भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या अध्यक्षपदी पुनीत बालन यांची बिनविरोध निवड

0
Newsworldmarathi Pune: भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या (अमेच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया – एकेएफआय) अध्यक्षपदी युवा उद्योजक पुनीत बालन यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या नव्या कार्यकारिणीत देशभरातील विविध राज्यांतील प्रतिनिधींना संधी देण्यात आली असून, एकूण २२ पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या २०२६ ते २०३० या कालावधीसाठीची निवडणूक रांची (झारखंड) याठिकाणी रविवारी पार पडली. या निवडणुकीसाठी महासंघाचे २२ राज्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्राचे क्रीडा प्रशासक तथा उद्योगपती पुनीत बालन यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर विदर्भातील माजी खासदार रामदास तडास यांची अध्यक्ष (प्रेसिडेंट एमेरिटस) म्हणून, तर बिहारचे राजकुमार सिंह यांची मुख्य संरक्षक (चीफ पॅट्रन) म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच सरचिटणीसपदी तेलंगणाच्या उशी रेड्डी यांची तसेच इतर महत्त्वाच्या पदांवर व कार्यकारिणीत देशातील विविध राज्यांतील प्रतिनिधींची बिनविरोध निवड करण्यात आली. उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रत्नाकर भेंगरा यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले तर दिवाणी न्यायालयाचे सहायक निवडणूक अधिकारी, निवृत्त जिल्हा न्यायाधीश पंकज श्रीवास्तव यांच्या देखरेखीखाली ही निवडणूक झाली. यावेळी महासंघाचे अरुण सिंह, डॉ. राजेश गुप्ता, विवेक रेड्डी, राहुल सिंह, चेतन गोविंद झा, राजेश सिंह, मनोज शर्मा, कुणाल एम. त्रिपाठी, सम्मी सिंह, सुजल केशरी, प्रदीप तिर्की व इतर पदाधिकारी उपस्थित होते. नवनिर्वाचित अध्यक्ष पुनीत बालन यांची विविध क्रीडा उपक्रमांना सातत्याने पाठबळ देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख असून, त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय कबड्डीला नवी दिशा आणि गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर सोपवल्याबद्दल देशभरातील सर्व राज्य संघटना आणि पदाधिकाऱ्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. कबड्डी हा भारताचा पारंपरिक आणि जनमानसाशी जोडलेला खेळ आहे. या खेळाला जागतिक स्तरावर अधिक बळकट करण्यासाठी, ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना संधी उपलब्ध करून देण्यासाठी, आधुनिक प्रशिक्षण सुविधा उभारण्यासाठी आणि महिला तसेच युवा कबड्डीपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सर्व पदाधिकाऱ्यांना आणि राज्य संघटनांना सोबत घेऊन भारतीय कबड्डीच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार असून, देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिकाधिक यश मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू.
– पुनीत बालन, नवनिर्वाचित अध्यक्ष.

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक; किसनराव मोहोळ यांचे निधन

0
Newsworldmarathi Pune: केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे वडील किसनराव दगडोबा मोहोळ यांचे गुरुवारी (दि. १८ जून २०२६) रात्री दुःखद निधन झाले. निधनसमयी ते ८६ वर्षांचे होते. रात्री १०.२० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मोहोळ कुटुंबीयांवर तसेच सामाजिक, सहकारी आणि क्रीडा क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. किसनराव मोहोळ यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तब्बल ४० वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावली. आपल्या कर्तव्यनिष्ठ स्वभावामुळे आणि सहकाऱ्यांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांमुळे त्यांनी सहकारी क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली होती. बँकेतील दीर्घ सेवाकाळात त्यांनी अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. सहकारी क्षेत्राबरोबरच किसनराव मोहोळ हे नामवंत पैलवान म्हणूनही ओळखले जात होते. कुस्ती क्षेत्रात त्यांनी आपल्या ताकदीचा आणि कौशल्याचा ठसा उमटवला होता. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात शिस्त, मेहनत आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम दिसून येत होता. त्यामुळे विविध क्षेत्रांतील अनेक व्यक्तींनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. किसनराव मोहोळ यांचे अंत्यदर्शन शुक्रवारी (दि. १९ जून २०२६) सकाळी ७ ते ९ या वेळेत कोथरूड येथील ‘वेणूकृष्णा’ निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, किसनराव मोहोळ यांच्या निधनाबद्दल राजकीय, सामाजिक, सहकारी आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडून शोकसंवेदना व्यक्त करण्यात येत असून मोहोळ कुटुंबीयांच्या दुःखात अनेकजण सहभागी झाले आहेत.

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरा

Newsworldmarathi pune:राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरुड मधील सखी-सुखदा वूमन वेल्फेअर फाऊंडेशनच्या वतीने आयोजित आनंद मेळावा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना वृद्धाश्रम आणि वंध्यत्वाच्या वाढत्या समस्यांवर उपाययोजना करण्यासंदर्भात ना. पाटील संकल्प व्यक्त केला. सखी-सुखदा वेल्फेअर फाऊंडेशनच्या माध्यमातून वस्ती भागातील ९०० गरोदर मातांना सुरक्षित प्रसूतीसाठी सहाय्य करण्यात आले. यानिमित्ताने फाऊंडेशनच्या वतीने आनंदोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने १८०० बालकांचे आधारकार्ड आणि सुकन्या समृद्धी योजनेचे कार्ड वितरित करण्यात आले. त्यासोबतच पाच चिमुकल्यांना लकी ड्रॉच्या माध्यमातून विशेष बक्षीस देण्यात आले. या कार्यक्रमाला सखी-सुखदा वुमन वेल्फेअर फाऊंडेशनच्या संचालिका स्मीता पाटील, ॲड. तनिषा पाटील, उद्योजक ललीत कुमार जैन, झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचे सतिश फडके, फाऊंडेशनच्या सुरेखा जगताप, धनश्री चितळे यांच्यासह सखी-सुखदा वुमन वेल्फेअर फाऊंडेशनच्या सर्व सदस्या आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना ना. पाटील म्हणाले की, स्मीता पाटील यांच्या खंबीर नेतृत्वामुळे सखी-सुखदा हा प्रकल्प यशस्वी झाला असून; सखी-सुखदाच्या वतीने आयोजित आनंद मेळावा म्हणजे आनंदी कोथरुडच्या वचनपूर्तीतील एक भावनिक क्षण आहे. या उपक्रमांतर्गत वस्ती भागातील अनेक गरोदर मातांचे बाळंतपण करण्याची संधी मिळाली. ते पुढे म्हणाले की, सध्या समाजात वृद्धाश्रमांची वाढती संख्या आणि वंध्यत्वाची समस्या ही गंभीर सामाजिक चिंता बनली आहे. त्यामुळे वृद्धाश्रमासारख्या संकल्पना मोडीत काढण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन, एखाद्या वयोवृद्ध दाम्पत्य किंवा एकल महिलांचे पालकत्व स्विकारावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. वंध्यत्व हा देखील चिंतेचा विषय झाला असून कोल्हापूर मधील हितैषी प्रमाणे, वंध्यत्व निवारणासाठी समुपदेशन आणि दत्तक प्रक्रिया आणि फॉस्टर केअर प्रक्रियेसाठी सखी-सुखदा अंतर्गत नवीन सेंटर कार्यान्वित करण्याचे यावेळी त्यांनी घोषित केले. तसेच, आगामी काळात सखी-सुखदा उपक्रमामधून नवजात बालकांची श्रवण क्षमता तपासण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी घोषित केले. कार्यक्रमाला उपस्थित उद्योजक ललीत जैन आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे सतीश फडके यांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सखी-सुखदा वूमन वेल्फेअर फाऊंडेशनच्या स्मीता पाटील यांनी केले.

बनावट मृत्युपत्र तयार करुन त्याद्वारे मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वकिलासह वडिल, बहिणीवर गुन्हा NEW दाखल

Newsworldmarathi pune: आईचे बनावट मृत्युपत्र तयार करुन त्याद्वारे तिची मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न करुन मुलीला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बाणेर पोलिसांनी वडिल, बहिणी आणि त्यांना मदत करणाऱ्या वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कैलास आटोळे, निलिमा आटोळे, अॅड. सुधीर धर निरफारके Adv. Sudhir Madhur Nir (रा. घोरपडी पेठ) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत नेहा प्रसाद मानकर (वय ३२, रा. वीरभ्रदनगर, बाणेर) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नेहा मानकर यांचे वडिल आरोपी कैलास आटोळे आणि बहिण निलिमा आटोळे आहेत. त्यांची आई पद्मिनी कैलास आटोळे या फॅशन डिझायनिंगची कामे करीत होती. वडिल कैलास आटोळे यांनी त्यांच्या आईपासून पहिल्या लग्नाची हकीकत लपवुन ठेवून आईसोबत दुसरे लग्न केले होते. या कारणावरुन आई वडिलांमध्ये वारंवार वाद चालू असायचे. त्यांच्या आईने तिच्या स्वकष्टाने बाणेर येथील वीरभ्रदनगर येथील शिवालय बंगला, गावठाणात बिल्डिंग, बैठे घर, संस्कार अपार्टमेंटमधील राहता फ्लॅट, तसेच ४ ते ५ फ्लॅट, बालेवाडी गाव येथील बिल्डिंगमधील ६ फ्लॅट आणि पार्किंग, ३ गुंठे जागा पाषाण येथील वृंदावन रेसिडन्सीमधील एक फ्लॅट, खडकवासला येथील एक फ्लॅट अशी मिळकत कमावली आहे. २०१२ मध्ये फिर्यादी यांची सावत्र बहिण तृप्ती वीरकर हिने वडिलांच्या आणि आईच्या नावावरील संपत्तीमधून वाटा मागितला होता. कोर्टाने वडिलांच्या संपत्तीमधील वाटा तिला दिला. त्यानंतर त्यांच्या आईने त्यांच्या संपत्तीमध्ये फिर्यादी बहिणी निलिमा आटोळे यांना समान हिस्यामध्ये वाटप करणारे मृत्युपत्र तयार करुन रजिस्टर केले. तिचे वडिल कैलास वाटोळे हे तिच्या मिळकतीचे येणारे भाडे मागत होते. त्यावरुन त्यांच्यात वाद होत होता. १० जानेवारी २०२६ रोजी त्यांची आई पद्मिनी आटोळे यांचे निधन आईच्या मृत्युनंतर तिचे वडिल तिला नॉमिनीपत्र व्या नावावर करण्यासाठी दबाव देऊ लागले. त्यांनी दाद दिली नाही म्हणून ते वारस नोंदीसाठी बाणेर तलाठीच्या कार्यालयात गेले. तेथे फिर्यादी यांनी हरकत घेतली. फिर्यादी यांनी कोथरुड मंडल अधिकारी यांना आईचे नोंदणीकृत मृत्युपत्र दाखवले. त्यावेळी वडिलांनी खोटे मृत्युपत्र बनवितो आणि सगळी प्रॉपर्टी माझ्या एकट्याच्या नावावर करुन घेतो, अशी धमकी दिली. मंडल अधिकारी फिर्यादी यांच्या बाजूने निकाल देत असताना वडिलांनी पुढील तारीख मागून घेतली. २९ एप्रिल २०२६ रोजी त्या दोघांनी खरोखरच त्यांच्या आईच्या निधन झाल्याअगोदरच्या तारखेचे तिच्या नावाचे अॅड. सुधीर मधुर निरफारके यांच्या कार्यालयात केलेले नोटराईड मृत्युपत्र मंडल अधिकारी यांच्याकडे सादर केले. त्यावरुन प्रॉपर्टी त्या दोघांचे नाव लावण्याची विनंती केली. त्या मृत्युपत्राची प्रत पाहिली असता वडिलांनी सादर केलेल्या मृत्युपत्रावर आईची सही खोटी होती. डॉक्युमेंटला कोणताही स्टॅम्प पेपर नव्हता. नोटराईझड डॉक्युमेंटला साक्षीदार अमित नांदे याचे २०१३ साली वय ३८ वर्ष होते आणि २०२५ साली देखील त्याचे वय ३७ वर्षच नमूद होते. डॉक्युमेंटची मेज नंबरीग चुकीची होती. फिटनेस प्रमाणाऱ्या डॉ. एरिक डेव्हिड याचा डॉक्टराचा परवाना २०२२ लाच संपलेला दिसला. तो डॉक्टरही आईच्या ओळखीचा नव्हता. ही बाब मंडल अधिकारी यांच्या लक्षात आणून देऊन वडिलांनी खोटे मृत्युपत्र तयार केल्याचे दाखवून दिले. त्यामुळे मंडल अधिकाऱ्यांनी फिर्यादीच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर वडिल व निलिमा यांनी त्याच NEW या दस्ताच्या आधारे २९ मे २०२६ रोजी हा दस्त गादणीकृत करुन घेतला आहे. दरम्यान, कैलास आटोळे व निलिमा आटोळे यांनी त्याच्याविरुद्ध व त्यांच्या पतीविरुद्ध खोटेनाटे अर्ज करुन दोघांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. वेळोवेळी धमक्या आणि शिवीगाळ केली. या दरम्यान त्यांनी आईच्या नावाचे खोटे मृत्यु पत्र का तयार केले याबाबत विचारणा केली बनवुन असता त्या दोघांनी देखील त्यांना “आईने म चुक केली आहे, मी खोटे कागदपत्रे तयार केल, तुला घर सोडायला लावेल, तुला रस्त्यावर आणीन, तुला पाहून घेतो, “अशा धमक्या व शिवीगाळ केली. त्यामुळे त्यांनी वडिल कैलास आटोळे, बहिण निलिमा आटोळे आणि त्यांना बनावट नोटरी करुन देणारा वकील अॅड. सुधीर मधर निरफारके यांच्याविरुद्ध तक्रार केली आहे. बाणेर सांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस NEW उपानेरीक्षक शैला पाथरे तपास करीत आहेत.

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी पुनीत बालन यांची निवड

Newsworldmarathi pune: कै. सौ. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्त मंडळाची निवड जाहीर करण्यात आली असून ट्रस्टच्या अध्यक्षपदी पुनीत बालन यांची निवड करण्यात आली आहे. राजू बलकवडे यांची कार्यकारी विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आली असून ॲड. विवेक भरगुडे आणि वर्षा थोरवे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. तसेच सुरज थोरात यांच्याकडे खजिनदारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून नितीन पंडित यांची उत्सव प्रमुख तर मनीषाताई खेडेकर यांची उपउत्सव प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पराग काळकर आणि महेंद्रशेठ गाढवे यांची विश्वस्त म्हणून निवड झाली आहे. दरम्यान, ट्रस्टच्या विश्वस्त निवड प्रक्रियेमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप काही व्यक्तींनी केला होता. मात्र, या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर निवड प्रक्रियेत कोणतीही अनियमितता झालेली नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यानंतर धर्मादाय आयुक्तांच्या आदेशानुसार नव्या विश्वस्त मंडळाची निवड निश्चित करण्यात आली. नवीन विश्वस्त मंडळाच्या निवडीमुळे मंदिराच्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना अधिक बळ मिळणार असल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली आहे.
“धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या निकालाचे मी मनःपूर्वक स्वागत करतो. ‘भगवान के दरबार में देर है, अंधेर नहीं’ या उक्तीचा प्रत्यय देणारा हा निर्णय असून न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणारा आहे. दत्तमंदिर ट्रस्टचा अध्यक्ष म्हणून मंदिराची परंपरा, श्रद्धा आणि संस्कृती यांना कोणताही धक्का लागू न देता भाविकांसाठी अधिकाधिक समाजोपयोगी आणि लोककल्याणकारी उपक्रम राबविण्यावर आमचा भर राहील. भक्तांच्या सेवेला सर्वोच्च प्राधान्य देत ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
– पुनीत बालन, अध्यक्ष, कै. सौ. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट.

पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्याला यश

0
Newsworldmarathi pune: ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पुणे आकाशवाणीच्या वृत्त विभागाबाबत गेल्या काही दिवसांपासून विविध माध्यमांमध्ये बंद होण्याच्या चर्चांना उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय रेल्वे, माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन हा विषय त्यांच्या निदर्शनास आणून दिला. यावेळी मंत्री वैष्णव यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “कोणत्याही परिस्थितीत पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही.” त्यामुळे या संदर्भातील सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. रेल्वे विभागाच्या विविध विकासकामांचे उद्घाटन आणि नव्या रेल्वे सेवांच्या लोकार्पणासाठी अश्विनी वैष्णव पुणे दौऱ्यावर आले असता पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी झालेल्या चर्चेत मोहोळ यांनी पुणे आकाशवाणीच्या वृत्त विभागाबाबत निर्माण झालेल्या चिंतेची माहिती दिली आणि हा विभाग कायम ठेवण्याची मागणी केली. त्यावर अश्विनी वैष्णव यांनी अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव अथवा विचार केंद्र सरकारसमोर नसल्याचे स्पष्ट केले. पुणे आकाशवाणीच्या वृत्त विभागाला अनेक दशकांची समृद्ध परंपरा लाभली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, जिलहा तसेच विविध भागांतील लाखो श्रोत्यांचे आकाशवाणीशी भावनिक नाते जुळलेले आहे. स्थानिक घडामोडी, सामाजिक प्रश्न, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विश्वसनीय बातम्यांचे माध्यम म्हणून आकाशवाणीने दीर्घकाळ लोकांचा विश्वास संपादन केला आहे. त्यामुळे वृत्त विभाग कायम ठेवण्याची जनभावना मोहोळ यांनी मंत्री वैष्णव यांच्यापर्यंत पोहोचवली. यावेळी स्पष्टीकरण देताना अश्विनी वैष्णव म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील आकाशवाणी केंद्रांचे आधुनिकीकरण आणि सक्षमीकरण करण्याचे काम सुरू आहे. आकाशवाणी अधिक प्रभावी, आधुनिक आणि लोकाभिमुख करण्यासाठी आम्ही विविध स्तरांवर प्रयत्न करत आहोत. त्यामुळे पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. उलट स्थानिक बातम्या आणि जनसंपर्क अधिक सक्षम करण्यावर आमचा भर आहे. महाराष्ट्रातील तसेच देशातील सर्व आकाशवाणी केंद्रांचे अद्ययावतीकरण करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे.” याबाबत प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, “पुणे आकाशवाणी केंद्राला गौरवशाली इतिहास लाभला आहे. आजही जवळपास सव्वा कोटी श्रोते नियमितपणे आकाशवाणीवरील बातम्यांवर विश्वास ठेवतात. प्रत्येक श्रोत्याच्या मनातील भावना आणि अपेक्षा मी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यापर्यंत पोहोचवली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग सुरूच राहील, अशी स्पष्ट ग्वाही दिली आहे. त्यामुळे वृत्त विभाग बंद होणार असल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळायला हवा. आकाशवाणीचे आधुनिकीकरण आणि सक्षमीकरण करण्यासाठी केंद्र सरकार घेत असलेल्या पुढाकाराबद्दल मी मंत्री अश्विनी वैष्णव यांचे मनःपूर्वक आभार मानतो.” पुणे आकाशवाणी ही केवळ एक प्रसारण संस्था नसून पुण्याच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि पत्रकारितेच्या इतिहासाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे तिचे जतन, संवर्धन आणि आधुनिकीकरण करून अधिक सक्षम स्वरूपात पुढे नेण्याचा केंद्र सरकारचा निर्धार असल्याचे या भेटीतून स्पष्ट झाले आहे.

पुणे मनपा शाळांच्या खासगीकरणाला काँग्रेसचा तीव्र विरोध : प्रशांत जगताप

0
Newaworldmarathi Pune :पुणे महानगरपालिकेच्या शाळा खासगी संस्थांच्या ताब्यात देण्याच्या प्रयत्नाला तसेच शिक्षणाच्या बाजारीकरणाला काँग्रेस पक्षाने तीव्र विरोध दर्शविला आहे. गेल्या काही वर्षांपासून पुणे मनपाच्या काही शाळा आकांक्षा फाउंडेशनकडून मोफत चालवल्या जात आहेत. मात्र, यंदापासून या शाळांमधील त्यांची यंत्रणा कायम ठेवण्यासाठी आकांक्षा फाउंडेशनला दरवर्षी १२ कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी मांडल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर काँग्रेसकडून जोरदार आक्षेप घेण्यात आला. स्थायी समितीचे पुनर्गठन झाल्यानंतर गेल्या पाच महिन्यांत प्रथमच एखाद्या प्रस्तावावर मतदान घेण्याची वेळ आल्याचे सांगण्यात आले. महानगरपालिकेच्या शाळांसाठी आकांक्षा फाउंडेशनला एकूण १०८ कोटी रुपये देण्याचा प्रशासनाचा डाव असून या उधळपट्टीला काँग्रेसचा विरोध असल्याचे काँग्रेसचे नगरसेवक व स्थायी समिती सदस्य प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केले. विरोधी पक्षांकडून आधीच नऊ शाळा खासगी संस्थांना देण्यास आक्षेप असताना, आणखी काही शाळा खासगी संस्थांकडे सोपविण्याचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी मांडल्याचा आरोपही त्यांनी केला. एका शाळेसाठी सुमारे २२ कोटी रुपये खर्च होत असून भविष्यात या सर्व शाळांसाठी तब्बल ७७०० कोटी रुपयांची उधळपट्टी होऊ शकते, असा दावा जगताप यांनी केला. या प्रस्तावाला काँग्रेसचे प्रशांत जगताप यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सुहास टिंगरे, अमोल बालवडकर आणि वैशाली बनकर यांनीही विरोध दर्शविला. सर्वांना मोफत शिक्षणाचा हक्क मिळावा, मात्र त्यासाठी मनपाच्या शाळा खासगी संस्थांच्या घशात घालण्यास आमचा विरोध असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीसाठी राज्यव्यापी स्पर्धांचे आयोजन; विद्यार्थी व नागरिकांना सहभागाचे आवाहन

0
Newsworldmarathi Pune: देशातील युवकांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी भारत सरकारच्या “नशामुक्त भारत अभियान” अंतर्गत विविध स्तरांवर व्यापक जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (ANTF), महाराष्ट्र राज्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, भोई प्रतिष्ठान पुणे आणि जाधवर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीसाठी राज्यव्यापी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या अंमली पदार्थांच्या आकर्षणाला प्रतिबंध घालण्यासाठी आणि समाजात जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, पोलीस, प्रशासन, साहित्य, कला, संस्कृती, चित्रपट क्षेत्रातील मान्यवर तसेच देशप्रेमी नागरिक या उपक्रमात सक्रिय सहभागी होणार आहेत. ही केवळ अल्पकालीन मोहीम नसून समाजात दीर्घकालीन जनजागृती निर्माण करण्यासाठी पुढील अनेक वर्षे सातत्याने राबविण्यात येणारा उपक्रम असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. या मोहिमेचा अधिकृत शुभारंभ राज्यव्यापी स्पर्धांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. अंमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि त्याच्या विळख्यात अडकलेली तरुणाई या विषयावर घोषवाक्य (स्लोगन), निबंध, चित्रकला आणि रील (Reels) निर्मिती या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व स्पर्धा विनामूल्य असून सहभागी होण्याची अंतिम मुदत २१ जून २०२६ आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक तथा अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या प्रमुख श्रीमती ज्योतीप्रिया सिंग यांनी सर्व वयोगटातील विद्यार्थी आणि जागरूक नागरिकांनी या जनजागृती अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. स्पर्धेतील विजेत्यांचा भव्य बक्षीस वितरण समारंभ २६ जून २०२६ रोजी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आयोजित करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या अटी, नियम व नोंदणीसाठी इच्छुकांनी आयोजकांनी दिलेल्या गुगल फॉर्म लिंकचा वापर करावा तसेच अधिक माहितीसाठी संबंधित समन्वयकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आम्ही पण लष्करात जाऊन देशसेवा करणार”; आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांची एनडीए भेट ठरली भावनिक

0
Newaworldmarathi Pune: “आम्हाला वडील नाहीत, तरी आम्ही खूप अभ्यास करू आणि सैन्यात भरती होऊन तुमच्यासारखीच देशसेवा करू,” असे अभिवचन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथील अधिकाऱ्यांना दिले. या शब्दांनी उपस्थित अधिकारीही भावुक झाले. भोई प्रतिष्ठान आणि अर्धापूर तालुका मराठी पत्रकार संघ, नांदेड यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘पुण्यजागर’ प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांच्या एनडीए भेटीदरम्यान हा हृदयस्पर्शी प्रसंग घडला. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण भोई प्रतिष्ठान आणि अर्धापूर तालुका मराठी पत्रकार संघ गेली बारा वर्षे सांभाळत आहेत. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी या विद्यार्थ्यांसाठी जगप्रसिद्ध लष्करी प्रशिक्षण संस्था एनडीए, पुणे येथे शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली होती. सुमारे सात हजार एकर परिसरात विस्तारलेल्या एनडीएमध्ये भूदल, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांचे प्रशिक्षण दिले जाते. येथे विद्यार्थ्यांनी विमान, हेलिकॉप्टर, ड्रोन, जहाजे, अश्वदळ तसेच विविध लष्करी साधने प्रत्यक्ष पाहिली. देशसेवेसाठी सैनिकांना दिल्या जाणाऱ्या कठोर शारीरिक, मानसिक आणि भावनिक प्रशिक्षणाची माहिती देणारी चित्रफीतही विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली. एनडीएच्या प्रशस्त आणि अत्याधुनिक मेसमध्ये एका टेबलावर ठेवलेले जेवणाचे ताट आणि समोरची रिकामी खुर्ची पाहून विद्यार्थ्यांनी चौकशी केली. त्यावेळी युद्धात बेपत्ता झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ रोज हे ताट ठेवले जाते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हे ऐकून सर्वजण भावनाविवश झाले. उपक्रमाचे संयोजक, भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य युवा धोरण समितीचे मानद सदस्य प्रा. डॉ. मिलिंद भोई यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता देशप्रेम, देशसेवा आणि सैन्याविषयी आदर निर्माण व्हावा, या उद्देशाने या भेटीचे आयोजन करण्यात आले. “सेवा परमो धर्मः (Service Above Self)” हा सैन्याचा मंत्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे हाच या उपक्रमामागील हेतू असल्याचे त्यांनी नमूद केले. दुर्गा क्षीरसागर आणि नियती इंगोले या विद्यार्थिनींनी एनडीए परिसरातील पवित्र माती सोबत घेत देशसेवेची शपथ घेतली. “एक दिवस आम्हीही एनडीएमध्ये प्रवेश मिळवू,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या उपक्रमासाठी निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, एअर कमांडर आर. एम. श्रीधरन, ब्रिगेडियर विनोद कुमार, लेफ्टनंट कर्नल दलजीत सिंग यांच्यासह अनेक मान्यवरांचे सहकार्य लाभले.

पीएमपीच्या सर्व बसमध्ये बसणार सीसीटीव्ही कॅमेरे विनयभंग, चोरी व अपघातांवर नियंत्रणासाठी निर्णय; रोहन सुरवसे-पाटील यांच्या मागणीला यश

Newsworldmarathi Pune :पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसमधील विनयभंग, चोरी आणि अपघातांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सर्व बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे-पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर पीएमपीएमएल प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. सुरवसे-पाटील यांनी एप्रिल २०२६ च्या पहिल्या आठवड्यात पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांना लेखी निवेदन देऊन सर्व बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी केली होती. त्यानंतर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत उर्वरित बसमध्येही ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला. सध्या पीएमपीच्या ताफ्यातील सुमारे ३० ते ३५ टक्के बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नसल्याचे सुरवसे-पाटील यांनी सांगितले. त्यामुळे बसमधील गुन्हेगारी घटनांमध्ये आरोपींची ओळख पटविणे आणि पुरावे गोळा करणे कठीण जात होते. विशेषतः गर्दीच्या वेळेत महिलांशी गैरवर्तनाच्या घटना घडत असून, पुराव्याअभावी कारवाईत अडचणी येत होत्या. सध्या वातानुकूलित तसेच नव्याने दाखल झालेल्या बसमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा उपलब्ध आहे. आता उर्वरित जुन्या बसमध्येही टप्प्याटप्प्याने कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तसेच बसमधील सीसीटीव्ही फुटेजचे प्रभावी निरीक्षण व देखरेख करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांनी प्रवासी सुरक्षेला प्राधान्य देत हा निर्णय घेतल्याबद्दल सुरवसे-पाटील यांनी त्यांचे आभार मानले. या निर्णयामुळे बसमधील विनयभंग, चोरी आणि इतर गैरप्रकारांवर आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.