नवले ब्रिजवर पुन्हा अपघात; ट्रेलरचा ब्रेक फेल, एकाचा मृत्यू

Newsworldmarathi Pune: शहरातील नवले ब्रिजवर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. आज पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली असून, ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने तीन वाहनांना जोरदार धडक बसली. या अपघातात तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, एक व्यक्तीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघात इतका भीषण होता की वाहनांचे पुढचे भाग चकनाचूर झाले. घटनास्थळी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले. सध्या अपघातग्रस्त वाहनं बाजूला करण्याचे काम सुरू असून, अधिक तपास सुरू आहे. नवले ब्रिजवर याआधीही अनेक वेळा अशा प्रकारचे अपघात घडले आहेत. वाहनांची गती, वाहतूक नियमनाची कमतरता आणि उताराचा रस्ता हे सर्व घटक वारंवार होणाऱ्या दुर्घटनांना कारणीभूत ठरत आहेत. स्थानिक नागरिकांनी या समस्येकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहावे, अशी मागणी पुन्हा एकदा केली आहे.

महिला, बालकांची सुरक्षा व आरोग्यासाठी गेस्टॅम्प ऑटोमोटिव्ह्स आणि होप फाउंडेशन कडून गाड्यांचे वाटप

Newsworldmarathi Pune : चाकण एमआयडीसीमध्ये स्थापित असलेल्या सुप्रसिद्ध अशा गेस्टॅम्प आॅटोमोटिव्ह्ज इंडिया कंपनी आणि होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन च्या वतीने आपली समाजिक जबाबदारी लक्षात घेऊन महिला व बालकांची सुरक्षा आणि त्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी आरोग्य विभाग ,पुणे, ग्रामीण पोलीस आयुक्तालय कार्यालय व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय सरकारी विभागांसाठी ५ स्कोडा कायलॅक गाड्यांचे वाटप यावेळी फीत कापून तसेच हिरवा झेंडा दाखवून या गाड्या संबंधित विभागांकडे रवाना करण्यात आल्या. या कारवाटप कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून गेस्टॅम्पच्या आशिया विभागाचे सीईओ अँटोनियो लोपेझ उपस्थित होते. याशिवाय जिल्हा रुग्णालय, औंधचे सिव्हिल सर्जन डॉ. नागनाथ एस. यम्पल्ले, डॉ. अमित लवेकर , मानसोपचार तज्ज्ञ, सहायक सिव्हिल सर्जन, जिल्हा रुग्णालय, औंध. गेस्टॅम्प आॅटोमोटिव्ह्जचे कंट्री सीईओ आणि अध्यक्ष ग्लिन जोन्स, कंट्री सीएफओ व प्रादेशिक वित्त संचालक अजय चौधरी, होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशनच्या सीईओ डॉ. कॅरोलिन ओडीअर दि वॉल्टर, भरोसा सेलच्या पोलिस उपनिरीक्षक अनुराधा पाटील आणि पोलीस निरीक्षक प्रवीण कांबळे म्हाळुंगे पोलीस स्टेशन यांच्यासह कंपनीचे इतर अधिकारी, तसेच पोलिस व आरोग्य खात्यातील अधिकारी उपस्थित होते. गेस्टॅम्प ऑटोमोटिव्ह्सचे आशिया विभागाचे सीईओ अँटोनियो लोपेझ म्हणाले, “गेस्टॅम्पमध्ये आम्ही असा विश्वास ठेवतो की शाश्वत विकासाची सुरुवात समुदायांच्या सक्षमीकरणातून होते. होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशनसोबतच्या या भागीदारीद्वारे आम्ही केवळ वाहनेच देत नाही, तर प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सन्मानासाठी गुंतवणूक करत आहोत.” या उपक्रमामुळे मोबिलिटी, आऊटरिच व आपत्कालीन प्रतिसाद क्षमतेत वाढ होऊन, विशेषतः महिलांचे व बालकांचे आरोग्य व सुरक्षितता सुनिश्चित करण्यात मदत होईल आणि अधिक सुरक्षित, निरोगी समुदाय घडवता येईल. डॉ. कॅरोलिन ओडीअर दि वॉल्टर, सीईओ, होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन यांनी सांगितले,”हा उपक्रम हे सुनिश्चित करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे की आरोग्य व संरक्षण सेवा गरजूंना सहज उपलब्ध होतील. गेस्टॅम्पसोबत मिळून आम्ही मजबूत व सुरक्षित समुदाय घडवण्याचा प्रयत्न करत आहोत, जिथे प्रत्येक मूल व प्रत्येक महिला सन्मानाने व आशेने जगू शकेल.” गेस्टॅम्प ऑटोमोटिव्ह्स इंडिया आणि होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २०२५–२६ या वर्षासाठी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा अजेंडा अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आला आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश महिला आणि बालकांच्या आरोग्य व संरक्षण क्षेत्रात क्षमता निर्माण करून एक सशक्त समुदाय घडवण्याचा आहे. समाज कल्याणासाठी आणि सातत्यपूर्ण वचनबद्धतेचा भाग म्हणून गेस्टॅम्प ऑटोमोटिव्ह्स आणि होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन यांच्या वतीने पाच स्कोडा कायलॅक कार महत्त्वाच्या शासकीय संस्थांना देणगी म्हणून प्रदान केली गेली. यामध्ये पोलिस यंत्रणा व आरोग्य यंत्रणांचा समावेश आहे.

मी शाकाहारी आहे, पण खात मिळालं मांसाहारी : मंत्री पंकजा मुंडे यांची खंत

Newsworldmarathi Parali : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात बोलताना आपल्या शाकाहारी जीवनशैलीविषयी आणि सध्याच्या सामाजिक परिस्थितीबाबत खंत व्यक्त केली. “मी शाकाहारी आहे, मला खात मिळालं मांसाहारी. मी जेवायला गेल्यावर मांसाहारीचं जेवण समोर येतं. कुठेही गेले तरी लोक म्हणतात – कोंबडे खा, मासे खा,” असं स्पष्टपणे सांगत त्यांनी या गोष्टीची आठवण करून दिली. पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये हास्याची लाट तर निर्माण झालीच, पण त्यांनी सामाजिक बदलाची सूचक टीकाही केली. त्या म्हणाल्या की, “माझ्यासारख्या शाकाहारी व्यक्तींना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक ठिकाणी शाकाहारी पर्याय उपलब्ध नसतात.” त्यांच्या या वक्तव्यातून शाकाहारी व्यक्तींविषयी असलेली अनास्था अधोरेखित झाली. पशूसंवर्धन विभाग आणि राष्ट्रीय पशूधन अभियानातंर्गत पशूपालकांसाठी आयोजित एकदिवसीय कार्यशाळेचे उदघाटन करून मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी पशूपालक आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. पशूसंवर्धन खात्याच्या माध्यमातून तरुणांना स्वावलंबी बनवणाऱ्या योजना आम्ही राबवित आहोत. दुग्ध व्यवसाय वाढवण्यासाठी देखील प्रयत्न सुरु आहेत. ग्रामीण भागातील तरुणांना पशूपालनाशी निगडित प्रकल्प आणि उद्योगांच्या माध्यमातून ‘ग्रामीण उद्योजक’ बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. असेही मुंडे म्हणाल्या. पशूसंवर्धन विभागातंर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांना शेतीचा दर्जा देण्यासाठी देखील प्रयत्न सुरु आहेत. तरुणांनी पशूपालनाच्या अनेक योजनांमध्ये सहभागी होऊन योजनांचा लाभ घ्यावा. इतर उद्योगांप्रमाणेच पशूपालनातून मोठा फायदा मिळतो. तुमचे हात मजबूत करण्यासाठी शासन या योजना राबवत आहे, योजनांचा लाभ घ्या आणि इतरांनाही योजनांची माहिती दया’ असे आवाहन मुंडे यांनी उपस्थित पशूपालकांना केले.

दुर्दैवी घटना…! विहिरीत बुडून दोन मुलांचा मृत्यू; घटनेने परिसरात हळहळ

Newsworldmarathi Solapur: सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील एका विहिरीत बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना १ मे रोजी घडली आहे. सलग १० तास शोधकार्य करून दोन्ही मुलांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. दोघांचा मृतदेह सापडल्यानंतर कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला. भीमरत्न राजगुरू (वय-१४) आणि नैतिक माने (वय-१५, दोघेही रा. बोरामणी, ता. दक्षिण सोलापूर) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. नेमकं काय घडलं? याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या बोरामणी गावातील शेळके यांच्या विहिरीत गुरुवारी दुपारी काही शाळेतील मुलं पोहायला गेली होती. साडे बारा वाजण्याच्या सुमारास मुलं पोहत असताना, विहिरीचा कठडा घसरला आणि त्यांच्या अंगावर पडला. भीमरत्न आणि नैतिक ही दोन्ही मुलं ढिगाऱ्याखाली दबली गेली. बाकीची मुलं कशीबशी बाहेर आली. वाचलेल्या मुलांनी आरडाओरडा करून आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बोलावून घेतले. या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल, जिल्हा ग्रामीण पोलीस प्रशासन आणि दक्षिण सोलापूर तालुक्याचे तहसीलदार किरण जमदाडे त्यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत माहिती जाणून घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी त्याठिकाणी तळ ठोकून गुरुवारी रात्री उशिरापर्यंत अथक परिश्रम करून दोन मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात यश मिळवले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. या घटनेने बोरामणी गावात शोककळा पसरली आहे.

कचऱ्यातून निर्माण केलं निसर्गाचं सौंदर्य; साई जनसेवा प्रतिष्ठान आणि PMCचा अनोखा उपक्रम

पुणे : पुणे शहरामध्ये वाढत्या शहरीकरणाबरोबरच लोकसंख्येचा विचार केला तर सध्या असलेली उद्यानांची संख्या अगदीच अपुरी आहे. मात्र योग्य नियोजनातून आपल्याच घराच्या, ऑफिसच्या टेरेसवर घरातील टाकाऊ वस्तू आणि ओल्या कचऱ्यापासून सुंदर आणि हिरवेगार टेरेस गार्डन आपण स्वत: तयार करू शकतो याचा आदर्श घालून देत पुणे महानगरपालिका, कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय आणि साई जनसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या ८०० चौ. फुट टेरेसवर मनमोहक टेरेस गार्डन तयार करण्यात आले आहे. याचे उद्घाटन नुकतेच अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी पी आणि उपायुक्त, परिमंडळ क्रमांक ४ जयंत भोसेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. पुणे महानगरपालिका, कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या टेरेसवर या पर्यावरणपूरक गार्डनची निर्मिती करण्यात आली असून या गार्डनमध्ये टाकाऊ टायर, ड्रम आणि विटांचा उपयोग करून ८०० चौरस फूट जागेत फळे, फुले, भाज्या आणि शोभेच्या झाडांनी ही बाग फुलवण्यात आली आहे. या टेरेस गार्डनमध्ये शेवगा, कारले, संत्रा, पपई, कांचन, बहावा, चाफा, जास्वंद, सदाफुली, कर्दळी, तगर, गुलाब, बांबू, ऊस, शोभेची रोपे अशी फळझाडे, फुलझाडे आल्याने ही बाग अतिशय सुंदर आणि मनमोहक दिसत आहे. यासोबतच उन्हाची दाहकता लक्षात घेवून पक्षासाठी केलेली पिण्याचे पाणी व्यवस्था तसेच परिसरात केलेली नागरिकांसाठीची बैठक व्यवस्था सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. यावेळी बोलताना अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी पी म्हणाले कि, “ पुणे महानगरपालिका ही संस्था नागरिकांशी निगडीत असून तिचे ब्रिदवाक्य वरं जनहितं ध्येयम असे आहे. आपण केलेल्या कामाचा प्रभाव हा नागरिकांवर होत असतो व नागरिकांकडून आपल्या सेवेबाबत मिळणारे समाधान आणि कौतुक हे आपल्या कामाची पोचपावती असते आणि हि पोचपावती कोंढवा येवलेवाडी कार्यालयास मिळाली आहे” याप्रसंगी कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त लक्ष्मण कादबाने यांचेसह सहाय्यक आयुक्त दिपक राऊत, जगले, मंदार वेदक, अपेक्स कमिटी मेंबर, नेराळे मॅडम, तंवर मॅडम, मोहल्ला कमिटी सदस्य, धायभर तसेच उपअभियंता चौधरी मॅडम , प्रशासन अधिकारी मोरे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक दुल्लम व कदम व कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी व साई जनसेवा प्रतिष्ठानचे सुरज लोखंडे यांचेसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या स्मृतीना पंकजा मुंडेंचा भावनिक उजाळा

Newsworldmarathi Mumbai : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या काकांना, भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत प्रमोद महाजन यांना त्यांच्या स्मृतिदिनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. पंकजा यांनी प्रमोद महाजन यांचा एक जुना फोटो शेअर करत त्यांच्या आठवणी जागवताना आपल्या भावना व्यक्त केल्या. या पोस्टमध्ये त्यांनी कोणताही राजकीय मुद्दा न मांडता केवळ कुटुंबीय नात्यातून आठवणींना उजाळा दिला. पंकजा मुंडे यांनी लिहिले की, “तुमचं आयुष्य, तुमचा प्रवास, तुमचं नेतृत्व… सर्व काही आजही प्रेरणादायी आहे. तुम्ही दिलेला वारसा माझ्यासाठी मार्गदर्शक आहे.” या भावनिक पोस्टवर अनेक भाजप समर्थक, कार्यकर्ते आणि सामाजिक माध्यमांवरील अनुयायांनी प्रतिसाद दिला असून, प्रमोद महाजन यांचे राजकीय योगदान आणि दूरदृष्टी याची आठवण करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. प्रमोद महाजन हे भाजपा पक्षाच्या स्थापनेपासून संघटनात्मक बांधणीसाठी झटणारे नेते होते. तंत्रज्ञान, संवाद आणि धोरण यामध्ये त्यांचा प्रभाव मोठा होता. आजही त्यांचे कार्य अनेकांना प्रेरणा देते.

भिसे यांच्या जुळ्या बाळांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २४ लाखांची मदत

Newsworldmarathi Mumbai: पुण्यात प्रसूतीदरम्यान ईश्वरी भिसे यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांनी जुळ्या बाळांना जन्म दिला, मात्र दोन्ही नवजात बाळांचे वजन अत्यल्प असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करून विशेष निगा राखण्यात येत आहे. या बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत देण्यात आली आहे. सदर मदत ही रुग्णालयाने दिलेल्या अंदाजपत्रकानुसार देण्यात आली आहे. यापुढे देखील पुढील उपचारांसाठी आणखी आवश्यकता भासल्यास त्याचा लागणारा संपूर्ण खर्चही कक्षातूनच केला जाणार असल्याचे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले. ईश्वरी भिसेंच्या निधनाच्या वृत्तानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिसे कुटुंबीयांची तात्काळ भेट घेऊन भावनिक आधार दिला होता. यावेळी त्यांनी दिलेले मदतीचे आश्वासन प्रत्यक्षात उतरवत, आज संबंधित रुग्णालयात मदतीची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. उपचाराकरिता एका बाळासाठी १० लाख, तर दुसऱ्या बाळासाठी १४ लाख रुपये मदत म्हणून दिली गेली आहे. सध्या दोन्ही बाळांचे उपचार सूर्या हॉस्पिटल, पुणे येथे सुरू असून त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे नाईक यांनी सांगितले.

धक्कादायक…! प्रसूतीपूर्वीच आईसह बाळाचा मृत्यू; उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप

Newsworldmarathi Dahanu : डहाणू तालुक्यातील कैनाड वाडुपाडा घटना समोर आली आहे. येथील एका महिलेचा प्रसूतीदरम्यान योग्य वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. सायनू जितेश सावर (वय-२५) असं मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान, गर्भातील बाळाचा मृत्यू आधीच झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही दुर्दैवी घटना रविवारी घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, सायनू सावरला सकाळी प्रसूतीकळा सुरू झाल्यावर आशागड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला तत्काळ डहाणू येथील कॉटेज रुग्णालयात नेले. दुपारी तिची नॉर्मल प्रसूती करण्यात आली; परंतु प्रसूतीपूर्वीच गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे बाळाचा मृतदेह कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला. प्रसुतीनंतर अतिरक्तस्त्राव झाल्याने तिचे हिमोग्लोबीन केवळ ६.५ इतके खाली गेले. डहाणूतील डॉक्टरांनी तिला गुजरातमधील वलसाड येथे हलवण्याचा सल्ला दिला. मात्र, सरकारी रुग्णवाहिका सायंकाळी ५ पर्यंत उपलब्ध होऊ शकली. तब्बल तीन तास विलंब झाल्यामुळे रुग्णवाहिकेतून वलसाडकडे नेत असतानाच सायनूचा दुर्दैवी मृत्यू झाला. महिला रुग्णालयात दाखल होण्याआधी दोन दिवस घरात पडल्याने तिच्या गर्भाला गंभीर दुखापत झाली होती. या दुखापतीत तिचं बाळ गर्भाशयातच मृत झाल्याने रक्तस्त्राव वाढला. रुग्णालयात उशिरा आल्याने प्रसूतीनंतर जास्त प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने या महिलेचा मृत्यू झाला आहे. बाळदेखील प्रसूतीपूर्वीच गर्भाशयात मृत झाले असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामदास मराड यांनी सांगितले.

Ajit Pawar : मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतंय, पण कुठं जमतंय; अजित पवारांचा मिश्किल टोला

Newsworldmarathi Mumbai : राज्याच्या सत्तेत सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवण्याचा मान पटकावलेल्या अजित पवार यांची मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसण्याची इच्छा आता काही लपून राहिलेली नाही. अजित पवार यांनी पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात जाहीरपणे मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतंय, पण तो योग अजून जुळून आला नसल्याचे म्हणत खंत व्यक्त केली. तसेच मुख्यमंत्रीपदाचा योग कधी ना कधी जुळून येईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या ६५ व्या वर्धापन दिनानिमित्त गेल्या दिवसांपासून राष्ट्रवादीच्या वतीने वरळीतील जांबोरी मैदानावर ‘गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी देश पातळीवर महाराष्ट्राची स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या पद्मश्री अनुराधा पौडवाल, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे, ज्येष्ठ अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, पार्श्वगायिका बेला शेंडे, अर्जुन पुरस्कार विजेत्या कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे, अर्जुन पुरस्कार विजेत्या धावपटू ललिता बाबर, अर्जुन पुरस्कार विजेत्या नेमबाज राही सरनोबत यांचा उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांनी भविष्यात महाराष्ट्राला एखादी महिला मुख्यमंत्री मिळाली पाहिजे, या केलेल्या वक्तव्याचा धागा पकडत पवार यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केले. आपल्याला सगळ्यांना वाटत असते पण शेवटी तो योग जुळून यावा लागतो. कारण मलाही गेल्या अनेक वर्षांपासून वाटतं की मी मुख्यमंत्री व्हावं, पण कुठे जमतंय, असे म्हणत पवार यांनी मनातील खंत बोलून दाखवली. तसेच हा फुले, शाहू आणि आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये ज्याप्रमाणे ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री झाल्या त्याप्रमाणे महाराष्ट्रालाही महिला मुख्यमंत्री मिळण्याचा योग जुळून येईल, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला.

पुण्यात पुन्हा ‘हिट अँड रन’; ‘मर्सिडीज’ने दुचाकीस्वाराला उडवलं, तरुणाचा मृत्यू

Newsworldmarathi Pune: पुणे शहरात पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना समोर आली आहे. पुण्यातील नवले ब्रिज जवळ ‘हिट अँड रन’ची घटना घडली आहे. नवले ब्रिज जवळ एका मर्सिडीज कारने दुचाकीस्वाराला उडवले आहे. या घटनेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. कुणाल हुशार (रा. चिंचवड) असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. कारमधील मद्यधुंद चालकासह चार लोकांची अद्यापही मेडिकल झालेली नाही. आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेने पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेचा पोलीस तपस करत आहेत. वाघोलीत डंपरने महिलेला फरफटत नेलं, जागीच मृत्यू वाघोलीत डंपरने पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली, तर तिचा पती किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी सहा वाहण्याच्या सुमारास बायफ रोडवरील आयडीबीआय बँकेसमोर घडली आहे. रुपाली सुरज तिवारी ( वय- २७ वर्षे, रा. पार्थ व्हीलाज, बायफ रोड ) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. तिचे पती सूरज हे किरकोळ जखमी झाले. या प्रकरणी डंपर चालक शुभम सुदाम मस्के (वय- २५ वर्षे, रा. लोणीकंद ) व डंपर मालक प्रमोद संभाजी भाडळे ( रा. वाघोली ) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.