Newsworldmarathi Mumbai: राज्यातील शेतकऱ्यांवरील आर्थिक बोजा कमी करण्यासाठी महसूल विभागाने आता केवळ २०० रुपये मोजणी शुल्क भरून जमिनीच्या हिस्सेवाटपाची (नोंदणीकृत वाटणीपत्र) मोजणी व नकाशे देण्याचा निर्णय घेतला आहे. महायुती सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यापूर्वी जमाबंदी आयुक्तांच्या आदेशानुसार मोजणीसाठी शुल्क आकारले जात होते. आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रक्रियेत मोठा बदल करत केवळ २०० रुपयांमध्ये मोजणी करून नकाशा देण्याचा निर्णय घेतला आहे.
महसूल विभागातील जमाबंदी आयुक्त आणि भूसंपादन संचालकांच्या बैठकीत हिस्सेवाटप मोजणीसाठी २०० रुपये शुल्कचा निर्णय अंतिम करण्यात आला. ही सेवा सर्वसामान्यांसाठी खुली राहणार आहे. ७/१२ अभिलेखांमध्ये वाटणी झाल्यानंतर त्यास अनुसरून पोट विषयांची मोजणी करणे, ही प्रक्रिया पूर्वी गुंतागुंतीची होती.
आता ती सुलभ, वेगवान आणि खर्चिकतेपासून मुक्त झाली आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील लाखो शेतकरी कुटुंबांना कायदेशीर जमीन वाटपाची प्रक्रिया सोप्या पद्धतीने पर्ण करता येणार आहे. तसेच हिस्सेवाटप मोजणी प्रक्रियेतील शुल्कात मोठ्या प्रमाणात कपात करणारा हा निर्णय, राज्यातील शेतकऱ्यांच्या फायद्याचा ठरणारा आहे, असे बावनकुळे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
या पूर्वी महसूल खात्याने जात प्रमाणपत्र, घरकुल बांधकामासाठी निःशुल्क वाळू, पाणंद रस्ते, ५०० रुपयाचे मुद्रांक शुल्क माफ, जमिनीचे जिओ टॅगिंग, तुकडाबंदी कायद्यात सुधारणा अनेक महत्वाचे निर्णय घेतले.
Newsworldmarathi Yavatmal : शहरातून एक धक्क्कादायक बातमी समोर आली आहे. १५ मे रोजी यवतमाळमधील चौसाळा जंगलात एक मृतदेह आढळला होता, त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. मात्र, मृतदेहामागील गूढ उकलण्यात यवतमाळ पोलिसांना यश आले आहे. मुख्याध्यापक पत्नीनेच पतीला विष देऊन खून केला. तसेच, विद्यार्थ्यांच्या मदतीने पहाटेच्या सुमारास जंगल परिसरात मृतदेह जाळल्याचा धक्कादायक खुलासा पोलिस तपासात झाला आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंतनू अरविंद देशमुख ( वय-३२, रा. सुयोगनगर) यांचा मृतदेह असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. शंतनू १३ मे च्या सायंकाळपासून बेपत्ता होते. ते सनराइज इंग्लिश मीडियम स्कूल येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. तर त्याच ठिकाणी त्यांची पत्नी निधी (वय- २३) ही मुख्याध्यापिका होती. त्या दोघांचा प्रेमविवाह असल्याने तो आई-वडिलांपासून विभक्त राहत होता.
दरम्यान, जंगलामध्ये मृतदेह मिळाल्याची माहिती पसरताच शंतनूसोबत बारमध्ये असणाऱ्या मित्रांमध्ये कुजबुज सुरू झाली. पोलिसांनी त्यांच्या मित्रांची चौकशी सुरू केली. त्यावेळी एका मित्राच्या मोबाइलमध्ये शंतनूचा १३ मे रोजीचा फोटो दिसला. त्याच्या अंगातील सदरा आणि मृतदेहाजवळील कापडाचा तुकडा हे दोन्ही सारखेच निदर्शनास आले होते. येथूनच पोलिस तपासाची दिशा निश्चित झाली.
मुख्य आरोपी पत्नी निधीने पोलिसांना गुंगारा दिला. मात्र, तिच्या घरात आढळलेली अंडरवेअर व मृतदेहाच्या अंगातील अंडरवेअर एकाच कंपनीची होती. त्यामुळे पोलिसांचा संशय आधिक बळावला गेला. निधीची कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी तिने हत्येचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. निधीला मृतदेह जाळण्यास मदत करणाऱ्या तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Newsworldmarathi Pune : पुण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकाच घरात रहात असताना अनैतिक संबंधाच्या संशयावरुन तरुणाच्या तोंडावर फळीने मारहाण करुन त्याचा खुन केल्याची घटना घडली आहे. ही घटना बिरदवडी येथे १३ मे रोजी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास घडली होती. बंटिसिंह नरेंद्रसिंह परमार (वय-३०, रा. बिरदवडी, ता. खेड) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे.
या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक हौसिराम पिराजी गाडेकर यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. रामबाबु रामनाथ जाटव (रा. शिवराज कॉम्प्लेक्स, बिरदवडी, ता. खेड, मुळ रा़ परसोदाता, भरेट, जि़ दतिया, मध्यप्रदेश) असे खून करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंटिसिंह आणि आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा रामबाबु याला संशय होता. पतिने घेतलेल्या संशयावरून दोघांमध्ये वाद सुरु झाला होता. रामबाबु याने बंटिसिंह परमार हा झोपलेला होता. त्यावेळी त्याने त्याच्या तोंडावर लाकडी फळीने मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी पळून गेली होती. ती परत आली़. तेव्हा बंटिसिंह याने रामबाबु जाटव याच्याशी ओळख पटवून ६ दिवसांपूर्वी तो त्यांच्याच घरी राहू लागला होता.
दरम्यान, त्यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा राग रामबाबू याच्या मनात होता. एके दिवशी याचाच राग मनात धरुन त्याने परमारला लाकडी फळीने मारहाण केली होती. त्यानंतर त्याने घरात फरशीवर पडलेले रक्ताचे डाग पुसून टाकून पुरावा नष्ट केला होता.
बंटिसिंह परमार याला जखमी अवस्थेत १३ मे रोजी रात्री उशिरा वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तो बेशुद्धावस्थेत होता. तेथून त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान १९ मे रोजी सकाळी पावणे बारा वाजता त्याचा मृत्यु झाला. ससून रुग्णालयाने अहवाल पाठविताना पहिल्या मजल्यावरुन पडल्यामुळे जखमी झाला, असे निदान दिले होते. तर, त्याला अगोदर वायसीएममध्ये दाखल करताना घरात भांडणात जखमी झाल्याचे म्हटले होते. दोन्ही रिपोर्टमधील विसंगती लक्षात घेऊन पोलिसांनी बिरदवडी येथील घरमालक तसेच आजूबाजूच्या परिसरात चौकशी केली.
बंटिसिंह याचा मृत्यु झाल्यानंतर तो पळून पुण्यातून गेला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली एक शोध पथक आरोपीचा शोध घेण्यासाठी मध्यप्रदेशात रवाना झाले आहे. पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.
Newsworldmarathi Pune : महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास आयुक्तालयाच्या वतीने आदिवासी विकास विभागातील पदभरतीसाठी सरळसेवा पद्धतीने घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. पुण्याच्या हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या प्रतिक्षा दुधाडे हिने राज्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावत या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
१७ पदनामांच्या एकूण ६११ रिक्त पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. अतिरिक्त आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर विभागांतर्गत गृहपाल (स्त्री) पदाकरीता झालेल्या लेखी परीक्षेत प्रतिक्षाने हे यश मिळविले आहे.
हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालयातून प्रतिक्षाने राज्यशास्त्र विषयात बी. ए. पदवी संपादन केली आहे. आपल्या या यशात महाविद्यालयीन पातळीवर प्राप्त झालेल्या आणि विशेषतः राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. नीता बोकील यांच्या मार्गदर्शनाचा विशेष वाटा असल्याचे तिने नमूद केले.
दि पूना गुजराती केळवणी मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजेश शहा, सचिव श्री. हेमंत मणियार आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र गुरव यांनी महाविद्यालयाच्या दृष्टीने ही अत्यंत अभिमानाची व गौरवास्पद बाब असल्याचे नमूद करत प्रतिक्षाचे अभिनंदन केले आहे.
Newsworldmarathi Mumbai: राज्यामध्ये आवश्यक तेवढा बियाण्याचा आणि खतांचा साठा उपलब्ध असून बियाणे आणि खते याचा कुठलाही तुटवडा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भासणार नाही. साधारणपणे मागील वर्षांचा कल पाहता कुठले पीक कुठे कमी-अधिक प्रमाणात घेता येईल, याचा विचार करूनच त्या ठिकाणी बियाण्यांची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे कृषी विभागाच्या राज्यस्तरीय खरीप हंगाम नियोजन आढावा बैठक मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. खरीप हंगाम आढावा बैठकीसंदर्भातआयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
बोगस बियाण्यांवर आळा घालण्यासाठी ‘साथी’ पोर्टल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बोगस बियाण्यांवर आळा घालण्यासाठी महाराष्ट्राने केंद्र शासनाच्या ‘साथी’ या पोर्टलवर बियाणे नोंदणी करण्याचा नियम केला आहे. या नोंदणीमुळे हे बियाणे ट्रेसेबल होणार आहे. बोगस बियाणांबाबत कठोर पावले उचलण्यात येत असून यावर्षीपासून सर्व बियाणांची माहिती’साथी’ या पोर्टलवर आणण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे., असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
खताच्या लिंकिंगबाबत कडक कारवाई
खतांच्या बाबतीत लिंकिंगची तक्रार सातत्याने येत असल्याचे सांगून मुख्यमंत्रीश्री. फडणवीस म्हणाले की, लिंकिंग संदर्भात अतिशय कडक निर्णय घेण्यात आलेला आहे. आता प्रत्येक कृषी केंद्राच्या बाहेर बोर्ड लावून त्यावर फोन नंबर देण्यात येणार आहे. त्यामुळे लिंकिंगचा आग्रह झाला तर त्यासंदर्भात त्या नंबरवर फोन केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.एखाद्या कृषी केंद्रांनी पुरवठादार कंपन्याच्या सूचनेवरून लिंकिंग केल्याचेनिष्पन्न झाल्यास अत्यावश्यक वस्तू कायदा किंवा तत्सम कायद्याच्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.
शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र – ‘महाविस्तार’ ॲप
कृषी विभागाने एआय बेस्ड ‘महाविस्तार’ हे मोबाईल ॲप लॉन्च केले असून या ॲपवर शेतीच्या संदर्भातली सगळी माहिती आणि व्हिडिओज उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांना शेतीतील लागवड, त्याची पद्धती, कीड व्यवस्थापन, त्याची पद्धती, कोणत्या टप्प्यावर काय वापरले पाहिजे, अशी सगळी माहिती, त्याचे व्हिडिओज त्या ॲपमध्ये आहेत. या ॲपमध्ये मराठी भाषेत चॅटबॉट असून त्यावर कुठलाही प्रश्न विचारला असता त्याला योग्य उत्तर मिळते. असा हा शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून शेतीसंदर्भातील सर्व माहिती मिळवावी, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
Newsworldmarathi Pune: भारतीय सेनेने पार पाडलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या यशस्वी मोहिमेनंतर पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतीय सेनेला सलाम करत भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. काँग्रेस भवन ते मंडई या मार्गावर ही उत्साहपूर्ण यात्रा पार पडली.
या तिरंगा यात्रेत काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. देशभक्तीपर गीतांच्या घोषात आणि तिरंग्यांच्या लाटेने संपूर्ण वातावरण राष्ट्रभक्तीने भारले होते.
Oplus_131072
या यात्रेचे नेतृत्व काँग्रेसचे महाराष्ट्र सहप्रभारी बी. एम. संदीप आणि पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले. भारतीय सेनेच्या धाडसाचे आणि त्यागाचे कौतुक करत उपस्थितांनी “जय हिंद”च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
अरविंद शिंदे यांनी यावेळी सांगितले की, भारतीय सेनेने केलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ हे आपल्या देशाच्या सुरक्षेचे प्रतीक आहे. त्यांचा सन्मान आणि गौरव करण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली आहे.
यावेळी बी. एम. संदीप यांनी देखील भारतीय सेनेचे मन:पूर्वक अभिनंदन करत, काँग्रेस पक्ष नेहमीच सैन्याच्या पाठीशी असल्याचे नमूद केले.
ही यात्रा शहराच्या मध्यवर्ती भागातून काढण्यात आली असून, नागरिकांनी ती उत्स्फूर्तपणे पाहिली व तिरंगा फडकावून अभिमान व्यक्त केला. या यात्रेमुळे देशभक्तीचा संदेश जनमानसात पोहोचल्याचे काँग्रेसने सांगितले.
Newsworldmarathi Pune: पुणे महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे आता नवल किशोर राम यांच्या हाती जाणार आहेत. राज्य सरकारने त्यांची अधिकृत नियुक्ती केली असून, ते ३१ मे रोजी आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारणार आहेत.
नवल किशोर राम हे 2003 बॅचचे आयएएस अधिकारी असून, याआधी ते पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी प्रशासनात प्रभावी निर्णयक्षमता दाखवत पुण्यातील विविध शासकीय कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
नुकतेच राम हे पंतप्रधान कार्यालयात कार्यरत होते. तिथून त्यांची पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे महापालिका ही राज्यातील एक महत्त्वाची महापालिका असून, येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयुक्तपदावर येणाऱ्या अधिकाऱ्याची भूमिका फारच निर्णायक ठरणार आहे.
नवल किशोर राम यांच्या प्रशासनातील अनुभवामुळे पुण्यातील शासकीय आणि नागरी कामकाजात गती येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Newsworldmarathi sambhajinagar : पोलिसांनी हेल्प लाईन तातडीने मदत मिळवण्यासाठी दिली आहे, मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये हेल्प लाईनवर फोन करुन मदत मागणाऱ्या एका व्यक्तीलाच पोलिस स्टेशनमध्ये नेऊन पोलिसांनी चोप दिल्याची घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील पुंडलिक नगर पोलीस स्टेशनमधील ही १८ मे रोजी घडलेली घटना आहे. जालन्याहून पुण्याला माल वाहतूक करणाऱ्या एका ट्रक चालकाचा चारचाकी गाडीने पाठलाग केला आणि धक्का लागल्याचं सांगत नुकसान भरपाईची मागणी केली. भयभीत झालेल्या ट्रक चालकाने पोलिसांच्या मदतीसाठी ११२ आपत्कालीन मदत क्रमांकावर संपर्क केला असता पोलिसांनी दोन्ही गाड्या पोलिस स्टेशनला नेल्या आणि त्यानंतर जे घडलं ते मदत मागणाऱ्या ट्रक चालकाला मदतीऐवजी संकटात टाकणारं होतं.
१८ मे रोजी गोरक्ष मिसाळ हे ट्रक चालक जालन्याहून पुण्याला अवजड माल घेऊन जात होते. रस्त्याने रात्री साडे ११ च्या सुमारास एका चारचाकी गाडीला त्यांची अवजड मालाची वाहतूक करणारी गाडी घासली आणि त्यानंतर ट्रक अडवली गेली. चार चाकी गाडीमध्ये चार ते पाच जण होते आणि त्यांच्याकडून नुकसान भरपाईची मागणी करत शिवीगाळही करण्यात आली. गोरक्ष मिसाळ यांनी मारहाणीच्या भीतीपोटी ११२ या संपर्क क्रमांकावर फोन करुन पोलिसांना बोलावून घेतलं. पण पोलिसांनी मदत करण्याऐवजी भलतंच केलं. पुंडलिक नगर पोलीस स्टेशनचे पीएसआय रेशिम कोळेकर यांनी नुकसान भरपाई दे अन्यथा तुझ्यावर गुन्हा दाखल करु अशी धमकी दिली. गोरक्ष मिसाळ यांनी विनंती केली की साहेब मी तुम्हाला मदत मागितली आहे आणि उलट माझ्यावरच गुन्हा का दाखल करताय. संबंधित गाडीचे नुकसान झाले असेल तर ती नुकसान भरपाई देण्याची माझी तयारी आहे आणि इन्शुरन्स कंपनीकडून ही भरपाई दिली जाईल याची हमी मी स्वतः घेतो. मात्र तू जास्त बोलतोय असं म्हणत गोरक्ष मिसाळ यांना मारहाण करण्यात आली, शिवाय ते दारु पिलेले आहेत, असा आरोपही संबंधीत पोलीस उपनिरीक्षकाने केला. चालकाने मारहाण झाल्यानंतर घाटी रुग्णालय गाठलं आणि अल्कोहोल चाचणी करण्याची मागणी केली. मात्र पोलिसांच्या परवानगीशिवाय आम्ही दारु प्यायला आहात की नाही हे तपासू शकत नाही, असं स्पष्टीकरण डॉक्टरांकडून करण्यात आलं. मदत मागितल्यानंतर अडचणीत सापडलेल्या गोरक्ष मिसाळ यांनी आता या प्रकरणाची थेट पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.
गोरक्ष मिसाळ यांच्याविरोधात चारचाकी चालवणाऱ्या व्यक्तीने तक्रार केली असून मिसाळ यांनी घाटीमध्ये मारहाणीनंतर उपचार घेतले आहेत. दारु प्यायल्याची चाचणी करण्यासाठी आजही माझी तयारी आहे, मात्र संबंधित पोलीस उपनिरीक्षकावरती कारवाई करावी आणि पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासावं, अशी विनंती तक्रार अर्जाद्वारे संबंधित ट्रक चालकाने पोलीस आयुक्तांकडे केली आहे. याशिवाय गोरक्ष मिसाळ यांची ट्रकही गेल्या तीन दिवसांपासून अडवून ठेवण्यात आली आहे. ही ओव्हरलोडची केस असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र ओव्हरलोडवर कारवाई करण्याचा अधिकार मोटर वाहन कायद्यानुसार संबंधित प्रादेशिक परिवनह अधिकाऱ्याकडे आहे. काटा केल्यानंतर वाहनावर ओव्हरलोडची कारवाई केली जाते. मात्र पोलिसांनी अवैधपणे गाडी अडवून मौल्यवान मालाचं नुकसान केलं जात असल्याचा आरोप चालकाने केलाय.
Newsworldmarathi Pune: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते राजेंद्र हगवणे यांच्या सूने वैष्णवी हगवणेच्या मृत्यूने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली आहे. वैष्णवीने आत्महत्या केली, असा दावा केला जात असतानाच तिच्या कुटुंबीयांनी तिला आत्महत्या करायला लावण्यात आले नसून तिचा खून करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे.
दरम्यान, वैष्णवी हगवणेची एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, त्यावरून वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. या ऑडिओमध्ये वैष्णवी म्हणते, “लग्न करून मी चूक केली. ताई म्हणाली की मी तुझी सगळीकडे बदनामी करते, जे केलं नाही तेही सगळ्यांना सांगते. शशांकसोबत तू कधी लॉयल नव्हती, असंही तिने मला सुनावलं. ताई मला ‘फालतू, घणेरडी’ अशा शब्दांत बोलली.”
पुढे वैष्णवी सांगते, “मला मारताना दाजी बघत होते, आणि त्यांनीही माझ्यावर हात उचलला. त्यांनाही ते खरं वाटतंय. त्यामुळे मी त्या माणसाला घटस्फोट देणार आहे, असं मी पप्पांना सांगितलं. पप्पांनीही आपण यावर विचार करू, असं सांगितलं होतं.”
या क्लिपमधून वैष्णवीवर सासरच्या मंडळींकडून झालेला मानसिक आणि शारीरिक छळ स्पष्ट होत असल्याचे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही आत्महत्या नसून सुनियोजित खून आहे, असा त्यांचा आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणात शशांक हगवणे, त्याची आई लता आणि बहीण करिष्मा यांना अटक केली असून, राजेंद्र हगवणे व त्यांचा मुलगा सुशील सध्या फरार आहेत.
पोलिस तपास सुरू असून, ऑडिओ क्लिपच्या सत्यतेचीही चौकशी केली जात आहे.
Newsworldmarathi Pune: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते राजेंद्र हगवणे यांच्या सूने वैष्णवी हगवणेच्या मृत्यूमागे आत्महत्या नसून खून झाल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. वैष्णवीने १६ मे रोजी गळफास घेतल्याचे प्रथम सांगण्यात आले होते, मात्र तिच्या मृतदेहावर आढळलेल्या जखमा आणि शवविच्छेदन अहवालामुळे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.
बी.जे. हॉस्पिटलच्या अहवालानुसार, वैष्णवीचा मृत्यू गळ्यावरील फासामुळे झाला असून, तिच्या शरीरावर धारदार वस्तूने मारहाण केल्याच्या अनेक खुणा आढळल्या आहेत. याआधी २७ नोव्हेंबर २०२३ रोजीही वैष्णवीने छळाला कंटाळून विष घेण्याचा प्रयत्न केला होता.
वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर राजेंद्र हगवणे आणि त्यांचा दुसरा मुलगा सुशील हगवणे हे फरार आहेत.
प्रकरणातील एक ऑडिओ क्लिप समोर आली असून, त्यात वैष्णवीने मैत्रिणीला सतत होणारा मानसिक छळ, चारित्र्यावरचे आरोप आणि हुंड्यासाठी होणारी मागणी याबाबत सांगितले आहे. शशांक हगवणे याने वैष्णवीच्या वडिलांकडे २ कोटी रुपये मागितल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
पैसे न दिल्यामुळे वैष्णवीला धमकावण्यात आले आणि तिला माहेरी पाठवण्यात आले होते. काही दिवसांनंतर ती पुन्हा सासरी परतली, पण छळ कायम राहिला. अखेर १६ मे रोजी ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आली आणि डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.