दहावी-बारावी निकाल १५ मेपर्यंत जाहीर होणार

Newsworldmarathi Pune : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सुरुवातीला हे निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागतील, अशी अपेक्षा होती. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार, बारावीचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शेवटच्या टप्प्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहावी आणि बारावीचे निकाल १५ मेपर्यंत नक्की जाहीर करण्यात येणार आहेत. यंदा लेखी परीक्षा दरवर्षीपेक्षा दहा दिवस लवकर घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे निकालही लवकर लागणार असून, विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रम आणि करिअरच्या योजना करण्यासाठी अधिक वेळ मिळेल. बारावीच्या परीक्षा ११ फेब्रुवारीपासून, तर दहावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू झाल्या होत्या. सध्या सर्व विभागीय मंडळांचे निकाल एकत्र करून त्याचा अंतिम आढावा घेतला जात आहे. बारावीचा निकाल ५ मे ते १० मेदरम्यान, तर दहावीचा निकाल १५ मेपर्यंत लागेल, असे सांगण्यात आले आहे

आनंदाची बातमी …! लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिलचा हप्ता जमा होण्यास सुरुवात

Newsworldmarathi Mumbai : विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना मानली जाणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गुंडाळणार अशी विरोधकांची ओरड असताना राज्य सरकारने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता ४१० कोटी रुपयांचा निधी योजनेसाठी मंजूर केला आहे. शासकीय धोरण लक्षात घेऊन नियंत्रक अधिकारी यांनी निधी खर्च करताना काटकसरीच्या उपाययोजना आखून खर्च करावा, असे निर्देश देखील महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आले आहेत. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे. पुढील २ ते ३ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल. तसेच की, या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे.” असं मंत्री अदिती तटकरे यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे. दरम्यान, योजनेचे निकष डावलून योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची छाननी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तब्बल ५० हजार महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ स्वतःहून सोडला. विरोधकांनी यावरून राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. तसेच कालांतराने ही योजना बंद करण्याचा सरकार डाव असल्याचा आरोपदेखील करण्यात आला. शिवाय लाडक्या बहिणीला अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर १५०० रुपयांचा हप्ता देण्याची घोषणाही हवेत विरली. लाडक्या बहिणींनी यानंतर नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली. अखेर महिला व बालविकास विभागाने आर्थिक वर्षाकरिता ४१०.३० कोटी रुपयांच्या निधी खर्चाच्या प्रस्तावाला मान्यता दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात विशेष घटक योजना, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तसेच ३१ सहाय्यक अनुदाने (वेतनेतर) खर्चासाठी ३९६० कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

अखेर पुणे शहरात पाणी कपात… जाणून घ्या कोणत्या भागात कधी होणार पाणी कपात

Newsworldmarathi Pune : तापमानाचा पारा ४०च्या वर गेल्या शहरात पाण्याची मागणी २५ टक्के पेक्षा अधिक वाढली आहे. त्यातच, धरणातून शहरातील उचलण्यात येणारे पाणी मर्यादीत असल्याने पाण्याच्या मागणी एवढा पुरवठा करणे शक्य नसल्याने महापालिकेकडून अखेर शहरात पाण्याची कपात करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. दक्षिण पुण्यातील कात्रज, आंबेगाव, धायरी, सिंहगड रस्ता परिसरापासून ही सुरूवात करण्यात आली आहे. या भागात आता आठवडयातून एक दिवस पाणी बंद ठेवले जाणार आहे. या परिसरात महापालिकेच्या वडगाव जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र, उपलब्ध असलेले पाणी कमी पडत असल्याने कात्रज परिसरात मोठया प्रमाणात पाणी पुरवठा विस्कळीत झाला असल्याने सर्व भागात पुरेसे पाणी देण्यासाठी आठवडयातून एक दिवस पाणी बंद ठेवले जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या सोमवार (दि,५ मे) पासून केली जाणार आहे. या भागात चक्राकार पध्दतीने पाणी दिले जाणार आहे. वार आणि पाणी पुरवठा बंद असणारा भाग सोमवार बालाजीनगर : बालाजीनगर, श्रीहरी सोसयाटी,गुरूदत्त सोसायटी, साईकृपा सोसायटी, सर्वे नं २३, गुलमोहर सोसायटी, पवार हॉस्पीटल परिसर कात्रज : उत्कर्ष सोसायटी परिसर, गुजर वस्ती, कात्रज तलावा लगतचा पूर्व भाग, चौधरी गोठा कोंढवा : साईनगर, गजानन महाराज नगर, शांतीनगर सोसायटी, महानंदा सोसायटी, सावंत कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी. मंगळवार सनसिटी : सनसिटी संपूर्ण, माणिकबाग, सनसिटी परिसर, समर्थ नगर, महालक्ष्मी सोसायटी, मधुकर हॉस्पीटल परिसर, विठ्ठलवाडी, विठठलनगर जुनी धायरी : संपूर्ण जुनी धायरी, उज्वल टेरेस, बारंगणी मळा, दळवीवाडी, पारी कंपनी रस्ता कात्रज : राजस सोसायटी परिसर, निरंजन सोसायटी, कमला सिटी, स्टेट बँक सोसायटी, नवीन पोस्ट आफिसचा भाग कोंढवा : कामठे पाटील नगर, खडीमशिन चौक, सिंहगड कॉलेज, हब टाऊन सोसायटी, कोलते पाटील सोसायटी, प्रभाग ३७ बुधवार वडगाव हिंगणे : वडगाव बुद्रूक, वडगाव हिंगणे, पेरूची बाग, धावडी, जाधवनगर, वडगाव गावठाण, जाधवनगर, खोरड वस्ती, सुदत्त संकूल, समर्थ नगर, संतोष मागील परिसर, हिंगणे, महादेवनगर, आंनद विहार, राजीव गांधी वसाहत कात्रज : वघजाईनगर, भांडेआळी, सुखदा-वरदा सोसायटी, सम्राट टॉवर, आंबामाता मंदीर पाठीमागील परिसर. शिवशंभोनगर गल्ली १, माऊलीनगर, सिल्वहर ओक सोसायटी, बलकवडे नगर कोंढवा : सुखसागर नगर २, शिवशंभोनगर ( कात्रज- कोंढवा रस्ता) स्वामी समर्थ नगर गुरुवार धनकवडी : सर्वे नं. २,३ धनकवडी गावठाण, बाळकृष्ण सोसायटी, सौदागर सोसायटी, राजमुद्रा सोसायटी, चित्तविहारी सोसायटी, अक्षयनगर, दौलतनगर, कलानगर, गुलाबनगर, चैतन्यनगर, सर्वे. नं. ३४,३५,३६, ३७सह्याद्रीनगर, आदर्शनगर, प्रतिभानगर तळजाई पठार सर्व्हे नं.४,५,७,८, गणेशदत्त सोसायटी, टिळकनगर, सावरकर सोसायटी, आंबेडकर वसाहत, ग्रीन पार्क, अविष्कार सोसायटी, सन्मित्र सोसायटी, सागर सोसायटी, सहकारनगर भाग १, दाते बसस्टॉप कात्रज : सुखसागरनगर भाग १, मॅजेस्टीक टॉवर, रोहितदास महाराज मठ, शिवशंभोनगर, स्वामी समर्थनगर (डोंगर भाग) निलया सोसायटी, महादेवनगर भाग – २. कोंढवा : सावकाशनगर, काकडे वस्ती, शिवशंभोनगर (काकडे वस्तीचा भाग) गोकुळनगर (रस्त्याचा व डोंगर भाग), वृंदावननगर. शुक्रवार आंबेगाव पठार : आंबेगाव पठार सर्वे नं. १५ ते सर्वे नं. ३०, महाराणा प्रताप चौक, सर्वे नं. १७ ते दत्तनगर भुयारी मार्ग, चंद्रभागानगर, त्रिमूर्ती चौक, भारती विहार सोसायटी, भारती विद्यापीठ मागील संपूर्ण परिसर कात्रज : वसवडेनगर, पोलीस कॉलनी, जाधवनगर, जोगेश्वरीनगर, मोरे-निंबाळकर वस्ती, भारतनगर, दत्तनगर. आगम मंदिर संतोषनगर अन्जलीनगर, दत्तनगर, जांभूळवाडी रस्ता, दत्तनगर, वंडर सिटी परिसर, साईनगर कोंढवाः कोंढवा बु. (गावठाण), वटेश्वर मंदिर, भोलेनाथ फर्निचर, हिल व्यू सोसायटी, मरळ नगर, कांतिन अपार्टमेंट, विष्णू ठोसरनगर, कोंढवा बु. (भाऊ कामठे गल्ली) कपिलनगर, लक्ष्मीनगर संपूर्ण. आचल फार्म शनिवार कात्रज :, कात्रज गाव, गुजरवाडी फाटा, अखील नवीन वसाहत कात्रज कोंढवा : राजीवगांधी वसाहत संर्पूण, चैत्रबन वसाहत, कुष्णनगर, झांबरे वस्ती, ग्रीन पार्क, अजमेरा पार्क, काकडेवस्ती गल्ली क्रमांक १ शिवशक्ती नगर, अशरफ नगर गल्ली क्रमांक ७,८ आणि ११ कोंढवा : राजीवगांधी वसाहत संर्पूण, चैत्रबन वसाहत, कुष्णनगर, झांबरे वस्ती, ग्रीन पार्क, अजमेरा पार्क, काकडेवस्ती गल्ली क्रमांक १ शिवशक्ती नगर, अशरफ नगर गल्ली क्रमांक ७,८ आणि ११ रविवार कात्रज : महादेवनगर भाग १, आनंद नगर, विद्या नगर, महावीर नगर कोंढवा : शिवप्लाझा पिसोळी रस्ता, एच अॅड एम सोसायटी, पारगे नगर, १५ नंबर, आंबेडकर नगर संपूर्ण, पुण्यधाम आश्रम रस्ता, हगवणे नगर, अशरफ नगर पूर्ण

प्रशांत दराडे यांना छत्रपतीची उमेदवारी एक निष्ठेच फळ

Newsworldmarathi Baramati: श्री छत्रपती सहकारी कारखाना भवानीनगर या ठिकाणी प्रशांत दराडे यांना पृथ्वीराज जाचक यांनी उमेदवारी देऊन त्यांच्यावरती विश्वास दाखवला आहे. शेतकरी कुटुंबातील प्रशांत दराडे यांना ही संधी दिल्याने जाचक यांचे कौतुक करण्यात येत आहे. श्री छत्रपती साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्यात समन्वय साधत ‘श्री जय भवानी माता’ सर्वपक्षीय पॅनल जाहीर करण्यात आला. लासुर्णे, सणसर, उद्धट, अंथुर्णे, सोनगाव व गुणवडी या गटांमधून प्रत्येकी दोन ते तीन उमेदवार तर ‘ब’ वर्ग, अनुसूचित जाती-जमाती, महिला राखीव, ओबीसी व भटक्या-विमुक्त प्रवर्गातून प्रत्येकी एक उमेदवार निवडण्यात आले. गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर जागावाटप निश्चित करण्यात आले.

आयसीएसई बोर्डाच्या निकालामध्ये अविषा जॉन पुण्यामध्ये द्वितीय

Newsworldmarathi pune : कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (सीआयएससीई) यांच्यातर्फे घेतलेल्या आयसीएसईच्या (दहावी) परीक्षेत अविषा जॉन हिला 99.4% गुण मिळवून पुणे शहरात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. अविषा जॉन हि बाकलीवाल ट्युटोरियल्सच्या 3 वर्षीय फाउंडेशन आणि स्पेशल कॉम्प्रिहेन्सिव कोर्सची विद्यार्थिनी आहे. अविषा तिच्या सातत्यपूर्ण अभ्यासू वृत्ती, शैक्षणिक गुणवत्ता आणि शांत स्वभावासाठी ओळखली जाते. बाकलीवाल ट्युटोरियल्समध्ये तिने घालवलेल्या तीन वर्षांत ती सतत टॉप परफॉर्मर राहिली आहे. तिचे उत्तम गुण हे तिच्या मेहनतीचे आणि संस्थेने दिलेल्या कठोर मार्गदर्शनाचे फलित आहेत. पुढील वाटचालीत अविषा विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करण्याचा मानस बाळगते आणि आपल्या उज्वल भविष्याकडे ठामपणे वाटचाल करत आहे. सीआयएससीईच्या भारतासह परदेशातील दोन हजार ८०३ शाळांमधील दोन लाख ५२ हजार ५५७ विद्यार्थ्यांनी यंदा आयसीएसईची परीक्षा दिली. त्यातील दोन लाख ५० हजार २४९ म्हणजेच ९९.०९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

जयकुमार गोरे बदनामी प्रकरणात रामराजे नाईक निंबाळकर यांना समन्स : तपासात मोठा ट्विस्ट

Newsworldmarathi Pune : राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधातील खंडणी व बदनामी प्रकरणात आता मोठा राजकीय वळण आले आहे. तपासाच्या धागेदोऱ्या माजी विधान परिषद सभापती आणि शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्यापर्यंत पोहोचले असून, वडूज पोलिसांनी त्यांना समन्स बजावले आहेत. त्यांना शनिवारी सकाळी ११ वाजता हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घडामोडींमुळे सातारा जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. प्रकरणाचा उगम एका महिलेच्या आरोपांपासून झाला असून, तिच्या म्हणण्यानुसार जयकुमार गोरे यांनी २०१६ पासून व्यक्तिगत आकस ठेवून त्रास दिला, तसेच अश्लील फोटो व्हॉट्सॲपवर पाठवले. याप्रकरणी तिने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. दरम्यान, या प्रकरणात पत्रकार तुषार खरात, संबंधित महिला आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते अनिल सुभेदार यांना दहिवडी पोलिसांनी अटक केली होती. तिघांनाही न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आता रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव तपासात पुढे आल्यामुळे हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे बनले आहे.राजकीय वर्तुळात हे पाऊल रामराजेंना मोठा धक्का मानले जात आहे. पुढील तपासात आणखी कोणती नावे पुढे येतात, याकडे राज्याचे राजकारण लक्ष ठेवून आहे.

लोहगाव-खराडी रस्त्याच्या कामासाठी आमदार बापू पठारे यांचे थेट आमरण उपोषण…

Newsworldmarathi Pune : पुण्यातील लोहगाव-खराडी परिसराला जोडणाऱ्या केवळ ३०० मीटर अपूर्ण रस्त्याच्या कामासाठी आमदार बापू पठारे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. आज सकाळी ८.३० वाजता त्यांनी स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांसह या रस्त्यावर ठिय्या देत आंदोलनाला सुरुवात केली. फॉरेस्ट पार्क आणि गोठण ओढा मार्गे जाणारा हा रस्ता लोहगाव-वाघोली मार्गाला जोडतो. मात्र, अनेक वर्षांपासून या रस्त्याचे काम प्रलंबित असून, नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णवाहिकांना दररोज अपुऱ्या रस्त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याबाबत वारंवार निवेदने, मागण्या आणि पाठपुरावा करूनही पुणे महानगरपालिकेने दुर्लक्ष केल्याचा आरोप पठारे यांनी केला आहे. विभागाचे अधिकारी ‘बघू, करू’ असे उत्तर देतात, पण प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यामुळे आता आमरण उपोषणाशिवाय पर्याय नसल्याचे पठारे यांनी म्हटले आहे. सोशल मीडियावर त्यांनी यासंदर्भात माहिती दिली असून, रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरुच राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. पठारेंच्या पोस्टमध्ये नक्की काय म्हटलं आहे? लोहगाव-वाघोली रस्त्याला जोडणाऱ्या फॉरेस्ट पार्क, गोठण ओढा मार्गे जाणाऱ्या रस्त्यावरील केवळ ३०० मीटर अंतराचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णवाहिकांना दररोज या रस्त्याच्या अपूर्णतेमुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वारंवार निवेदने, मागण्या आणि पाठपुरावा करूनही पुणे महानगरपालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे आता मी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून आज सकाळी ८.३० वाजता त्याच लोहगाव येथील ३०० मीटर रस्त्यावर आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. असं पठारे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हत्या की आत्महत्या…! मासिक पाळीत जेवण बनवल्याने विवाहितेची हत्या? नातेवाईकांच्या आरोपाने खळबळ

Newsworldmarathi Jalgao : जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २६ वर्षीय विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गायत्री ज्ञानेश्वर कोळी (वय-२६) असं जीवनयात्रा संपविलेल्या विवाहितेचे नाव आहे. जळगाव तालुक्यातील किनोद येथे गुरुवारी ही घटना घडली आहे. दरम्यान, गळफास घेऊन तिने जीवन संपविलेले नसून विवाहितेचा सासू आणि नणंद यांनी गळा आवळून खून केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे विवाहितेने जीवन संपवलं की हत्या करण्यात आली? यावरून संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायत्री कोळी या जळगाव तालुक्यातील किनोद याठिकाणी पती, सासू आणि दोन मुलं यांच्यासह राहत होत्या. पती भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. तर गायत्री शिवणकाम करून संसाराला हातभार लावत होती. दरम्यान, गुरुवारी (दि.१) रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. गायत्रीने गळफास घेतल्याचे समजताच तिचे पती, सासू आणि नणंद फरार झाले होते. गायत्रीला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती गायत्रीच्या कुटुंबीयांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान गायत्रीने आत्महत्या केली नसून तिच्यासोबत घातपात झाल्याचा आरोप गायत्रीचा भाऊ सागर कोळी, बहीण प्रियंका कोळी आणि मावशी सुनीता कोळी यांनी केला आहे. नातेवाईकांचा आरोप काय? गायत्रीचा भाऊ सागर कोळी याने सांगितले की, गायत्रीला मासिक पाळी आली असताना तिने स्वयंपाक केला होता, तो स्वयंपाक तिच्या सासू आणि इतरांना चालत नव्हता. यावरून घरात किरकोळ वाद झाला. त्यानंतर हा वाद विकोपाला गेला. घरात घडलेल्या वादानंतर तिने हा प्रकार वडिलांना देखील सांगितला होता. मात्र, वडील बाहेरगावी गेले होते. असं असताना तिच्या सासू आणि नणंद यांनी घरी येऊन तिला मारझोड केली आणि गळा दाबून खून केला. नंतर त्यांनी आत्महत्या केल्याचा बनाव करत गायत्रीच्या गळ्यात साडी बांधून तिला लटकवून दिले, असा आरोप गायत्रीच्या भावाने केला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सलग सुट्ट्यांमुळे महामार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी

Newsworldmarathi pune मे महिन्याच्या सुरुवातीला सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे, नाशिक आणि गोवा महामार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. उष्णतेपासून बचावासाठी अनेक प्रवासी रात्री प्रवास करत असल्याने रात्रीही महामार्गांवर मोठ्या वाहनांच्या रांगा दिसून आल्या. विशेषतः मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील लोणावळा-खंडाळा घाटात ८ ते १० किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घाट पार करण्यासाठी लागणारा वेळ १५-२० मिनिटांवरून २-३ तासांपर्यंत वाढला होता. खासगी बसचालक राजेंद्र सिंह यांनी मुंबई-पुणे मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. रेल्वे प्रशासनाने उन्हाळी गर्दी लक्षात घेऊन विशेष गाड्यांची घोषणा केली असली, तरी सर्व गाड्यांचे आरक्षण भरले असून तत्काळ तिकीटही मिळत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. अनधिकृत दलालांकडून जादा दराने तिकीट विक्री होत असल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. मुंबई-नाशिक मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांमुळे दिवा, कल्याण फाटा आणि माणकोली येथे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून वाहनचालकांचा वेग कमी झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिक वेळ रस्त्यावर काढावा लागत आहे.

अकरा महिन्याच्या बाळाला बिबट्याने आईसमोरून उचलले…

Newsworldmarathi Dound : दहिटणे (ता. दौंड) येथील भिसे वस्तीवर बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास अकरा महिन्याच्या बाळाला बिबट्याने उचलून नेल्याची धक्कादायक घटना घडली. अन्वनित धुळा भिसे असे त्या चिमुकल्याचे नाव असून, तो आईसमोर खेळत असताना बिबट्याने अचानक झडप घालून त्याला ओढून नेले. आईच्या आरडाओरडीनंतर बिबट्या पळून गेला. या घटनेमुळे गावात मोठा संताप पसरला आहे. दौंड तालुक्याच्या पश्चिम भागात बिबट्याचे सतत दर्शन होत असून पूर्वीही पाळीव जनावरांवर हल्ले झाले आहेत. परिसरात पिंजरा लावण्याची मागणी वारंवार करण्यात आली होती, मात्र वनविभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. घटनेनंतर यवत पोलीस व वनविभागाने शोधमोहीम सुरू केली असून श्वानपथकाची मदत घेण्यात आली आहे. अद्याप बाळाचा ठावठिकाणा लागलेला नाही. वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचा नागरिकांचा आरोप आहे.