकडून गणेश बिडकर यांच्याकडे असल्याचे सांगितले जाते. या सर्व घडामोडींमुळे पुण्यातील भाजप–शिवसेना युतीवर मुंबईत शिक्कामोर्तब झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत असून, राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. गुरुवारी दुपारी आमदार नीलम गो-हे यांची भेट घेतल्यानंतर बिडकर हे मुंबईला रवाना झाले होते. त्यामुळे आता युतीची अंतिम चर्चा ही मुंबईत स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होताना दिसत आहे. युतीच्या कोणत्या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब होणार हे आता अवघ्या काही तासातच स्पष्ट होईल असे या फोटोवरून दिसत आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री सामंत यांच्या चर्चेनंतर शिवसेनेची जागा वाटपाबद्दलची नाराजी देखील दूर झाली असल्याचे सांगितले जाते.

संजय राऊतांनी हिंदुत्वाबद्दल ऊर बडवणे थांबवावे; भाजपाचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची टीका

0
Newsworldmarathi pune: वंदनीय हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार केला. उद्धव ठाकरेंनी अजान स्पर्धा, नमाज पठण स्पर्धेचे आयोजन केले, मुंबईत मराठी भवन बाजूला उर्दू भवन निर्मिती करणे, राशिद मामूला पक्षात प्रवेश दिला हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. मतांसाठी इतकी लाचारी करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी आणि संजय राऊतांनी आता हिंदुत्वाबद्दल ऊर बडवणे थांबवावे, असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी शुक्रवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठी माणसाला बेदम मारहाण करणे, खिचडी घोटाळ्यासारखे असंख्य घोटाळे करणे, पत्रा चाळ घोटाळा करून मराठी माणसाला बेघर करणे हे राऊतांचे हिंदुत्व आहे का असा प्रहारही बन यांनी केला. यावेळी बन म्हणाले की, भाजपाचे हिंदुत्व हे सर्वांनी पाहिले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी हिंदुत्वाचा गजर आणि त्यासोबतच विकास या धोरणानुसार काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने राम मंदिर बांधले, 370 कलम हटवून दाखवले. सामान्य माणसाला हिंदुत्वाचे रक्षण कोण करत आहे हे चांगलेच ठाऊक आहे. नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुका यांच्या निकालानंतर संजय राऊत यांनी पराभवाच्या भीतीतून रोज उठून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर तथ्यहीन आरोप करणे सुरू केले असून त्यांच्या अस्वस्थतेचा हा स्पष्ट पुरावा आहे अशी बोचरी टीकाही श्री. बन यांनी केली. भाजपासोबत युतीत असलेले लोकंच भाजपाचा पराभव करण्यास इच्छुक असल्याचे बिनबुडाचे वक्तव्य करणा-या राऊतांना लक्ष्य करत बन यांनी संजय राऊतांना खडे बोल सुनावले. नगर पालिका, नगर पंचायत निवडणुकांमध्ये मतदारांनी उबाठा गटाचे पानीपत केले आहे. याच निवडणुकीत भाजपा आणि संपूर्ण महायुतीने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या पाठीशी राज्यातील 14 कोटी जनतेचे कायम आशीर्वाद आहेत. कोणी कितीही बाष्कळ आरोप केले तरी मुंबईचा विकास फडणवीस आणि महायुती सरकारच करू शकते हा विश्वास जनतेला असल्याने मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा, महायुतीचाच विजय होईल, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला. गुंडांची भाषा राऊतांना शोभत नाही असा घणाघात करत बन म्हणाले की जे स्वत: गुंडागर्दी,दहशतवाद, यंत्रणेचा गैरवापर करत होते, रोज 100 कोटींची वसुली करत होते, गुंडांना अभय देत होते तेच आज वायफळ बडबड करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमध्ये गुंडगीरीला थारा नाही. आरोपींना कठोर शासन होते. देवेंद्रजींचे हे सरकार आहे, कुणाचाही मुलगा फरार असेल किंवा कुणावरही गुन्हा दाखल असेल तर त्याच्यावर निश्चितपणे कारवाई होईल. हे कायद्याच राज्य आहे आणि कायदा सर्वांसाठी समान आहे हेच भाजपा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचे धोरण असल्याचेही त्यांनी नमूद केले . राऊतांनी महाराष्ट्र पोलीसांचा अपमान केला“पोलीस यंत्रणा ही खाकी वर्दीतली भाजपाची टोळी आहे” या राऊतांच्या आरोपाचा समाचार घेत श्री. बन म्हणाले की राज्यातील जनतेचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अहोरात्र कार्यरत असतात त्या पोलीसांचा राऊतांनी घोर अपमान केला आहे .पोलीसांचा हा अपमान जनताही विसरणार नाही. उद्धव ठाकरे यांनीही पोलीसांना याआधी घरगडी संबोधले होते याचीही आठवण बन यांनी करून दिली राऊत हेच नशाबाज आणि दगाबाजनशेबाजी आणि दगाबाजीचा इतिहास हा उबाठा गटाचा आणि राऊतांचा आहे असा प्रहार बन यांनी केला. रोज सकाळी उठून नशा चढल्यागत बाष्कळ बडबड, आरोप पत्रकारांसमोर केले जातात. 2019 साली भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसून दगाबाजी कोणी केली हे सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे नशेबाजीवर बोलण्याचा नैतिक अधिकार उबाठाला नाही अशी बोचरी टीका बन यांनी केली. सातारा प्रकरणात एकनाथ शिंदेंचा संबंध नाही चौकशीअंती सातारा प्रकरणामध्ये मध्ये कुठेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संबंध आढळला नाही. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्टपणे सांगितले आहे की या प्रकरणात शिंदेचा काहीही संबंध नाही तरीही बादरायण संबंध जोडून एकनाथ शिंदे यांची बदनामी केली जात आहे. ‘खोटे बोला आणि रेटून बोला’ या धोरणानुसार बिनबुडाचे आरोप करत राजकीय खेळी खेळली जात असल्याची टीका बन यांनी केली.

जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटर च्या वतीने आयोजित ZEMO Chess Nuts Series

0
Newaworldmarathi Pune: जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटरच्या वतीने आयोजित ZEMO Chess Nuts Series – पुणे आवृत्ती ही अखिल भारतीय दर्जाची बुद्धिबळ स्पर्धा पुण्यात यशस्वीरित्या पार पडली. या स्पर्धेत देशभरातील उत्कृष्ट बुद्धिबळ खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेत भारतातील विविध राज्यांमधून २२५ पेक्षा अधिक खेळाडूंनी भाग घेतला. त्यामुळे ही स्पर्धा परिसरातील अत्यंत दर्जेदार आणि प्रतिष्ठित बुद्धिबळ स्पर्धांपैकी एक ठरली. या स्पर्धेत सर्व गटांमध्ये चुरशीचे सामने पाहायला मिळाले. खेळाडूंनी रणनीती, शिस्त आणि क्रीडाभावना यांचे उत्कृष्ट दर्शन घडवले. ही स्पर्धा जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटर येथे पार पडली. अत्याधुनिक सुविधा, प्रशस्त खेळण्याची जागा, योग्य प्रकाशयोजना आणि खेळाडूंना अनुकूल वातावरण यामुळे स्पर्धेचे आयोजन अतिशय सुरळीत झाले आणि सहभागी खेळाडूंना उत्तम अनुभव मिळाला. ZEMO Chess Nuts Series ही एक अखिल भारतीय पातळीवरील बुद्धिबळ स्पर्धा मालिका म्हणून विकसित केली जात आहे. पुणे आवृत्ती ही या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या मालिकेचा उद्देश विविध वयोगटांतील आणि रेटिंग स्तरांतील खेळाडूंना एक शिस्तबद्ध, पारदर्शक आणि दर्जेदार स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. या स्पर्धेचे आयोजन Sports Reconnect या क्रीडा आयोजन व्यवस्थापन संस्थेने केले. गेल्या दहा वर्षांहून अधिक काळापासून ही संस्था विविध क्रीडा प्रकारांमध्ये मोठ्या आणि व्यावसायिक दर्जाच्या स्पर्धा यशस्वीपणे आयोजित करत आहे. या आयोजनासाठी ZEMO या क्रीडा-तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मचे सहकार्य लाभले. ZEMO हे स्पर्धा व्यवस्थापन, डेटा-आधारित प्रणाली आणि खेळाडूंचा एकूण अनुभव सुधारण्यासाठी काम करते. पुणे आवृत्तीच्या यशस्वी आयोजनामुळे भारतातील स्पर्धात्मक बुद्धिबळ क्षेत्र अधिक बळकट करण्यासाठी आयोजक आणि सहकार्य संस्थांची बांधिलकी अधोरेखित झाली आहे. तसेच, जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटर हे राष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळ तसेच इतर क्रीडा स्पर्धांसाठी एक प्राधान्याचे केंद्र म्हणून पुढे येत असल्याचेही यामुळे स्पष्ट झाले आहे. या स्पर्धेचे विजेते खालील प्रमाणे आहेत. 1)विक्रमादित्य कुलकर्णी (मुंबई) 2)अक्षज पाटील (पुणे) 3)अविरत चौहान (पुणे). या स्पर्धेच्या पुरस्काराच्या वेळी जयराज स्पोर्ट्स कन्वेंशन सेंटरचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ.राजेश शहा, जॉइंट मॅनेजिंग ट्रस्टी नैनेश नंदू ,ट्रस्टी विनोद देडिया, सीईओ अशोक सरकार आणि श्री पूना गुजराती बंधू समाज ट्रस्टचे सीईओ गिरीश घाटपांडे उपस्थित होते.

एकनिष्ठ कार्यकर्ता, संधीची वाट पाहतोय : सतीश बहिरट

0
Newsworldmarathi Pune: २०१७ साली झालेल्या पुणे महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून सतीश बहिरट यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ – वाकडेवाडी परिसरातून, म्हणजेच प्रभाग क्रमांक ७ मधून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या विनंतीला मान देत त्यांनी स्वतःचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. हा निर्णय त्यांनी कोणतीही नाराजी न दाखवता घेतला, ही बाब पक्षातील त्यांच्या एकनिष्ठतेचे प्रतीक मानली जाते. उमेदवारी मागे घेतल्यानंतरही सतीश बहिरट यांनी प्रचारापासून स्वतःला दूर ठेवले नाही. उलट, त्यांनी प्रभागातील सर्व भाजप उमेदवारांसाठी प्रभावीपणे प्रचार करत संघटन मजबूत करण्याचे काम केले. त्यांच्या मेहनतीचा परिणाम म्हणून संबंधित प्रभागात भाजपचे सर्व उमेदवार विजयी झाले. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात भाजपचा उच्च स्ट्राइक रेट राहण्यामागे बहिरट यांची निष्ठा, कार्यशैली आणि कार्यकर्त्यांशी असलेले सुसंवाद महत्त्वाचे ठरले. तरीदेखील, या दीर्घकालीन योगदानानंतरही सतीश बहिरट यांना पक्षाकडून कोणतीही मोठी जबाबदारी अथवा संधी मिळालेली नाही, अशी चर्चा पक्षांतर्गत सुरू आहे. आता आगामी महापालिका निवडणुकीत गोखलेनगर – वाकडेवाडी परिसरातून, म्हणजेच प्रभाग क्रमांक ७ मधून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. या प्रभागातील दोन जागा सर्वसाधारण खुल्या गटासाठी असल्याने बहिरट यांच्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे मानले जात आहे. वरिष्ठांचा शब्द पाळणाऱ्या आणि पक्षासाठी सातत्याने काम करणाऱ्या या एकनिष्ठ कार्यकर्त्याला यावेळी न्याय मिळणार का, याकडे पुण्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. बहिरट यांची उमेदवारी ही शहर पातळीवर चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.